मानखुर्द, मुंबई येथे 18/11/2023 रोजी बटुकेश्वर दत्त यांच्या 113 व्या जन्मदिवसानिमित्त, नौजवान भारत सभेच्या शहीद भगतसिंह वाचनालयाच्या नवीन जागेचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात शशांक यांनी केली. त्यांनी नौजवान भारत सभेचा उद्देश आणि कार्याची थोडक्यात मांडणी केली. आशय यांनी बटुकेश्वर दत्त यांच्या क्रांतिकारी जीवनाबद्दल आणि कार्याबद्दल माहिती दिली. बटुकेश्वर दत्त आणि त्यांचे साथीदार स्वातंत्र्य आणि समानतेसाठी ज्या चिकाटीने लढले, त्यांचे देशातील लोकांवरील अतूट प्रेम, त्यांचे त्यागमय जीवन अशा अनेक बाबींचा त्यांनी उलगडा केला. स्त्री मुक्ती लीग संचालित सावित्री फातिमा अभ्यास गटाच्या विद्यार्थिनी शबाना यांनी बटुकेश्वर दत्त यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात केली.

इस्रायल या दहशतवादी राज्याकडून गाझामध्ये सुरू असलेल्या नरसंहाराबाबत सुप्रीत ने वक्तव्य केले. ते म्हणाले की इस्रायल हे राष्ट्र नसून साम्राज्यवादी देशांनी त्यांच्या सामूहिक हितसंबंधांचे रक्षण करण्यासाठी समर्थन दिलेला वसाहतवादी प्रकल्प आहे. अशा अमानुष कब्ज्याचा विरोध करण्याच्या पॅलेस्टिनी लोकांच्या हक्काबद्दल ते बोलले आणि पॅलेस्टाईनच्या मुक्तीसाठी या जगातील सर्व कर्तव्यदक्ष लोकांनी आवाज उठवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. सांस्कृतिक टोळीने सादर केलेल्या गाण्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यानंतर दिल्लीच्या नौजवान भारत सभेच्या कार्यावर बनलेला एक व्हिडिओ दाखवण्यात आला. भगतसिंह आणि इतर क्रांतिकारकांच्या कार्यांना समर्पित पुस्तकांच्या स्टॉलचे विद्यार्थी आणि स्थानिक रहिवाशांनी खूप कौतुक केले. अल्पोपहार आणि चहापानाने कार्यक्रमाची सांगता झाली. त्यानंतरही वाचनालयाचे महत्त्व आणि भविष्यात काय काम करायचे याबाबत जीवंत चर्चा झाली.

ही पोस्ट वाचणाऱ्या सर्व संवेदनशील आणि पुरोगामी व्यक्तींना आम्ही आवाहन करतो की आमच्यासोबत या संघर्षात सामील व्हा आणि एका चांगल्या जगाच्या उभारणीसाठी तुमचे जीवन समर्पित करा!
