जगातील सर्वाधिक भ्रष्ट पक्ष आहे भाजप! तुरुंगात नाही, भ्रष्टाचाऱ्यांना संसदेत-मंत्रीपदी पाठवत आहे भाजप!

“ना खाऊंगा, ना खाने दूंगा” ची भाषा करणाऱ्या, भ्रष्टाचाऱ्यांना “चक्की पिसायला” तुरुंगात पाठवण्याची भाषा करणाऱ्या भाजपचे खरे चरित्र आता सर्वांसमोर उघडे पडले आहे. देशातील विविध भांडवली राजकीय पक्षातील भ्रष्टाचाराच्या चौकशीला सामोर जाणाऱ्या 25 नेत्यांना भाजपत सामील करून घेऊन आणि त्यापैकी 23 जणांना चौकशीतून दिलासा देऊन भाजपने सिद्ध केले आहे की त्यांचे एवढेच म्हणणे आहे की “भ्रष्टाचार करा, पण भाजपत येऊन करा!”

कॉंग्रेस, राष्ट्रवादी, तृणमूल सारख्या पक्षातील नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत 2014 मध्ये मोदी सरकार सत्तेत आले. परंतु यापैकीच अनेक नेत्यांना शिक्षा देणे दूर, त्यांना सत्तापदी पोहोचवण्याचे वा त्यांचे गुन्हे माफ करण्याचे काम भाजपने केले आहे.

महाराष्ट्रातील मोदींनी “नॅचरली करप्ट पार्टी” म्हणवलेल्या राष्ट्रवादीचे अजित पवार, प्रफुल पटेल, हसन मुश्रीफ, छगन भुजबळ, शिवसेनेचे प्रताप सरनाईक, भावना गवळी, यामिनी जाधव, यशवंत जाधव, कॉंग्रेसचे कृपाशंकर सिंह, अशोक चव्हाण, अर्चना पाटील, बाबा सिद्दीकी; आसामातील कॉंग्रेसचे हेमंत बिस्वसर्मा, राजस्थानातील कॉंग्रेसच्या ज्योती मिर्धा, हरियाणा/छत्तीसगढमधील कॉंग्रेसचे नवीन जिंदल, झारखंडमधील कॉंग्रेसच्या गीता कोडा, आंध्रमधील टीडीपीचे सी एम रमेश, पंजाबमधील कॉंग्रेसचे रानिंदर सिंह (अमरिंदर सिंह यांचे पुत्र) , उत्तरप्रदेशातील समाजवादी पार्टीचे संजय सेठ, पश्चिम बंगालमधील तृणमूलचे सुवेंदू अधिकारी, सोवान चॅटर्जी, तपस रॉय, सुजाना चौधरी, गोव्यातील कॉंग्रेसचे दिगंबर कामत, तेलंगणातील वाय.एस.आर.एस.पी.च्या के गीता असे सर्व नेते भाजपमध्ये किंवा भाजपप्रणीत सरकारांमध्ये सामील झाले आहेत आणि त्यांचे गुन्हे माफ करायचे काम भाजपने केले आहे. या यादीत नारायण राणे, राधाकृष्ण विखे पाटील, एन डी तिवारी, वैशाली दालमिया, प्रबीर घोशाल, इतरही अनेक नेते जोडता येतील ज्यांचे नाव भ्रष्टाचाऱ्यांच्या यादीत पुढे राहिले आहे.

जे 25 भ्रष्टाचारी नेते भाजपत सामील झालेत, त्यापैकी 10 कॉंग्रेसचे, 4 राष्ट्रवादीचे, 4 शिवसेनेचे, 3 तृणमूल कॉंग्रेसचे, दोन तेलगू देसमचे, आणि समाजवादी पार्टी व वाय्.एस.आर.सी.पी.चा एकेक नेता आहे. यापैकी 3 जणांच्या केस बंद केल्या गेल्यात आणि 20 जणांच्या थंड्या बस्त्यात ठेवून दिल्या गेल्या आहेत. काही उदाहरणे पाहूयात.

महाराष्ट्रातील बिल्डर लॉबीचे लाडके अजित पवारांवर 70,000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप मोदींनी केल्याच्या काही दिवसातच अजित पवार फक्त भाजपच्या सत्तेत सामील झाले नाहीत तर त्यांना भाजपने उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री सुद्धा केले आणि भ्रष्टाचाराच्या उगमस्त्रोताचे खाते सुपूर्त केले. देशातील विमान वाहतूक व इतर बड्या उद्योगपतींचे लाडके राष्ट्रवादीचे प्रफुल पटेल सुद्धा याचप्रकारे दोषमुक्त झाले आणि आता सत्तेचा भाग झाले आहेत. आदर्श घोटाळ्यावरून भाजपने रान उठवले आणि आता त्याच घोटाळ्याचे अग्रणी नेते अशोक चव्हाण हे भाजपमध्ये सामील झाल्यावर त्यांना चक्क राज्यसभेवर पाठवले आहे! पश्चिम बंगालमधील तृणमूलचे सुवेंदू अधिकारी याच श्रेणीतील. त्यांच्यावर नारदा स्टिंग ऑपरेशन संदर्भातील आरोप होते. 2020 मध्ये ते भाजपत सामील झाले आणि सर्व चौकशा जणू काही स्वत:हून बिळात जाऊन लपल्या आहेत! आसमचे माजी कॉंग्रेसी नेते हेमंत बिस्व सर्मा यांच्यावर शारदा चिटफंड घोटाळ्याचे आरोप केल्यानंतर आता ते भाजपत सामील झालेत आणि त्यांना मुख्यमंत्री केले गेले आहे!

असेच नाही की भाजपला आता “धुलाई मशिन” म्हटले जाते आणि “भ्रष्टाचारी जुमला पार्टी” असा बीजेपीचा अर्थ लावला जातो! भाजप खऱ्या अर्थाने जगातील सर्वाधिक भ्रष्ट नेत्यांचा पक्ष बनलेला आहे!

उद्योगपतींना लाखो कोटींची कर्ज माफी, कर माफी, इलेक्टोरल बॉंडच्या महाघोटाळ्यामार्फत कंपन्या व आर्थिक गुन्हेगारांना हजारो कोटींची कंत्राटे देणे, त्यांचे गुन्हे माफ करणे, कर माफ करणे अशा अनेक मार्गांनी भाजप सर्वाधिक श्रीमंत पक्ष बनला आहे. भाजपची सर्वत्र असलेली पंचतारांकित कार्यालये, प्रचारात केली जाणारी कोट्यवधींची उधळपट्टी याचीच साक्ष आहेत. एकीकडे श्रमाच्या लुटीद्वारे मालक वर्गाला जनतेला लुटण्याची खुली सूट देणारा, आणि दुसरीकडे जनतेची संपत्ती धनदांडग्यांच्या घशात घालणारा भाजप त्यामुळेच भांडवलदार वर्गाचा लाडका आहे.

आपल्याच घामाच्या कमाईची भाजपने ही सर्व लूट चालवली आहे, आणि आपल्याला महागाई, बेरोजगारीच्या रोज भडकत चाललेल्या आगीत ढकलले आहे. नौजवान भारत सभा या लुटीविरोधात चालू असलेल्या देशव्यापी भगतसिंह जनअधिकार यात्रेत सामील होण्याचे आणि या भ्रष्टाचारी पक्षाला सत्तेतून उखडून फेकण्याचे जनतेला आवाहन करत आहे.

Related posts

Leave a Comment

four × 5 =