तरुणांना आवाहन
पीटर क्रोपोतकिन
अनुवाद – सोमनाथ केंजळे
प्रिन्स पीटर क्रोपोतकिन (१८४२-१९२१) एक प्रसिद्ध रशियन अराजकतावादी क्रांतीकारी होते. तसेच नावाजलेले भूगर्भ शास्त्रज्ञ आणि भुगोलाचे तज्ज्ञही होते. पण १८७० च्या दशकांत हे सगळं सोडून क्रांतीकारी आंदोलनात सामील झाले. त्यांना अटक करण्यात आली, मात्र ते निसटून विदेशात गेले आणि १८८६ मध्ये इंगलंडमध्ये स्थायिक झाले. ‘अॅन अपील टू यंग’ नावाचा हा त्यांचा प्रसिद्ध लेख आहे जो त्यांनी आपला व्यवसाय निवडू पाहणाऱ़्या़् युवक-युवतींना संबोधीत करण्यासाठी लिहीला आहे. हा लेख सर्वात प्रथम क्रोपोतकिनचे पत्र ‘ला रिवोल्ट’ मध्ये १८८॰ मध्ये प्रकाशीत केला होता. त्यानंतर जगभरात तो एका पत्रकाच्या रूपामध्ये वारंवार छापण्यांत येत आहे. आजही त्याची अपील तितकीच प्रभावी आणि हालवून सोडणारी आहे.
आज मी तरुणांना संबोधित करू इच्छीत आहे. वृद्धांनी हे पत्रक ठेवून द्यावं. तुम्हाला वाचून काही सापडणार नाही, उगाच डोळे दुखवून घेऊ नये. स्पष्ट करतो की वृद्ध म्हणजे असे लोक जे मन आणि बुद्धीने वृद्ध आहेत.
मी असं गृहीत धरून चाललोय की तुम्ही अठरा वा वीस वर्षांचे आहात आणि तुम्ही तुमचं शिक्षण अथवा अप्रेंटीस पूर्ण केली आहे. आणि आता कुठे तुम्ही जीवनांत पाऊल ठेवत आहात, जगायला सुरुवात करत आहात. मी असंही गृहीत धरतोय की तुमचा मेंदू त्या अंधश्रद्धांपासून मुक्त आहे ज्या तुमच्यावर तुमचे शिक्षक थोपवू पहात होते. तुम्ही ना सैतानाला घाबरता, ना पादरी आणि धर्माचार्याच्या निरर्थक फालतू गप्पा ऐकायला जाता. तसेच तुम्ही त्या छैल्ल-छबील्या, सडक्या समाजाची पैदावारही नाही आहात ज्यांच्याकडे पाहून वाईट वाटतं. जे आपली झकास बॉटमची पँट आणि माकडांसारखे चेहरे बगीचांमध्ये हिंडवत राहतात. ज्यांची इतक्या कमी वयांतसुद्धा एकच इच्छा असते आणि ती म्हणजे कुठलीही किंमत मोजून मौज-मज्जा करायची बस्स. याच्या उलट मी असं मानतो की तुमच्या छातीत उत्साहांचं भरणं आलंय अन् म्हणून मी तुमच्याशी बोलतोय.
मला माहीतीये, तुमच्या मनातला पहीला प्रश्न जो तुम्ही वारंवार स्वत:लाही विचारलेला आहे, अन् तो म्हणजे, “मी काय व्हायला पाहीजे?” खरंतर तारुण्यांत माण्सं असा विचार करतात की एखादी विद्या वा विज्ञानाचा अभ्यास केल्यानंतर, जे समाजाच्या योगदानांमुळं शक्य होतं, आपण आपली बुद्धी, आपली क्षमता आणि आपल्या ज्ञानाचा उपयोग अशा लोकांच्या अधिकारासाठी करायला हवा, जे आज विपन्नावस्थेत, दु:खांत आणि अज्ञानांत खितपत पडलेत. त्याच्यासाठी शिक्षण, नुस्तं कमाईच्या जोरावर आपल्या व्यक्तीगत लाभासाठी लूटीच्या हत्यारासारखा वापर करण्यांसाठी नक्कीच नसतं. मग जर कुणी असा विचार करत नसेल तर नक्कीच त्यांचा मेंदू विकृतीनें ग्रस्त आहे किंवा व्यसनांनी त्याला वेडा बनवलं असणार.
तुम्ही सुद्धा अशांच लोकांतील आहात जे असं स्वप्न पाहतात. पाहता ना तुम्ही? चांगली गोष्ट आहे. आता बघूया की आपल्या या स्वप्नांना सत्यांत उतरवण्यासाठी काय करावं लागणार आहे.
मला माहीत नाही की तुम्ही कुठल्या वर्गात जन्माला आलात. कदाचीत तुमच्यावर भाग्याची कृपादृष्टि असेल आणि तुम्ही विज्ञानाचे विद्यार्थी झाला असाल. तुम्ही डाक्टर, वकील, लेखक वा वैज्ञानिक बनणार असाल. तुमच्या समोर एक व्यापक क्षेत्र खुले असेल. तुम्ही व्यापक ज्ञान आणि प्रज्ञेनं सज्ज होऊन जीवनात प्रवेश करत असाल. किंवा असं असेल की तुम्ही एक इमानदार कारागीर आहात. ज्याचं विज्ञानाच ज्ञान तेवढचं आहे जेवढं शाळेत शिकवलं होत. पण तुमचा एक फायदा झालाय की तुम्ही अनुभवांतून हे लवकर शिकलात की आपल्या काळांतील कष्टकरी समुदायाला कशा तऱ्हेने पाठीचा कणा तुटे पर्यंत राबावं लागत आहे.
आता आपण पहील्या प्रकारांतल्या तरुणांबाबत बोलुया. मी असं समजून बोलतोय की तुम्हाला विज्ञानाचं शिक्षण मिळालं आहे. आणि तुम्हाला डॉक्टर बनायचं आहे. समजा, उद्या एक जाडेभरडे कपडे घातलेला कोणीतरी व्यक्ती त्याच्या आजारी बायकोला तपासण्यासाठी तुम्हाला घेऊन जायला येतो. तो तुम्हाला एका अशा अरुंद गल्लीमधून घेऊन जातो, जीथं समोरासमोर राहणारे शेजारी जर मनांत आणलं तर येणाऱ्या जाणाऱ्यांच्या डोक्यांवरून परस्परांशी हस्तांदोलन करू शकतील. मग तुम्ही घाणेरड्या आणि दूर्गंधीयुक्त अशा परिसरात दाखल होता. जीथं फूटक्या दिव्यांतून फडफडणारी वात घरभर उजेड करायचा प्रयत्न करत असते. तुम्ही मळक्या जीन्यांवरून दोन, तीन, चार वा पाचव्या माळ्यापर्यंत चढून येता आणि बघता की एका अंधाऱ्या दमट खोलीत ती आजारी बाई मळक्या चिध्यांनी अंथरलेल्या अंथरुणावर झोपली आहे. जून्या फाटक्या कपड्यांत थरथरणारी, पिवळ्या धमकं चेहऱ्यांची मुलं त्यांच्या मोठाल्या डोळ्यांना वटारून तुमच्याकडे पाहत आहेत. त्या बाईचा नवरा कोणतीही परिस्थीती उद्भवली तरी देखील तो आयुष्यभर रोज बारा-तेरा तास काम करत राहीला आहे. पण गेल्या तीन महीन्यांपासून तो बेरोजगार आहे. त्याच्या धंद्यामध्ये बेकार होणं तसं अनपेक्षित नाही, कारण दरवर्षी एकदा तरी असं होतच असतं. पण अगोदर जेव्हा तो बेकार होत असे, तेव्हा त्याची बायको पंधरा आणे रोजंदारीवर काम करत असे. कदाचीत तिने तुमचेही कपडे धुतले असतील. पण गेल्या दोन महीन्यांपासून ती अंथरुणाला खिळून आहे आणि दु:ख व त्रासांमूळ सगळं घर जणू जखडून गेलयं.
डॉक्टर, तुम्ही त्या आजारीबाईसाठी काय इलाज सांगाल? तुम्ही पहिल्या नजरेतच ओळखलं की तीच्या आजारांच कारण रक्ताची कमतरता आहे. चांगले अन्न आणि हवा हे न मिळणे आहे. तुम्ही तीला काय खायला सांगणार? रोज चांगलं शिजवलेल मटण सांगणार? गांवातल्या मोकळ्या हवेतील व्यायाम सांगणार? की मुक्त हवेशीर बेडरूम? काय विडंबना आहे, नाही. जर ती या सगळ्यांवर खर्च करू शकत असती, तर तुमच्या सल्ल्या अगोदरच तीनं या सगळ्या गोष्टी केल्या असत्या.
जर तुम्ही मनांन निर्मळ, मनमोकळे आहात आणि तुमच्या चेहऱ्यावर प्रामाणिकपणा आहे तर कुटूंबातली माणसं तुम्हाला बऱ्याच गोष्टी सांगतील. ते तुम्हाला सांगतील की पार्टीशनच्या पल्याड राहणारी बाई अशी खोकते की ऐकून काळीज फाटावं. ती एक गरीब धोबीन आहे, जी कपड्यांना इस्तरीकरून घर चालवते. एका माळ्यावर खाली राहणाऱ्या सगळ्या मुलांना ताप आहे, की सर्वात खाली राहणारी शिंपीन, वसंत येईतोवर जीवंत रहायची नाही. की पुढच्या खोलीत तर अवस्था अजून वाईट आहे.
या सर्व आजारी लोकांना तुम्ही काय सांगाल? तुम्ही त्यांना पोटभर खायला, हवा पालटायला, थोडं श्रम कमी करायला सांगणार? तुम्हाला असे वाटत असेल, कदाचीत तुम्ही असं करू शकला असता. पण तुम्ही असं म्हणायची हिम्मत सुद्धा करू शकत नाही. मग व्यथीत मनाने तुम्ही बाहेर येता. तुमच्या ओठांवर फक्त एक शिवी असते.
पुढच्याच दिवशी त्या कबुतरखान्यात राहणाऱ्या लोकांच्या नशीबावर तुम्ही दु:खी मनानं विचार करत असता. तोच तुमचा पार्टनर सांगतो की काल एक नोकर त्याला घ्यायला आला होता. चार घोड्यांची एक बग्गी होती. ती एका बड्या महालाच्या मालकीनीसाठी होती. रात्रीची झोप न येण्यांमूळे थकलेली एक बाई जीचा पूर्ण वेळ नटण्या सजण्यात, भेटी-गाठीत, नाच-पार्टीत आणि मुर्ख नवऱ्यासोबतच्या भांडणात खर्च होत होता. तुमच्या दोस्ताने तीला सल्ला दिला की जगण्याची पद्धत जरा शिस्तीमध्ये बांधा, मसाल्यांचे पदार्थ जरा कमी खा, मोकळ्या हवेत जरा फिरून येत चला, रागावर नियंत्रण ठेवा आणि उपयुक्त श्रमाच्या अभावाची भरपाई आपल्या बेडरूममध्येच थोडीफार कसरत वगैरे करत भरून काढा.
एक बाई मृत्युच्या दारांत उभी आहे कारण तीला आयुष्यभर कधी पोटभर अन्न मिळालं नाही, की मनभरून आराम नाही. तर दुसरी यासाठी दु:खी आहे की जन्म झाल्यापासून आजवर काम कशाला म्हणतात हेच तीला माहीत नाही.
जर तुमचा स्वभाव प्रत्येक गोष्टीची सवय करून घेणारा असेल, तर एखादं अस्वस्थ करणारं दृश्य बघीतल्यावर, तुमच्या व्यथित अंतकरणाला फक्त कोरडा निश्वास आणि शेरीचा एक ग्लास पिऊन आराम मिळत असेल. तर हळूहळू अशी विसंगती तुम्हाला सवयीची होऊन बसेल. मग एक प्रकारची पशुवृत्ती तुमच्यावर हावी होत जाईल. तुमच्या मनात एकच विचार असेल कि कुठल्याही तऱ्हेने मौजमजा करणाऱ्यांच्या टोळक्यात सामील व्हावं, म्हणजे मग पून्हा कधी त्या दु:खीतांमध्ये जायची वेळ येऊ नये. पण जर तुम्ही माणूस असाल, जर तुमची प्रत्येक भावना जाणीवपूर्वक केलेल्या कामात परावर्तीत होत असेल, जर तुमच्यातल्या बुद्धीमान माणसाला तुमच्यातल्या पशुने चिरडून टाकलं नसेल, तर एखाद्या दिवशी तुम्ही स्वत:शीच पुटपुटत घरी याल, की “नाही.. हे चूक आहे. आता अजून असं चालू राहता कामा नए. फक्त आजारांचा इलाज करने पुरेसे नाही, तर ते होणारच नाहीत असं काही करावं लागेल.” जीवनमानाचा स्तर थोडा सुधारून आणि थोड्या बौद्धीक विकासांतून आपल्या अर्ध्याहून अधिक रुग्णांचे आजार पळून जातील. शरीर विज्ञानाला जरा थोडा वेळ बाजूला बसवूयात. मोकळी हवा, चांगले जेवण, जीव घेण्या मेहनतीला सुट्टी, आपल्याला इथून सुरुवात करायला पाहीजे. नाहीतर डॉक्टरांचा व्यवसाय म्हणजे फसवणूक आणि फुकाची बडबड या शिवाय काहीच असणार नाही.
त्याच दिवसापासून तुम्ही समाजवाद समजून घ्यायला सुरुवात केली असेल. तुम्ही त्या विषयी अधिक जाणून घेऊ इच्छिताल आणि जर परोपकार शब्द तुमच्यासाठी महत्वहीन झाला नसेल, तर तुम्ही निसर्ग विज्ञानाच्या तत्वदर्शनाचे तर्क सामाजिक प्रश्नांच्या अभ्यासाला लावून पहाल व अंतिमत: तुम्ही आमच्यातलेच झाले असाल. मग तुम्ही सामाजिक क्रांती आणण्यासाठी तसेच काम कराल, जसे आम्ही करत आहोत.
पण कदाचित तुम्ही असेही म्हणाल, “खड्यात जाओ फक्त व्यावहारिक काम, मी तर स्वत:ला शुद्ध विज्ञानासाठी समर्पित करेन. मी एक खगोलशास्त्रज्ञ, एक भौतिक शास्त्रज्ञ, एक रसायनशास्त्रज्ञ बनेल. हेच एकमेव काम आहे जे नेहमी फळाला येतं, मग भले ते फळ भावी पिढीला का मिळेना.”
चलातर, सगळ्यात अगोदर आपण हे समजून घेऊ की विज्ञानाप्रती समर्पित होण्यांतून तुम्हाला काय मिळवायच आहे? काय तुम्ही फक्त अशा आनंदाच्या शोधात आहात जो अमर्याद असतो. जो प्रकृतीचे अध्ययन आणि आपल्या बौद्धीक क्षमतांच्या प्रयोगांनी प्राप्त होतो? जर असं असेल तर मी तुम्हाला सांगेल की जो दार्शनिक विज्ञानाला स्वत:चे जगणे अधिक सुखद करण्यासाठी वापरतो तो त्या दारुड्यापेक्षा वेगळा नसतो जो फक्त दारुतून मिळणाऱ्या तात्कालिक सुखाच्या शोधासाठी जगत राहतो? यात अजिबात शंका नाही की दार्शनिकाने त्याच्या सुखसाधनांना खुप हुशारीने निवडलेले असते. कारण ते त्याला दारुड्याच्या तुलनेत अधिक खोल आणि दिर्घजीवी आनंद देतात. फक्त एवढाच काय तो फरक. दोघांचा उद्देश मात्र तेवढाच स्वार्थपूर्ण असतो… व्यक्तीगत सुख.
पण नाही, तुम्हाला असं स्वार्थपूर्ण आयुष्य घालवण्यात रस नसेल. विज्ञानासाठी समर्पण करून तुम्ही मानवतेची सेवा करू इच्छीत असाल. तर मग तुमच्या अभ्यासात सुद्धा तुम्ही याच विचारांनी निर्देशित व्हाल.
हा एक गोड भ्रम आहे. आपल्यांतील असा कोण आहे ज्याने विज्ञानाप्रती समर्पन करते वेळी त्याला कवटाळले नसेल.
जर तुम्ही खरोखर मानवतेबाबत विचार करत असाल व जर तुम्ही तुमच्या अभ्यासांत मानवतेचं भलं करण्याचा उद्देश बाळगून असाल तर मग एक मोठा प्रश्न तुमच्या समोर निर्माण होतो. तुमच्यात चिकीत्सेची वृत्ती कितीही कमी जरी असली, तरी खुप लवकर तुमच्या लक्षात येइल की आजच्या समाजात विज्ञान विलासितेच्या अधीन आहे. याचा अर्थ काही मोजक्या लोकांचे आयुष्य सुखी बनवण्यासाठी विज्ञानाचा उपयोग होतोय. बहुतेक मानवतेपासून ते खुप दूरवर असत.
विश्वाच्या निर्मीतीबाबत विज्ञान एका ठोस प्रस्थापनेपाशी येऊन जवळजवळ एक तप उलटलं आहे. तरी आपल्यात असे किती जण आहेत, जे त्याला समजून घेऊ शकतात? अथवा वास्तविक विज्ञाननिष्ठ चिकीत्सक वृत्तीचे आहेत? फक्त काही हजार लोक तुम्हाला सापडतील. ही संख्या अशा करोडो लोकांच्या तुलनेत नगण्य आहे, जे अंधश्रद्धा आणि पूर्वग्रहाच्या समुद्रात आकंठ बुडालेत आणि त्याच्या परिणामी धार्मिक दांभिंकाच्या हातातील कळसुत्री बाहुली बनायला सदैव तत्पर असतात.
अजून एक पाऊल पूढे टाका आणि या गोष्टीवरही लक्ष द्या की विज्ञानाने भौतिक आणि नैतिक आरोग्याचे तर्कपूर्ण आधार स्थापन करण्यासाठी काय केले? विज्ञान आपल्याला सांगते की शरीर स्वास्थ्यासाठी आपल्याला काय करावे लागेल. आपल्या गर्दीने भरलेल्या जगात अधिक उत्तम परिस्थिती उपलब्ध करायला काय करायला पाहीजे. पण या दोन दिशांनी झालेले अपार काम फक्त पुस्तकांत कैद झाले आहे, नाही का? आपण जानतो की हेच खरं आहे. पण असं का? कारण विज्ञान आज फक्त मुठभर विशेषाधिकार प्राप्त लोकांसाठी आहे. कारण समाज दोन वर्गांत, एक मजुरी करणारा गुलाम आणि भांडवल हडपणाऱ्यांत विभाजीत आहे. अशी सामाजिक असमानता तर्कपूर्ण जीवनस्थितीच्या तमाम शिकवणूकीला नव्वद टक्के लोकांसाठी एक कटू विनोद बनवून ठेवते.
मी अशी अनके उदाहरण देऊ शकतो, पण आता एवढ्यावरच थांबतो. तुम्ही फक्त एवढं करा की फाउस्टच्या कोठडी बाहेर जा.ज्याच्या धुळीनं भरलेल्या खिडक्यांमधून अंधूकसा प्रकाश पुस्तकांनी भरलेल्या कपाटावर पडत राहतो. तुमच्या आजूबाजूला बघा, तुम्हाला या विचारांच्या समर्थनात नवे नवे पुरावे सापडतील.
आता हा केवळ वैज्ञानिक सत्य आणि आविष्कारांना जमवण्याचा प्रश्न उरत नाही. सर्वात महत्वाचं आणि गरजेच आज हे आहे की विज्ञानाने आजवर जे जे शोधून काढलयं त्याचा प्रसार व्हायला हवा. तो आपल्या दैनिक जगण्याचा भाग बनायला हवा, त्याला सर्वांची सामुदायिक संपत्ती बनवायला हवं. आपल्याला या गोष्टींना व्यवस्थीत क्रमांत बांधून घ्यायला पाहीजे, जेणेकरून कुणीही, तमाम मानवजात या सत्यांना समजू शकेल आणि अंमलकरण्यास पात्र बनेल. आपल्याला विज्ञान विलासाची वस्तु नाही तर मानवी जीवनाचा पाया बनवावा लागेल. हेच न्यायोचित होईल.
मी आणखीन पुढे असे म्हणेल की खुद्द विज्ञानाचे हीत सुद्धा याच गोष्टींत सामावलं आहे. विज्ञान वास्तवत: तेव्हाच विकास करू शकते, जेव्हा एखाद्या नव्या सत्यासाठी जमिन तयार असेल. उष्णतेच्या यांत्रिक उत्पत्तीचा सिद्धांत मागच्या शतकांतच शोधून काढला होता (त्याच रूपामध्ये हर्न आणि क्लासियस आज त्याला सुत्रबद्ध करतात) पण तो जवळजवळ ८० वर्षे अकादमिक कागद पत्रांमध्ये बंदिस्त होता. जेव्हा भौतिक विज्ञानाच्या विकास व प्रसार एका अवस्थेत पोहचला व त्याला स्विकारण्या लायक लोकंही तयार झाले, तेव्हा हा उर्जेचा नियम ८० वर्षांच्या कैदेतून सुटू शकला. प्रजातींच्या वैविध्या विषयीचे इरासमस डार्वीनचे विचार त्याचा नातू चार्ल्स डार्वीन मार्फत तीन पिढ्यांनंतर अकादमिक विचारवंताद्वारे स्विकारले गेले आणि तेही लोकमताचा दबाव होता म्हणून झालं. कवी अथवा कलाकारांसारखा दार्शनिक-तत्ववेत्ता सुद्धा नेहमी त्या समाजाचाच अंग असतो, ज्या समाजात तो जगतो आणि शिक्षण देत असतो.
पण जर तुमच्यातही असे विचार खदखदत असतील तर तुम्हाला वाटेल की सर्वात महत्वाचं काम हे आहे की अशा परिस्थितीत आमुलाग्र परिवर्तन आणायला हवं जीथं एका बाजूला तत्ववेत्ता वैज्ञानिक तर सत्याने काठोकाठ भरलेला असतो आणि दुसरीकडे माणसांची मोठी संख्या त्याच अवस्थेत जगत असते, जीथं ती पाच वा दहा दशकांपूर्वी होती म्हणजे गुलाम आणि यंत्राच्या अवस्थेत. जी रुढ सत्य ही समजून घेऊ शकत नाही. पण जेव्हा तुम्ही या व्यापक, खोल, मानवीय आणि ठोस वैज्ञानिक सत्याला स्विकारताल, त्या दिवशी तुम्ही विशुद्ध विज्ञानांतील अभिरूची हरवून बसाल. तुम्ही या परिवर्तनासाठी उपाय शोधू लागाल. जर तुम्ही या शोधांत सुद्धा तीच निष्पक्षता ठेवाल, जी तुम्ही वैज्ञानिक संशोधनांमध्ये ठेवली, तर तुम्ही नक्कीच समाजवादाचे उद्दीष्ट स्विकाराल. तमाम खोट्या तर्कांना सोडून तुम्ही आमच्यात सामील व्हाल. अगोदरच सुखासिन असलेल्या समूहाला अधिक सुखी करण्याची साधने जमवण्याऐवजी तुम्ही तुमचं ज्ञान आणि समर्पण त्यांच्या सेवेत लावाल जे वंचित आणि उत्पीडीत आहेत.
आणि विश्वास ठेवा की एक महान कर्तव्य पूर्ण केल्याचा आनंद तुम्ही अनुभवाल. तुमची भावना आणि तुमचे काम यांमध्ये वास्तविक एकता तुम्ही अनुभवाल आणि तेव्हा तुम्हाला कळेल की तुमच्यात अशी ताकद आहे जीचा तुम्ही कधी स्वप्नांतही विचार केला नव्हता. आणि ज्या दिवशी – आपल्या प्रोफेसरांच्या अतोनांत प्रयत्नांमुळे तो दिवस फार दूर नाही – हे परिवर्तन होईल, ज्याच्यासाठी तुम्ही काम करत आहात, तेव्हा मात्र सामूहीक वैज्ञानिक कामांतून नवी शक्ती आत्मसांत करून तीला आपली उर्जा देणाऱ्या कामगारांच्या सैन्याच्या ताकदवान मदतीने विज्ञान पूढच्या दिशेने एक अशी जबरदस्त झेप घेईल. ज्याच्या तुलनेत आजची मंदगतीची प्रगती नवशिक्यांच्या बारीकसारीक प्रयोगांसारखी वाटेल.
व तेव्हाच तुम्ही खऱ्या-खुऱ्या विज्ञानाचा आनंद घेऊ शकाल जे सर्वांसाठी असेल.
जर तुम्ही कायद्याचे शिक्षण पूर्ण केलं असेल आणि बार काउंसिल मध्ये सामील होणार असाल, तर तुम्ही तुमच्या भावी कामकाजाबाबत अनेक भ्रम बाळगून आहात. मी असं समजतो की तुम्ही उदात्त भावना असलेल्या लोकांमधील एक आहात आणि दुसऱ्यांचे भलं करनं म्हणजे काय हे तुम्हाला कळतं. कदाचीत तुम्ही विचार करताय, “मी माझं आयुष्य दुसऱ्याच्या भल्यासाठी हर तऱ्हेच्या अन्याया विरुद्ध अविरत आणि उर्जस्वी संघर्षाला समर्पित करेल. मी माझी सर्व क्षमता कायदा, म्हणजे सर्वोच्च न्यायाच्या अभिव्यक्तीच्या विजयासाठी कारणी लावेल. खरचं यापेक्षा उदात्त करीयर कुठलं असेल अजून?” तुम्ही अतिशय आत्मविश्वासाने निवडलेल्या पेशाची सुरुवात करता.
ठीक आहे, आपण लॉ रिपोर्टसचं कुठलही पान पलटतो आणि खरं जीवन काय सांगू पाहतय त्याच्याकडे लक्ष देतो.
आपल्या समोर एका श्रीमंत जमीनदारांच प्रकरण आहे. तो आपल्या एका कुळाच्या बेदखलीची मागणी करत आहे, ज्याने कर दिला नाही. कायदेशीर दृष्ट्या प्रकरण निर्वीवाद आहे. गरीब शेतकरी कर भरू शकत नाही मग त्याला हाकलून देण्या शिवाय काही उपाय नाही. पण वस्तुस्थितीची पडताळणी केली तर आपल्या हाती या काही गोष्टी लागतात – जमीनदार वसुल केलेला कर ऐशो-आरामासाठी उधळत असतो आणि कुळ मात्र दिवसरात्र मेहनत करत असतात. जमीनदाराने त्याच्या जागीरीची अवस्था सुधारण्यासाठी काहीही केलेले नसते. तरीही एका रेल्वे लाईनची निर्मीती, नवीन रस्ते बनने, एका गाळाच्या जमिनीला सुकवून आणि पडीक जमिनीवर शेती सुरु होण्यांतून त्याच्या जमिनीची किंमत पन्नास वर्षाच्या आतमध्ये तीनपट झाली आहे. पण या वाढीमध्ये भरीव योगदान करणाऱ्या शेतकऱ्याने मात्र स्वत:ला उघ्वस्त केलं आहे. तो सावकाराच्या कचाट्यात सापडलाय आणि गळ्यापर्यंत कर्जात बुडालाय. तो आता जमिनदाराला कर देण्याच्या अवस्थेत नाही. कायदा जो नेहमी संपत्तीची बाजू घेतो, या प्रकरणांत एकदम ठाम आहे, त्याच्यासाठी जमीनदाराची बाजू एकदम योग्य आहे. पण तुम्ही, ज्याची न्याय भावना अजून कायद्याच्या धोकेबाज तर्कांखाली दबलेली नाही, तुम्ही काय कराल? काय तुम्ही म्हणाल की शेतकऱ्याला रस्त्यावर हाकलून द्यायला हवं? कायदा तर हेच म्हणतोय. कि मग तुम्ही अपील कराल की जमीनदारांने त्याच्या संपत्तीत झालेली वाढ शेतकऱ्याला परत द्यायला पाहीजे, कारण ते शेतकऱ्याच्या कष्टाचे फळ आहे. आणि हेच न्यायोचित आहे. मग तुम्ही कुणाच्या बाजूने उभे राहणार? कायद्याच्या बाजूने आणि न्यायाच्या विरोधात की न्यायाच्या बाजूने आणि कायद्याच्या विरोधात?
जेव्हा कामगार नोटीस न देता मालकाच्या विरोधात संप करत असेल, तेव्हा तुम्ही कोणाची बाजू घ्याल? कायद्याची बाजू म्हणजे त्या मालकाची बाजू आहे ज्याने आर्थिक संकटाच्या काळात फायदा घेऊन अमाप नफा कमावलाय. अथवा तुम्ही कायद्याच्या विरुद्ध, पण त्या कामगारांच्या बाजूने उभे रहाल, जे त्या काळांत केवळ दोन आणे रोजंदारीवर काम करत राहीले आणि बायका-मुलांना आपल्या डोळ्यां देखत भुक आणि आजारांत मरताना पाहत होते? का तुम्ही धोकेबाज कागदांच्या तुकड्यांच्या बाजूने उभे रहाल, जो ‘अनुबंधांच्या स्वतंत्रतेची’ बात करतो? का मग तुम्ही न्यायाची बाजू घ्याल, ज्याच्या लेखी अशा अनुबंधाला काही एक अर्थ नाही, जीथे एक पक्ष खादाड लठ्ठ व्यक्ती आहे आणि दुसरा असा व्यक्ती जो फक्त जगण्यासाठी आपले श्रम विकायला मजूबर आहे. असा अनुबंध खरंतर अनुबंधच नाही, जो ताकदवान आणि कमजोर या दोघांत केला गेला असेल.
अजून एक प्रकरण घेऊयांत. इथं लडंनमध्ये एक व्यक्ती मटनाच्या दुकानाच्या आजूबाजूला भटकत होता. त्याने मांसाचा एक तुकडा उचलला आणि तिथून पळून गेला. त्याला अटक करून त्याची चौकशी केली तर समजलं की तो एक बेरोजगार कारागीर आहे आणि त्याने व त्याच्या कुटूंबाने चार दिवसांपासून काहीही खाल्लेलं नाही. दुकानदाराला सांगीतलं जातं की त्या व्यक्तीला जाऊ द्याव पण दूकानदार अडून बसतो आणि म्हणतो की त्याला न्याय हवाय. तो प्रकरण दाखल करतो ज्यात त्या व्यक्तीला ६ महीने कैद होते. न्याय देवता आंधळी असते ना. जेव्हा तुम्ही रोज असेच निर्णय ऐकत असता तेव्हा तुमची अंतरात्मा या कायद्याच्या आणि समाजाच्या विरोधात बंड करण्यास तयार नाही होत?
की तुम्ही, त्या व्यक्तीच्या विरोधांत कायदा लागू कराण्याची भाषा कराल, ज्याचं लहानपणापासून नीटनेटकं पालन झालं नाही की प्रेमाचे दोन शब्द त्याच्या कानावर कधी पडले नाहीत. दुनियेच्या लाथा खातखात तो एका मुक्कामावर पोहचतो आणि थोड्याश्या पैशांसाठी आपल्या शेजाऱ्यांची हत्या करतो. तुम्ही त्याला फाशी देण्याच्या, अथवा त्यापेक्षाही भयंकर शिक्षा, वीस वर्षे कैद देण्याची मागणी कराल? तुम्हाला हे चांगलं माहीती आहे की तो अपराधी नसून एक माथेफिरू आहे. आणि खरंतर त्याच्या गुन्ह्याचा दोषी आपला संपूर्ण समाजच आहे.
आता हेच बघा. निराशेच्या एका क्षणी गिरण्यांना आग लावणाऱ्या गिरणी कामगारांना तुरुंगात डांबायला तुम्ही सांगाल का? एका धनदांडग्याची हत्या करणाऱ्या व्यक्तीला जन्मठेपेची शिक्षा व्हावी का? जे विद्रोही बैरीकेडांवर भविष्याचा झेंडा फडकावत आहेत, त्यांना गोळी मारली पाहीजे का? नाही, नक्कीच नाही.
जर तुम्ही कॉलेजात शिकवलेल्या गोष्टींची उजळली करण्यापेक्षा जरा विवेकानं विचार कराल आणि कायद्याचं विश्लेषण करालं, तर कायद्याचं खरं रूप म्हणजे ‘सामर्थ्यवानाचा अधिकार’ आणि सार म्हणजेच मनुष्य जातीच्या दिर्घ आणि रक्तरंजित इतिहासातील तमाम हुकूमशाहींना योग्य ठरवण्यासाठी कायद्याच्या भावेतालच्या शाब्दिक गुंडाळ्या फेकून द्याल. जेव्हा तुम्ही हे समजून घ्याल तेव्हा कायद्या बद्दलचा तिरस्कार अजून तीव्र होत जाईल. तुम्हाला समजून येइल की लिखीत कायद्याचा सेवक बनण्याचा अर्थ आहे, दररोज अंतरात्म्याच्या कायद्या विरोधात उभं राहणं आणि चुकीची बाजू घेणे. हा संघर्ष कायम चालू राहू शकत नाही. मग तुम्ही एकतर आपल्याच अंतरात्म्याचा गळा आवळून एक धूर्त बदमाश तरी बनाल, किंवा परंपरेशी नातं तोडून घ्याल आणि आमच्या सोबत या आर्थिक, सामाजिक आणि राजकिय अन्यायाला पूर्णत: नष्ट करण्यासाठी काम कराल.
मग तुम्ही तेव्हा एक समाजवादी, एक क्रांतीकारक झालेला असाल.
तुम्ही, तरुण इंजीनिअर हो! तुम्ही जे उद्योगांमध्ये विज्ञानाला लागू करून कामगारांची दशा सुधारण्याचे स्वप्न पहात आहात, अखेर तुमचा मोहभंगच होईल. खरंतर एक दु:खद निराशा तुमची वाट पहातेय. तुम्ही तुमच्या बुद्धीच्या जोरावर एका अशा रेल्वे लाईनची योजना तयार करता, जी खोल खड्ड्यांच्या किनाऱ्यावरून पुढे जाते आणि ग्रेनाईटच्या डोंगरांची छाती कापत दोन देशांना एक करेल, ज्यांना निसर्गाने वेगवेगळे केलं आहे. पण जसं कामाला सुरुवात होते, तुम्ही बघता की अभाव आणि आजारांनी बेजार झालेल्या कामगारांच्या फौजा च्या फौजा त्या अंधाऱ्या भुयारांमध्ये राबताहेत. तुम्ही पहाता की त्यापैकी बहुतेक जण खुप कमी उरलेले पैसे आणि रोगट जंतूना घेऊन घरी परतात. रेल्वे मार्गाच्या हर एक नवीन भागात मैलाच्या दगडाप्रमाणे मजूरांची प्रेते तुमची वाट पाहतात. जो खरंतर अांधळ्या लालसेचा परिणाम आहे. आणि जेव्हा रेल्वेमार्ग तयार होतो, तेव्हा तुम्हाला दिसते की त्याच्यावरून युद्धमग्न सैन्याचा दारुगोळा वाहून नेला जातोय.
तुम्ही तुमच्या तारुण्यांतली सर्वात सुंदर वर्षे एका अशा आविष्काराला अंतिम रूप देण्यासाठी घालवता, ज्यांच्यामुळे उत्पादनात सुलभता येईल आणि अनेक प्रयोगांती, रात्ररात्र जागल्यानंतर शेवटी तुम्ही मौल्यवान शोध लावता. तुम्ही त्याला व्यवहारात लावून बघता आणि तुमच्या अपेक्षेपेक्षा चांगला परिणाम साधला जातो. मग दहा-वीस हजार लोक रस्त्यावर फेकले जातात. जी उरतात त्या पैकी बहुतेक लहान मुलं आहेत, जी केवळ मशिनचा एक भाग बनून जातात. तीन-चार मालकांची दौलत कैक पटीत अजून वाढत जाते, पूर्वीपेक्षा जास्त उधळपट्टीसाठी. काय हेच तुमचं स्वप्न आहे?
अंतत: तुम्ही, आजवर झालेल्या औद्योगिक विकासाचा अभ्यास करता आणि तुमच्या लक्षात येत की शिलाई मशिनच्या शोधांमूळे शिलाई करणाऱ्या स्त्रीयांना काहीही फायदा झाला नाही.आणि हिऱ्यासारख्या टणक टोकदार ड्रील मशिन्स असूनही सेंट गोटहार्ड बोगद्यांमधला मजूर एंकिलोसिस ने मरत आहे, आणि गिफार्ड कंपनीची लीफ्ट येऊन सुद्धा गवंडी आणि रोजंदारी कामगार अगदी पूर्वीसारखाच बेरोजगार आहे. जर तुम्ही त्याच स्वतंत्र भावनेतून सामाजिक समस्यांवर विचार कराल, जी तुम्ही यंत्रांच्या संशोधनावेळी दाखवली होती, तर निश्चीतच तुम्ही या निष्कर्षाप्रत याल की खाजगी संपत्ती आणि पगारी गुलामीच्या वर्चस्वाच्या परिणामी प्रत्येक आविष्कार कामगारांच्या गुलामीला अजून कठोर करतोय, त्याच्या श्रमाला अजून तीव्र करतो आहे. मंदी आणि बेकारीचा काळ पूर्वीपेक्षा आता खुप लवकर लवकर येऊ लागलाय, संकट अजून तीव्र होत आहे. याचा फायदा फक्त त्याच व्यक्तीला होतोस, ज्याच्याकडे ऐशोआरामाची सर्व साधने उपलब्ध असतात.
जेव्हा तुम्ही अशा निष्कर्षाप्रत याल तेव्हा तुम्ही काय कराल? एक तर तुम्ही तऱ्हेतऱ्हेच्या तर्कां आधारे आपली अंतरात्मा शांत कराल किंवा मग एक दिवस तुम्ही तारुण्यातल्या आपल्या प्रामाणिक स्वप्नांना अलविदा म्हणाल. मग तुम्ही स्वत:साठीही सुखाची साधने गोळा करायला लागाल. तेव्हा तुम्ही शोषकांच्या तंबूत दाखल झालेले असाल. किंवा कदाचित तुमच्या मनात अजून ती कोमलता शिल्लक असेल तर स्वत:शीच म्हणाल “नाही, ही वेळ आविष्काराची नाही. अगोदर आपल्याला उत्पादनाची संपूर्ण रचनाच बदलण्यासाठी काम करावे लागेल. जेव्हा खाजगी संपत्ती संपुष्टात येईल, तेव्हाच उद्योगांतील प्रत्येक नवीन शोध मानव-जातीच्या कल्याणासाठी असेल. आणि तेव्हा जी मजूरांची मोठी संख्या आज केवळ यंत्र बनून खपत आहे, ती विचार-विमर्श करणाऱ्या लोकांच्या समूहामध्ये परावर्तित होईल. जी अभ्यासांने प्रशिक्षीत व शारिरीक श्रमानं कुशल बनलेल्या त्यांच्या बुद्धीला उद्योगांच्या विकासासाठी खर्च करतील. अशा रितीने होणारी यंत्रांमधली प्रगती एक झेप घेईल. मग पन्नास वर्षात इतकं काही मिळवले जाईल की जे आपण स्वप्नातही पाहू शकणार नाही.”
आता, मी शाळेच्या शिक्षकांना काय सांगू, ज्याच्यासाठी त्याचा पेशा उबग आणणारा नाही तर आनंदाची उधळण करणाऱ्या उत्साही मुलांनी घेरलेला असतो. जो त्यांच्या उत्साही चेहरे आणि निरागस हास्यांमुळे स्वत:ही उत्साहीत होत असतो. मी आता त्याच्याशी बोलू इच्छितोय. जो त्या छोट्या छोट्या डोळ्यांमध्ये मानवतेचे असे विचार भरण्याचा प्रयत्न करतो, जे कधी काळी त्याने पाहीलेले असतात.
मी नेहमी पाहतो की तुम्ही उदास आहात आणि मला माहीती आहे की तुमच्या कपाळावरल्या आठ्यांचे कारण काय आहे. आज तुमच्या प्रिय विद्यार्थ्याने विल्यीयम टेलची गोष्ट इतक्या उत्साहात वाचून दाखवली,जरी त्याचं लैटीनचं ज्ञान इतकं चांगलं नसेल, पण त्याचे मन स्थिर आणि प्रफूल्लीत होतं. त्याच्या डोळ्यांत तेज होतं. जणू तो सगळ्या अत्याचाऱ्यांना तिथेच संपवून टाकू इच्छित होता. त्याने तित्कयाच जोशपूर्ण पणे शिलरच्या या काव्यपंक्ती वाचल्या
तोडतो बेड्या गुलाम गुलामीच्या जेव्हा कधी
भय तुम्हा कसले असे मुक्त माणसांनाे
पण जेव्हा तो घरी आला तेव्हा त्याची आई, त्याचे वडील, त्याचे काका यांनी गावातल्या पुजारी आणि पोलीसांविषयी सम्मान न दाखवल्या बद्दल त्याला खुप सुनावलं. जोपर्यंत त्याने शिलर ला तिष्ठत ठेवून ‘स्वत:ची मदत कशी करावी’ हे वाचायला घेतलं नाही तोपर्यंत “दुरदर्शिंता, अधिकाऱ्यांप्रति सम्मान, मोठ्यांचा आदर” यांवर पोटभर भाषणं त्याला पाजली गेली.
आणि कालच तुम्हाला कळलं की तुमच्या सर्वात चांगल्या विद्यार्थ्यांचे आयुष्य असं बदलले की अपेक्षाभंग व्हावा. एक रात्रंदिवस अधिकारी बनण्याची स्वप्ने पहातोय आणि दुसरा आपल्या मालका सोबत कामगारांच्या मामूली मजूरी मधूनसुद्धा चोरी करण्यांसाठी युक्त्याप्रयुक्त्या लढवत आहे. तुम्ही मात्र तुमचा आदर्श आणि जीवनाच्या या वैषम्यांवर खुप विचार करता आणि दु:खी होत राहता.
तुम्ही यावर चिंतन मनन करत असताच. पण मी पाहतोय की दाेन वर्षानंतर निराशा आणि निराशा पदरी येत राहील्यानंतर तुम्ही तुमच्या प्रिय लेखकांना उचलून बाजूला ठेवाल आणि म्हणाल की निसंशय टेल एक खुप प्रामाणिक व्यक्ती होता. पण तो थोडासा माथेफिरू सुद्धा होता. कवीता ड्रांइग रूममध्ये धगधगणाऱ्या आगीपाशी बसून वाचायला छानच वाटते, खासकरून तेव्हा जेव्हा तुम्ही फक्त तीनाचा पाढा दिवसभर शिकवत राहता. पण कवी लोक नेहमी ढगात राहतात. त्यांच्या विचारांशी ना जगण्याचा संबंध असतो, ना शाळा तपासणीसाच्या पुढच्या दौऱ्याशी.
किंवा असंही होऊ शकतं की तुमच्या तारुण्यांची स्वप्ने तुमच्या प्रौढपणी अजून पक्की बनतील. तुमची इच्छा असेल की शाळेत व शाळे बाहेर सर्वांसाठी खुली आणि मानवीय शिक्षणाची व्यवस्था असावी. तुमच्या लक्षात येऊ लागेल की आजच्या परिस्थितीत हे अशक्य आहे. मग तुम्ही बुर्जूआ समाजाच्या पायावरच हल्ले करू लागाल. मग तुम्हाला शिक्षण विभागाद्वारे बडतर्फ केलं जाईल आणि तुम्ही शाळा सोडून आमच्यात सामील व्हाल व आमच्यातलेच एक बनून जाल. तुम्ही अशा लोकांत ज्ञान प्रसाराचं काम कराल, ज्यांना आयुष्याने तर खुप शिकवले पण ज्यांना औपचारिक शिक्षणापासून वंचित रहावं लागलं. तुम्ही त्यांना सांगु लागाल की मानवजातीनं नेमकं काय करायला पाहीजे. किंवा आपण सगळे एकजूटीनं काय करू शकतो. तुम्ही प्रस्थापित व्यवस्थेला पूर्णत: बदलण्यासाठी समाजवाद्यांशी मिळून काम कराल. खरी समानता, वास्तविक बंधुता आणि संपूर्ण विश्वासाठी कधीही न संपणारी स्वतंत्रता हे उद्दीष्ट साध्य करण्यासाठी आमच्या खांद्याशी खांदा भिडवून लढाल.
शेवटी, मी युवा कलाकार, मुर्तीकार, चित्रकार, कवी आणि संगीतकार यांच्याशी बोलू इच्छितो. तुम्ही हे बघता की नाही की तुमच्या पुर्वजांना प्रेरणा देणारा अग्नी आजच्या माणसामध्ये दिसत नाही? तुम्हाला दिसत नाही का कलेचा बाजार झालेला आणि सर्वत्र सुमार दर्जाचे राज्य?
का याच्यापेक्षाही वेगळे काही होऊ शकते? प्राचीन विश्वाच्या पुनर्शोध करण्याचा आणि निसर्गाच्या अंगप्रत्यंगा मधून ओसंडुन मिळणारा आनंद ज्याच्यातून पुनर्जागरण काळातील महान कृतींचा जन्म झाला होता, त्या आपल्या युगातील कलांमधून अदृश्य झालाय. क्रांतीकारी आदर्शांवीना त्या अजूनही थंड पडून आहेत. आपली कला तो आदर्श यथार्थवादाच्या रूपामध्ये सापडलाय असे सांगतात. मग ती खुप मनस्वी पणे एखाद्या झाडाच्या पानांवर पडलेला दवबिंदू तंतोतत रेखाटले, एखाद्या गायीच्या पायांच्या स्नायुंची नक्कल उतरवते वा गद्य आणि पद्यांमध्ये एखाद्या सीवरची उबग आणणारी घाण वा वेश्येच्या खोलीचे अगदी सटीक उच्च दर्जांचे वर्णन प्रस्तुत करते आहे.
मग तुम्ही म्हणता, “पण असं असेल तर मग काय करायला पाहीजे?” माझं उत्तर आहे. जर तुमच्या मते तुमच्यां आतमध्ये जळणारी आग विझुन फक्त धुरच शिल्लक राहीला असेल, तर मग तुम्ही तेच कराल जे आत्तापर्यंत करत आला आहात. आणि तुमची कला मग शेटजींच्या दुकानांत सजावटीच्या, थर्ड क्लास ओपेराच्या पुस्तकांत, आणि नाताळावर छापलेल्या वार्षिक अंकांमध्ये रांगोळ्या काढण्यापर्यंत पतीत होऊन जाईल. तुमच्यांतले अनेक याच रस्त्यानी डोळे बंद करून धावत सुटले आहेत.
पण जर तुमचे हृदय अजूनही मानवतेसाठी स्पंदत असेल व एका सच्चा कवी सारखे तुम्ही जीवनांतल्या सुरावटींना ऐकू शकत असाल तर तुमच्या चहूबाजुंनी वेढलेला दु:खाचा सागर तुम्ही पहाल, भुकेनं मरणाऱ्या लोकांचा तुम्ही सामना कराल, खाणीमध्ये एकावर एक रचलेली आणि बेरीकेड्समध्ये छिन्न विछीन्न पडलेल्या प्रेतांमध्ये तुम्ही स्वत:ला अनुभवाल, हद्दपारीची शिक्षा झालेल्या कैद्यांची लांबच लांब रांग बघाल, जी सैबेरीयाच्या बर्फांत आणि ऊष्णकटिबंधीय बेटाच्या दलदलीत गाडून घ्यायलां चालली आहेत. जीवन-मृत्युच्या या संघर्षांना तुम्ही बघाल जो की लढला जात आहे हरणाऱ्यांच्या किंकाळ्या आणि जिंकणाऱ्यांच्या अश्लील अट्टाहासांमध्ये, तसेच भ्याडपणाला धडकणाऱ्या वीरते मध्ये, घृणास्पद धुर्तपणाचा सामना करणाऱ्या उदात्त दृढतेंमध्ये – या सर्वांना बघून तुम्ही तटस्थ राहू शकणार नाही. तुम्ही याल व उत्पीडतांच्या बाजूंने उभे रहाल. कारण तुम्हाला माहीती आहे की सौंदर्य, उदात्तता आणि जीवनांतल स्पिरीट त्याच लोकांच्या बाजूने आहेत जे लढताहेत, प्रकाशासाठी, मानवतेसाठी, न्यायासाठी.
शेवटी तुम्ही मला थांबवाल.
तुम्ही म्हणाल, “काय फालतू बडबड चालवली आहे. जर शुद्ध विज्ञान विलासिपणा आहे, डॉक्टरीची प्रॅक्टीस फसवणूक आहे, जर कायद्याचा अर्थ अन्याय आहे आणि नवीन यंत्राचा शोध फक्त दरोड्यांच अजून एक साधन असेल, व्यावहारीक माणसाच्या सहजबुद्धीच्या विपरीत उभारलेल्या शाळांना बदलण्याची गरज आहे आणि क्रांतीकारी विचारांशिवाय कला फक्त पतीतच होत असेल तर मग माझ्या करण्यासाठी काय शिल्लक राहतय?”
चांगली गोष्ट आहे, मी तुम्हाला सांगतो.
एक खुप मोठं आणि रोमांचकारी काम. एक असं काम ज्याच्यात तुमच्या अंत:चेतनेचा आणि व्यवहाराचा योग्य ताळमेळ असेल. एक असा उपक्रम जो तुमच्यात सर्वात उदात्त आणि उर्जस्वी भावना जागवण्यासाठी सक्षम असेल.
कोणतं काम? मी सांगतो कुठलं ते.
आता हे तुम्हाला ठरवायच की, सतत तुमच्या अंतरात्माला फसवत राहणार आणि शेवटी म्हणणार, “खड्ड्यात जाऊदे माणूसकी, जोवर लोक इतके मुर्ख आहेत की तुम्ही काहीही करू शकता, तर मग का नाही मी सुखाची सर्व साधने गोळा करावीत आणि उपभोगावीत?” अथवा एकवार पून्हा तोच अनिवार्य पर्याय तुमच्या समोर असेल तो म्हणजे समाजवाद्यांसोबत जाण्याचा आणि त्यांच्या सोबतीने समाज पूर्णत: बदलण्यासाठी काम करण्याचा. आपण ज्या विश्लेषणांतून गेलो आहोत, त्यातून याच एका निष्कर्षाप्रत आपण पोहचू शकतो की त्याहून निराळं असं काही असुच शकणार नाही. प्रत्येक बुद्धीवान माणूस याच तार्किक निष्कर्षाप्रत पोहचेल फक्त त्याने आपल्या चारी बाजूला असणाऱ्या परिस्थितीचे प्रामाणिकपणे, विवेकाने अवलोकन करायला हवे. आणि त्या धूर्त तर्कांना बाजूला करावे जे हे बुर्जूआ शिक्षण आणि त्याच्या भोवतालचा स्वार्थ त्याच्या कानांत फुसफुसत राहत.
जसे आपण या निष्कर्षाप्रत पोहचतो, हा प्रश्न उभा राहणं स्वभाविक आहे, “की मग काय करायला पाहीजे?”
उत्तर खुप सोपं आहे.
तुम्ही ज्या परिस्थितीत वाढलात तीला सोडून द्या, जीच्यात जनतेला जनावरांच्या कळपापेक्षा अधिक न समजणं एक फॅशन आहे. सामान्य लोकांमध्ये या, उत्तरे आपोआप मिळू लागतील.
तुम्ही पहाल की इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, इटली, रशीया आणि अमेरिकेतही जिथे विशिष्ट एका वर्गाला विशेषाधिकार प्राप्त आहे आणि एक वर्ग उत्पीडित आहे, तीथे कष्टकरी वर्गांमध्ये जबरदस्त काम चालू आहे. ज्याचा उद्देश भांडवली, सामंती शासन व्यवस्थेनं लादलेली गुलामी कायमची नष्ट करने आणि एका अशा समाजाचा पाया रचने आहे, जो न्याय आणि बरोबरीवर आधारीत असेल. जनतेतील सामान्य माणूस आता त्याचे दु:ख तुमचं काळीज कापणाऱ्या सुरांमधून गाणं बनण्यापूरतं मर्यादीत ठेवू इच्छीत नाही. जसे त्याने अकराव्या शतकांत भुदास वा स्लाव शेतकरी असताना गायले होते. तो आपला अधिकार मिळवण्यासाठी आपल्या साथी श्रमिकाला सोबतीला घेऊन लढतो. त्याला माहीती आहे की तो काय करत आहे आणि त्याच्या मार्गात येणाऱ्या प्रत्येक अडचणींवर मात करायला तो तयार आहे.
त्याचे विचार सतत हे चिंतन करत असतात की असं काय केले पाहीजे ज्यांतून तीन चतुर्थांश लोकांसाठी हे जीवन अभिशाप न राहता वास्तविकरीत्या आनंदमय होईल. तो समाजशास्त्रातील अतिशय कठीण समस्यांना घेतो आणि आपल्या विवेक, क्षमता आणि कष्टाने मिळवलेल्या अनुभवांतून त्या सोडवण्याचा प्रयत्न करतो. त्याच्याच सारख्या भयान जगणाऱ्या माणसांना सोबत घेऊन एक समजदारी तयार करण्यासाठी, समूह बनवण्यासाठी, संघटीत होण्याचा प्रयत्न करत राहतो. तो संघटना उभ्या करतो, ज्या छोट्या छोट्या वर्गणींतून मुश्कीलीनं चालू राहतात. तो सीमेपलीकडील त्याच्याच सारख्या लोकांशी संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतो. आणि तो अशा दिवसांसाठी तयारीला लागतो जेव्हा युद्ध अशक्य होईल. तो त्या हवेतल्या मानवतावाद्यांपेक्षा अधिक योग्य प्रकारे हे काम करतो, जे विश्वशांतीचा जयघोष करत उड्या मारत राहतात. त्याचे इतर बांधव काय करत आहेत हे जाणण्यासाठी, त्यांच्या संपर्कात राहाण्यासाठी, आपल्या विचारांना प्रस्तुत करण्यासाठी आणि पसरविण्यासाठी तो छापखाना चालवतो, पण अनेक अडचणींना तोंड देत अविश्रांत कामातून तो हे शक्य करतो. शेवटी ती वेळ येऊन ठेपते. तो उठतो, फूटपाथ आणि बैरीकेड्सला आपल्या रक्तांन लाल करतो, तो त्या स्वातंत्र्यासाठी झेप घेतो जे धनिक आणि ताकदवर लोक पून्हा भ्रष्ट करतील व पून्हा ते त्याच्याच विरोधात वापरतील.
प्रयत्नांच्या पराकाष्ठेची अंतहीन मालिकाच जणू! कधीही न थांबणारा संघर्ष! दरवेळी नव्यांनं करावी लागणारी जीवापाड मेहनत! कैक वेळेस मध्येच सोडून जाणाऱ्यांमूळं रिकाम्या झालेल्या जागांची भरपाई करावी लागते. जो परिणाम असतो थकव्याचा, आत्म्याच्या भ्रष्ट होण्याचा, प्रताडनांचा. कित्येक वेळेस रानटी हल्ले आणि शांत डोक्यांनी केलेल्या हत्याकांडांने उध्वस्त झालेल्या सैन्याची भरपाई करावी लागते. कधी कधी मोठ्या प्रमाणात झालेल्या खुनीसत्रांतून तुटलेल्या अनेक कड्या, अतिशय सचोटीनं जोडाव्या लागतात. आणि पून्हा नव्याने सुरुवात करावी लागते.
हे वर्तमानपत्रे अशा लोकांमूळे चालू राहतात, जे स्वत:ला झोप आणि जेवणांपासून वंचित ठेवून समाजातून ज्ञानाचे काही थेंब गोळा करतात. आंदोलन त्या थोड्याश्या पैशांवर जीवंत राहते, जे जगण्याची किमान गरजांतूनही कपात करून दिले जातात. आणि हे सर्व असा धोका पत्करून होते, जेव्हा मालकाला कळेल की “त्याचा कामगार, त्याचा गुलाम, समाजवादाच्या रंगात रंगू लागलाय” त्याच्या परिणामी त्याचे कुटूंब एका मोठ्या संकटात सापडते.
जर तुम्ही जनतेमध्ये जाल तर तुम्हाला हेच दिसेल.
ओझ्याखाली लटपटत, अंतहीन संघर्षांत मेहनत करणाऱ्या माणसांनी कित्येक वेळी हा प्रश्न विचारलाय :
“कुठे आहेत ते तरुण, जे आमच्या श्रमांच्या मोबदल्यांत शिकले? कुठे आहेत ते तरुण ज्यांना शिकत असताना आम्ही खाऊ घातलं, कपडे दिले? कुठे आहेत ते ज्यांच्यासाठी भुकेल्या पोटी व दुप्पट ओझं घेऊन आम्ही ही घरे बनवली, हे कॉलेज, हे लेक्चर रूम आणि संग्रहालये उभे केली? कुठे आहेत ते लोक ज्यांच्या फायद्या साठी आम्ही सुकलेला, थकलेला चेहरा घेऊन उत्कृष्ट पुस्तकं छापली ज्यांतली बहुतेकतर आम्ही वाचूही शकत नाहीत. कुठे आहेत ते प्रोफेसर जे दावा करतात की मानवजातीची तमाम ज्ञान-विज्ञाने त्यांच्याकडे आहेत व ज्यांच्यासाठी मानवजात एका दुर्मीळ किड्यापेक्षा अधिक काही नाही. कुठे आहे ते लोक जे नेहमी मुक्तीच्या प्रशंसेसाठी भाषणे देत राहतात पण आमच्या स्वातंत्र्यासाठी कधीही विचार करत नाही, जे दररोज त्यांच्या पायदळी तुडवले जातं? कुठे आहेत ते लेखक आणि कवी, ते चित्रकार, आणि मुर्तीकार? एका शब्दांत बोलु. कुठे आहे ती दांभीकांची टोळी जी डोळ्यांत आसवं आणू आणू जनतेविषयी बोलत राहतात पण कधीच चुकूनही जनतेमध्ये जात नाहीत. जे कधीही आमच्या मानमोडेस्तोवर केल्या जाणाऱ्या मेहनतीत मदत करताना दिसत नाहीत.”
कुठे आहे ते? खरंच कुठे आहेत?
अरे, काहीतर भ्याडपणे उदासीनतेत आरामाचे जीवन जगत आहेत आणि बाकी बहुतेक “घाणेरड्या गर्दीचा” द्वेष करतात आणि जर या गर्दीनं त्यांच्या विशेषाधिकाराला जराही हात लावण्याचा प्रयत्न केला तर ते त्यांच्यावर तुटून पडण्यासाठीही तयार असतात.
हे खरं आहे की कधी कधी असा कुणीतरी तरुण आपल्यांत येतो जो ढोल-नगारे आणि बैरीकेड्सची स्वप्ने पहात असतो व सनसनाटी दृश्यांची इच्छा बाळगून असतो.पण जसं त्याला कळतं की बैरीकेड्स पर्यंतचा रस्ता खुप लांबचा आहे, काम कठीण आहे आणि या मार्गावर मिळणाऱ्या कौतुकांचा मुकूट काट्यांचा आहे. तसा तो जनतेच्या लढाईला सोडून पळ काढतो. सामान्यपणे अशी माणसं खुप महत्वाकांक्षी असतात, जे लोकांना फूस लावून त्यांची मतं मिळवू इच्छीतात पण जनता जेव्हा त्यांनीच सांगीतलेली तत्वे लागू करण्याचा प्रयत्न करू लागते, तेव्हा ते जनतेची निंदा करण्याकामी सर्वात पूढे येतात.जर लोकांनी त्यांच्या म्हणजेच, आंदोलनकर्त्या नेत्यांचा इशारा करण्यापूर्वीच पुढे येण्याचे धाडस केले तर कदाचित तोफा बंदूकांची तोंडे त्यांच्या दिशेने वळवण्यासाठी सुद्धा ते तयार होतात.
याला विखारी अपमान, दंभपूर्ण घृणा आणि भेकड शिव्यांची जोड द्या, तुम्ही समजून जाल की लोक उच्च आणि मध्यम वर्गाच्या बहुतेक युवकांकडून सामाजिक क्रांतीला मदतीच्या बाबत काय अपेक्षा बाळगुण आहेत ते.
पण तुम्ही विचाराल की, “मग आम्ही काय करायला पाहीजे?” जेव्हा की करण्यासाठी खुप काही आहे. काम इतकं आहे की युवकांची आख्खी सेना आपली समस्त उर्जा याकामी खपवू शकते. आपली प्रतीभा आणि सृजनाची पूर्ण ताकद लावून या महान कामी लोकांची मदत करू शकते.
आपण काय करायला हवं? तर ऐका
शुद्ध विज्ञानाच्या प्रेमींनो, जर तुम्ही समाजवादाच्या तत्वांनी सज्ज असाल, जर तुम्ही दरवाजा ठोठावणाऱ्या क्रांतीचा वास्तविक अर्थ समजत असाल, तर तुम्हाला दिसून येइल की विज्ञानाला नव्या तत्वांशी एकता कायम करायची असेल तर त्याला नव्या साच्यात आकार घ्यावाच लागेल. तुम्हाला हेही दिसेल की या क्षेत्रात यापेक्षाही मोठी क्रांती करायला पाहीजे. जशी अठराव्या शतकात विज्ञानाच्या प्रत्येक क्षेत्रांमध्ये केली गेली. तुम्हाला हेही दिसेल की इतिहासात आज फक्त महान राजे-रजवाड्यांच्या, पूढाऱ्यांच्या आणि संसदेच्या किस्से आणि कहाण्या आहेत त्या पुनश्च: जनतेच्या दृष्टीकोणातून लिहण्याची गरज आहे. की मानवजातीच्या दिर्घ विकासक्रमांत जनतेद्वारा केलेल्या कामाच्या नजरेतून लिहाव्या लागतील. तुम्हाला काय हे दिसत नाही की सामाजिक अर्थशास्त्र जे आज केवळ भांडवली दरोडेखोरीच्या पवित्र आवरणाचे काम करतेय, त्याचे मूलभूत सिद्धांत व सर्वच अनुप्रयोग नव्यांन लिहण्याची गरज आहे. की मानवशास्त्र, समाजशास्त्र, नीतिशास्त्राला पूर्णत: नव्या साचात घडवावं लागेल. गाभ्यातून बदलावं लागेल, नैसर्गिक घटना म्हणून असणारी धारणा या अर्थी आणि व्याख्येच्या पद्धतीच्या दृष्टीकोणांतून सुद्धा.
तर ठिक आहे, कामाला लागू, तुमच्या क्षमतांना एका चांगल्या उद्दीष्टांसाठी समर्पित करा. खासकरून आपल्या तर्कांच्या स्पष्टतेनं पूर्वग्रहांशी लढण्यासाठी आमची मदत करा आणि संश्लेषनाच्या आपल्या क्षमतेनं एका उत्कृष्ट संघटनेचा पाया घालायला मदत करा. त्यापेक्षाही आपल्या नित्यांच्या वादविवादांमध्ये खऱ्या वैज्ञानिक संशोधनाची निर्भीकता लागू करने शिकवा. आणि आम्हाला दाखवा की सत्याच्या विजयासाठी कशा तऱ्हेने आपला जीव अर्पण करायचा असतो. जसा तुमच्या पूर्वजांनी केला होता.
कटू अनुभवांतून समाजवादाची शिकवण मिळवलेल्या डॉक्टरांनो, आज, उद्या आणि कधीही आम्हाला सांगताना थकू नका की जर जीवन आणि काम याची अशी स्थिती कायम राहीली तर लोक तीळतीळ मरत राहतील. की बहुसंख्यांक मानवता अशा स्थितीत जगत राहील, जी चांगल्या आरोग्यासाठी विज्ञानांन सांगीतलेल्या स्थितीच्या अगदी विपरीत असेल, तोवर तुमची सगळी औषधे आणि इलाज आजारांच्या विरोधात शक्तीहीन असेल. लोकांना ही गोष्ट पटवून सांगा की खरी गरज आजारांची कारणं मिटवण्याची आहे आणि आम्हा सर्वांना दाखवून द्या की या कारणांना संपवण्यासाठी काय करायला पाहीजे.
तुमची हत्यारे घेऊन या आणि आमच्या समोर तुमच्या अचूक हातांनी या सडू लागलेल्या समाजाची चीर-फाड करून बघा. आम्हाला सांगा की विवेकपूर्ण जीवन कसे असायला पाहीजे आणि कसं असू शकतं. खऱ्या शल्यचिकीत्सकसारखं जोर देऊन्ा म्हणा की ज्या अंगाला गैंगरीन झालं आहे, त्याला कापून फेकून द्यायला हवं. नाहीतर संपूर्ण शरीरात विष पसरेल.
तुमच्यातले जे उद्योगांमध्ये विज्ञान लागू करून काम करत आहेत, त्यांनी या आणि आम्हाला स्पष्ट सांगा की तुमच्या शोधाचे काय निष्कर्ष आहेत. जे लोक भविष्याकडे निडर होऊन्ा पूढे जाण्यांमध्ये कचरताहेत त्यांना समजावा की मानवजातीद्वारा अर्जित ज्ञानाच्या गर्भात कसे विस्मयकारी नवे आविष्कार लपले आहेत. योग्य परिस्थिती लाभताच उद्योग काय जादू दाखवू शकतात. माणूस दुसऱ्यासाठी राबण्यापेक्षा जेव्हा स्वत:साठी श्रम करू लागतो तेव्हा किती उत्पादन करू शकतो.
कवींनो, चित्रकार-मुर्तीकार, संगीतकारहो, जर तुम्ही तुमचे खरे मिशन व स्वत: कलेचे वास्तविक हीत काय आहे, हे समजला असाल तर आमच्या सोबत या. तुमचा पेन, शाई, दौत आणि विचारांना क्रांतीच्या सेवेत लावा. आपल्या भावपूर्ण शैलीमध्ये अथवा प्रभावशाली चित्रांमधून आमच्या समोर उत्पीडन करणाऱ्यां विरुद्ध जनतेच्या शौर्यपूर्ण संघर्षाचे चित्र सादर करा. आमच्या तरुणांच्या मनांत त्याच क्रांतीकारी उत्साहाचा अग्नी प्रज्वलित करा, ज्याच्यामुळं आमच्या पूर्वजांची अंतरंगे चमकत होती, स्त्रीयांना सांगा की सामाजिक मुक्तीच्या महान उद्दीष्टांसाठी आपले जीवन बलिदान करणाऱ्या पतीचा पेशा किती उदात्त आहे. लोकांना दाखवून द्या की त्यांचे वास्तविक जीवन किती भयानक आहे आणि त्याच्या कुरुपतेच्या कारणांवर बोट ठेवत, आम्हाला सांगा की जर प्रत्येक पावलावर आपल्या वर्तमान समाज व्यवस्थेचा मुर्खपणा आणि अपमानास्पद शुद्र अडचणी उभी करनार नसेल तर जीवन किती विवेकपूर्ण होऊ शकते.
अंतत: तुम्ही सर्व ज्यांच्याकडे ज्ञान, प्रतिभा, क्षमता आणि उद्यम आहे. जर तुमच्या स्वभावांत सहानुभूतीचे स्फुलिंग आहे. तर तुमच्या साथीं सोबत या आणि तुमची सेवा त्यांना द्या ज्यांना त्याची सर्वात जास्त गरज आहे. पण तुम्ही येत आहात तर लक्षात ठेवा की तुम्ही मालकासारखे नाही, उस्तादा सारखे नाही तर संघर्षातील सोबती सारखे आला आहात. की तुम्ही राज्य करण्यासाठी, हूकूम चालवण्यासाठी नाही तर एका अशा नव्या जीवनात नवी शक्ती मिळवण्यासाठी आला आहात, जे भविष्यावर विजय मिळवायला एका तरंगासमान पूढे चाललेय. तुम्ही शिकवायला कमी आणि बहुतेकांच्या आकांक्षाना समजण्यासाठी आला आहात. या साठी आला आहात की या आकांक्षाना एक उंच दर्जा देता यावा. आणि मग त्यांना वास्तविक जीवनात साकार करण्यासाठी युवावस्थेचा तमाम जोश आणि वयाचा तमाम होश कायम ठेवून न थांबता आणि घाई न करता कामात व्यस्त व्हावे. तेव्हा आणि केवळ तेव्हाच तुम्ही एक पूर्ण, एक उदात्त आणि एक विवेकपूर्ण जीवन जगू शकाल. तेव्हाच तुम्ही पाहू शकाल की या मार्गावरील तुमचा प्रत्येक प्रयत्न भरघोस फळं घेऊन येईल. जेव्हा एकवार तुमचे कार्य आणि अंत:चेतनाच्या निर्देशावर ही उदात्त एकता कायम होईल, जी तुम्हाला इतकी ताकद देईल ज्याविषयी कधी तुम्ही स्वप्नातही विचार केला नसेल.
लोकांमध्ये राहून त्यांच्याकडून कृतज्ञता व सम्मान कमावत, न्याय आणि समानतेसाठी अविरत संघर्ष करणे, याहून उत्कृष्ट करिअर तरुणांसाठी कुठले असू शकतं.
खात्यापित्या घरातील तुम्हा लोकांना ही गोष्ट सांगायला मला खुप वेळ लागला की जीवन तुम्हा पुढे द्वंद्व उपस्थित करत आहे, जर तुम्ही साहसी आणि ईमानदार असताल तर समाजवाद्यांच्या खांद्याला खांदा भिडवून काम करण्यासठी तुम्ही बाध्य व्हाल. त्यांच्या रांगेमध्ये सामील होऊन सामाजिक क्रांतीचे उद्दीष्ट पुढे न्याल. हे सत्य किती साध-सोपं आहे. पण जेव्हा तुम्ही भोवतालच्या बुर्जूआ प्रभावात वाढलेल्या लोकांशी बोलत असाल तर कितीतरी खोट्या तर्कांशी तुम्हाला भिडावं लागेल, कित्येक साऱ्या पूर्वग्रहांवर विजय मिळवावा लागेल. कितीतरी स्वार्थपूर्ण संकटावर मात करून पूढे जावं लागेल.
आज तुम्हा लोकांशी बोलणं, जनतेच्या तरुणांशी बोलणं, संक्षेपानं बोलणं खुप सोपं आहे. तर्क आणि कारवाई करण्याचं साहस तुमच्यात कितीही कमी असु द्यात. पण घटनांचा दबावच तुम्हाला समाजवादी बनण्यासाठी मजबूर करेल.
श्रमिक वर्गांचा हिस्सा असूनही समाजवादाच्या विजयासाठी स्वत:ला झोकून न देणं, खरंतर खऱ्या हिताच्या गोष्टीं विषयी अपसमज बाळगणे आहे. आपली उद्दीष्टे आणि ऐतिहासिक मिशन मधल्या मध्येच सोडून देणं आहे.
तुम्हाला तुमचं लहाणपण आठवते का जेव्हा थंडीच्या दिवसांत एका अंधाऱ्या कोपऱ्यात तुम्ही खेळायला गेला होता? तुमच्या पातळ कपड्यांतून आतमध्ये शिरत थंडी तुम्हाला बोचत होती, आणि थंड चिखल तुमच्या बुटांमधून आतमध्ये शिरत होता. त्या वयात सुद्धा जेव्हा तुम्ही गरम कपड्यात झाकून घेतलेल्या त्या लाल गालाच्या मुलांना येता जाता बघीतले तेव्हा ते तुमच्याकडं हिणतेच्या नजरेने पाहत होते. तेव्हा तुम्ही चांगल्या पद्धतीने ओळखून होता, की नखशिखांत झाकलेली ही छोटी मूलं तुमची वा तुमच्या सवंगडयांची बरोबरी करू शकत नाहीत. ना अकलेच्या बाबत, ना काॅमनसेंस आणि ना जोश आणि ताकदी बाबत. नंतर जेव्हा तुम्हाला पाच-सहा वाजता उठून घाणेरड्या कारखान्यात कैद राहून धडाम धडाम वाजणाऱ्या मशिनपाशी उभं राहण्याची वेळ आली व स्वत:च मशिन प्रमाणे वर्षानुवर्षे काम करावं लागते, या काळात ती मूलं मात्र उत्कृष्ट शाळा, अॅकेडमी आणि विद्यापीठात शिक्षण मिळवत होती. आता तीच मूलं, तुमच्याहून अक्कल कमी असूनही उत्कृष्ट शिक्षण घेऊन तुमचे मालक बनलेत आणि जगण्याच्या तमाम सुखांना तथा सभ्यतेच्या तमाम फायद्यांना उपभोगत आहेत. पण तुम्ही? कशा प्रकारचं आयुष्य तुमची वाट पाहतयं?
तुम्ही एका छोट्याश्या दमट, उबट खोलीत परतता जीथं पाच-सहा माणसं जनावरांसारखी राहतात. जीथं तुमची आई, जीला तीच्या जगण्यांनच आजारी केलय. जी वयानं नव्हे पण चिंतेनं म्हातारी झाली आहे. तुम्हाला जेवणाच्या नावाखाली वाळलेले तुकडे आणि चटणी देते. ज्याच्या सोबत एक काळे पाणी असतं त्याला गमतीनं चहा म्हणतात. या सगळ्यातून लक्ष बाजूला सारायला तुमच्या कडे रोज एकच प्रश्न असतो “उद्या दुकानदाराची उधारी कशी फेडायची आणि घरमालकाच भाडं कसं द्यायच?”
तुम्ही काय तीस-चाळीस वर्षे हीच जीवघेणी जींदगी जगणार जी तुमचे आई-वडील जगले होते? काय तुम्ही आयुष्यभर दुसऱ्यांसाठी चांगल्या आयुष्याचा सगळा आनंद, ज्ञान आणि कलेची सुखासिनता गोळा करायला खटत राहणार आणि याच्या बदल्यांत एकाच गोष्टीची चिंता तुम्हाला पडेल की उद्या भाकर कुठुन आणायची? काय तुम्ही स्वत:ला जीवघेण्या श्रमाच्या जात्यात भरडून घ्यायचं आणि त्याच्या बदल्यात तुम्हाला फक्त अडचणी आणि हालअपेष्टा मिळणार, जेव्हा संकटाची वेळ येईल तेव्हा? काय तुम्ही जीवनाकडून इतकचं मागता?
कदाचीत तुम्ही हार मानाल, या स्थितीतून बाहेर पडण्याचा कुठलाच मार्ग दिसत नसल्यानं तुम्ही स्वत:शीच म्हणाल “सगळी पीढीच या नियतीच्या फेऱ्यांतून जात असते, मी एकटा काय बदलू शकतो. मलाही झुकावच लागेल. तर मग ठिक आहे, मी ही खटत राहील आणि जसं जमल तसं जगेल.”
चांगली गोष्ट आहे. अशा स्थितीत जगणे खुप काही शिकवून जातं.
एके दिवशी आर्थिक संकट येईल. असं आर्थिक संकट जे पूर्वी कधी नव्हतं आलं आणि एका पूर्ण उद्योगालाच ठप्प करेल. ज्यामुळे हजारों कामगार विपन्नवस्थेत ढकलले जातील. त्यामुळे कुटूंबाच्या कुटूंबे चिरडले जातील. इतरांसारखं तुम्ही सुद्धा या संकटाशी झुंजता पण लवकरच तुम्हाला पहायला मिळतं की कशा प्रकारे तुमची पत्नी, मुलं, मित्र हळू हळू अभावग्रस्ततेचे शिकार बनतात व तुमच्या डोळ्यांदेखत मरू लागतात. फक्त पोटभर अन्नावाचून देखरेखी वाचून आणि डॉक्टरी मदती वाचून ही गरीब माणसं बिछान्यावर शेवटचा श्वास घेतात. तर दुसरीकडं मात्र चमचमणाऱ्या महानगरांत श्रीमंतांच्या झुंडीच्या झुंडी रस्त्यावर मजामस्ती करत भटकत राहतात. मरणाऱ्या लोकांच्या विव्हळणाऱ्या आवाजापासून बेपर्वा आणि बेफिक्र
तेव्हा तुम्हाला समजेल की किती घृणास्पद आहे हे सगळं. तुम्ही संकटाच्या कारणांचा विचार कराल आणि तुम्ही जर पडताळणी केली तर तुम्ही या घाणेरड्या व्यवस्थेच्या मूळापर्यंत पोहचाल. जी करोडो लोकांना मुठभर रिकामटेकड्या अय्याश लोकांच्या स्वार्थाच्या दयेवर सोपवते. तेव्हा तुम्हाला समजेल की समाजवाद्यांच हे म्हणनं की आपल्या आजच्या अस्तित्वमान समाजाला वरपासून खालपर्यंत नव्यानं संगठीत करावं लागेल. आणि हे शक्यही आहे.
सामान्य संकटाच्या पूढे जावून आता तुमच्या प्रकरणाविषयी बोलूया. एक दिवस जेव्हा तुमचा मालक त्याची दौलत वाढवायला तुमच्याकडून थोडे अधिक पैसे ओरबडायला, तुमच्या श्रमाचा मोबदल्यामध्ये थोडी कपात करतो. तेव्हा तुम्ही विरोध करता. पण तो गर्वीष्ठपणे उत्तर देतो, “जेवढं देतोय त्याच्यावर काम करता येत नसेल, तर जा आणि गवत खा.” तेव्हा तुमच्या लक्षात येईल की तुमचा मालक फक्त मेंढयागत तुम्हाला हाकतच नाही तर त्याच्या लेखी तुमची किंमत ही खालच्या दर्जाच्या जनावरा सारखी आहे. तेव्हा तुम्हाला समजेल की मजूरी-व्यवस्थेद्वारे तुम्हाला त्याच्या मजबूत पंज्यात करकच्च आवळून ठेवायण्यातच त्याला समाधान मिळते. इतकंच नव्हे तर, हरप्रकारे तो तुम्हाला गुलाम बनवू इच्छितो. तेव्हा एकतर तुम्ही त्याच्यापूढे गुडघे टेकाल व मानवी सन्मानाची भावनाही सोडून द्याल, परिणामी तुम्ही अशा प्रत्येक अपमानाला सहन करू लागाल. किंवा मग तुमचं रक्त उसळेल, हा विचार करून तुम्ही थरथरून जाल की कसल्या भयंकर उतरंडीवर तुम्ही ढकलले जात आहात. तुम्ही रागात प्रत्युतर द्याल. आणि मग स्वत: बेरोजगारांच्या रांगते ढकलले जाल. तेव्हा तुम्हाला समजेल की समाजवाद्यांचं म्हणने किती खरं आहे “विद्रोह करा, या आर्थिक गुलामी विरोधात उठून उभे रहा.” तेव्हा तुम्ही समाजवाद्यांच्या रांगामध्ये सामिल व्हाल आणि आर्थिक, सामाजिक व राजकिय गुलामीला पूर्णता: उध्वस्त करण्यासाठी त्यांच्या सोबत काम करू लागाल.
मग कधीतरी त्या हसऱ्या सुंदर मुलीची कथा तुम्हाला ऐकायला मिळेल. जिची आत्मविश्वासी चाल, आनंदी स्वभाव आणि मधाळ बोलणं तुम्हाला आवडायचं. वर्ष दर वर्ष वाईट स्थितीत घालवल्यानंतर तीने गाव सोडले व मोठ्या शहरात आली. तिला माहीती होतं इथंही जगण्याचा संघर्ष कठीण असणार, पण आशा होती की कमीतकमी इमानदारीनं एका वेळेचं पोट भरता येईल. तुम्हाला माहीती आहे तिचं काय झालं? कुण्या भांडवलदाराच्या पोरानं तिला जाळयात ओढलं. ज्याला ती पूर्णत: समर्पित झाली. थोड्याच दिवसांत त्यानं तिला सोडून दिलं. आणि मग पदरात एक लेकरू घेऊन ती एकटीच राहू लागली. ती साहसी होती म्हणून तिनं संघर्ष सोडला नाही. पण थंडी आणि भूके विरुद्धच्या या असमान संघर्षात ती उन्मळून पडली आणि तीला शेवटचे दिवस एका खैराती दवाखान्यात घालवावे लागले. कुणालाच माहीत नाही की कशाप्रकारे दवाखान्यात…
तुम्ही काय कराल? पून्हा तुमच्या पूढे दोन रस्ते खुले आहेत. एकतर तुम्ही या अप्रिय आठवणी एखाद्या मुर्खतापूर्ण वाक्यांनी बाजूला साराल. तुम्ही म्हणाल, “असं करणारी ती ना पहीली होती, ना शेवटची असेल” कदाचित कधीतरी तुमच्याच सारख्यां इतर पशुंसोबत एखाद्या सार्वजनिक ठिकाणी त्या मुलीच्या आठवणींना काळीमा लावत एखादा अश्लिल किस्सा सांगाल. किंवा मग गतवर्षांच्या आठवणी तुमच्या काळजाला चाटून जातील व तुम्ही त्या धोकेबाज धनदांडग्याला शोधाल जेणेकरून त्याच्या थोबाडात लावता यावी. तुम्ही रोज होणाऱ्या अशा घटनांच्या कारणांचा शोध घ्याल व लक्षात येईल, जोवर समाज दोन वर्गात विभागलेला आहे तोवर या घटना थांबवता येणार नाहीत. एका बाजूला जगात तमाम दु:खी लोक आहेत, तर दुसरीकडे चिकन्या चुपड्या बाता करणारे वासनांध पशु आहेत. तुम्ही समजून जाल की ही दरी पार करण्याची वेळ आता आली आहे. आणि तुम्ही समाजवाद्यांमध्ये आपली जागा घ्यायला धावत याल.
आणि तुम्ही कष्टकरी स्त्रीयांनो, हे ऐकून तुमच्यावर काहीच परिणाम झाला नाही? ओटीतल्या मुलांच्या सुंदर डोक्यावर हात फिरवत तुमच्या डोक्यात असा विचार कधीच येत नाही का? की या सामाजिक परिस्थितीत या मुलाचे भविष्य काय असेल? तुम्ही काय तुमच्या लहान बहीणीच्या व तमाम मुलांच्या भविष्याबाबत कधीच विचार नाही करत? काय तुम्हाला वाटतं का की तुमची मुलं सुद्धा तशीच जनावरासारखी खटत रहावीत जसा त्यांचा बाप खटत होता? रात्रीच्या जेवणाशिवाय त्याला काहीच चिंता नसावी आणि दारुच्या अड्ड्या शिवाय त्याच्या आयुष्यात कुठला आनंद नसावा. तुम्हाला वाटतं का तुमचा पती, तुमचा मुलगा त्या लहरी पोराच्या दयेवर रहावा जो बाप कमाईतून मिळालेल्या भांडवलाच्या जोरावर शोषण करतो आहे. काय तुम्हाला हेच पाहीजे की ते नेहमी मालकाचे गुलाम बनून रहावे जो त्यांची हाड न् हाडांचा चुराडा करून विकू इच्छितोय, धनी शोषकांच्या कुरणातल्या शेणापेक्षा जास्त त्यांची पात्रता अजिबात नसावी?
नाही, कधीच नाही. हजारदा नाही. जेव्हा तुम्ही ऐकलं की उत्साह आणि दृढतेनं ओतप्रोत तुमच्या पतींनी संप केला, पण शेवटी मान खाली घालून त्या घमेंडखोर बुर्जूआच्या अटी त्यांना मान्य कराव्या लागल्या, तसं तुमचे रक्त उसळू लागलं. मला माहीत आहे की तुम्हाला त्या स्पेनी महीलांच कौतूक आहे ज्या जनविद्रोहाच्या वेळेस विद्रोहींच्या पूढल्या रांगेत होत्या व त्यांनी शिपायांच्या संगिनी समोर आपली छाती पूढं केली होती. मला विश्वास आहे तुम्ही त्या स्त्रीचे नाव इज्जतीनं घेता जिने एका समाजवादी बंदीवानाला क्रुरपणे छळणाऱ्या दुष्ट अधिकाऱ्याच्या छातीत गोळी घातली होती. आणि मला खात्री आहे की पॅरीसच्या त्या महीलांविषयी वाचून तुमच्या हृदयाचे ठोके वेग धरतात, ज्यांनी गोळ्यांच्या वर्षावाची पर्वा न करता “आपल्या माणसांना” शौर्यपणे लढायला धीर दिला होता.
तुमच्यापैकी प्रत्येक प्रामाणिक तरुण, शेतकरी, मजूर, कामगार, कारागीर अणि शिपाई प्रत्येकाला समजेल की आपले अधिकार काय आहेत. मग तुम्ही आमच्या सोबत याल. तुम्ही त्या क्रांतीच्या तयारीसाठी आपल्या भावांसोबत काम करण्यासाठी याल, जे गुलामीच्या प्रत्येक निशाणीला साफ करून, साखळदंड छिन्न विछिन्न करून, जून्या सडकया परंपरांना तोडत समस्त मानवजातीसाठी आनंदमय जीवनाचा नवा आणि व्यापक रस्ता उघडून शेवटी खरी स्वतंत्रता, वास्तविक समानता आणि बंधूत्वाची स्थापना करतील. तेव्हा सर्व माणसं एकत्र येऊन, सोबतीनं काम करत मिळणाऱ्या फळाचा आनंद घेतील. आपल्या सर्व क्षमतांचा भरपूर विकास करत, एक विवेकपूर्ण, मानवीय आणि सुखमय जीवन जगतील.
आता कुणी असं म्हणू नये की आम्ही जो एक छोटा समूह आहोत या महान लक्ष्याला प्राप्त करण्यासाठी खुप कमजोर आहोत.
जरा मोजा आणि पहा, या अन्यायाला सहन करणारे तुमच्या सारखे किती लोक आहेत.
आम्ही शेतकरी जे दुसऱ्यांसाठी काम करत राहतो आणि स्वत: मात्र कोंडा खातो, जेव्हा आमचा मालक उंची गहू खातो आहे, आमचीच संख्या करोडो मध्ये आहे.
आम्ही कामगार जे उत्तम रेशीम आणि मखमल तयार करतोय, पण आम्ही मात्र ठिगळांनी व्यापलेलो असतो. आमचीही मोठी संख्या आहे. जेव्हा कारखान्याची धडधड आम्हाला संधी देते तेव्हा रस्त्यावर आणि चौकांमध्ये समुद्राला भरती यावी तसे आम्ही रस्ते व्यापतो.
आम्ही शिपाई जे आदेश वा हंटरांनी हाकलो जातोय. आम्ही जे गोळ्या झेलतो. ज्याच्या साठी आमच्या अधिकाऱ्यांना पदक आणि पेंशन मिळते. आम्ही अज्ञानी मुर्ख माणसं ज्यांना आपल्याच भावांवर गोळी घालण्याशिवाय काहीच शिकवलं जात नाही. आम्हाला तर एवढंच करायचय, फक्त वळायचं आहे त्या सजल्या धजलेल्या अधिकाऱ्यांच्या दिशेने जे केवळ आम्हाला आदेश देतात, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर ही मरणाचा पिळवटपणा दिसू लागेल.
अरे, आपण सर्वजन रोज जे खटतो आणि अपमानीत होतोय, आपण सर्व मिळून एक विराट संख्या आहोत. ज्याची कुणीही बरोबरी करू शकत नाही. आपण तो समुद्र आहोत, जो सर्वांना सामावून घेऊ शकतो आणि सर्वांना स्वाहा करू शकतो.
ज्या दिवशी आपण असं करायचं नक्की करू, त्या दिवशी न्याय झालेला असेल. त्याच क्षणी धरतीवरल्या सगळ्या अत्याचाऱ्यांचा पार धुराळा उडाला असेल.