नौजवान भारत सभेतर्फे पुण्यातील शिवरायनगर वस्तीमध्ये बेरोजगारीवर संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले

shivraynagar unemplyment discussion event

shivraynagar unemplyment discussion eventशुक्रवारी, 4 जुलै रोजी नौजवान भारत सभेतर्फे पुण्यातील शिवरायनगर वस्तीमध्ये बेरोजगारीवर संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जोशपूर्ण घोषणांनी सभेची सुरुवात करण्यात आली आणि त्यानंतर “आ रे नौजवान तेरी बेड़ियाँ रही है टूट” हे क्रांतिकारी गीत गायले गेले, ज्यामुळे उपस्थित जनतेचा उत्साह वाढला.
त्यानंतर साथी सिद्धार्थ यांनी नौजवान भारत सभेची भूमिका मांडली. त्यामध्ये शहीद भगतसिंह, शहीद सुखदेव, शहीद राजगुरू आणि त्यांच्या क्रांतिकारी साथीदारांचा वारसा आणि शहीदांचे विचार आजपण कसे प्रासंगिक आहेत आणि त्यांनी ज्या समतामूलक, शोषणमुक्त समाजाचे स्वप्न बघितले होते तो समाज आजही वास्तवात आलेला नाहीये, हे अधोरेखित करण्यात आले. इंग्रज असो वा भारतीय सरकार असो, प्रत्येक भारतीय शासनाकडून जाणीवपूर्वक क्रांतिकारकांचा विचार जनतेपासून दूर ठेवण्याचं काम करण्यात आलं. चित्रपट, जयंत्या, पुतळ्यांमध्ये अडकलेल्या भगतसिंहांना, त्यांच्या क्रांतिकारी विचारांना परत जनतेमध्ये घेऊन जाण्याचे काम आज देशातील युवकांच्या खांद्यावर येऊन ठेपले आहे.
यासाठीच युवकांना संघटित करण्याचे आणि क्रांतिकारी युवक आंदोलनाला व्यापक जनसंघर्षांची जोडण्याचे प्रयत्न नौजवान भारत सभा करत आहे. आजरोजी सर्व समस्यांचे मूळ असलेल्या भांडवलशाही, साम्राज्यवाद, हिंदुत्ववादी फॅशिझम पासून भांडवली पितृसत्ता, जातीवाद आणि सर्व प्रकारच्या अस्मितांच्या राजकारणापर्यंत, या शोषक, जनविरोधी व्यवस्थेचा विरोध नौजवान भारत सभा करते. लहान मुलांमध्ये “आझाद स्पोर्ट्स क्लब” “सर्जनशीलता वर्ग व शिबिर” चालवण्यापासून ते देशव्यापी आंदोलन छेडत भगतसिंह जनअधिकार यात्रा, एनटीए-विरोधी आंदोलनात पोलिसांच्या लाठ्या खाण्यापर्यंत नौजवान भारत सभा काम करत आहे. म्हणूनच आजरोजी रोजगार, शिक्षण, महागाई पासून सर्वच गोष्टींत दरदिवशी अधिकाधिक वाईट होत जाणाऱ्या परिस्थितीच्या मूळाशी जाण्यासाठी, ते जाणून त्याच्याविरुद्ध संघर्ष करण्यासाठी युवकांना संघटित होण्याचे आवाहन करण्यात आले.
समाज बदलण्यासाठी त्याचा सखोल अभ्यास करण्याचाच एक भाग म्हणून अशी चर्चासत्रे, सभा, संवाद कार्यक्रम नौभास आयोजित करत असते. ज्याला हात घालत साथी सुस्मित यांनी बेरोजगारीवर प्रकाश टाकला. भांडवलशाहीचे अंतर्विरोध उलगडत बेरोजगारीचे मूळ कसे भांडवलशाहीच आहे, हे स्पष्ट करण्यात आले. अनौपचारिकीकरण हे देशातील बेरोजगारीचे प्रमुख कारण आहे. याखेरीज मोदी सरकारच्या कारकिर्दीत वाढतच चाललेल्या खाजगीकरण आणि कंत्राटीकरणामुळे बेरोजगारी आता आधी कधी ही न पाहिलेल्या उंचीवर जाऊन पोहचली आले. जनतेमध्ये लोकसंख्या, “हिंदूंचे रोजगार मुस्लिम खातात”, “इतर राज्यांमधील कामगार तुमच्या नोकऱ्या खातात”, “SC/ST/OBC आरक्षणामुळे तुमचे रोजगार लुबाडले जातात” असले खोटे मुद्दे सत्ताधारी भांडवलदार वर्ग आणि भांडवली मीडिया जनतेमध्ये निर्माण करून सतत जनतेची दिशाभूल करत आले आहेत. आजरोजी भांडवलदारांचे, अदानी-अंबानीचे लाडके असलेले हिंदुत्ववादी फॅशिस्ट तर मुस्लिमांना हिंदूंचे शत्रू म्हणत खोटा प्रचार करतात व बेरोजगारांच्या फौजेला दंगलखोर टोळक्यांत बदलतात. म्हणून भांडवलशाहीकडून लादल्या जाणाऱ्या या खोट्या कारणांचा पर्दाफाश करत आकडेवारीसोबत बेरोजगारीची खरी कारणं मांडण्याचं काम केलं गेलं. ही बेरोजगारी कशी भांडवली अर्थव्यवस्थेला पूरक आहे याचे खोलात विश्लेषण केले. शेवटी पुन्हा गगनभेदी घोषणा देऊन वस्तीतील तरुणांना ‘नौजवान भारत सभा’ शी जोडून घेण्याचे आवाहन करत सभेची सांगता झाली.

Related posts

Leave a Comment

20 − eleven =