अहमदनगरमधील नृशंय दलित विरोधी अत्याचाराच्या विरोधात आवाज उठवा!

अहमदनगरमधील नृशंय दलित विरोधी अत्याचाराच्या विरोधात आवाज उठवा!
दलित मुक्तीच्या महान परियोजनेला अस्मितावाद आणि प्रतीकवादाच्या खड्ड्यातून बाहेर काढा!

Jadhav familyअहमदनगरमध्ये २१ ऑक्टोबर रोजी एका दलित कुटुंबातील तीन लोकांची करण्यात आलेली निर्घृण हत्या आणि त्यानंतर त्यांच्या देहाचे तुकडे तुकडे करून विहिरीत फेकून देण्याच्या घटनेने पुन्हा एकदा महाराष्ट्रातील कष्टकरी जनतेला हादरवून सोडले आहे. तमाम दलितवादी राजकीय पक्ष आपल्या स्वार्थासाठी या घटनेकडे एक ‘‘सुवर्णसंधी’’ म्हणून पाहत आहेत व दलितांच्या हिताच्या नावाखाली याचा पुरेपूर राजकीय लाभ उठवण्याचा प्रयत्न करीत आहेत. दुसरीकडे भांडवली मिडिया नेहमीप्रमाणे यावेळीसुद्धा ही घटना दाबून टाकण्याचे काम करीत आहे किंवा ही घटना म्हणजे केवळ दोन कुटुंबांतील वैराचा प्रकार असल्याचे भासवत दलितांवर होणाऱ्या अत्याचारांवर पांघरुण घालण्याचे काम करीत आहे. परंतु कष्टकरी दलित जनतेला हे ठाऊक आहे की घटना कोणतीही असो, त्यांनाच शेवटी अशा प्रकारच्या नृशंस अत्याचारांना बळी पडावे लागते. असे कां होते की गरीब दलित जनताच अशा घटनांमध्ये नेहमी बळी ठरत असते? नेहमी आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या कमकुवत जनतेलाच जुलूम कां सहन करावा लागतो?

जर गेल्या ४०-५० वर्षांतील घटनांकडे पाहिले तर हे स्पष्ट होते की दलितांवर होणाऱ्या अत्याचारांच्या १० पैकी ९ घटनांमध्ये कष्टकरी दलित जनता म्हणजेच ग्रामीण सर्वहारा आणि अर्धसर्वहारा आणि शहरातील गरीब कामगार दलित माणसंच बळी ठरतात. जातीय उत्पीडनाचा एक वर्गीय पैलूदेखील आहे हे समजून घेणे आज गरजेचे आहे. ९० टक्क्यांहून जास्त दलित जनता आज भयंकर गरीबी आणि भांडवली व्यवस्थेच्या शोषणाची बळी आहे. गावांतील श्रीमंत शेतकऱ्यांच्या शेतांमध्ये दलितांचे ग्रामीण सर्वहाराच्या रूपात भयंकर शोषण केले जाते आहे. शहरांमध्ये गरीब दलित जनतेला फॅक्टरी मालक, ठेकेदार, दलालांच्या लुटीला सामोरे जावे लागते जे कष्टकरी जनतेच्या शरीरातील रक्ताचा शेवटचा थेंबसुद्धा शोषून आपले खिसे गरम करीत असतात. आज कष्टकरी दलित जनता भांडवली व्यवस्था आणि ब्राह्मण्यवादाच्या ‘‘पवित्र युती’’च्या हाती बळी जात आहे.

भांडवलशाहीने आपल्या सेवेसाठी दलितांमधील एक छोटासा हिस्सा तयार केला आहे. दलित जातींचा एक अत्यंत छोटा हिस्सा जो सामाजिक पदानुक्रमात वर सरकला आहे तो आज भांडवलशाहीची सेवा करतो आहे आणि गरीब कष्टकरी दलित जनतेवर होणाऱ्या अत्याचारांवर संदिग्ध मौन पाळतो आहे. हा खाऊनपिऊन सुखी असलेला उच्च मध्यमवर्गीय हिस्सा आज कोणत्याही प्रकारे गरीब दलित जनतेसोबत नाही. अर्थातच त्यालासुद्धा कित्येकदा अपमानास्पद निंदेचा बळी ठरावे लागत असते, परंतु त्याचा विरोध केवळ प्रतिकात्मक कारवायांपुरता मर्यादित आहे आणि तो भांडवलशाहीकडून मिळालेल्या समृद्धीची मलई चाटून समाधान मानतो आहे. या खाऊन पिऊन सुखी असलेल्या स्तरामधून येणाऱ्यांद्वारे बनविण्यात आलेल्या अनेक दलितवादी-आंबेडकरवादी संघटना आज कष्टकरी दलित जनतेच्या वास्तविक उत्पीडनाच्या विरोधात आवाज उठवीत नाहीत यामागचे कारण काय? या संघटना बथानी टोला, लक्ष्मणपूर बाथेमध्ये गरीब दलितांच्या खून्यांना न्यायालयाद्वारे सोडून दिल्यावर मूग गिळून गप्प कां राहतात? या अस्मितावादी दलित राजकारण करणाऱ्या संघटना गोहाणा, भगाणा मिर्चपूर, खैरलांजी यांसारख्या घटना घडल्यावर जनआंदोलन कां उभे करीत नाहीत? या संघटना कधीच भूमीहीन दलित कामगारांच्या बाजूने शेतातील मजूरी वाढविण्याची लढाई कां लढत नाहीत? शहरांमधील गरीब दलित कामगारांच्या मागण्या कां पुढे करीत नाहीत? बहुसंख्य दलित जनतेसाठी महत्त्वपूर्ण असणाऱ्या या मुद्द्यांवर एक तर या संघटना मौन पाळतात किंवा केवळ औपचारिकता पार पाडून गप्प बसतात. हां, अस्मितावादी प्रतीकात्मक मुद्द्यांवर प्रतीकात्मक कारवाई करण्यात हे सर्वांत पुढे असतात. विद्यापीठांची नावे, मूत्र्या आणि कार्टून यांबाबत मोठा गदारोळ माजवतात. अहमदनगरच्या घटनेबाबतही यांची संधिसाधू भूमिका या अस्मितावादी राजकारणाद्वारे समजून घेतली जाऊ शकते.

ब्राह्मण्यवादी विचारधारा कोणत्याही एका जातीची नाही तर एकूण शासकवर्गाची विचारधारा आहे आणि इतिहासात प्रत्येक शासकवर्गाला तिने एक विचारधारात्मक उपकरण प्रदान केले आहे. अगोदर ब्राह्मण्यवादी विचारधारेने सामंतशाहीशी ‘‘पवित्र युती’’ केलेली होती आणि आज ब्राह्मण्यवादी विचारधारेने भांडवलशाहीसोबत हातमिळवणी केलेली आहे. गेल्या २०-३० वर्षांमध्ये ज्यांनी सर्वांत भयंकर दलित उत्पीडनाच्या घटना घडवून आणल्या ते मोठ्या प्रमाणात आर्थिक आणि सामाजिक रूपात विकसित होणाऱ्या मध्यम जातींमधून आलेले आहेत, ते यामुळेच. जाट, भूमिहार, मराठा यांसारख्या शेतकरी-कुलक मध्यम जाती आज सर्वांत भयंकर दलित उत्पीडनाच्या घटनांना कारणीभूत ठरत आहेत ज्या जातीय पदानुक्रमात मागास जातींमध्ये येतात. म्हणूनच हे समजून घेण्याची गरज आहे की ब्राह्मण्यवादी विचारधारा कोणत्याही विशिष्ट जातीची विचारधारा नाही तर शासक वर्गाची विचारधारा आहे. सत्ता ज्यांच्या हाती राहिलेली आहे त्यांनी ब्राह्मण्यवादाच्या उच्चनीचतेच्या विचारधारेचा वापर गरीब जनतेला दाबण्यासाठी आणि विभागण्यासाठी केलेला आहे. इतकेच काय तर मुघल आणि तुर्कांनीदेखील ब्राह्मण्यवादी विचारधारेकडे ईर्षायुक्त दृष्टीने पाहिले आहे. आजच्या भांडवली व्यवस्थेमध्ये ब्राह्मण्यवादी विचारधारा भांडवलशाहीची विचारधारा आहे. आज ब्राह्मण्यवादी विचारधारेच्या जहराला भांडवलशाहीचे पाठबळ लाभलेले आहे. ब्राह्मण्यवादी विचारधारेच्या विरोधात कोणतीही खरी लढाई भांडवली नफेखोर व्यवस्थेच्या विरुद्ध लढाईच्या घोषणेशिवाय लढली जाऊ शकत नाही. जे ब्राह्मण्यवादाला विरोध करण्याच्या बाता करतात परंतु भांडवलशाहीला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करीत नाहीत ते एक तर मूर्ख तरी आहेत किंवा तुम्हांला तरी मूर्ख बनवीत आहेत. उदाहरणादाखल चंद्रभान प्रसादसारखे बाजारू अस्मितावादी दलितवादी विचारवंत जे दलितांमधून एक भांडवलदार वर्ग निर्माण होण्याबद्दल आनंद व्यक्त करतात आणि म्हणतात की आता दलितांचादेखील एक हिस्सा शोषण करू शकतो! ते या वास्तवाबाबत मौन पाळून असतात की ज्यांचे शोषण ते करीत आहेत त्यांचा एक मोठा हिस्सासुद्धा वास्तविक दलित जनताच आहे. आज रामदास आठवले, उदित राज, रामविलास पासवान, थिरुमावलन वगैरे दलित हितांच्या ‘‘राखणदारां’’ना सवर्णवादी शक्तींच्या कुशीत जाऊन बसण्यात कोणतीच लाज वाटत नाही! का? तमाम प्रामाणिक कार्यकर्ते असूनही आज उच्च मध्यमवर्गीय आंबेडकरवादी-दलितवादी संघटना अस्मितावादी राजकारणाच्या दुष्टचक्रात अडकून पडत आहेत! का? गेल्या तीन चार दशकांमध्ये जहाल अस्मितावाद आणि प्रतीकवादातून दलित जनतेला काय मिळाले आहे? दलित मुक्तीच्या आंदोलनातील गतिरोधाची कारणे समजून घेण्याची वेळ आता आलेली नाही का?अस्मितावाद आणि प्रतीकवाद आणि ‘डोक्यावर उभा असलेला जातीयवाद’ यांना सोडून दलित मुक्तीची परियोजना समग्र भांडवली व्यवस्थेला उद्ध्वस्त करण्याच्या परियोजनेशी जोडूनच आपल्या ध्येयाप्रत पोहोचू शकते हे समजण्याची वेळ आलेली नाही का? भांडवलशाही आणि ब्राह्मण्यवाद नाभिनालबद्ध आहेत हे आपल्याला कां दिसून येत नाही? मित्रहो, अहमदनगरची घटना पुन्हा एकदा टाहो फोडून हेच प्रश्न आपल्याला विचारत आहे. आपण त्यांची उत्तरे देण्यास तयार आहोत का?

तमाम दलितवादी-आंबेडकरवादी राजकीय पक्षांमध्ये आज ब्राम्हण्यवादी विचारधारेशी मुकाबला करण्याची कणभरसुद्धा क्षमता नाही. रामदास आठवले, उदित राज, रामविलास पासवान यांसारखे दलित मुक्तीच्या बाता करणारे लोक आज भाजपासारख्या घोर दक्षिणपंथी आणि ब्राह्मण्यवादी विचारधारेचा वाहक असलेल्या पक्षाच्या कुशीत जाऊन बसले आहेत आणि त्यांचा संधिसाधूपणा पूर्णपणे नागडा झालेला आहे. मायावतीच्या शासनकाळात उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या असंख्य अत्याचारांबाबत सर्वांनाच माहित आहे. म्हणूनच या पक्षांकडून काही अपेक्षा बाळगणे वेडेपणाचे आहे आणि त्यांच्या दलितमुक्तीच्या बातांवर केवळ हसले जाऊ शकते. आज पूर्ण ताकदीनिशी या पक्षांच्या अस्मितावादी राजकारणाचा पर्दाफाश करण्याची गरज आहे. आज दलितांच्या एका हिश्श्याला असेही वाटते की दलितवादी पक्षांद्वारे केला जाणार भ्रष्टाचार न्यायोचित आहे. जर उच्च आणि मध्यम जातींच्या शासकांनी इतकी वर्षे लूट आणि भ्रष्टाचार केला असेल तर आता थोडी संधी दलित शासकांनासुद्धा मिळाली पाहिजे! कित्येक खाऊन पिऊन सुखी असलेले बुद्धिजीवी असाही तर्कदेत असतात की जर दलित भांडवलदार कष्टकरी जनतेचे रक्त शोषून आपल्या तिजोऱ्या भरत असतील तर गरीब दलित जनतेने त्याबद्दल खूष झाले पाहिजे. सवर्णांच्या जागी जर दलित लुटत असतील आणि सवर्ण मालकांच्या जागी दलित मालक आपल्या कष्टांची लूट करीत असतील तर त्याबद्दल खूष होणे वेडेपणा आहे कारण तेव्हाही सगळ्यांत जास्त दलित कामगार आणि कष्टकरीच लूटला जाईल. आमचा विरोध फक्त सवर्ण भांडवलदारांकडून होणाऱ्या लुटीला नाही तर आमचा विरोध लुटीच्या एकूण व्यवस्थेला आहे. देशभरात कामगार वर्गाचा एक मोठा हिस्सा दलित जातींमधून येतो. ही जनता भांडवली शोषण आणि सवर्णवादी उत्पीडनाच्या जोखडाखाली दबून गेली आहे आणि हे जोखड ती एकाच वेळी झुगारून देऊ शकते, वेगवेगळे करून नाही.

बहुसंख्य दलित जनतेला जातीय उत्पीडन आणि भांडवली शोषणातून आज कशा प्रकारे मुक्ती मिळू शकते? अस्मितावादी राजकारणाच्या मार्गाने तिला गेल्या सहा दशकांमध्ये काही मिळाले आहे? वास्तविक दलित मुक्तीच्या परियोजनेच्या मार्गातील सर्वांत मोठा अडथळा आज अस्मितावादी राजकारण आहे. जोवर या अस्मितावादी राजकारणाला इतिहासाच्या कचरापेटीत फेकून एकूण कष्टकरी समाजाची वर्गएकजूट बनवली जात नाही तोवर भांडवलशाही आणि ब्राह्मण्यवादाची ही युती उद्ध्वस्त केली जाऊ शकत नाही. कष्टकरी जनतेमध्येदेखील अनेक जातीय पूर्वग्रह आहेत हे खरे आहे, परंतु ते दीर्घकालिक संघर्षाद्वारे व प्रचाराद्वारे तोडले जाऊ शकतात.

हे समजून घेण्याची नितांत आवश्यकता आहे की वर्गीय दृष्टिकोनापासून तुटलेले राजकारण आणि विचारधारा भांडवलशाहीचीच सेवा करील. वर्ग एकजूट आणि वर्ग दृष्टिकोनाच्या अभावाने दलित मुक्तीच्या ध्येयाला पुरेशी हानी पोहोचवलेली नाही का? अस्मितावादी राजकारणाने खुद्द दलित जनतेलाच वेगवेगळ्या जातींमध्ये विभागलेले नाही का? या अस्मितावादी राजकारणाच्या जहराने वेगवेगळ्या दलित जातींमध्ये एक भिंत उभी केलेली आहे. आज जर आपण अस्मितावादी आणि प्रतीकवादी राजकारण करणाऱ्या अशा लुटारू पक्षांच्या आणि संधिसाधू संघटनांकडून आशा बाळगत राहिलो तर यापुढेदेखील मिर्चपूर, खैरलांजी, भगाणा, अहमदनगर घडतच राहणार. जर आपण यांची चौकट मोडली नाही तर दलित मुक्तीच्या महान परियोजना अस्मितावाद आणि प्रतीकवादाच्या दुष्टचक्रात फिरत राहतील. आता आपण स्वस्थ बसून चालणार नाही, वर्तमानाचे जडत्व आपण तोडले पाहिजे. या प्रश्नांवर विचार करा आणि आजचा गतिरोध नष्ट करण्यासाठी पुढे या!

कष्टकऱ्यांची वर्ग-एकता – जिंदाबाद जिंदाबाद!

जाति-धर्माचे झगडे सोडा, खऱ्या लढाईशी नाते जोडा!

युनिव्हर्सिटी कम्युनिटी फॉर डेमोक्रेसी अ‍ॅण्ड इक्वॉलिटी

नौजवान भारत सभा

बिगुल मजदूर दस्ता

संपर्क – नारायण ९७६९९०३५८९, बबन – ९९२३५४७०७४, विराट – ९६१९०३९७९३ ईमेल – ucde.mu@gmail.com

Related posts

Leave a Comment

18 + 14 =