भगतसिंह जनअधिकार पदयात्रेची आज दिनांक 24 डिसेंबर रोजी 15 व्या दिवशी शहीद भगतसिंह उद्यान, पत्रकार चौक, अहमदनगर येथून “शहीद भगतसिंह अमर रहे”, “इंकलाब झिंदाबाद”च्या नाऱ्यांनी, अनेक विद्यार्थी – तरुणांचे आदर्श आलेल्या शहीदे आझम भगतसिंह यांच्या पुतळ्याला अभिवादन करत जोरदार सुरवात झाली!

महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार, धर्मवाद यांच्या विरोधात तसेच शिक्षण, रोजगार, आरोग्य, आवासाच्या जनतेच्या मूलभूत अधिकारांसाठी निघालेली यात्रा पुढे अप्पू हत्ती चौक, छबुराव लांडगे चौक, कोंडी मामा चौकापर्यंत जोरदार घोषणा, क्रांतीकारी गीतांच्या गजरात पुढे गेली. भगतसिंह जनअधिकार पदयात्रेच्या सांस्कृतिक टोळीने सामान्य जनतेचा दिवसेंदिवस खिसा कापणाऱ्या महागाईला गीतात सादर प्रस्तुत करणारं गीत ‘महागाई वाढलीय दादा’ सादर केले. त्यानंतर यात्रा राहुल धुत हॉस्पिटल, रामचंद्र खुंट, धरती चौक, बंगाल चौकी, महात्मा फुले पुतळ्यापर्यंत गेली. पदयात्रेत मोठया संख्येने सिद्धार्थ नगर मधील कष्टकरी घरातील महिला सामील झाल्या. उषाताई, सविता यांनी सांगितलं की घरातले सगळे हात कामाला जातात तरीही पोराबाळांचे दोन वेळचे पोट भरणे सुद्धा कठीण झाले आहे. महागाई तर वाढली पण काम नाही, काम मिळालं तर हातात पगार अत्यंत तुटपुंजा, जे थोडंफार मिळणारं राशन होतं ते सुद्धा मोदी सरकारने बंद केलं. लक्ष्मीबाई म्हणाल्या की, ‘मोदी सरकारने तर श्वास घेणं सुद्धा कठीण करून टाकलंय. आमच्या सारख्या गरिबाने करायचं तरी काय, जायचं तरी कुठे?’

ह्या पदयात्रेत भारताचा क्रांतिकारी कामगार पक्ष, नौजवान भारत सभा सोबतच इतर क्रांतिकारी संघटना सामील झाल्या आहेत. आज जनता महागाई, बेरोजगारीने त्रस्त असताना आपल्यामध्ये जाती धर्माचे राजकारण करून सामान्य जनतेमध्ये फूट पाडण्यात येत आहे. आपल्याला आज जनतेच्या खऱ्या मुद्द्यांना घेऊन योग्य राजकारण उभे करावे लागेल हा संदेश देत अहमदनगर मधील पदयात्रेचा पहिला टप्पा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करत पार पडला.

