अस्पृश्यता समस्या
भगत सिंह
काकीनाडा येथे १९२३ चे काँग्रेस अधिवेशन झाले. आजच्या अनुसूचित जाती, ज्यांना त्या काळी अस्पृश्य म्हटले जायचे, त्यांना हिंदू आणि मुसलमान संस्थांमध्ये विभागून देण्याची सूचना महंमद अली जीना यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात केली. हा वर्गभेद पक्का करण्यासाठी हिंदू आणि मुसलमान श्रीमंत लोक पैसा द्यायला तयार होते.
या मुद्द्यावर सर्वत्र चर्चा होत असतानाच्या त्या काळातच भगतसिंह यांनी अस्पृश्यता समस्या नामक हा लेख लिहिला. या लेखात श्रमिक वर्गाची शक्ती आणि मर्यादा यांचा अंदाज घेऊन त्याच्या प्रगतीसाठी ठोस सूचना करण्यात आल्या आहेत. भगतसिंह यांचा हा लेख जून १९२८ च्या ‘किरती’च्या अंकात विद्रोही या नावाने प्रकाशित झाला होता.
आपल्या देशासारखी दुर्दशा इतर कोणत्याही देशाची झालेली नाही. इथे अनेक अजब प्रश्न निर्माण होत राहतात. यापैकी एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न म्हणजे अस्पृश्यता समस्या. समस्या ही आहे की, 30 कोटी लोकसंख्या असलेल्या देशात 6 कोटी लोकांना अस्पृश्य मानले जाते. त्यांच्या केवळ स्पर्शानेदेखील धर्म भ्रष्ट होतो. त्यांनी मंदिरात प्रवेश केल्यास देव-देवता नाराज होतात! त्यांनी विहिरीतून पाणी शेंदल्यास विहीर अपवित्र होते. हे प्रश्न विसाव्या शतकात उपस्थित होत आहेत, हे ऐकूनदेखील लाज वाटते.
आपला देश खूपच अध्यात्मवादी आहे, पण माणसाला माणसाचा दर्जा देतानासुद्धा आपण कां कू करतो. दुसरीकडे पूर्णत: भौतिकवादी मानला जाणारा युरोप अनेक शतकांपासून ‘इन्कलाब’चा आवाज बुलंद करत आला आहे. त्यांनी अमेरिका आणि फ्रेंच क्रांतीच्या वेळेसच समानतेची घोषणा केली होती. आज रशियानेदेखील सर्व प्रकारच्या भेदभावांना तिलांजली देऊन क्रांतीसाठी कंबर कसली आहे. आपण मात्र सतत आत्मा-परमात्म्याच्या अस्तित्वाची चिंता आणि जोरदार वादविवादात गुरफटून विचारतो आहेत, की अस्पृश्यांना जानवे दिले जाईल का? त्यांना वेदशास्त्रे वाचण्याचा अधिकार आहे की नाही? आपण अशी तक्रार करतो की, परदेशात आपल्याला चांगली वागणूक दिली जात नाही, इंग्रज सरकार आपल्याला इंग्रजांप्रमाणे समान वागणूक देत नाहीत; पण अशी तक्रार करण्याचा काही अधिकार आपल्याला आहे का?
मुंबई कौन्सिलचे सदस्य असलेले सिंधमधील एक मुस्लीम विद्वान श्री. नूर मोहंमद यांनी 1926 मध्ये या संदर्भात म्हटले होते – “If the Hindu society refuses to allow other human beings, fellow creatures so that to attend public schools, and if…the president of local board representing so many lakhs of people in this house refuses to allow his fellows and brothers the elementary human right of having water to drink, what right have they to ask for more rights from the bureaucracy? Before we accuse people coming from other lands, we should see how we ourselves behave toward our own people… How can we ask for greater political rights when we ourselves deny elementary rights of human beings.’’
ते म्हणतात की, “जेव्हा तुम्ही एखाद्या माणसाला पिण्यासाठी पाणी देण्यास नकार देता, जेव्हा तुम्ही त्याला शाळेत प्रवेश नकारता, तेव्हा तुम्हाला स्वत:साठी अधिक अधिकार मागण्याचा काय अधिकार आहे? जेव्हा तुम्ही दुसऱ्या माणसाला समान अधिकार द्यायलाही नकार देता, तेव्हा तुम्हाला जादा राजकीय अधिकार मागण्याचा हक्क कसा काय पोचतो?
मुद्दा अगदी योग्य आहे. परंतु ही गोष्ट एक मुसलमान म्हणतो म्हणून हिंदु म्हणतील की, तो त्या अस्पृश्यांना मुसलमान बनवून आपल्यात सामील करून घेऊ पाहतोय!
जर तुम्ही त्यांना असेच पशूहूनही हीन समजत राहाल, तर ते नक्कीच दुसऱ्या धर्मांमध्ये सामील होऊन जातील, जिथे त्यांना जास्त अधिकार मिळतील, जिथे त्यांच्याशी माणसासारखा व्यवहार केला जाईल. मग ख्रिश्चन आणि मुसलमान हे हिंदु समाजाची हानी करतात, असे म्हणणे निरर्थक ठरेल.
किती स्पष्ट म्हणणे आहे हे, पण ते ऐकून सगळ्यांचा तडफडाट होतो. हिंदूंनाही अगदी हीच काळजी वाटते. सनातनी पंडितसुद्धा या मुद्द्यावर काही ना काही विचार करू लागले आहेत. मोठे युगप्रवर्तक म्हणवले जाणारेही यात मधेमधे सामील झाले. पाटण्यात लाला लजपतराय यांच्या अध्यक्षतेखाली हिंदू महासभेचे संमेलन झाले. त्या वेळी या विषयावर गरमागरम चर्चा झाली. चांगलीच खडाजंगी झाली. लाला लजपतराय अस्पृश्यांची बाजू घेणारे जुने समर्थक आहेत. प्रश्न हा होता की, अस्पृश्यांना यज्ञोपवित (जानवे) घालण्याचा अधिकार आहे किंवा नाही; तसेच त्यांना वेदशास्त्रांचा अभ्यास करण्याचा अधिकार आहे का? मोठमोठे समाजसुधारक यावर रागाने लाल झाले; पण लालाजींनी या दोन गोष्टींवर सर्वांची सहमती घडवली व हे मान्य करून हिंदू धर्माची लाज राखली. नाही तर विचार करा, किती लाजिरवाणी गोष्ट झाली असती ती! कुत्रा आपल्या मांडीवर बसू शकतो. आपल्या स्वयंपाकघरात तो बिनदिक्कत फिरू शकतो; पण एका माणसाचा आपल्याला स्पर्श झाला, की लगेच धर्म भ्रष्ट होतो. आज मालवीयजींसारखे मोठे समाजसुधारक, जे स्वत:ला अस्पृश्यांचे कैवारी आणि न जाणो काय काय समजतात; ते आधी एका भंग्याच्या हस्ते गळ्यात हार घलून घेतात, पण नंतर मात्र कपड्यासहित स्नान केल्याशिवाय स्वत:ला अपवित्र समजतात. काय चलाखी आहे! मंदिर हे सर्वांवर प्रेम करणाऱ्या परमेश्वराची पूजा करण्यासाठी आहे, पण तिथे अस्पृश्य गेले तर ते अपवित्र होते! परमेश्वराचा कोप होतो! घरात जर ही दशा असेल, तर आपण बाहेर समानतेच्या नावाने संघर्ष करणे कितपत योग्य दिसते? आपली ही वागणूक म्हणजे देखील कृतघ्नपणाचा कळसच आहे. जे लोक अत्यंत कष्टाची कामे करून आपल्याला सुखसोयी पुरवितात, त्यांनाच आपण झिडकारतो. पशूंची आपण पूजा करू शकतो, पण माणसाला जवळही बसवू शकत नाही.
आज या प्रश्नावर खूप ओरड होते आहे. अशा प्रकारच्या विचारांवर आजकाल अधिक लक्ष दिले जात आहे. देशात ज्या रीतीने मुक्तीची भावना विकसित होत आहे, त्यात धर्मवादी राजकारणामुळे इतर कोणता फायदा होवो न होवो; पण एक फायदा असा झाला आहे की अधिक अधिकारांची मागणी करण्यासाठी प्रत्येकाला आपापल्या समाजाची संख्या वाढविण्याची चिंता पडली आहे. मुसलमानांनी यावर जरा अधिकच भर दिला आहे. यामुळे हिंदूंच्या अहंभावाला धक्का बसला आहे. यातूनच स्पर्धा वाढली. तंटेबखेडेदेखील झाले. हळूहळू शिखांमध्येसुद्धा दलितांची जानवी उतारण्यासाठी व केस कापण्याच्या प्रश्नावरून तंटे होऊ लागले. आता तिन्ही समाज अस्पृश्यांना आपापल्या गोटात ओढू लागले आहेत. त्याबद्दल बराच गदारोळ उडतो आहे. इकडे ख्रिस्ती मंडळी गुपचूप आपला प्रभाव वाढवत आहेत. चला, या सगळ्या घडामोडींमध्ये देशाच्या दुर्भाग्याचे हे लांच्छन मात्र कमी होऊ लागले आहे!
अस्पृश्यांनी जेव्हा हे पाहिले की, त्यांच्यामुळे यांच्यामध्ये भांडणे होत आहेत आणि प्रत्येक जण त्यांना स्वत:चा ‘खुराक’ समजत आहे, तेव्हा त्यांनी विचार केला की त्यापेक्षा आपण वेगळेच संघटित का होऊ नये? हा विचार पुढे येण्यामागे इंग्रज सरकारचा हात असो वा नसो, पण हे नक्की की या प्रचारात सरकारी यंत्रणेचा बऱ्याच मोठ्या प्रमाणात हात होता. ‘आद्य धर्म मंडळ’ सारख्या संघटना या विचारांच्या प्रचाराचाच परिपाक आहेत.
आणखी एक प्रश्न असा उपस्थित होतो की, या समस्येवर योग्य उपाय काय आहे? याचे उत्तर अत्यंत महत्त्वाचे आहे. सर्वात अगोदर हे मान्य केले पाहिजे की, सर्व माणसे समान आहेत आणि कोणीही जन्माने किंवा श्रम-विभागणीमुळे वेगळा नाही. म्हणजेच एखादी व्यक्ती गरीब भंग्याच्या घरी जन्मली आहे म्हणून तिने आयुष्यभर मैलाच साफ करत राहायचे व विकास होईल असे समाजातील कोणतेही काम करण्याचा तिला अधिकार नाही, हे म्हणणे निरर्थक आहे. आपल्या पूर्वज आर्यांनी त्यांच्याशी अन्यायपूर्ण व्यवहार केला. त्यांना नीच मानून तिरस्कृत केले आणि हलकी कामे करण्यास भाग पाडले. याबरोबरच त्यांनी या विरोधात बंड करू नये या चिंतेने त्यांनी पुनर्जन्माच्या तत्त्वज्ञानाचा प्रचार केला; हे तर तुमच्या पूर्वजन्मीच्या पापाचे फळ आहे, आता काय होऊ शकते? गुपचूप आहेत तसे दिवस कंठा! या पद्धतीने त्यांना सहनशीलतेचा उपदेश करून प्रदीर्घकाळ शांत ठेवले. पण त्यांनी हे मोठे पाप केले. माणसाच्या मनातील मानवतेलाच नष्ट केले. आत्मविश्वास आणि स्वावलंबनाची भावनाच नष्ट करून टाकली. अनन्वित दमन आणि अन्याय केले. आज त्या सर्वांच्या प्रायश्चित्ताची वेळ आली आहे.
याबरोबरच दुसरा आणखी एक घोटाळा झाला. लोकांच्या मनात आवश्यक कामे करण्याविषयी घृणा उत्पन्न झाली. आपण कोष्ट्यांना तिरस्कृत केले. आज विणकरांना अस्पृश्य समजले जाते. यू.पी.कडे तर भोयांनाही अस्पृश्य मानले जाते. यामुळे मोठी गफलत झाली. त्यामुळे विकासाच्या मार्गात अडथळे निर्माण झाले आहेत.
या समाजघटकांना आपल्यासोबत ठेवले पाहिजे. आपण त्यांना अस्पृश्य म्हणू नये अथवा तसे समजू नये. त्यामुळे समस्या संपुष्टात येईल. याबाबत नौजवान भारत सभेने आणि काँग्रेसने अवलंबिलेली पद्धत प्रशंसनीय आहे. आजपर्यंत ज्यांना अस्पृश्य म्हटले गेले त्यांच्याकडे आपण आपल्या या पापांची क्षमा मागितली पाहिजे. आणि त्यांना आपल्यासारखेच माणूस मानले पाहिजे. त्यांच्यावर तीर्थ न शिंपडता, त्यांच्याकडून मंत्रपठण व कलमापठण करवून न घेता, त्यांची शुद्धी न करता, त्यांना आपल्यात सामील करून घेऊन; त्यांच्या हातून पाणी पिणे हीच योग्य पद्धत आहे. आपापसात ओढाओढी करणे आणि प्रत्यक्ष व्यवहारात त्यांना कोणतेही अधिकार न देणे, ही गोष्ट योग्य नाही.
गावां-गावांत जेव्हा मजुरांमध्ये प्रचारास सुरुवात झाली, त्या वेळी सरकारी लोक ‘हे भंगी – चांभारांना डोक्यावर चढवून तुमचे काम बंद पडणार’ असे सांगून शेतकऱ्यांना भडकावत होते. मग शेतकरीही तेवढ्यावर भडकून उठले. त्यांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की, जोवर गरिबांना खालचे व नीच समजून ते पायाखाली दाबून देवू इच्छितात, तोवर त्यांची स्थिती सुधारणार नाही. बऱ्याचदा असे म्हटले जाते की, ते स्वच्छ राहत नाहीत. याचे उत्तर स्पष्ट आहे – ते गरीब आहेत. गरिबीवर उपाय शोधा, उच्च कुळात जन्मलेले गरीब तरी काय कमी घाण राहतात. ते घाण काम करतात ही सबबही चालणार नाही, कारण आया मुलांची ‘शी’ स्वच्छ करतात म्हणून त्या थोड्याच भंगी किंवा अस्पृश्य होतात?
मात्र जोपर्यंत अस्पृश्य जाती स्वत:ला संघटित करणार नाहीत, तोपर्यंत हे काम होणार नाही. आमचे तर असे मत आहे की, त्यांनी स्वत:ला स्वतंत्रपणे संघटित करणे वा लोकसंख्येत मुसलमानांच्या बरोबरीचे प्रमाण असल्याने त्यांच्यासारखीच अधिकारांची मागणी करणे, हा आशादायी संकेत आहे. एक तर धार्मिक भेदभाव मुळातून नष्ट करा, नाहीतर त्यांना (अस्पृश्यांना) त्यांचे वेगळे अधिकार द्या. शाळा, कॉलेज, पाणवठे व रस्त्याचा उपयोग करण्याचे त्यांना पूर्ण स्वातंत्र्य देणे, हे नगरपरिषदा व असेंब्लीचे कर्तव्य आहे. हे केवळ तोंडी नव्हे, तर त्यांना सोबत घेऊन विहीरींवर जावे, त्यांच्या मुलांना शाळेत प्रवेश मिळवून द्यावा. पण ज्या असेंब्लीत बालविवाहाविरुद्ध सादर केलेल्या विधेयकाच्या आणि धर्माच्या नावावर हलकल्लोळ माजवला जातो, तिथे अस्पृश्यांना आपल्यात सामील करण्याचे धाडस कसे केले जाईल?
म्हणूनच आमचे असे म्हणणे आहे की, त्यांचे आपले स्वत:चे लोकप्रतिनिधी असावेत. त्यांनी स्वत:साठी जादा अधिकार मागावेत. आमचे तर स्पष्टच म्हणणे आहे की, अस्पृश्य म्हटल्या जाणाऱ्या सर्व खऱ्या लोकसेवकांनो आणि बंधुंनो, जागे व्हा! उठा! आपल्या इतिहासाकडे पहा. गुरू गोविंदसिंहांच्या फौजेची खरी शक्ती तुम्हीच होता! छत्रपती शिवाजी महाराज तुमच्या जोरावरच सारे काही करू शकले. त्यामुळेच त्यांचे नाव आजही घेतले जाते. तुमची बलिदाने सुवर्णाक्षरांमध्ये लिहिलेली आहेत. तुम्ही सदैव सेवा देऊन व जनतेचे जीवन सुखी आणि सुरक्षित करून जे मोठे उपकार करता आहात, त्याची आम्हा लोकांना जाणीवदेखील नाही. भूमी हस्तांतरणासंबंधी कायद्यामुळे तुम्ही धन एकत्र करूनसुद्धा जमीन खरेदी करू शकत नाही. तुमच्यावर एवढा अन्याय केला जात असल्यामुळेच श्रीमती मेयो म्हणते, “जागे व्हा, आपली शक्ती ओळखा आणि संघटित व्हा! मुळात स्वत: प्रयत्न केल्याशिवाय काहीच मिळू शकणार नाही. (Those who would be free must themselves strike the blow) स्वातंत्र्य मिळवण्यासाठी स्वातंत्र्याची इच्छा असणाऱ्यांनी स्वत: प्रयत्न केले पाहिजेत.
हळूहळू माणसाची प्रवृत्ती अशी बनत चालली आहे, की त्याला स्वत:साठी जादा अधिकार तर हवे असतात, पण जे आपल्यापेक्षा खालच्या स्थानावर आहेत, त्यांना तो आपल्या टाचेखाली दाबून ठेवू इच्छितो. ‘नाठाळाच्या माथी हाणावी काठी’ असे म्हटले जाते. म्हणून तुम्ही संघटित व्हा आणि आपल्या पायावर उभे राहून संपूर्ण समाजाला आव्हान द्या. मग तुम्ही पाहाल की तुम्हांला अधिकार देण्याला नकार देण्याची भाषा करण्याची हिंमत कोणी करणार नाही. तुम्ही दुसऱ्याच्या तोफेचा दारूगोळा बनू नका. दुसऱ्या कोणाच्याही तोंडाकडे पाहू नका. पण लक्षात ठेवा, तुम्ही नोकरशाहीच्या जाळ्यात अडकले जाणार नाही याची खबरदारी घ्या. तुम्हांला मदत करणे तर दूरच, उलट ती तुम्हांला मोहरा बनवू पाहत आहे. तुमच्या गुलामीचे आणि गरिबीचे मूळ कारण ही भांडवलवादी नोकरशाहीच आहे. त्यामुळे तुम्ही कधीही तिच्याशी हातमिळवणी करू नका. तिच्या कपटी चालींपासून स्वत:ला दूर ठेवा, मगच सारे काही ठीक होईल. तुम्ही अस्सल सर्वहारा आहात… संघटित व्हा, तुमचे काही एक नुकसान होणार नाही. उलट गुलामीच्या बेड्या मात्र तुटून पडतील. उठा, प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात बंड पुकारा. हळूहळू होणाऱ्या सुधारणांमुळे काही एक साध्य होणार नाही. सामाजिक आंदोलनातून क्रांती उभी करा आणि राजकीय व आर्थिक क्रांतीसाठी कंबर कसा. तुम्हीच तर देशाचे मुख्य आधार आहात. त्याची खरी ताकद आहात. निद्रिस्त सिंहांनो, उठा व बंड पुकारा!