कोणाच्या दबावाखाली लहान मुलांचे सर्जनशीलता शिबिर नकोय पुणे पोलिसांना? पुणे पोलिसांचा गणित-विज्ञान-चित्रकलेला विरोध का?

नौभासच्या लहान मुलांसाठीच्या सर्जनशीलता शिबिराला बंद पाडण्याच्या पुणे पोलिसांच्या कृतीचा तीव्र निषेध!
नौजवान भारत सभेतर्फे पुण्यात कष्टकरी पार्श्वभूमीतून येणार्या ६वी ते १०वी च्या मुलांसाठी जनता वसाहत येथे उन्हाळी शिबिर आयोजन करण्यात आले. या शिबिरात सामील झालेल्या मुलांचा उत्साह, आणि शिबिराची यशस्विता आपण स्वतंत्रपणे केलेल्या दुसऱ्या पोस्ट मध्ये पाहू शकता (लिंक: https://bit.ly/4aP4FvY ). परंतू या शिबिराचे आयोजन होऊ नये असा पर्वती ठाण्यातील पोलिसांनी पूर्ण प्रयत्न करून स्वत:चे जनविरोधी चरित्र नग्नपणे सिद्ध केले आहे.
नौजवान भारत सभा शालेय विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, चिकित्सा, धर्मनिरपेक्षता, सामूहिकता आणि समतेची मूल्ये रुजवण्यासाठी, त्यांना समाजाप्रती संवेदनशील बनवण्यासाठी विविध राज्यांमध्ये शिक्षण सहाय्यता केंद्र, आझाद स्पोर्ट्स क्लब, उन्हाळी सर्जशीलता शिबिर, सहली, विज्ञानाचे प्रयोग असे अनेक उपक्रम अयोजित करत असते. असे उपक्रम अयोजित करून कष्टकरी पार्श्वभूमीतून येणार्या मुलांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकासासाठी संधी उपलब्ध करवून देणे आणि भविष्याचे जबाबदार नागरिक बनवणे ह्यासाठी नौभासचे कार्यकर्ते कटिबद्ध आहेत. नुकतेच अहमदनगर आणि बिहार येथेही असे शिबिर अत्यंत उत्तमरित्या संपन्न झाले आहे.
अशाच प्रकारचे उन्हाळी शिबिर नौभासतर्फे पुण्याच्या मध्यवर्ती भागातील जनता वसाहत येथे आयोजित करण्यात आले. शिबिराचे आयोजन करण्यासाठी जनता वसाहत येथील ‘समाज विकास केंद्र’ च्या स्थानिक केअरटेकर यांच्याशी बोलून २ दिवसाच्या शिबिरासाठी जागा वापरण्याची परवानगी घेतली. समाज विकास केंद्राच्या जागेवर अनेक कार्यक्रम केअरटेकर यांच्या परवानगीने होत असतात. कार्यक्रमाची पोस्ट जेव्हा समाज माध्यमांवर टाकण्यात आली, तेव्हा पर्वती पोलिस ठाण्यातून दोन पोलिस नौभासच्या दांडेकर पूल येथील वाचनालयावर चौकशी साठी आले. त्यांनी कार्यक्रमाची पूर्ण माहिती घेतली आणि त्यानंतर पोलिसांनी समाज विकास केंद्राच्या स्थानिक केअरटेकरवर दबाव टाकून नौभासला जागा वापरण्याची दिलेली परवानगी रद्द करवून घेतली! हे सर्व शिबिर सुरू होण्याच्या आदल्या दिवशी करण्यात आले! प्रश्न आहे की हे शिबिर रद्द करवण्याचे कारस्थान पर्वती पोलिस कोणत्या राजकीय शक्तिंच्या दबावाखाली हे करवत आहेत?
फॅसिस्ट मोदी सरकारच्या मागच्या १० वर्षांच्या काळात आपण पाहिलेच आहे की दिवसेंदिवस राजकीय कार्यकर्त्यांवर अमानुष कारवाईचा बडगा उगारला जात आहे. जनतेच्या रोजगार, महागाई, शिक्षण, आरोग्य या मुद्द्यांवर खऱ्या अर्थाने संघर्ष करणार्या संघटनेवर दबाव आणण्यासाठी पोलिस प्रशासन राजकीय दबावाखाली काम करत आहे, हे आज उघड सत्य आहे. परंतु आता लहान मुलांच्या व्यक्तिमत्वाच्या विकासासाठी आयोजित केलेल्या सर्जनशीलता शिबिराचा सुद्धा पुणे पोलिसांच्या दृष्टीने कोणता धोका आहे? याच मुलांना जेव्हा दर्जेदार शिक्षण सोडा, पोषक आहार सुद्धा मिळत नाही, तेव्हा कुठे असते राज्यसत्ता आणि तिचे पोलिस! कोण आहेत ते राजकीय़ पुढारी ज्यांना कामगार-कष्टकऱ्यांच्या मुला-मुलींची प्रगती बघवत नाही?
आम्ही सर्व कष्टकरी आणि न्यायप्रिय जनतेला आवाहन करत आहोत की अशा प्रकारच्या दडपशाहीचा निषेध करण्यासाठी नक्की समोर यावे आणि पोलिसांच्या जनविरोधी कृत्यांवर वचक बसवण्यासाठी दबाव टाकावा.
आम्ही येथे आग्रहाने नमूद करू इच्छितो की पर्वती पोलिस, आणि त्यांचे पोषणकर्ते व कामगार-कष्टकऱ्यांचे शत्रू असलेले राजकीय पुढारी यांच्या प्रयत्नांपुढे न झुकता जनता वसाहत येथील जनतेच्याच सहयोगाने २ दिवसीय उन्हाळी शिबिर यशस्वीरीत्या पार पाडले गेले, ज्याला मुला-मुलींनी व पालकांनी भरभरून प्रतिसाद दिला! यापुढेही नौभास अशा दबावांना भीक न घालता “जनतेची सेवा करा” या तत्त्वावर चालत कामगार-कष्टकऱ्यांच्या मुलांच्या विकासाकरिता कटिबद्ध राहिल!

Related posts

Leave a Comment

three × 1 =