दि. 01/06/2024 आणि 02/06/2024 रोजी जनता वसाहत, पुणे येथे नौजवान भारत सभा (नौभास) तर्फ़े सहावी ते दहावीच्या मुलांकरिता दोन दिवसीय समर कॅम्प (उन्हाळी शिबीर) आयोजित केला गेला. यामध्ये मुलांनी विविध उपक्रमांची मजा घेतली व बऱ्याच गोष्टी शिकल्या. या कॅम्पमध्ये गणितातील गमती जमती, विविध मजेदार खेळ आणि कृती, चित्रकला आणि हस्तकला तसेच विज्ञानाचे प्रयोग यांचा समावेश होता.शिबिराची सुरवात शहीद भगतसिंह, राजगुरू, सुखदेव यांना क्रांतिकारी अभिवादन करून झाली.
गणिताच्या सत्रामध्ये गणितातल्या खेळांमुळे मुलांना गणित विषयात रस निर्माण झाला व गणित नक्की येते कुठून आणि आपण नक्की हे का शिकतो याची जाणीव झाली. सत्रामध्ये मुलांना मानव समाजात गोष्टी मोजण्याची गरज जशी समोर आली तसे कशाप्रकारे वेगवेगळ्या आकड्यांचे रूप आपल्याला बघायला मिळाले आणि वेगवेगळ्या प्राचीन समाजामध्ये कोणते आकडे वापरले जायचे हे समजावण्यात आले. इजिप्त मधल्या आकड्यांपासून ते रोमन आकड्यांपासून ते आता वापरल्या जाणाऱ्या हिंदू-अरबी आकड्यांपर्यंतच्या प्रवासाबद्दल मुलांना सांगितले गेले. बेरीज,वजाबाकी, गुणाकार, भागाकार या गणितीय क्रियांचा व ऋण संख्या अर्थात निगेटिव्ह नंबर्स चा खरच अर्थ काय याबद्दल मुलांना सांगितले गेले. गणितातल्या मजेदार गोष्टीबद्दल बोलले गेले. सातच्या पाढयावर टाळी वाजवण्याचा खेळ सुद्धा घेतला गेला. गणित हा बऱ्याचदा मुलांचा न आवडता विषय असतो पण याच्यात खरंच किती गमती आहेत आणि याचं महत्त्व काय आहे याबद्दल या सत्रामध्ये सांगितले गेले.
खेळाच्या सत्रामध्ये खेळांमध्ये, “passing the parcel”, “dumb charades ” आणि “simon says” असे खेळ घेतल्या गेले. खेळ खेळताना, त्यांच्या चेहऱ्यात आनंदाची चमक होती आणि मुलांमध्ये उत्साह साफ दिसत होता.
चित्रकला आणि हस्तकलेच्या सत्रामध्ये त्यांनी आपली सर्जनशीलता विकसित केली. विविध रंग, कांद्याच्या चकत्या, पाने, नाणी इत्यादी वस्तूंच्या मदतीने त्या रंगांचा छाप मारून विविध कलाकृती बनवल्या. साथी स्वप्नजा सोबत मुलांनी त्यांची कल्पनाशक्ती वापरुन चित्र काढले. त्यासोबतच क्राफ्ट पेपर आणि स्ट्रॉच्या मदतीने एक फिरणारी चक्री सुद्धा मुलांने बनवली.विज्ञान प्रयोगाच्या माध्यमातून मुलांनी विज्ञानाच्या जगातील गंमतीचा अनुभव केला. जगात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीमागे कारण असते आणि ते आपण समजून घेतले पाहिजे. यासाठी त्यांना प्रश्न विचारणे हे शिकवले गेले. विज्ञानाच्या प्रयोगांमध्ये प्रकाश कसा सरळ रेषेत प्रवास करतो हे शिकवले. प्रकाशाची सरळ रेषा कशी असते हे दाखवण्यासाठी लेझरचा वापर केला. एका डोळ्याने अंतर योग्यप्रकारे का मोजता येत नाही हे समजावण्यासाठी नाण्याचा खेळ घेतला. हायड्रोजन पेरॉक्साइड, लिक्विड सोप आणि यीस्टच्या सहाय्याने एलिफंट्स टूथपेस्टचा प्रयोग घेतला. पोटॅशियम परमँगनेटचा रंग जांभळ्यापासून साखर आणि कॉस्टिक सोड्याच्या द्रावणाच्या भर घातल्यावर हिरव्या होतो आणि नंतर पिवळा होतो, हा प्रयोग केला. तसेच फुग्याच्या साहाय्याने रॉकेट्स कसे चालवले जातात हेही शिकवले. ह्या प्रयोगांमधनं आणि खेळांमध्ये मुलांना विज्ञानाचे महत्त्व पटवून दिले गेले.
शिबिराच्या शेवटी मुलांना त्यांचा या शिबिरातल्या अनुभवाबद्दल विचारले गेले व त्यांना पुढे काय शिकायला आवडेल आणि कुठले सत्र घ्यावेत असे वाटते हे विचारले गेले. येथे झालेल्या या कॅम्पमुळे मुलांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. अशा कॅम्पच्या माध्यमातून मुलांना नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. पुढील शिबिर कधी होणार याची विचारणा मुलांकडून केली गेली.
सध्याच्या फॅसिस्ट काळात शिक्षणावर चहूबाजूंनी हल्ला होत आहे, कामगार कष्टकरी वर्गातील मुलं-मुली शिक्षणापासून दूर लोटली जात आहेत. शिक्षणाचे बाजारीकरण, भगवेकरण सुरू आहे. अशामध्ये मुलांना शिक्षणाची गोडी लावणे, चिकित्सक, वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे, त्यांना अन्यायकारक भांडवली समाजाबद्दल प्रश्न विचारायला लावणे हे सर्व महत्वाचे कार्यभार आहेत. अशा प्रकारच्या शिबिरातून आणि नौभासच्या नियमित कार्यक्रमातून ह्या गोष्टींसाठी नेहमीच प्रयत्न केले जातात.
अशा प्रकारचे शिबिर यापुढेही आयोजित केले जातील. तुम्ही सुद्धा अशा प्रकारच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊ शकतात. सामील होण्यासाठी संपर्क करा.
संपर्क – 8329869421
नौजवान भारत सभा (पुणे)
