पुण्यातील अतिवृष्टी ग्रस्त लोकांच्या स्थितीवर पुढाऱ्यांचे चीड आणणारे वर्तन

पुण्यातील अतिवृष्टी ग्रस्त लोकांच्या स्थितीवर पुढाऱ्यांचे चीड आणणारे वर्तन
काल 15 ऑक्टोबर’20 रोजी आय.बी.एन. लोकमत चॅनेलने पुण्यातील विविध पक्षांच्या नेत्यांना पुण्यातील आणि विशेषत: आंबिलओढा परिसरातील पुर परिस्थिती बद्दल चर्चेसाठी बोलावले होते. ही चर्चा खालील लिंक वर बघायला मिळू शकते. https://youtu.be/_R9plWCb4do यामध्ये नौजवान भारत सभा आणि स्थानिक पुरग्रस्त नागरिकांनी सुद्धा सहभाग घेतला आणि सुरुवातीलाच समस्या मांडल्या.
सर्वच पक्षांचे नेते असल्यामुळे उपायांबद्दल निश्चित काहीतरी ऐकायला मिळेल अशी जर तुमची अपेक्षा होती तर फक्त भ्रमनिरास मिळेल कारण या चर्चेमध्ये सर्व पुढाऱ्यांचे वागणे फक्त चालढकलण्याचे आणि जबाबदारी टाळण्याचे किंबहुना जबाबदारी जनतेवर ढकलण्याचेच होते.
चर्चेमध्ये सत्ताधारी भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना या सर्वांनी फक्त प्रश्नाला एकमेकावर ढकलण्याचे काम केले. पुणे महानगरपालिकेत सत्तेत असलेला भाजप या पुरस्थितीला आणि नागरिकांच्या दुरावस्थेला कारणीभूत आहे असे कॉंग्रेसवाले म्हणत होते तर राष्ट्रवादी व कॉंग्रेसचे राज्य अनेक दशके राहिले तरी त्यांनी काही केले नाही आणि त्यांची ‘पापे’ आम्ही ‘लगेच’ कशी फेडणार आणि राज्य सरकार अडथळे आणत आहे अशी भाजपची भुमिका होती. सर्व चर्चा महानगरपालिकेच्या गंभीर असंवेदनशीलता,जनतेच्या दुरावस्थेबद्दल आणि अधिकारांबद्दल न होता फक्त ‘अतिक्रमणां’बद्दल झाली पाहिजे असाच प्रयत्न सर्व जण करत होते.
या परिसरामध्ये हजारोंच्या संख्येने जे कामगार-कष्टकरी राहतात ते पुणे शहर चालवण्यात, देशातील संपत्तीच्या निर्मितीमध्ये मोठे योगदान देतात. देशामध्ये प्रत्येकाला घरकुलाचा अधिकार असला पाहिजे कारण आपण या देशाला योगदान देणारे, कष्ट करणारे नागरिक आहोत आणि सन्मानाने जगणे हा आपला अधिकार असलाच पाहिजे. परंतु या भांडवली सत्तापिपासू पक्षांना हे सिद्ध करण्यात जास्त रस होता की आंबिलओढा परिसरात बेकायदेशिरपणे लोक राहतात आणि यांचे नाकर्तेपण नाही तर तथाकथित ‘बेकादेशीर’ घरे हीच मोठी समस्या आहे. स्वत: हजारो स्वेयर फूटांच्या बंगल्यात राहणाऱ्या, शहरातील सर्व नाले आणि डोंगरांवर श्रींमंतांसाठी बिल्डींगा बांधून नियमित करवणाऱ्या, अनेक जमिनी बिल्डरांच्या घशात घालणाऱ्या आणि पुणे शहरातील घरांचे दर लाखो-कोटींना नेवून ठेवणाऱ्या या बिल्डरधार्जिण्या नेत्यांसाठी याच देशाचे कामगार-कष्टकरी नागरिक मत मिळवण्याच्या कामाचे आहेत, पण घर देण्यासाठी मात्र ते ‘बेकायदेशीर’ ठरतात! यातून यांचे खरे जनविरोधी चरित्र आपण ओळखले पाहिजे.
यांनी टीव्हीवर एकमेकांना दाखवायला भांडण केले पण वास्तवात मात्र सर्व मिळून मनपाच्या आर्थिक मुद्यांवर निर्णय घेणाऱ्या स्थायी समिती मध्ये एकत्र असतात आणि समितीद्वारे बिल्डर-ठेकेदारांच्या नफ्याकरिता पुणे शहर चालवत आहेत हेच सत्य आहे. जर यांची खरोखर इच्छा असती तर चर्चेमध्ये सर्वांनी मिळून लागलीच जनतेच्या हितासाठी काहीतरी योजनांवर चर्चा केली असती, पण टीव्हीवर यांना मिळणारा वेळ फक्त दुसरा कसा ‘जास्त’ वाईट आहे हे सांगण्यात घालवणारे हे सर्वपक्षीय़ नेते आपापसात मिळालेले आहेत, आणि जनतेशी यांना काही देणेघेणे राहिलेले नाही. घरकुलाचा, आवासाचा खरा अधिकार मिळवण्यासाठी पुर-अतिवृष्टीग्रस्त नागरिकांसमोर संघर्ष सोडून काहीही उपाय नाही हेच खरे!
– नौजवान भारत सभा, पुणे

Related posts

Leave a Comment

eight − 6 =