शहीद भगतसिंह यांच्या जन्मदिवसानिमित्त नौजवान भारत सभेतर्फे शहीद स्मृती संकल्प अभियान राबविण्यात येत असून त्याअंतर्गत पुस्तक प्रदर्शने, पथनाट्य इत्यादी माध्यमातून विद्यार्थी-तरुण आणि जनतेपर्यंत क्रांतिकारकांचा वारसा व त्यांचे विचार पोहोचविण्याचे काम केले जात आहे. कधी नव्हे एवढे आज क्रांतिकारकांचे विचार प्रासंगिक झाले आहेत. याच अभियानांतर्गत ‘ विविध महाविद्यालयांमध्ये नौभास तर्फे “बाईचीच चूक” या पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले. पुरुषसत्ताक व्यवस्थेवर हल्ला चढवणारे आणि महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा अधोरेखित करणाऱ्या या पथनाट्याला विद्यार्थी-तरुणांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. काही विद्यार्थ्यांनी सांगितले की हे नाटक बघताना त्यांच्या अंगावर काटा उभा राहिला. त्यातून उभे झालेले मुद्दे आजचे जिवंत मुद्दे आहेत. महिलांचा प्रश्न हा अर्ध्या लोकसंख्येचा प्रश्न आहे. महिलांना आजही समाजात दुय्यम वागणूक दिली जाते, तिला प्रत्येक ठिकाणी अपमानाचा, अत्याचाराचा सामना करावा लागतो. गेल्या दहा वर्षांमध्ये महिलांवरील अत्याचारांची संख्या सतत वाढतच आहे. ही परिस्थिती बदलायची असेल, एक समतामुलक, शोषणमुक्त समाज निर्माण करायचा असेल तर तरुणांनी पुढे येणे आज अत्यंत गरजेचे आहे. नाटका सोबतच नौभास तर्फे लावण्यात आलेल्या बुकस्टॉल ला सुद्धा तरुणांचा चांगला प्रतिसाद मिळाला अनेकांनी क्रांतिकारकांचे लिखाण असलेली पुस्तके घेतली. बऱ्याच विद्यार्थ्यांनी पथनाट्य बघितल्यानंतर संघटनेसोबत जोडून घेण्याची इच्छा व्यक्त केली. व्यक्तिवादातून बाहेर निघत समाजासाठी काहीतरी करण्यासाठी ही चांगली संधी आहे असेही काही विद्यार्थी म्हणाले.
शहीद भगतसिंह स्मृति संकल्प अभियान : पुणे, 26 सप्टेंबर 2024
