रविवार, दि. 3 जानेवारी रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त दांडेकर पूल परिसरात सावित्रीबाईंच्या संघर्षाला अभिवादन करण्यासाठी प्रभातफेरी आयोजित करण्यात आली होती. वस्तीतील युवक सुद्धा ह्यात सहभागी झाले. प्रभातफेरी नंतर वस्तीतील शहीद भगतसिंह वाचनालया जवळ अभिवादन सभा घेण्यात आली. सावित्रीबाई फुलेंनी त्या काळच्या सरंजामी-ब्राह्मणवादी व्यवस्थेने महिला आणि शुद्रातीशूद्रांवर लादलेल्या ज्ञानबंदीच्या विरोधात, स्त्री गुलामी व जातिव्यवस्थेच्या विरोधात लढा पुकारला. सावित्रीबाई-ज्योतिबांनी रूढी, परंपरा, अंधश्रद्धांनी बरबटलेल्या समाजात आपल्या कुटुंबा पासून समाजात अविरत संघर्ष केला. आपले अवघे आयुष्य ह्या महत्कार्याला अर्पण केले. त्यांच्या संघर्षापासून आज तरुण-तरुणींनी प्रेरणा घेण्याची गरज आहे. आजच्या भांडवली व्यवस्थेत शिक्षणाचे बाजारीकरण-व्यापारीकरण-खाजगीकरण परत नव्या अर्थाने कामगार-कष्टकऱ्यांवर ज्ञानबंदी लादत आहे. भांडवलशाही, लुटीच्या व्यवस्थेला दीर्घायुषी बनवण्यासाठी कष्टकरी कामगारांना विभाजित ठेवण्याचे हत्यार म्हणून जातीव्यवस्था-धर्मवाद-पितृसत्तेचा परत एकदा जोरदार वापर करत आहे. त्यामुळे सावित्रीबाईंच्या संघर्षातुन प्रेरणा घेऊन आज आपल्या समोर उपस्थित असणाऱ्या जिवंत समस्यांना संघटीत रित्या भिडण्याचा संकल्प ह्यावेळी तरुणांनी केला. ‘सर्वांना केजी ते पीजी समान व मोफत शिक्षण’, ‘काम करण्याची इच्छा असणाऱ्या प्रत्येक हाताला काम’ व स्त्रीमुक्तीचा संघर्ष समोर घेऊन जाण्याचा संकल्प ह्याप्रसंगी करण्यात आला. सभेनंतर वस्तीतील महिला व मुलींसाठी ‘व्हय मी सावित्रीबाई’ नाटक दाखवून त्यावर चर्चा आयोजित करण्यात आली.
रविवार, दि. 3 जानेवारी रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त दांडेकर पूल परिसरात सावित्रीबाईंच्या संघर्षाला अभिवादन करण्यासाठी प्रभातफेरी आयोजित करण्यात आली होती.
