अमर शहीद रामप्रसाद बिस्मिल यांच्या जन्मदिवसा (11जून) निमित्त

काकोरी च्या वीरांचा परिचय
– विद्रोही नावाने शहीद भगतसिंह यांचा लेख
(9 ऑगस्ट, 1925 ला शहीद रामप्रसाद बिस्मिल, अशफाकउल्ला आणि त्यांच्या इतर कांतिकारी साथींनी मिळून क्रांतिकारी पार्टी साठी धन जमा करण्याच्या उद्देशाने लखनौ नजिक काकोरी जवळ रेल्वे थांबवून सरकारी खजिना लुटला. यानंतर चंद्रशेखर आझाद यांना सोडून बाकी सगळे क्रांतिकारी इंग्रजांच्या हाती लागले. भगतसिंह पण तेव्हा कानपूर येथे निवासी असताना हिंदुस्तान रिपब्लिकन पार्टीमध्ये भरती झालेले होते.
‘विद्रोही’ नावाने मे, 1927 ला भगतसिंह यांनी ‘काकोरी च्या वीरांशी परिचय’ मथळ्याचा लेख पंजाबीत प्रकाशित केला. तो लेख प्रकाशित होताच भगतसिंह यांना अटक झाली. खाटेवर बसून हातात बेड्या असलेलं त्यांच ते प्रसिद्ध छायाचित्र याचवेळी टिपलं गेलं. त्याआधी भगतसिंह यांनी पंजाबला परतून सचिंद्रनाथ सन्याल यांचं पुस्तक ‘बंदी जीवन’ चा पंजाबी अनुवाद प्रकाशित केलेला होता. – संपादक.)
अगोदर ‘किरती’ (पंजाबी पत्रिका) मध्ये काकोरी संबंधित काही लिहिलं गेलेलं आहे. आज आम्ही काकोरी कट आणि त्याच्या वीरांसंबंधी काही लिहू ज्यांना त्यासंदर्भात एवढी कडक शिक्षा मिळाली आहे.
9 ऑगस्ट, 1925 ला काकोरी या छोट्याश्या स्टेशन वरून एक पॅसेंजर ट्रेन सुटली होती. ते स्टेशन लखनऊ पासून आठ मैल दूर आहे. ट्रेन मैल-दीड मैल अंतर चालली असेल की सेकंड क्लास मध्ये बसलेल्या तीन तरुणांनी गाडी रोखून गाडीत असलेला खजिना लुटला. त्यांनी आधी मोठ्याने आवाज देऊन सगळ्या प्रवाशांना समज दिली की त्यांनी घाबरण्याचे कारण नाही, त्यांचा उद्देश प्रवाशांना त्रास देणे नसून फक्त सरकारी खजिना लुटणे हा आहे. असो, ते गोळया झाडत राहिले. यातच एक प्रवासी गाडीतून खाली उतरला अन गोळी लागून मेला.
सरकारी अधिकारी हार्टन, सी.आई.डी. या प्रकरणाच्या तपासात लागला. त्याला आधीच खात्री झाली होती की ही लूट ढाक्याच्या क्रांतिकारी गटाचे काम आहे. त्याने सगळ्या संशयित व्यक्तींची चौकशी सुरु केली. तेवढ्यात क्रांतिकारी गटाची राज्य परिषद मेरठ येथे होईल असेल ठरले. सरकारला याची बातमी मिळाली अन तेथे खुप कडक चौकशी झाली.
यानंतर सप्टेंबर च्या उत्तरार्धात हार्टन ने अटक वारंट प्रसिद्ध केले, 26 सप्टेंबर ला बऱ्याच तलाश्या घेतल्या गेल्या आणि खुप व्यक्ती पकडलेही गेले. काही पकडले गेले नाहीत. त्यापैकी एक श्री राजेंद्र लाहिरी यांना दक्षिणेश्वर बॉम्ब केस मध्ये पकडले जाऊन त्यांना 10 वर्ष कैदेची शिक्षा झाली आणि श्री अशफाकउल्ला आणि सचिंद्र बक्षी नंतर पकडले गेले, ज्यांच्यावर वेगवेगळे खटले चालले.
जज च्या निर्णयावरून हे समजलं की असहयोग आंदोलन दडपले गेल्यानंतर देशभक्त तरुणांचा शांततेवरून विश्वास उडाला अन त्यांनी युगांतर हा गट स्थापन केला. श्री जोगेशचंद्र चट्टोपाध्याय बंगालहून या गटाचं संगठन करायला यू.पी. ला आले अन काम पूर्ण करून सप्टेंबर, 1924 ला परतले. त्यावेळी बंगाल मध्ये ऑर्डिनंस पास झाला होता अन ते परतल्यावर लगेच हावडा पुलावर पकडले गेले. तलाशी घेतल्यावर त्यांच्या खिशातून एक कागद मिळाला ज्यात यू.पी. च्या राज्य परिषदेच्या एका बैठकीचा अन यू.पी. तील गटाच्या संघटनेचा तपशील लिहीलेला होता. शेवटी काम पुन्हा सुरु झालं अन त्यासाठी आणखी काही दरोडे पण झाले. जज च्या मते या गटाचे नेते होते- श्री सचिंद्रनाथ सन्याल.
श्री सचिंद्रनाथ सन्याल यांच नाव कोणाकडून लपून थोडीच होतं. तेच तर ‘बंदी जीवन’ सारख्या प्रसिद्ध व सुंदर पुस्तकाचे लेखक आहेत. बनारस चे निवासी आहेत अन 1915 च्या गदर आंदोलनात त्यांनी खुप काम ही केलेलं होतं. तेच तर बनारस कटाचे नेते व श्री रासबिहारी यांचा उजवा हात होते. तेव्हा जन्मठेपेची शिक्षा झाली पण 1920 मध्ये सुटले. नंतर ते आपल्या पूर्वीच्या कामात पून्हा लागले आणि सन 1925 च्या सुरुवातीला ‘दि रेवल्यूशनरी’ पत्रक एकाच दिवसात साऱ्या हिंदुस्तानात वाटले गेले. त्यातल्या भाषेची अन प्रभावी विचारांची इंग्रजी वर्तमानपत्रांनीही खुप प्रशंसा केली. ते फेब्रुवारी मध्ये पकडले गेले. त्यांच्यावर त्या संबधी खटला ही चालवला गेला अन 2 वर्षाची शिक्षा ही झाली. तिथूनच त्यांना काकोरी खटल्यात ओढले गेले. ते खुप जिंदादिल होते. कोर्टात स्वतः आनंदी राहणं अन दुसऱ्यांना आनंदी ठेवणं हेच त्यांचं काम. त्यांनी आपला खटला स्वतः लढवला. जज त्यांनाच सर्वांचे गुरु म्हणत असत. ‘बंदी जीवन’ चा गुजराती व पंजाबीत अनुवाद झाला होता.
ते इंग्रजी आणि बंगाली चे उच्च कोटि चे लेखक होते. आता त्यांना दोनदा जन्मठेप झाली आहे.
त्यांच्यासोबत त्यांचा लहान भाऊ भूपेंद्रनाथ सान्याल यांनापण या खटल्यात ओढले गेले. ते बी.ए. च शिक्षण घेत होते. ते पकडले गेले अन त्यांनाही 5 वर्ष तुरुंगवास झाला.
श्री सचिंद्र नंतर अत्यंत प्रसिद्ध वीर श्री रामप्रसाद आहेत. त्यांच्यासारखा सुंदर, मजबूत तरुण शोधूनही सापडणे मुश्किल आहे. खुप सक्षम व्यक्ती आहेत. हिंदीचे मोठे लेखक आहेत. त्यांनी ‘कॅथराईन’, ‘बोल्शेविकों के काम’, ‘मन की लहर’ अशी अनेक पुस्तके लिहिली. ते उर्दूचे प्रसिद्ध शायर आहेत. त्यांच वय 28 वर्ष आहे. आधी 1919 ला मैनपुरी कटात त्यांच्याविरुद्व वारंट प्रसिद्ध झाले अन त्यांचे गुरु श्री गेंदालाल आणि अन्य पकडले गेले. परंतु ते नेपाळच्या दिशेने रवाना झाले आणि खुप कष्ट सहन करत तिकडे दिवस काढले. पूर्ण दिवस मेहनत करणं, कुदळ चालवणं पण रात्री फक्त दीड आणे मिळणे ज्यात पोटभर जेवणही होत नसे. अनेकदा तर गवत ही खावे लागले. पण त्यातही मजा म्हणजे, एवढं असूनही रात्री बसून कविता लिहिणे अन भारतमातेच्या आठवणीत अन प्रेमात अश्रू ढाळणे अन गीतं लिहिणे! असे तरुण कुठे मिळू मिळतात? ते युद्ध-विद्येत खुप पारंगत आहेत आणि आज फाशीची शिक्षा मिळण्याचे कारणपण बऱ्यापैकी हेच आहे. या वीराला फाशीची शिक्षा झाली अन तो हसला. असा निर्भीक वीर, असा सुंदर तरुण, असा योग्य अन उच्चकोटि चा लेखक अन निर्भय योद्धा मिळणं किती मुश्किल आहे.
तीसरे वीर श्री राजिंद्रनाथ लाहिरी आहेत. 24 वर्षाचा अत्यंत सुंदर तरुण, एम.ए., बनारस हिंदू विद्यापीठाचे विद्यार्थी होते. जज म्हणत होता की हा युगांतर गटाचा एक मजबूत स्तंभ आहे. ते गाडी रोखणाऱ्यात होते. बाहेरून दुबळा-सुकलेला हा तरुण. कलकत्या जवळ दक्षिणेश्वर बॉम्ब फॅक्टरीत पकडला गेला, त्यात दहा वर्ष शिक्षा झाली. खुशीने तर जाड व्हायला लागला. काकोरी खटल्यात तर शरीर चांगलेच भरले होते आणि आता फाशीची शिक्षा झालीये.
वीर रोशन सिंह ला सुद्धा फाशीची शिक्षा झाली आहे. ते आधी पोलिसांची मदत करंत आणि खुप सारे लुटारू त्यांनी पोलिसांना पकडून दिले होते. तेपण फसले, पण ते काही डाकू नव्हेत. जज पण सांगतो की हे तरुण खरे देशसेवक होते. ठीक आहे! या वीराला पण शतशः प्रणाम.
यानंतर मन्मथनाथ गुप्त यांची वेळ. ते काशी विद्यापीठाचे बी.ए. चे विद्यार्थी होते. 18 वर्ष वय आहे. बंगाली, गुजराती, मराठी, उड़िया, हिन्दी, इंग्रजी अन फ़्रेच अशा अनेक भाषा त्यांनी अवगत केलेल्या. जज ने त्यांना पण लुटारूंत शामिल करत 14 वर्षाची कडक शिक्षा दिली आहे. ते खुप निर्भय आहेत अन ही शिक्षा ऐकून तेही हसले. आजकाल ते तुरूंगात उपोषण करत बसले आहेत. त्यांना गैर-सरकारी सदस्याने जाऊन विचारलं की जेवण का नाही करत? तर या पठ्ठयाने उत्तर दिलं की आम्ही माणसं आहोत. आमच्या सोबत माणसांसारखा व्यवहार व्हायला हवा. मला नाही वाटत की हा पशुसम व्यवहार सहन करत मी 14 वर्ष जिवंत राहू शकेल. तीळ-तीळ मरण्यापेक्षा एकदाच मेलेलं बरं. ते आधी असहयोग आंदोलनावेळीही तुरुंगात जाऊन आलेत.
आता ज्या तरुणाचा नाव घेतलं जात आहे, त्याला महापुरुष म्हटलं तरी ते इष्टच असेल. तो वीर श्री जोगेशचंद्र चॅटर्जी आहे. ते कोमिल्ला (ढाका) चे रहिवासी. ते बी.ए. चे तत्वज्ञानाचे विद्यार्थी होते. प्रोफेसर त्यांच्यावर खुप खूष असत अन म्हणत की हा पोरगा खुप शूरवीर आहे. परंतु तो कॉलेजच नाहीतर साऱ्या दुनियेच्या तत्वज्ञानाला लाथ मारून अन सगळं सोडून युगांतर गटात शामिल झाला. त्यांना “डिफेंस ऑफ इंडिया अॅक्ट” नुसार अटक केली गेली अन असहनीय यातना दिल्या गेल्या. एका दिवशी त्याच्या डोक्यावर मल टाकून चार दिवस कोठडीत बंद करून ठेवलं. तोंड धुवायला ही पाणी दिलं गेलं नाही अन खुप मारून मारून पूर्ण शरीर जखमी केलं गेलं. पण त्यांच्याजवळ मूक राहण्यावाचून काय पर्याय होता?
1920 मध्ये सुटल्यावर ते एक साधारण कार्यकर्त्या प्रमाणे कांग्रेसमधे काम करत राहिले गरीब घरातून आलेला, परंतु आपलं घरं उध्वस्त करून सुद्धा जगात सेवा असतेच ना. ते 1923 ला यू.पी. आले अन मग ‘युगांतर’ गटाचा पाया रोवला. 1924 मध्ये बंगाल ला परतले अन पकडले गेले. आधी त्यांना ऑर्डिनंस नुसार पकडले गेले आणि नंतर इकडे काकोरीत आणलं गेले. त्यांना 10 वर्षाची शिक्षा झाली. ते खुप सुंदर तरुण होते. जज ने त्यांची खुप प्रशंसा केली.
श्री गोविन्द चरणकार उर्फ डी.एन. चौधरी लखनौहून पकडले गेले. ते खुप जुने क्रांतिकारी होते. 1918 की 1919 मध्ये ढाक्यात त्यांना पोलीस पकडायला आले होते. त्यांनी गोळ्यांचं उत्तर गोळ्यांनी दिलं अन लढत-लढत पळ काढला. बंदुकीच्या गोळ्या संपल्या होत्या अन ते जखमी झाले होते. पकडले गेले अन काळ्यापाण्याची शिक्षा झाली. 1922 मध्ये खुप आजारी पडल्यावर सोडून देण्यात आले. 1925 ला पुन्हा पकडले गेले अन आता 10 वर्ष शिक्षा झाली आहे.
आता आपण श्री सुरेशचंद्र भट्टाचार्य यांच्या संबंधात काही लिहुयात. ते बनारस चे रहिवासी. बनारस कटाच्या वेळी त्यांच वय अवघे 16 वर्ष होतं अन ते पकडले गेले. पण काही सिद्ध न झाल्याने त्यांना सोडून देण्यात आले अन बुंदेलखंडात नजरकैदेत ठेवण्यात आले. ते हिंदी चे मोठे प्रसिद्ध लेखक आहेत. कानपुर च्या ‘प्रताप ‘सारख्या प्रसिद्ध वर्तमानपत्राचे सहाय्यक संपादक होते. त्यांना बनारसहून पकडले गेलं अन सात वर्षाची शिक्षा सुनावली. ते खुप सुंदर गात असत. तुरुंगात ते योगाभ्यास करत असत.
श्री राजकुमार कानपुर चे रहिवासी. ते बनारस हिंदू विद्यापीठात बी.ए. चं शिक्षण घेत होते. पकडले गेले. त्यांच्या घरात दोन रायफली मिळाल्या. ते खुप सुंदर गाणारे अन दिसायलाही खुप सुंदर आहेत. खुप उत्साही आहेत. श्री दामोदर स्वरूप खुप आजारी असतानाही त्यांना कोर्टात आणलं गेलं तेव्हा यांनी जज ला खुप सुनावलं. जज ने म्हटलं की तुला निकालाच्या वेळी अद्दल घडवली जाईल अन त्या वीराला 10 वर्षाची शिक्षा सुनावली गेली. आयुष्य एका तऱ्हेने उध्वस्त झालं पण तो हसला. धन्य ते वीर अन त्यांना जन्म देणाऱ्या वीर माता.
श्री विष्णु शरण दुबलिस मेरठ चे रहिवासी. वैश्य अनाथालयाचे अधीक्षक होते. बी.ए. ला असताना असहयोग आंदोलनात सहभाग घेतला होता आणि मेरठ ला त्यांनी दूसरं बारडोली बनवलं होतं. सविनय कायदेभंगासाठीही तयार झाले होते. त्यांच्या घरी युगांतरकारींची ची बैठक झाली होती. त्यांना 7 वर्षाची शिक्षा सुनावली गेली आहे.
श्री रामदुलारे यांनाही 7 वर्षाची शिक्षा झाली. तेही कानपूरचे रहिवासी. स्काउट मास्टर, कांग्रेस चे जोशपूर्ण सेवक होते.
6 एप्रिल ला निकाल सुनावला गेला अन त्या दिवशी सगळे क्रांतिकारी गात आले होते –
सरफ़रोशी की तमन्ना, अब हमारे दिल में है,
देखना है ज़ोर कितना बाज़ु-ए-क़ातिल में है!
शिक्षा बेपर्वाईने ऐकून घेतल्या अन हसले. त्यांनतर दुःखाचा क्षण आला. ज्या वीरांनी समुद्रात एकत्र आपल्या नावा उतरवल्या होत्या त्यांची आता वेगळे होण्याची वेळ येऊन ठेपली होती. “क्रांतिकारी लोकांत जे अगाध अन गंभीर प्रेम असतं ते साधारण जीवन जगणारा मनुष्य अनुभव नाही करू शकत,” श्री रासबिहारी यांच्या वाक्याचा अर्थ पण आपण लोक नाही समजू शकत. ज्या लोकांनी ‘सिर रख तली प्रेम की गली’त (जीवावर उदार होऊन प्रेमाच्या गल्लीत) पाय ठेवलाय त्यांची महिमा आपल्यासारखे निकृष्ठ लोक कशी समजू शकतील? त्यांचं परस्पर प्रेम एवढं गाढ असतं ज्याला आपण स्वप्नात पण नाही समजू शकत. दीड वर्ष आपल्या जीवनातील अंधकारमय भविष्याची वाट पाहत ते एकत्र बसले होते. तो क्षण आला, तिघांना फाशी, एकाला जन्मठेप, एकाला 14 वर्ष कैद, चौघांना 10 वर्षांची कैद आणि उरलेल्यांना 5-10 वर्षाचा सक्तमजुरीची शिक्षा सुनावत जज उपदेश द्यायला लागला “तुम्ही खरे सेवक अन त्यागी आहात. परंतु चुकीच्या मार्गांवर चालले आहात.” गरीब भारतातच खऱ्या देशभक्तांचे हे हाल होतात. जज त्यांना आपल्या कामांवर पुनर्विचार करायचा उपदेश देऊन चालता झाला, अन मग, अन मग… मग काय झालं? काय विचारता? विरहाचे क्षण खुप वाईट असतात. ज्यांना फाशीची शिक्षा झाली, ज्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली त्यांच्या काळजाचा ठाव आपल्याला नाही घेता येणार. पावलो-पावली रडणारे हिंदुस्तानी, असंच थर-थर कापायला लागणारे भ्याड हिंदुस्तानी त्यांना काय समजून शकणार? लहान्यांनी मोठ्यांना वाकून नमस्कार केला. त्यांनी लहान्यांना आशीर्वाद दिला, जोर-जोरात गळाभेटी घेतल्या अन आवंढा गिळून राहिले. पाठवून दिलं त्यांना. जातांना रामप्रसादजींनी मोठ्या वेदनादाई स्वरात सांगितलं-
दरो-दीवार पे हसरत से नज़र करते हैं.
ख़ुश रहो अहले वतन हम तो सफ़र करते हैं.
हे बोलून ते लांब, मोठया दूरच्या यात्रेवर चालते झाले. दरवाजातून निघताना त्या न्यायालयाच्या भल्यामोठ्या रॅंकन हॉल ची क्षणिक भयावह शांतता, एक उसासा टाकून तोडतांना ते पुन्हा बोलले-
हाय, हम जिस पर भी तैयार थे मर जाने को.
जीते जी हमसे छुड़ाया उसी काशाने को.
आपण लोकं एक उसासा टाकून समजून घेतो की आपलं कर्तव्य पूर्ण झालं आ. आपण पेटून नाही उठत, आपली तडफ मेली आहे, आपण इतके मृतवत झाले आहोत. आज ते उपोषण करत आहेत, तडफत आहेत, अन आपण गपचूप सगळा तमाशा पाहत बसलोय. ईश्वर त्यांना शक्ती अन हिंमत देवो की ते वीरतेने आपले दिवस पूर्ण करोत अन त्या वीरांची बलिदानं फळाला येवोत.
लेखक
‘विद्रोही’

Related posts

Leave a Comment

16 + 7 =