पहलगाम दहशतवादी हल्ला : काश्मीरमध्ये शांतता स्थापित करण्याचे सारे दावे खोटे!

पर्यटक आणि सामान्य नागरिकांना संरक्षण देणाऱ्या यंत्रणेच्या अकार्यक्षमतेसाठी जबाबदार कोण?
पहलगाममधील अतिरेकी हल्ल्याचा बहाणा करून देशाला धर्मवादाच्या आगीत झोकून देण्याचा संघपरिवाराचा डाव हाणून पाडा!
साथींनो, 22 एप्रिल रोजी काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम या पर्यटनस्थळी दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात 27 जणांचा मृत्यू झाला तर अनेक जखमी झाले. नौजवान भारत सभा या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध करते. या हल्ल्यात भारतातील विविध राज्यांचे नागरिक आणि एक परदेशी नागरिकही ठार झाला आहे. हल्ल्याची जबाबदारी ‘द रेझिस्टन्स फ्रंट’ नावाच्या अतिरेकी गटाने घेतली आहे, जो पाकिस्तानी अतिरेकी संघटना लश्कर-ए-तोयबाशी संबंधित आहे, असे मानले जाते. हल्ल्यादरम्यान पर्यटकांच्या जीवाच्या रक्षणासाठी आणि त्यांना सुरक्षित पोहोचवण्यासाठी काश्मीरमधील घोडेवाले, हॉटेलवाले, ऑटोचालक आणि इतर सामान्य नागरिक झटले. त्यांनी पर्यटकांना पैशाशिवाय मदत केली. आदिल हुसेन नावाचा घोडेवाला पर्यटकांचे प्राण वाचवताना दहशतवाद्यांच्या गोळीला बळी पडला. पर्यटकांनीही कबूल केले की छोट्या-मोठ्या व्यवसायातील गरीब काश्मीरी लोक त्यांना मदत करण्यासाठी पुढे सरसावले. या दहशतवादी हल्ल्याची काश्मीरमधील सामान्य जनतेनेसुद्धा तीव्र निंदा केली आहे. लोकांनी रस्त्यावर उतरून विरोध दर्शविला आणि या हल्ल्याला काश्मीरियतवर हल्ला म्हटले आहे. याच्या विरोधात काश्मीरमधील मशिदींतून घोषणा करण्यात आल्या, तर सर्व राजकीय पक्षांनीही या कृत्याचा निषेध केला आहे. भारतीय मुख्य धारेच्या मीडियाने काश्मीरी लोकांची जी पूर्वग्रहदोषीत छबी बनवली आहे, ती सोशल मीडियावरील बातम्या, फोटो आणि व्हिडिओंमुळे धुळीत मिसळली गेली आहे. तरीही या हल्ल्यामुळे काश्मीरमधील पर्यटनावर नक्कीच वाईट परिणाम होतील. त्यासोबतच, या हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित करण्याचे केंद्र सरकारचे सर्व दावे खोटे ठरले आहेत.
पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरसह संपूर्ण देशातील न्यायप्रिय जनता दुःखी आणि रागात आहे. पण एक विषारी गट आहे ज्याच्या चेहऱ्यावर या अमानुष कृत्यानंतरही धूर्त हास्य झळकत आहे. संघ परिवार आणि भाजपशी जोडलेल्या विविध लंपट गटांचे चेहरे या दिवसांत खुश दिसत आहेत. त्यांना मुस्लिमांवर हल्ला करण्याची आणखी एक संधी मिळाली आहे. विविध राज्यांतून काश्मीरी विद्यार्थी आणि मुस्लिम कामगारांवर हल्ल्यांच्या बातम्या येत आहेत. धर्माच्या नावाने होणाऱ्या संघी दहशतवादाच्या सर्व घटनांकडे डोळेझाक करून झोपण्याचे सोंग करणारा गोदी मीडिया या दहशतवादी हल्ल्याला धर्मवादी रंग देण्यात गुंतला आहे. भाजपने पाळलेला आयटी सेल विविध प्रकारच्या खोट्या बातम्या प्रसारित करण्यात रमला आहे. त्याद्वारे या हल्ल्याच्या विरोधात उभा राहिलेल्या प्रत्येक काश्मीरीला दहशतवादी ठरवण्यात आणि देशातील प्रत्येक मुस्लिमाला संशयाच्या चौकटीत ढकलण्यात येत आहे. पाकिस्तानचे भूत उभे करून प्रत्येक काश्मीरी आणि मुस्लिमाला हिंदुस्थानचा शत्रू ठरवून त्यांच्यावर हल्ले केले जात आहेत. आम्ही देशातील प्रत्येक न्यायप्रिय विद्यार्थी, तरुण आणि सामान्य जनतेला आवाहन करतो की भाजप आणि संघ परिवाराच्या सापळ्यात अडकण्यापासून वाचले पाहिजे. यांच्या नेत्यांची मुले परदेशात शिकत आहेत आणि चांगल्या पदांवर स्थायिक झाली आहेत, पण बेरोजगारीचा मार सहन करणाऱ्या आपल्या भावंडांना आणि मुलामुलींना हे लोक नष्ट करण्यास मुळीच संकोच करणार नाहीत. म्हणून मित्रांनो, शिक्षण, रोजगार, आरोग्यसेवा आणि आवास यासारख्या आपल्या मूलभूत हक्कांसाठी एकत्र या; धर्मवादी फॅशिस्टांच्या प्रचाराला बळी पडून आपल्याच भावंडांशी वैर बाळगू नका. काश्मीरी आणि गरीब, स्थलांतरित मुस्लिमांवर हल्ले करणाऱ्या गुंडांचा आपल्या एकतेच्या बळावर सामना करा, कारण अन्यायाला मूकपणे पाहणे म्हणजे अन्यायात सहभागी होण्यासारखेच आहे.
मित्रांनो, काश्मीरमध्ये सुरू असलेल्या दहशतवादी हल्ल्यांची जबाबदारी मोदी सरकारने घेतली पाहिजे. काश्मीर हे जगातील सर्वात जास्त सैन्यीकृत ठिकाणांपैकी एक आहे. असे असूनही पुलवामा सारखी घटना कशी घडू शकते, ज्यामध्ये चाळीस सैनिक ठार झाले? आणि आता पहलगाम सारखी घटना कशी घडू शकते, ज्यामध्ये 27 निरपराधी लोकांचे प्राण गेले!? जर या हल्ल्यामागे खरोखर पाकिस्तानच हात असेल तर सीमा ओलांडून घुसखोरी कशी होऊ शकते?
मोदी सरकारने त्त्यांची छप्पन इंची छाती फुगवून नोटबंदीच्या सोबत “दहशतवादाची कंबर मोडण्याचा” दावा केला होता. त्यानंतर काश्मीरबद्दलचे कलम 370 आणि 35-ए काढून टाकण्यात आले, जम्मू-काश्मीरचा राज्याचा दर्जा हिरावून घेण्यात आला, डोमिसाइल नियमांमध्ये बदल करण्यात आले, काश्मीरच्या जनतेवर लाठीचार्ज करण्यात आला. पण त्यानंतरही “दहशतवादाची कंबर मोडली” असे दिसत नाही. निश्चितच जिथे न्याय नाही, तिथे शांतता असू शकत नाही. काश्मीरच्या सामान्य जनतेने दहशतवादाचा अंधारमय काळ पाहिला आहे आणि ती कधीही याची समर्थक नव्हती. पण या दडपशाहीनंतर निर्माण झालेला असंतोष विविध प्रकारच्या कट्टरवादी दहशतवादी संघटनांना वाढण्याची जमीन तयार करतो आहे.
साथींनो, पुलवामा प्रकरणाप्रमाणेच पहलगाम हल्ल्याच्या बाबतीतही खऱ्या दहशतवाद्यांपर्यंत पोहोचण्याची शक्यता फारच कमी आहे. पण हे नक्की आहे, की या घटनेचा येणाऱ्या बिहार आणि बंगालमधील निवडणुकांत मोठ्या प्रमाणात वापर होईल. कारगिल युद्धापासून ते काश्मीरमध्ये झालेल्या सर्व मोठ्या हल्ल्यांची वेळापत्रके आणि निवडणूक वेळापत्रक यांची तुलना केल्यास, काहीतरी गडबड असल्याचे दिसून येईल. फार दिवस झाले नाहीत, जेव्हा देवेंद्र सिंह नावाच्या डीएसपी रँकच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याला हिझ्बुल मुजाहिद्दीनच्या बक्षीसी दहशतवाद्यासोबत पकडण्यात आले होते. पुलवामा हल्ल्यानंतर सैनिकांच्या मृत्यूच्या नावाखाली जिंगोइझम, अंधराष्ट्रवाद आणि युद्धोन्माद भडकवून मतांसाठी भीक मागणाऱ्यांची खरी वृत्ती कोणापासून लपलेली नाही. ८० च्या दशकानंतर काश्मीरमध्ये जेव्हा-जेव्हा दहशतवादाचे विष पसरले आहे, तेव्हा-तेव्हा याचा सर्वात मोठा फायदा धर्मवादी फॅशिस्टांनीच उठवला आहे. आणि याचा सर्वात जास्त तोटा काश्मीरमधील सर्व जाती-धर्माच्या लोकांना सोसावा लागला आहे.
आम्ही मागणी करतो की पहलगामच्या दहशतवादी हल्ल्याची पूर्ण तपासणी व्हावी. या हल्ल्यात मृत पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना योग्य मोबदला द्यावा आणि जखमी झालेल्यांना उत्तम वैद्यकीय सेवा पुरवली जावी. याचबरोबर, काश्मीरला भेट देणाऱ्या पर्यटकांना, तेथील सरकारी कर्मचाऱ्यांना, प्रवासी मजुरांना आणि सर्व सामान्य नागरिकांना जीवन-मालमत्तेच्या सुरक्षेची हमी मिळावी. देशभरातील विविध राज्यांमध्ये शिक्षण घेत असलेल्या काश्मीरी विद्यार्थ्यांना आणि रोजगारासाठी जाणाऱ्या मजुरांना आवश्यक संरक्षण दिले जावे. काश्मीरमध्ये खरी शांतता तेव्हाच प्रस्थापित होऊ शकते, जेव्हा काश्मीरी जनतेला त्यांचे सर्व राजकीय आणि आर्थिक हक्क प्राप्त होतील.
– नौजवान भारत सभा

Related posts

Leave a Comment

nineteen − 17 =