23 मार्च शहीद दिवसानिमित्त दिशा विद्यार्थी संघटना व नौजवान भारत सभेतर्फे पुण्यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाचे व रॅलीचे आयोजन!

शहीद क्रांतिकारकांचा क्रांतिकारी वारसा जिंदाबाद! शहीद भगतसिंह, सुखदेव, राजगुरू अमर रहे!
23 मार्च शहीद दिवसानिमित्त दिशा विद्यार्थी संघटना व नौजवान भारत सभेतर्फे पुण्यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाचे व रॅलीचे आयोजन!

आज 23 मार्च. आजच्याच दिवशी ब्रिटिश साम्राज्यवादी सत्तेने भारतीय क्रांतीचे अग्रदूत असणाऱ्या भगतसिंह, सुखदेव व राजगुरू या तीन महान क्रांतिकारकांना फाशी देऊन भारतीय क्रांतिकारी आंदोलनाची अपरिमित हानी केली होती. जगभरातील क्रांतिकारी आंदोलनातून आणि रशियात झालेल्या महान ऑक्टोबर समाजवादी क्रांतीतून प्रेरणा घेत या क्रांतिकारकांनी भारतीय जनतेला ब्रिटिश साम्राज्यवादी सत्तेच्या आणि भांडवलशाहीच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी आपल्या जीवाचे बलिदान दिले. मात्र भारतीय जनतेला ब्रिटिश गुलामीतून तर स्वातंत्र्य मिळाले, परंतु आजही भांडवलदार वर्गाच्या शोषणकारी सत्तेखाली देशातील जनता भरडली जात आहे. ह्या शहिदांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी या महान शहिदांचा क्रांतिकारी वारसा पुढे घेऊन जाणे कधी नव्हे एवढे गरजेचे झाले आहे. हाच वारसा पुढे घेऊन जात आणि रोजगार, शिक्षण, आरोग्य, आवास यांसारख्या जनतेच्या खऱ्या मुद्द्यांवर संघर्ष करत जनतेला व तरुणांना संघटित करण्याचे काम नौजवान भारत सभा करत आहे. आज 23 मार्च शहीद दिवसानिमित्त पुण्यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. “कारवा चलता रहेगा” या क्रांतिकारी गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. सुरुवातीला साथी रवी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करत थोडक्यात शहीद क्रांतीकारकांचे जीवन व क्रांतिकारकांच्या विचारांची प्रासंगिकता याची मांडणी केली. यानंतर गौहर रजा दिग्दर्शित “इन्कलाब” या माहितीपटाचे प्रदर्शन करण्यात आले. दिशा विद्यार्थी संघटनेतर्फे साथी मिराज यांनी आजच्या विद्यार्थी चळवळी समोरील आव्हानांची त्यांच्या वक्तव्यात मांडणी केली. कुठलेही ज्ञान हे सामाजिक संपत्ती आहे आणि त्यामुळेच विद्यार्थी म्हणून विद्यार्जन करत असताना सामाजिक प्रश्नांबाबत विचार करणे आणि त्यावर काम करणे हे विद्यार्थ्यांचे कर्तव्य आहे. तसेच कुठलाही विद्यार्थी सामाजिक वास्तवापासून आणि त्याच्या समस्यांपासून विलग राहू शकत नाही, त्यामुळेच समाज बदलण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांच्या समस्या सामूहिकरीत्या सोडवण्यासाठी विद्यार्थ्यांनी पुढे येण्याची गरज आहे असे मत साथी मिराज यांनी मांडले. त्यानंतर साथी सुस्मित यांनी देशातील आजच्या परिस्थितीवर भाष्य केले. देशात महागाई गगनाला भिडलेली आहे. वरच्या एक टक्के लोकसंख्येकडे 40 टक्के व खालच्या 50% जनतेकडे केवळ तीन टक्के संपत्ती एवढ्या प्रचंड प्रमाणात विषमता वाढलेली आहे. महिला विरोधी व जातीय अत्याचार यामध्ये दिवसेंदिवस वाढच होत आहे. आज देशामध्ये फॅसिस्ट शक्ती सत्तेत असताना तरुणांची विशेष जबाबदारी आहे की त्यांनी कामगार कष्टकऱ्यांना संघटित करत या समाजविरोधी शक्तींचा सामना केला पाहिजे. शेवटी विविध प्रश्नांवर चर्चासत्र आयोजित करून व क्रांतिकारी गीताने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. नंतर शहिदांचे विचार लोकांपर्यंत घेऊन जाण्याच्या उद्देशाने गांजवे चौक ते मांगीरबाबा चौकापर्यंत पदयात्रा करण्यात आली.

Related posts

Leave a Comment

five × 4 =