नौजवान भारत सभा, पुणे आणि दिशा विद्यार्थी संघटने तर्फे नवीन शिक्षण धोरण (NEP , New Education Policy) आणि ऑनलाईन शिक्षण विरोधी जनजागृती अभियान राबवले गेले

दिनांक १० सप्टेंबर गुरुवारी रोजी नौजवान भारत सभा, पुणे आणि दिशा विद्यार्थी संघटने तर्फे नवीन शिक्षण धोरण (NEP , New Education Policy) आणि ऑनलाईन शिक्षण विरोधी जनजागृती अभियान राबवले गेले. शिक्षण हा प्रत्येक सर्वसामान्यांचा मूलभूत हक्क असून ते प्रत्येकाला समान, मोफत मिळालेच पाहिजे यासाठी हे जनजागृती राबवण्यात आले.
नवीन शिक्षण धोरण हे शिक्षणाचे बाजारीकरण वाढवणारे, मोठमोठ्या कंपन्यांना शिक्षणाचा धंदा करण्याचा अधिकार देणारे, विद्यापीठ आणि कॉलेजांना फी वाढवण्याचा अधिकार देणारे, मल्टी एंट्री – मल्टी एक्झिट म्हणजेच पैसा असेल तर शिका नाहीतर घरी बसा हे सांगणारे, जसा पैसा तसे शिक्षण यासारख्या अनेक तरतुदी असलेले हे कामगार कष्टकरी विरोधी धोरण आहे. शिक्षण हा प्रत्येकाचा हक्क नसून एका ठराविक वर्गाचा विशेषाधिकार आहे अशी एक चाल या नवीन शिक्षण धोरणाद्वारे सरकारने चालवली आहे. NEP मुळे मुख्यत्वे मध्यमवर्गीय व उच्च मध्यमवर्गीय कुटुंबातून येणाऱ्यांनाच उच्च शिक्षण घेता येणे शक्य होईल आणि बहुसंख्यांकाना संधी नाकारलीच जाणार आहे. सध्याच्या कोरोना महामारीमधे तर ऑनलाईन शिक्षण चालू करून त्यासाठी आवश्यक असणारी संसाधने सरकारने न पुरविल्यामुळे सर्वसामान्य विद्यार्थी शिक्षणाला मुकत आहेत.
पुण्यातील मनपा, अप्पा बळवंत चौक आणि स्वारगेट चौकात अतिशय शांततेत आणि कुठलीही गर्दी न करता, अंतराचे नियम पाळत अभियान चालवले गेले. असे असूनही स्वारगेट पोलिसांनी येऊन अडथळे आणले आणि 144 कलम लावले असल्याचे सांगत अभियान चालवायला मनाई केली आणि कार्यकर्त्यांना अनेक तास स्थानबद्ध करून ठेवले. 100च्यावर लोकांनी “परवानगी”ने एकत्र यायला सरकारने स्वत: जाहीर केलेले असताना अशा अभियानांची, जिथे पूर्ण काळजी घेऊन अभियान चालवले जात आहे, सरकार दडपशाही करत आहे आणि लोकशाही हक्क मारत आहे हे दिसून येते. कोरोना लॉकडाऊनचा फायदा घेऊन केंद्र सरकार आणि राज्य सरकार मनमानी कायदे बनवत आहे आणि जेव्हा सामाजिक कार्यकर्ते रस्त्यावर या कायद्यांचा विरोध करण्यासाठी रस्त्यावर येत आहेत तेव्हा त्यांचे दमन केले जात आहे. कोरोना काळामध्ये जनतेच्या असंतोषाची सत्ताधाऱ्यांना किती भिती आहे हे दिसून येते आहे.
सरकार शिक्षणाची नवीन धोरणे आणून त्यात बहुसंख्य असलेल्या कामगार वर्गातून आलेल्या विद्यार्थ्यांसाठी कुठलीही तरतूद ठेवत नाही. ह्याच कोरोना काळात NEET-JEE सारख्या परीक्षा ठेवून सरकारने मात्र विद्यार्थ्यांच्या डोक्यावर सतत टांगती तलवार ठेवली आहे. लॉकडाऊनमुळे सगळे काम-धंदे बंद असल्यामुळे, रोजगार गेल्यामुळे, व्यवसाय बंद असल्यामुळे खिशात पैसे नसताना, बसेस ची सोय नसताना शेकडो किलोमीटर लांब परीक्षा केंद्रावर पोचायचं कसं ह्या सर्व मागण्या घेऊन रस्त्यावर उतरलेल्या संतप्त विद्यार्थ्यांसाठी मात्र पोलिसांची लाठी आधीच हजर असते. नौभास आणि दिशातर्फे येत्या काळात हे अभियान सतत चालू ठेवले जाईल आणि नवीन शिक्षण धोरणाविरोधात विद्यार्थी-युवकांच्या एकजुटीचा प्रयत्न चालूच राहिल.

Related posts

Leave a Comment

fourteen + thirteen =