महान जातीविरोधी योद्धे अय्यंकाली यांच्या जन्मदिनानिमित्त (28 ऑगस्ट) नौजवान भारत सभेतर्फे नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘फँड्री’ चित्रपटाचे प्रदर्शन आणि चर्चा आयोजित करण्यात आली

महान जातीविरोधी योद्धे अय्यंकाली यांच्या जन्मदिनानिमित्त (28 ऑगस्ट) नौजवान भारत सभेतर्फे नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘फँड्री’ चित्रपटाचे प्रदर्शन आणि चर्चा आयोजित करण्यात आली. नागराज मंजुळेंच्या सुरुवातीच्या काळातील सिनेमांमध्ये समाजाचे चित्रण वास्तववादी आहे. ‘फॅंड्री’ चित्रपटाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील जातिव्यवस्थेचे विदारक सत्य अचूकपणे समोर ठेवले आहे. चित्रपटामध्ये केलेला प्रतीकांचा वापर अत्यंत समर्पक आहे. ही एका दलित पार्श्वभूमीतून येणाऱ्या, जातिव्यवस्थेने पीडित आणि गरिबीमध्ये वाढणाऱ्या एका शाळकरी मुलाची कहाणी आहे. जातींच्या सीमा ओलांडून केलेले प्रेम, एक सन्मानजनक आयुष्य जगण्याची ओढ, जातिव्यवस्थेचा तिटकारा आणि शेवटी उच्चजातींयांकडून होणाऱ्या छळाला कंटाळून त्यांना दगड मारत सुटणे अशा अनेक दृश्यांमधून ‘जब्या’चे बंडखोर व्यक्तिचित्र रेखाटले गेले आहे. दलित पार्श्वभूमीतून येणाऱ्या महिलांचे होणारे दुहेरी (“उच्च” जातीयांकडून होणारा छळ आणि पितृसत्तेमुळे दबले जाणे) शोषणसुद्धा चित्रपटामध्ये टिपले गेले आहे.
सिनेमानंतर आजचे जातिव्यवस्थेचे वास्तव आणि तिला संपवण्याच्या मार्ग काय असू शकतो, फक्त शिक्षणामुळे जातिव्यवस्था का संपू शकत नाही, जातिव्यवस्थेचा वापर सत्ताधारी वर्ग कसा करतो आणि अय्यंकालींच्या वारश्याची आज प्रासंगिकता या मुद्दयांवर चर्चा झाली. अय्यंकाली जातिअंताच्या लढाईतले महत्त्वाचे नेते होते ज्यांनी ब्राह्मणवाद्यांविरुद्ध आणि त्यांच्या सत्तेविरुद्ध संघर्ष केला. यासाठी त्यांनी सरकारला अर्ज, विनंत्या केल्या नाहीत तर जनतेच्या सामूहिक ताकदीवर त्यांना विश्वास होता. यात ते यशस्वी सुद्धा झाले. त्यांनी दाखवून दिले की शोषित जनता फक्त लढू शकते असे नाही तर जिंकू सुद्धा शकते. अय्यंकालींनी सार्वजनिक रस्त्यावरून चालण्याची विद्रोही कृती असो, दलित मुलांना शाळेत प्रवेशाच्या अधिकारासाठी लढाई असो, शेतमजूर कामगारांचा संप घडवून आणणे असो यातून अय्यंकालींची कार्यदिशा अगदी स्पष्ट होते. अय्यंकाली एक क्रांतिकारक होते ज्यांना जनतेच्या शक्ती आणि पुढाकारावर भरवसा होता, सरकार पेक्षा जनतेच्या मूलगामी संघर्षावर विश्वास होता. त्यांनी जातिअंताच्या प्रश्नाला कामगारवर्गीय एकतेची जोड दिली. आज अय्यंकालींच्या क्रांतिकारी वारशासोबत स्वतःला परिचित करून घेणे महत्त्वाचे बनले आहे. अय्यंकाली सत्तेसोबत संघर्ष करणारे नेते होते त्यामुळे आजच्या राज्यसत्तेने त्यांना आठवण्याचे काहीच कारण नाही. यामुळेच क्रांतिकारी आणि प्रगतीशील शक्तींची ही जबाबदारी बनते की त्यांनी अय्यंकालींना, त्यांच्या कार्याला जनतेमध्ये घेऊन जावे. यातून जातिअंताच्या चळवळीला योग्य दिशा मिळेल आणि जातिव्यवस्थेच्या विरोधात अखेरचा लढा उभा करता येईल.
संपर्क: 8956840785
नौजवान भारत सभा, पुणे

Related posts

Leave a Comment

20 − twenty =