जाती उच्चाटन अभियान
क्रांतीशिवाय जाती उच्चाटन नाही, जाती विरोधी संघर्षाशिवाय क्रांती नाही
जाती अंताचा मार्ग सुधारवाद, संविधानवाद नाही तर “क्रांतीकारी वर्गीय एकजूट” आहे
मित्रहो,
जातीच्या आधारावर एका मोठ्या समुदायाची आर्थिक लुट, सामाजिक व्यवहारात पावला-पावलावर होणारा भेदभाव व आंतरजातीय प्रेमातून होणाऱ्या हत्या हे आजच्या काळातलं एक कटू सत्य आहे. सगळी न्यायप्रेमी माण्सं जाती व्यवस्थेचा अंत पाहू इच्छिताहेत, त्यासाठी शक्य तेवढा प्रयत्न देखील करत आहेत. तर दुसरीकडे प्रत्येक शासक वर्ग मात्र ही जाती व्यवस्था टिकवून ठेवण्याचा पुरेपुर प्रयत्न करत आले आहेत. भारता बाहेरून आलेल्या शासकांनी हीची उपयोगिता ओळखून, जनतेत फुट पाडण्यासाठी तिचा भरपुर वापर देखील केला. मग ते मध्यकालीन मुगल शासक असोत वा आधुनिक ब्रिटिश साम्राज्यवादी असोत किंवा आत्ताचे आपले तथाकथित लोकशाहीचे शासकर्ते असोत. सगळ्यांनी अनेकोनेक पद्धतीने या जाती व्यवस्थेला मजबुतच केले.
याच्याच परिणामी आज भारत असंख्य जातींमध्ये वाटला गेला आहे. प्रत्येक जातीकडे आपल्याहून खालची म्हणायला एक जात आहे. देशात जाती आधारीत असंख्य संघटना आहेत. दर दिवशी दलित विरोधी हिंसाचार चालू असतो. राष्ट्रीय मानव अधिकार आयोगांच्या रिपोर्टनुसार भारतात दर दिवशी तीन दलित स्त्रियांवर बलात्कार होतो. दिवसाला दोन दलितांची हत्या होते. उच्च शिक्षण संस्थांमध्ये दलित विद्यार्थ्यांप्रति होणारा भेदभाव किती आहे हे या तथ्यांवरून समजते की २००७ पासुन उत्तर भारत आणि हैदराबाद येथील विद्यापीठांत झालेल्या २५ आत्महत्यापैकी २३ आत्महत्या या दलित विद्यार्थ्यांनी केल्या आहेत. आरक्षणाच्या माध्यमातुन दलितांमधील एक छोटा मध्यमवर्ग व कुलीनांचा एक हिस्सा निर्माण झालाय , जो सत्तेचा लाभार्थी आहे आणि सवर्णवादाला उपटून टाकण्याऐवजी अधिक प्रामाणिकपणे सवर्ण सत्तेची सेवा करण्यात मश्गुल झाला आहे. जातीय अत्याचार प्रामुख्याने गरीब दलितांविरुद्ध होत असतात आणि यातले अत्याचारी मात्र कोणत्याही शिक्षे शिवाय किंवा अगदी नगण्य शिक्षा भोगुन मोकाट फिरत असतात. खैरलांजी, लक्ष्मणपुर बाथे, चुंदुर, बथानी टोला, मिर्चपुर इ. हत्याकांडांत अत्यंत गरीब दलितच मारले गेलेत आणि ह्यातील बहुतेक हत्यारे “पुराव्या अभावी” नेहमीप्रमाणे निर्दोष सुटले. खरे तर जातीय भेदभाव आणि अपमान पोटभरलेल्या मध्यवर्गीय दलितांना सुद्धा सहन करावा लागतो. परंतु गरीब दलितांबाबत मात्र तो अधिक तीव्र आणि पाशवी रूपात होत असतो. ह्या जातीगत होणाऱ्या अपमानाविरूद्ध हा मध्यम वर्ग कोणताही रैडिकल संघर्ष करत नाही. फक्त शाब्दिक विरोध करत राहतो. अगदी ठामपणे सांगायचे झाले तर कोणताही रैडिकल संघर्ष उभा करण्याची ताकत फक्त गरीब दलितां मध्येच आहे.
स्वातंत्र्यानंतर सत्तेवर आलेल्या गव्हाळ इंग्रजांनीही जातीचा वापर जनतेचा असंतोष दडपण्यासाठी केलाय. ९०च्या दशकात जेव्हा उदारीकरण आणि खाजगीकरणाच्या माध्यमातुन देशातील जनतेला लुटण्यास सुरुवात केली गेली, तेव्हा मंडल कमीशनच्या राजकारणातून संपुर्ण समाजाला जातीवादाच्या खाईत ढकलला गेला होता. आता जेव्हा आर्थिक संकट अधिक गडद झाले आहे आणि सरकारी नोकऱ्या जवळ-जवळ संपल्यात तरी देखील जाट, गुर्जर, मराठा, पटेल इत्यादींना जातीच्या आधारे एकवटुन शासक वर्ग आपला डाव खेळत आहे. २९ मार्च रोजी लोकसभेत कार्मिक मंत्री जितेंद्र सिंह यांनी सांगितले की २०१३च्या तुलनेत २०१५ मध्ये ८९ टक्के सरकारी नोकरभर्ती बंद झाली आहे. २०१३ मध्ये जिथे १,५१,८४१ सरळ भर्ती झाली होती तिथे २०१५ मध्ये फक्त १५,८७७ एवढ्या पदांवर भर्ती झाली. स्पष्टच आहे की आरक्षणाची जी लढाई जाट, गुर्जर, मराठा, पटेल इत्यादी समाज लढत आहे ,त्याचा फायदा फक्त सत्ताधाऱ्यांनाच होणार आहे.
जाती उच्चाटनाची संपुर्ण योजना ह्या परिस्थितीला समजुन घेऊनच बनवली जाऊ शकते. जाती आधारावर संघटन बनवून, बहुजन एकतेचा पोकळ नारा देऊन किंवा संविधानाचा वापर करून काही जाती अंत केला जाऊ शकत नाही. प्रत्येक जातीमध्ये आज असा एक छोटा हिस्सा आहे जो की साधनसंप्पतीवर कब्जा करून बसला आहे. उदाहरणच द्यायचं तर मराठा समाज जो की आरक्षणासाठी लढतोय, यातील फक्त २०० मराठा कुटुंबाकडे राज्यातील बहूतेक संसाधने आहेत. गरीब मराठ्यांना आपल्या शेतात, कारखाण्यांमध्ये लुटण्याचे काम हाच हिस्सा करतोय. त्यामुळेच सर्वच जातींमधील गरीबांना एकजुट होऊन लढण्याची गरज आहे. निश्चितच हे वाटते तेवढे सोपे नाही. सोपं असत तर आतापर्यंत सगळ्या जातीमधील गरीबांची आपोआपच एकजुट झाली असती आणि जाती व्यवस्था देखील नष्ट झाली असती. भारतात हजारो वर्षांपासुन जातीव्यवस्था आहे आणि अशा थोड्याशा प्रचाराने गरीब एकत्र येणार नाही पण हे देखील खरे आहे की याच्याशिवाय दुसरा कोणताच मार्ग सध्या तरी नाहीत.
कष्टकरी दलित बंधु आणि भगिनींनी शहीदे आजम भगतसिंहाचे हे शब्द आठवले पाहिजेत “जागे व्हा, आपली शक्ती ओळखा आणि संघटित व्हा! मुळात स्वत: प्रयत्न केल्याशिवाय काहीच मिळू शकणार नाही. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी स्वातंत्र्याची इच्छा असणाऱ्यांनी स्वत: प्रयत्न केले पाहिजेत. ‘नाठाळाच्या माथी हाणावी काठी’ असे म्हटले जाते. म्हणून तुम्ही संघटित व्हा आणि आपल्या पायावर उभे राहून संपूर्ण समाजाला आव्हान द्या. मग तुम्ही पाहाल की तुम्हांला अधिकार देण्याला नकार देण्याची भाषा करण्याची हिंमत कोणी करणार नाही. तुम्ही दुसऱ्याच्या तोफेचा दारूगोळा बनू नका. दुसऱ्या कोणाच्याही तोंडाकडे पाहू नका. पण लक्षात ठेवा, तुम्ही नोकरशाहीच्या जाळ्यात अडकले जाणार नाही याची खबरदारी घ्या. तुम्हांला मदत करणे तर दूरच, उलट ती तुम्हांला मोहरा बनवू पाहत आहे. तुमच्या गुलामीचे आणि गरिबीचे मूळ कारण ही भांडवली नोकरशाहीच आहे. त्यामुळे तुम्ही कधीही तिच्याशी हातमिळवणी करू नका. तिच्या कपटी चालींपासून स्वत:ला दूर ठेवा, मगच सारे काही ठीक होईल. तुम्ही अस्सल सर्वहारा आहात… संघटित व्हा, तुमचे काही एक नुकसान होणार नाही. उलट गुलामीच्या बेड्या मात्र तुटून पडतील. उठा, प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात बंड पुकारा. हळूहळू होणाऱ्या सुधारणांमुळे काही एक साध्य होणार नाही. सामाजिक आंदोलनातून क्रांती उभी करा आणि राजकीय व आर्थिक क्रांतीसाठी कंबर कसा. तुम्हीच तर देशाचे मुख्य आधार आहात. त्याची खरी ताकद आहात. निद्रिस्त सिंहांनो, उठा व बंड पुकारा!” (शहीद भगतसिंह यांचा लेख ‘अस्पृश्यता समस्या’)
भगतसिंहाचे हे शब्द इतके प्रासंगिक आहेत की ते आजच लिहले आहेत असे वाटते. म्हणुन आज आपल्याला ह्याच कार्य दिशेला समजण्याची गरज आहे.
सर्व कामगार बंधु आणि भगिनींनी सुद्धा हे लक्षात घेतले पाहिजे की जर तुम्ही दलित कष्टकरी मित्रांना गुलाम समजत असाल तर, तुम्ही स्वत:देखील भांडवलाची गुलामी करत राहण्यास अभिशप्त व्हाल. शहीद भगतसिंह यांनी म्हटले होते की “वर्ग एकजुट पहिली अट आहे. ही वर्ग एकजुटता तेव्हाच कायम होइल जेव्हा आपण जातीपातीच्या विचारांना कायम स्वरूपी गाडून टाकू.
गरीब समाजामध्ये जे जातीगत संस्कार आणि जातीगत पुर्वग्रह व्याप्त आहेत, त्याच्या विरुद्ध देखील क्रांतीकारी आंदोलनाला कठीण लढाई लढावी लागणार आहे. परंतु असली कोणतीही लढाई संघर्षातुनच उभी केली जाऊ शकते. त्या मुद्यांवर आपल्याला एकसाथ संघर्ष उभा करावा लागेल जे की प्रत्येक जातीच्या गरीबाचे मुद्दे आहेत. ज्यावेळी प्रत्येक जातीचे गरीब एकाच संघर्षामध्ये बरोबर उतरतील तेव्हाच जातीगत पुर्वग्रह आणि जातीगत भेदभावांच्या संस्काराचा वर्चस्ववाद तोडण्याची सुरुवात केली जाऊ शकते.
आम्ही एक सुरुवात करतोय मित्रांनो, आम्हाला तुमच्या सोबतीची आणि सहकार्याची गरज आहे. तर चला, ह्या जातीविरोधी जनमोहीमेचा हिस्सा बनु. ही आपल्या सगळ्यांची मोहीम आहे. ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी देखिल आहे.
जातीधर्माचे झगडे सोडा, खऱ्या लढ्याशी नाते जोडा!
जाती उन्मूलनाचा मार्ग, इंकलाबचा मार्ग!
ब्राम्हण्यवाद मुर्दाबाद, जातीयवाद मुर्दाबाद!
- नौजवान भारत सभा
- अख्ािल भारतीय जाति विरोधी मंच
- दिशा विद्यार्थी संघटना
- बिगुल मजदूर दस्ता
- यूनिवर्सिटी कम्युनिटी फॉर डेमोक्रेसी एण्ड इक्वॉलिटी (UCDE)
मुबई संपर्क: शहीद भगतसिंह पुस्तकालय, 103, 61-ए, लल्लूभाई कम्पाउण्ड, मानखुर्द (पश्चिम),
फ़ोन: – ९६१९०३९७९३, ९८१९६७२८०१
अहमदनगर संपर्क : शहीद भगतसिंह पुस्तकालय, सिद्धार्थनगर, गुगळे क्लिनिकच्या पाठीमागे, अहमदनगर
सम्पर्क : ९१५६८२४७०६, ८८८८३५०३३३, ७०५८१९७७२९, ९१५६३२३९७६
फेसबुक पेज : www.facebook.com/nbsmaharashtra वेबसाइट : www.ma.naubhas.in