क्रांतिकारी शहीद रामप्रसाद बिस्मिल यांना विनम्र अभिवादन!

11 जून हा क्रांतिकारी रामप्रसाद बिस्मिल यांचा जन्मदिवस. अखेरच्या श्वासापर्यंत बिस्मिल यांनी फक्त ब्रिटिश वसाहतवाद्यांविरोधात लढा दिला नाही तर भारतात खऱ्या अर्थाने समतेवर आधारित समाज स्थापन करण्याचासुद्धा प्रयत्न केला. त्यांचा जन्म 1897 मध्ये शाहजहाँपूर, उत्तर प्रदेश येथे झाला. लहानग्या बिस्मिलने घरीच अभ्यास सुरू केला आणि मग नंतर एका मौलवीकडून उर्दू भाषेचे शिक्षण घेतले. बिस्मिल, राम, अग्यात या नावाने त्यांनी हिंदी आणि उर्दूमध्ये कविता लिहिल्या. ‘मेरा रंग दे बसंती’ हे गीत त्यांचीच प्रसिद्ध रचना आहे. बिस्मिल लहान वयातच आर्यसमाजी झाले. त्यानंतर त्यांचे शिक्षक, सोमदेव यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी ब्रिटिश राजवटीविरूद्ध स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होण्यास सुरुवात केली. बिस्मिल 1916 साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या लखनऊ बैठकीत उपस्थित होते. तिथेच त्यांचा परिचय भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या ‘मात्रवेदी दल’ या भूमिगत क्रांतिकारी संघटनेसोबत झाला. त्यानंतर ते या संघटनेचा भाग झाले. या काळात त्यांनी भारताच्या राजकीय स्वातंत्र्याची वकीली करणारे ‘अमेरिका को इंडिपेंडेंस कैसे मिली’ हे पुस्तक लिहिले. 1918 साली मेनपुरी षडयंत्र प्रकरणी ब्रिटिश सरकारने बिस्मिल व इतर काही जणांना फरार घोषित केले. यावेळी त्यांनी जातीय, धार्मिक तेढ सोडून जनतेला इंग्रजांच्या विरोधात एकजुटीने लढण्याचे आवाहन करणारे ‘देश वासीयों के नाम संदेश’ नावाचे एक पॅम्फलेट लिहिले.
नंतर मेनपुरी षडयंत्र प्रकरणी सर्व राजकीय कैद्यांना माफी मिळाल्यानंतर 1920 मध्ये बिस्मिल अज्ञातवासातून परत आले आणि त्यांनी आपले काम सुरू ठेवले. रशियन क्रांतीच्या काळात ‘बोल्शेविकांचा कार्यक्रम’ हे रशियन क्रांतिकारकांच्या कार्यक्रमाबद्दलचे एक पुस्तक अनुवादित करून प्रकाशित केले. असहकार आंदोलनात गांधींनी घेतलेल्या माघारीमुळे भ्रमनिरास होऊन त्यांनी ‘हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन’ या क्रांतिकारी संघटनेत प्रवेश केला. 1925 साली बिस्मिल आणि आणखी एक क्रांतिकारक, अश्फाकउल्लाह खान (या दोन क्रांतिकारकांची मैत्री आजही धार्मिक ऐक्याचे प्रतीक आहे) या दोघांच्या पुढाकाराने सुप्रसिद्ध काकोरी कट पार पाडण्यात आला. या प्रकरणी बिस्मिल, अशफाकउल्लाह खान, रोशन सिंग, राजेंद्रनाथ लाहिरी यांना अटक करून फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. तुरुंगात असताना बिस्मिलने आपले आत्मचरित्र लिहिले आणि अनेक लेख, पॅम्फलेट लिहिले जे क्रांतिकारी चळवळ, तिचे भविष्य आणि भारतातील समाजवादी राज्य यावर चर्चा करतात. बिस्मिलला 19 डिसेंबर 1927 रोजी गोरखपूर जेलमध्ये फाशी दिले गेले.
बिस्मिल आणि सावरकरांच्या माफी नाम्याची समांतर तुलना करण्याचा प्रयत्न हिंदूत्ववादी करत असतात. माफीनामा लिहून सावरकरांनी देशाच्या स्वातंत्र्य आणि न्यायासाठीचा झगडा तर थांबवलाच, सोबतच हिंदूत्वाच्या विचारधारेचे बीज पेरून त्यांनी धार्मिक द्वेषसुद्धा पसरवला. परंतु बिस्मिल यांनी देशाला ब्रिटिशांच्या साम्राज्यवादी जोखडातून मुक्त करण्यासाठीचा संघर्ष सुरूच ठेवला. सावरकरांच्या विपरीत, बिस्मिलने हिंदू-मुस्लिम ऐक्याचा आणि धार्मिक तेढ संपवण्याचा संदेश पसरवला. त्यांचा ब्रिटिशांविरोधात संघर्ष, धर्मनिरपेक्ष आणि समानतेवर आधारित समाज घडवण्याची जिद्द आणि त्यासाठी आवश्यक असलेल्या समाज बदलाच्या वैज्ञानिक सिद्धांताचा अभ्यास ह्या सर्व गोष्टींतून हे स्पष्ट दिसते की ते एक सच्चे क्रांतिकारी होते. आजच्या काळात जेव्हा धार्मिक फॅसिस्ट शक्ती आपल्या समाजाला पोखरण्याचा अथक प्रयत्न करत आहेत, तेव्हा शहीद बिस्मिल यांचे क्रांतिकारी विचार आणि धर्मनिरपेक्ष मूल्ये आता पूर्वीपेक्षाही अधिक प्रासंगिक आहेत.

Related posts

Leave a Comment

one × 1 =