विद्यार्थी सर्जनशीलता शिबिर : पहिला दिवस

दि. 25/5/2024 रोजी सिद्धार्थनगर, अहमदनगर येथे सहा दिवसीय विद्यार्थी सर्जनशीलता शिबिराचा आज पहिला दिवस यशस्वीरीत्या पार पडला.
शिबिरात एकूण 91 विद्यार्थी सहभागी झाले होते. शिबिराची सुरुवात सकाळी सात वाजता राजू म्याना सरांनी पी.टी ने केली. ज्यात मुलांना शारीरिक स्वास्थ्य जपण्याचे महत्त्व पटवून देत कवायत करण्यात आली. औपचारिकरित्या शिबिराची सुरुवात प्रमुख पाहुण्या शिक्षिका काकडे मॅडम यांनी शहीद-ए-आजम भगतसिंह, सुखदेव, राजगुरू यांच्या प्रतिमेला हार अर्पण करत, तसेच ‘मेरा रंग दे बसंती चोला’ या क्रांतिकारी गाण्याने करण्यात आली. उद्घाटन प्रसंगी काकडे मॅडम, राजू म्याना सर, प्रवीण नेटके सर तसेच मुंबई वरून आलेले नौभास कार्यकर्ते राहुल साबळे, शशांक सौरव, हर्ष बोराडे आणि मिरा नायर उपस्थित होते.
पुढे नाष्टा केल्यानंतर शिबिराच्या आजच्या ‘चित्रकला’ या विषयावर शिक्षक प्रवीण नेटके सरांनी प्रकाश टाकला. चित्रकलेचे महत्त्व पटवून देत मुलांच्या मनामध्ये चित्राबद्दल कुतूहल निर्माण करत चित्रकलेचा आपल्या जीवनाशी कसा व्यापक अर्थाने संबंध आहे यावर शिक्षकांनी सविस्तर मांडणी केली. त्यानंतर त्यांनी प्रत्यक्ष चित्र कलेच्या मुख्य विषयावर मुलांना मार्गदर्शन केले आणि त्यांच्याकडून प्रॅक्टिस करवून घेतली. एकंदरीत मुलांची नवीन शिकण्यात आणि चित्रकला सारखे विषय सविस्तर जाणून घेण्यात विशेष आवड दिसून आली.
एकीकडे समाजात शिक्षणाचे बाजारीकरण प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढत चाललेले असताना कलागुणांना वाव मिळावा असे शिक्षण गरिबांना मिळणे अशक्य झाले आहे. शिबिर–प्रशिक्षण वर्ग ह्या बाबी फक्त श्रीमंतांची मक्तेदारी होत चालल्या आहेत. अशात अहमदनगर येथे नौभास कडून हे सहा दिवसीय शिबीर कष्टकरी समाज घटकातील मुलांना शिक्षणाची नवी उमिद देणारे ठरावे यासाठी याचे आयोजन करण्यात आले आहे. पुढील पाच दिवस वेगवेगळ्या विषयाला घेऊन विद्यार्थ्यांतील सुप्त कलागुणांना वाव मिळावा यासाठी हे शिबिर चालणार आहे.
विद्यार्थी सर्जनशीलता शिबिर : दुसरा दिवस
दि. 26/5/2024 रोजी सिद्धार्थनगर, अहमदनगर येथे सहा दिवसीय विद्यार्थी सर्जनशीलता शिबिराचा आज दुसरा दिवस पार पडला.विद्यार्थी सृजनशीलता शिबिराच्या दुसऱ्या दिवशी नियोजित वेळापत्रकाप्रमाणे शिबिराची सुरुवात पी. टी ने झाली. आजची पी. टी. कालपेक्षा वेगळी होती आज मुलांनी शारिरीक पिरॅमिड बनवला. डब्बा खाल्ल्यानंतर मुलं हॉलमध्ये जमा झाली.
शिल्पकलेवरचे आज चे सत्र सुरू होण्यापूर्वी क्रांतिकारी गाणी सादर करण्यात आली. नौभास कार्यकर्त्यांनी भगतसिंहाच्या क्रांतिकारी जीवनावर प्रकाश टाकत विद्यार्थ्यांना भारतीय क्रांतिकारी आंदोलनातील नौजवान भारत सभेचे योगदान यावर सविस्तर मांडणी करण्यात आली.
आजच्या शिबिराचा विषय शिल्पकला होता. शालेय जीवनातून लुप्त झालेला आणि खाजगी शाळेतही क्वचितच शिकवला जाणार हा विषय मुलांना खूप आवडला. मातीशी माणसाचे असलेले नाते आणि मातीला आकार देऊन एक मुर्त स्वरूप देण्याची प्रक्रिया आज मुलांनी जाणून घेतली. आज सगळे विद्यार्थी तब्बल दोन तास एकाग्राचित्तेने शिल्प करण्यात मग्न होते. जवळजवळ साऱ्याच मुलांनी आज पहिल्यांदा शिल्प बनवले. अनेकांना त्यांच्यातील सुप्त गुणांची जाणीव झाली. एकंदरीतच आजचे सत्र देखील काल प्रमाणेच मुलांना नवीन शिकवणारे व शिकण्याच्या प्रक्रियेतील आनंद देणारे होते.
विद्यार्थी सर्जनशीलता शिबिर : तिसरा दिवस
दि. 27/5/2024 रोजी सिद्धार्थनगर, अहमदनगर येथे सहा दिवसीय विद्यार्थी सर्जनशीलता शिबिराचा तिसरा दिवस यशस्वीरीत्या पार पडला.शिबिराचा तिसऱ्या दिवसाचा विषय विज्ञान प्रयोगांचा होता. पहिल्या सत्रामध्ये नौभास (पुणे) कार्यकर्ते शिक्षक सुस्मित राव यांनी काही विज्ञान प्रयोगांचे प्रात्यक्षिक करून दाखवले. आपल्या दैनंदिन आयुष्यात आपण अनेक गोष्टींचे निरीक्षण करत नाही आणि कित्येक घटनांचा कार्यकारणभाव आपल्याला माहीत नसतो म्हणून विद्यार्थ्यांनी दैनंदिन जीवनात चौकस राहून प्रश्न विचारले पाहिजेत यासाठी त्यांना प्रोत्साहित करण्यात आले. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र यांमधील प्रयोग मुलांना दाखवून त्यामागील विज्ञान मुलांना समजावण्यात आले. यामध्ये मुलांनी अनेक प्रश्न विचारले आणि मोठ्या उत्साहाने सहभाग दाखवला.
यांनतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते विनायक सापा सर यांनी बुवा–बाबा कशाप्रकारे सामान्य जनतेच्या धार्मिक भावना वापरून विविध ‘चमत्कार’ करतात, अंधश्रद्धा पसरवतात आणि जनतेची फसवणूक करतात हे समजावले. त्यांनी पाण्याचा दिवा लावून दाखवला, हवेतून सोन्याची साखळी काढून दाखवली, न जळणारा कापूस दाखवला आणि असे कित्येक ‘चमत्कार’ दाखवले. पुढे सत्राच्या शेवटी सर्व प्रयोगातील कार्यकारणभाव म्हणजेच वैज्ञानिक कारण काय आहेत? यावर सविस्तर मांडणी करण्यात आली.
पुढील तिसरे सत्र हे ‘क्राफ्ट’ चे होते. ज्यात पेपर आणि घरातील टाकावू वस्तूच्या वापरातून शोभेच्या छान वस्तू निर्माण करण्याच्या कलेबद्दल आवड निर्माण करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. तसेच शिक्षिका स्मिता म्याना मॅडम यांनी मुलांना अनेक प्रयोग करून दाखवले व मुलांना घरी सराव करायला साहित्य देण्यात आले. त्यानंतर आजच्या सत्राचे समापन करण्यात आले.
विद्यार्थी सर्जनशीलता शिबिर : चौथा दिवस
दि. 28/5/2024 रोजी सिद्धार्थनगर, अहमदनगर येथे सहा दिवसीय विद्यार्थी सर्जनशीलता शिबिराचा चौथा दिवस यशस्वीरीत्या पार पडला.
शिबिराचा चौथ्या दिवशी पाचव्या दिवशीच्या सादरीकरण आणि समारोपाच्या कार्यक्रमात सादर करायचे नाटक, गीत, डान्सच्या तयारीची रंगीत तालीम करण्यात आली.
गॅदरिंग मध्ये सादरीकरण होणार यामुळे मुलांमध्ये प्रचंड आनंद आणि उत्साह दिसत होता.
विद्यार्थी सर्जनशीलता शिबिर : पाचवा दिवस (सादरीकरण व समारोप)
दि.29/5/2024 रोजी सिद्धार्थनगर, अहमदनगर येथे सहा दिवसीय विद्यार्थी सर्जनशीलता शिबिराचा पाचवा दिवस सादरीकरण आणि समारोपाचा आनंदात यशस्वीरीत्या पार पडला.शिबिराच्या चार दिवसात वेगवेगळ्या कलात्मक विषयाला शिकत संध्याकाळच्या वेळेत मोठ्या कष्टाने मुलांनी नाटक, सोलो नृत्य, समूह नृत्य, लघु नाट्य या विषयाची कसून तयारी केली व पाचव्या दिवशी सादरीकरण केले.
समारोप आणि सादरीकरण कार्यक्रमाच्या अगोदर विद्यार्थ्यांची सिद्धार्थनगर मधून रॅली काढण्यात आली त्यानंतर कार्यक्रमाची सुरुवात शहीद–ए–आजम भगत सिंह, सुखदेव आणि राजगुरू यांच्या प्रतिमेला हार अर्पण करत करण्यात आली. त्यानंतर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अपेक्षा यांनी तर प्रास्ताविक अविनाश यांनी केले. त्यानंतर उपस्थित प्रमुख पाहुण्या अहमदनगर जिल्हा मराठा संस्थेच्या ट्रस्टी मीनाताई काटे, मार्क्सवादाचे प्रचार प्रसारक अभिजीत मीनाक्षी, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते विनायक सापा सर, महाराष्ट्र बालक मंदिर शाळेच्या मुख्यध्यापिका गिरी मॅडम, पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्या आणि शिक्षिका आडम मॅडम, प्राध्यापक बापू चंदनशिवे ह्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या सादरीकरणात क्रांतिकारी गाणे सादर करण्यात आले. तसेच नाटक, सोलो नृत्य, समूह नृत्य, लघु नाटक सादर करण्यात आले. सादरीकरणाच्या वेळेस मुलांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात उत्साह दिसत होता तसेच कार्यक्रमाला उपस्थित पालक देखील मुलांचे सादरीकरण बघून आनंदी होते.
नौभास कडून आयोजित करण्यात येत असलेले हे विद्यार्थी सर्जनशीलता शिबिर विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा या हेतूने आयोजित करण्यात आले होते.
विद्यार्थी सर्जनशीलता शिबिर : सहावा दिवस (सहल)
दि.30/5/2024 रोजी सिद्धार्थनगर, अहमदनगर येथे सहा दिवसीय विद्यार्थी सर्जनशीलता शिबिराचा सहावा आणि शेवटचा दिवस सहलीने संपन्न झाला.शिबिराच्या चार दिवसात वेगवेगळ्या कलात्मक विषयाला शिकत पाचव्या दिवशी महाराष्ट्र बालक मंदिर येथे सादरीकरण व समारोप कार्यक्रम पार पडला तसेच सहाव्या आणि शेवटच्या दिवशी अहमदनगर मधील साईबन कृषी पर्यटन केंद्र येथे सहलीचे आयोजन करण्यात आले होते.
सहलीचा दिवस हा मुलांचा आनंदाचा दिवस होता. सकाळी लवकर सहलीची गाडी गाठून मुलांनी तळपत्या उन्हात निसर्गाने थाटलेल्या साईबन कृषी पर्यटन केंद्राला मोठ्या आनंदात भेट दिली. त्यात सुरुवातीला प्राणी बघितले. आंतराची सफर असलेले प्रदर्शन बघितल्या नंतर मुलांमध्ये आकाश, ग्रह तारे याबद्दल प्रचंड उत्साह दिसून आला. पाण्यातून बोटिंग करतांना मुलांनी खूप मजा केली.
पुढे मुलांनी वेगवेगळे खेळ खेळत दिवसभर मजा केली त्यात रेन डान्स आणि कठपुतली खेळ सर्वात जास्त आकर्षणाचे खेळ राहिले आहेत. रेन डान्स मध्ये विद्यार्थ्यांनी मनसोक्त मजा केली.
सहा दिवसीय विद्यार्थी सर्जनशीलता शिबिराच्या शेवटचा दिवस सहलीनी पार पडला.
