चर्चासत्राची सुरवात ही “संघर्ष की राह पर” या क्रांतिकारी गीताने करण्यात आले. पुढे नौजवान भारत सभा चे कार्यकर्ता रवी यांनी मांडणी करताना मांडले की, देशातील अल्पसंख्याक भांडवलंदारांचा नफा वाढवण्यासाठी गेल्या काही वर्षांमध्ये सरकारने प्रत्येक क्षेत्रात खाजगीकरण केले आहे. शिक्षणासारख्या मुलभूत क्षेत्रात ही मोठ्याप्रमाणात खाजगीकरण करून सर्व सामान्य कामगार कष्टकरी जनतेच्या मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचे काम केले आहे. आज फक्त श्रीमंतांची मुलंच चांगले प्राथमिक शिक्षण, उच्चशिक्षण, तांत्रिक शिक्षण घेण्याचे स्वप्न बघू शकतात. पण सामान्य कामगार कष्टकरी वर्गातील मूल कसंबसं 8वी-10वी पर्यंत शिक्षण घेतात आणि पुढचे शिक्षण घेण्याची आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे ते कामगार म्हणून बाहेर पडतात. गेल्या काही वर्षांमध्ये या फाशिस्ट सरकारने आधीच्या सगळ्या सरकारांचे सर्व विक्रम मोडीत काढत कॉलेजेसची फिस वाढवली, सरकारी शाळा बंद केल्या, स्कॉलरशिप बंद केल्यात. नवीन शिक्षण धोरण 2020 आणून कॉलेजेसना दिले जाणारे सरकारी अनुदान बंद करून कॉलेजेसना कर्ज घेण्याची मुभा दिली आहे (याचा परिणाम साहजिकच विद्यार्थ्यांच्या फी वाढीत होणार आहे). अशा पद्धतीने कामगार कष्टकरी जनतेतील विद्यार्थ्यांवर ज्ञान बंदी करून शिक्षण हे फक्त श्रीमंतांना पर्यंत मर्यादित केले आहे. सध्याच्या शिक्षणाचे उद्दिष्ट हे मुलांना वैज्ञानिक दृष्टिकोन देणे, तर्कपध्दती देणे, समाजाप्रति संवेदनशील बनवणे, हे नसून फक्त एक कामगार बनवणे हे आहे. सध्याच्या घडीला शिक्षणाच्या बाजारीकरणासोबतच शिक्षणाचे भगविकरण सुद्धा जोरात चालू आहे. गेल्या वर्षी सरकारने डार्विनचा सिद्धांत पुस्तकातून काढून टाकला आहे. मोदी सरकारचे विविध खोटा इतिहासावर, विज्ञानावर सतत हल्ले चालू आहेत. 1991 मध्ये शिक्षणावरचा खर्च जी. डी.पी. च्या 1.4% होत होता तो मोदी सरकारच्या काळात फक्त 0.37% वर आलेलं आहे. आज शिक्षणापर्यंत सामान्य जनतेची पोहोच आणि शिक्षणाचा दर्जा दोन्हीही घसरले आहे. म्हणूनच आपण फातिमा शेख आणि सावित्रीबाई यांचा शिक्षणसाठीचा संघर्ष लक्षात घेतला पाहिजे. ज्या काळात महिलांना आणि दलितांना शिकण्याची बंदी होती त्याकाळी फातिमा शेख आणि सावित्रीबाई फुले यांनी जातिव्यवस्थेविरोधात, पितृसत्तेविरोधात संघर्ष केला. प्रसंगी सवर्णांचे हल्ले सुद्धा झेलले.
आजसुद्धा कामगार कष्टकरी जनतेवर भांडवलशाहीने नव्या पद्धतीने लादलेल्या ज्ञानबंदी चा विरोध करत सर्व विध्यार्थी युवकांनी शिक्षणाच्या मूलभूत अधिकारासाठी संघर्ष करणे गरजेचे आहे. जर ही व्यवस्था शिक्षणासारख्या मूलभूत गरजा ही पूर्ण नसेल करू शकत तर अशा व्यवस्थेच्या विरोधात शिक्षणाच्या हक्कासाठी मोठा लढा उभा करणे ही युवकांची जबाबदारी आहे. या देशात जन्मलेल्या प्रत्येक मुलाला समान, मोफत, दर्जेदार शिक्षण मिळाले पाहिजे या मागणीसाठी तरुणांनी संघटित झाले पाहिजे.
चर्चासत्राचा शेवट या जोरदार घोषणांनी करण्यात आला.
