गदर लाटेतील 16 नोव्हेंबरच्या शहीदांना क्रांतिकारी अभिवादन!

गदर चळवळीचा क्रांतिकारी वारसा जिंदाबाद!
जुलमी ब्रिटीश सरकारने ‘लाहोर षडयंत्र प्रकरण – 1’ अंतर्गत 16 नोव्हेंबर 1915 रोजी सात गदर योद्ध्यांना फाशी दिली. त्यांचा दोष एवढाच होता की त्यांनी स्वतंत्र भारताचे स्वप्न पाहिले होते. या शहीदांपैकी एक होते कर्तारसिंह सराभा, ज्यांना वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी फाशी देण्यात आली. 16 नोव्हेंबर रोजी शहीद झालेले इतर सहा क्रांतिकारक बक्षीश सिंह, हरनाम सिंह, सुरेन सिंह, जगत सिंह, विष्णू गणेश पिंगळे, सुरेन सिंह (1) हे होते.
रोजगार आणि चांगल्या संधीच्या शोधात कॅनडा आणि अमेरिकेत गेलेल्या भारतीयांनी 15 जुलै 1913 रोजी शोषण आणि भेदभावाविरुद्ध ‘हिंदी असोसिएशन ऑफ द पॅसिफिक कोस्ट’ नावाची संघटना स्थापन केली. ही संघटना ‘हिंदुस्थान गदर’ नावाचे वृत्तपत्र काढत असे. लवकरच ही पार्टी गदर पार्टी या नावाने प्रसिद्ध झाली. गदर पार्टी 1857 च्या पहिल्या स्वातंत्र्ययुद्धापासून प्रेरित होती. इंग्रजांनी 1857 च्या पहिल्या बंडाला ‘गदर’ असे नाव दिले होते.
भारतातून ब्रिटिश राजवट उलथून टाकून अमेरिकन पद्धतीची लोकशाही प्रस्थापित करणे हा गदर पक्षाचा उद्देश होता. सोहनसिंह भकना, लाला हरदयाल, गुरदित सिंह, रहमत अली शाह, गणेश विष्णू पिंगळे यांसारखे क्रांतिकारक त्याचे पहिल्या फळीचे नेते होते.
गदर चळवळीत 200 हून अधिक लोकांनी बलिदान दिले. कर्तारसिंह सराभा हे पक्षाचे सर्वात तरुण नेते आणि संघटक होते. ते जनरल म्हणून ओळखले जायचे. भगतसिंह साराभांच्या देशभक्ती आणि धैर्याचे चाहते होते आणि त्यांना आपला प्रेरणास्त्रोत मानत होते.
बोल्शेविक पक्षाच्या नेतृत्वाखाली रशियात झालेल्या समाजवादी क्रांतीनंतर, अनेक गदरवादी नेते समाजवादाच्या तत्त्वांनी प्रभावित आणि प्रेरित झाले.
नौजवान भारत सभा देशाच्या स्वातंत्र्यासाठी जगलेल्या आणि शहीद झालेल्या महान गदर क्रांतिकारकांना अभिवादन करते. आजच्या नवीन कंपनी शासन आणि फॅसिस्ट सत्तेविरुद्धच्या संघर्षांमध्येच नव्हे तर भांडवलशाही आणि साम्राज्यवाद यांच्याविरुद्धच्या प्रत्येक लढ्यातही गदर चळवळ प्रेरणादायी भूमिका बजावेल.

Related posts

Leave a Comment

seventeen − fifteen =