नौजवान भारत सभा (नौभास) देशातील अनेक राज्यांमध्ये भगतसिंहांचा, आपल्या क्रांतिकारी शहिदांचा वारसा देशातील तरुण पीढीपर्यंत पोहचवण्याचे काम गेल्या दोन दशकापासून करत आहे.
नौभास च्या क्रांतिकारी सुधार कार्यांपैकी एक महत्वाचे सुधार कार्य जे नौजवान भारत सभा, मुंबई द्वारे सुरु आहे ते म्हणजे शहीद राजगुरू शिक्षण सहायता केंद्र चालवणे ज्यात आठवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी नियमितपणे अभ्यास वर्ग चालवले जातात. शहीद राजगुरू शिक्षण सहायता केंद्र हे मानखुर्द, मुंबई च्या साठेनगर नावाच्या कामगार वस्तीमध्ये चालवले जाते. सोमवार ते शनिवार संध्याकाळी 6 से 8 या वेळेत हे अभ्यासवर्ग घेतले जातात.
2025 – 26 च्या शैक्षणिक वर्षासाठी मे महिन्यापासूनच हे अभ्यासवर्ग सुरु केले गेले आहेत, ज्यात विद्यार्थ्यांचा एकंदरीत शैक्षणिक स्तर पाहता सर्वांसाठी मूलभूत गणित आणि भाषा यांवर विशेष भर देण्यात आला. ज्यामुळे गणिताच्या आणि भाषेच्या मूलभूत संकल्पना समजण्यास विद्यार्थ्यांना मदत मिळाली. भूमिती विषयावर विशेष सत्र घेण्यात आहे ज्यात कागदापासून विविध आकार बनवणे आणि भूमितीच्या सामान्य संकल्पना समजण्यास विद्यार्थ्यांना मदत मिळाली. त्यासोबतच, विद्यार्थ्यांमध्ये सभोवतीची भौगोलिक परिस्थिती जाणून घेण्यास कुतूहल निर्माण कारण्याहेतू लाव्हा कसा बाहेर येतो, जमिनीचा उद्रेक कसा होतो यावर दुसरे विशेष सत्र घेण्यात आले. एकंदरीत पाहता शहीद राजगुरू शिक्षण सहायता केंद्रासाठी साठेनगरातील विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. विद्यार्थ्यांची संख्यासुद्धा हळूहळू वाढत चालली आहे. सध्या 30 ते 40 विध्यार्थी नियमितपणे अभ्यासवर्गात येत आहेत.
आम्ही मानतो की सर्वांना निःशुल्क, समान आणि दर्जेदार शिक्षण देणे ही सरकारची जबाबदारी आहे; परंतु सरकार शिक्षणक्षेत्रातील आपल्या जबाबदारी विसरले आहे. आजच्या नफेखोर भांडवली व्यवस्थेमध्ये शिक्षण एक बाजारू माल बनले आहे. अशा परिस्थितीत आपण ‘निःशुल्क, समान आणि दर्जेदार शिक्षण’ मिळवण्यासाठी संघर्ष उभारण्याची गरज आहे, आणि त्यासोबतच आपण प्रत्येक व्यक्तीपर्यंत शिक्षण पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. समाजाकडून आपल्याला मिळालेले ज्ञान समाजापर्यंत परत नेणे हे आपले कर्तव्य आहे.
आम्ही सर्व न्यायप्रिय तरुणांना आवाहन करतो की, त्यांनी प्रत्येक व्यक्तीपर्यंत निःशुल्क, समान आणि दर्जेदार शिक्षण पोहोचवण्याच्या संघर्षात आपली भूमिका सुनिश्चित करावी.
नौजवान भारत सभेद्वारे संचालित शहीद राजगुरू शिक्षण सहायता केंद्रामध्ये शिकवण्यासाठी पुढे या!
उद्याची नवीन पीढी घडवण्यात तुमच्या वेळेचे आणि श्रमाचे योगदान द्या!
शहीद राजगुरू शिक्षण सहायता केंद्राचे स्वयंसेवक व्हा!!
