भगतसिंह जन अधिकार यात्रा, आज सोळाव्या दिवसाची जल्लोषात सुरूवात!! बेरोजगारी, महागाई, भ्रष्टाचार, धर्मवाद आणि कष्टकरी जनतेच्या लुटीच्या विरोधात! रोजगार, शिक्षण, आरोग्यव्यवस्था, आवास आणि झुंझार जन-एकजुटीसाठी! भगतसिंह जनअधिकार यात्रेचा दुसरा टप्पा प्रचंड उत्साहात आणि क्रांतिकारी जोशात निरंतर सुरू आहे. बंगळुरू येथून सुरू झालेली भगतसिंह जन अधिकार यात्रा आज 25 डिसेंबर रोजी ऐतिहासिक पुणे शहरात पोहोचली. आज यात्रेचा सोळावा दिवस. ही यात्रा आठ हजार किलोमीटरचा प्रवास करीत आणि 80 जिल्ह्यांमधून जात 3 मार्चला दिल्लीत पोहोचेल. आज पदयात्रेची सुरूवात अप्पर डेपो भागातून झाली, चैत्रबन, वीआयटी चौक, महेश सोसायटी, वीआयटी शाळा या मार्गावरून पदयात्रा करीत, घोषणांच्या जयघोषात आणि भाषणे करीत, जनतेशी व युवकांशी संवाद साधत पदयात्रा पद्मावती हॉल येथे पोहोचली. येथे पदयात्रेचे रूपांतर जनसभेत झाले. सभेला संबोधित करताना भारताचा क्रांतिकारी कामगार पक्षाचे साथी परमेश्वर यांनी मांडले की इंडिया आघाडी भाजपला पर्याय होऊ शकत नाही तर कामगार वर्गाला त्यांचा स्वतंत्र पक्ष बळकट करावा लागेल. हरियाणा येथील कामगार चळवळीचे कार्यकर्ते अजय आशू यांनी सांगितले ह्या देशाची सर्व संपत्ती निर्माण करण्यात आपले रक्त खर्च होते परंतु आपण मात्र 6 बाय 6 च्या झोपडीत राहण्यास बाध्य आहोत. ही यात्रा केवळ 3 मार्च पर्यंत 90 दिवसांची यात्रा नाही तर तिला एक जन आंदोलन बनवावे लागेल. ठेका प्रथा नष्ट झाली पाहिजे, आणि भगतसिंह राष्ट्रीय रोजगार हमी कायदा पारित झाला पाहिजे. नौजवान भारत सभा, आंध्र प्रदेशचे साथी सुजन यांनी आजच्या कामगारांच्या परिस्थितीला जबाबदार सरकारच्या विरोधात भगतसिंह जन अधिकार यात्रेची गरज आहे हे मांडले तर साथी अभिजित यांनी महाराष्ट्र बांधकाम कामगार युनियनचे सल्लागार म्हणून युनियनचा आजपर्यंतचा प्रवास मांडला आणि कामगारांनी एकजूट होण्याचे आवाहन केले. भारताचा क्रांतिकारी कामगार पक्ष, महाराष्ट्र बांधकाम कामगार युनियन, नौजवान भारत सभा इत्यादी संघटनांचे कार्यकर्ते तसेच कामगार कष्टकरी जनता, युवक व विद्यार्थी मोठ्या संख्येने पदयात्रेत सहभागी झाले.
पुणे शहरात दरवर्षी लाखो विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी येतात. कित्येक विद्यार्थी सात-सात आठ-आठ वर्षे मेहनत करून ह्या अपेक्षेने अभ्यास करतात की त्यांना कधीतरी नोकरी मिळेल. परंतु आज बेरोजगारीचे संकट इतके भीषण झालेले आहे की एका एका जागेसाठी पाच-पाच हजार एवढे अर्ज येत आहेत. 35 कोटी लोक आज देशामध्ये बेरोजगारीने त्रस्त आहेत. या बेरोजगारीसाठी ही नफ्यावर आधारित भांडवलशाही व्यवस्था, आणि भाजप सहित सर्वच भांडवली पक्ष जबाबदार असून ह्या व्यवस्थेविरोधात एकजूट होऊन रोजगाराचा अधिकार मूलभूत अधिकार म्हणून प्राप्त करण्यासाठी आपल्याला लढावे लागणार आहे. एका नवीन समता मुलक, न्यायप्रिय, शोषणमुक्त समाजाच्या निर्मितीसाठी आपल्याला लढा उभारावा लागणार आहे. दुसऱ्या बाजूला वाढत्या महागाईने सामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे मोठ्या प्रमाणावर टॅक्सच्या माध्यमातून जनतेच्या खिशातील पैसा सरकार काढून घेऊन भांडवलदारांच्या घशात घालत आहे. ह्या लुटी विरोधात कामगार कष्टकऱ्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी, आपले मूलभूत अधिकार मिळविण्यासाठी आणि शोषण मुक्त समाजाच्या दिशेने पुढे जाण्यासाठी ही भगतसिंह जन अधिकार यात्रा देशभरात जनतेपर्यंत जात आहे. सोबतच येत्या 2024 च्या निवडणुकीमध्ये फॅसिस्ट भाजप आणि आरएसएसला सत्तेतून बाहेर काढण्यासाठी जनतेला तयार व्हावे लागणार आहे.
