नौजवान भारत सभेचे(नौभास) पहिले महाराष्ट्र राज्य अधिवेशन संपन्न काल, 23 मार्च 2022 रोजी, शहीद दिनाच्या निमित्ताने नौजवान भारत सभेचे पहिले महाराष्ट्र राज्य संमेलन पुणे येथे संपन्न झाले.

यावेळी मुंबई, पुणे, अहमदनगर आणि राज्याच्या इतर भागातून आलेल्या नौभासच्या सदस्यांनी मिळून आजवरच्या कार्याचा आढावा घेतला, राज्य कार्यकारणीची निवड केली, तत्कालीन पुढील कामांकरिता महत्वाचे ठराव पारित केले; तसेच खुल्या सत्रामध्ये व्याख्याने, क्रांतिकारी गीत व सडक नाटक सादरीकरण केले व शहीद अभिवादन फेरी काढली. नौजवान भारत सभेच्या घटनेनुसार झालेल्या या पहिल्या राज्यसंमेलनाची सुरूवात नौजवान भारत सभेचा झेंडा उभारून आणि शहीदांना क्रांतिकारी अभिवादन करून झाली. यानंतर पुणे समन्वयक रवि यांनी आजवरच्या नौभासच्या राज्यातील कामांचा आढावा मांडला. यावेळी देशपातळीवर झालेले भगतसिंह रोजगार हमी कायद्याकरिताचे (बसनेगा) आंदोलन, प्रदूषणकारी बायोवेस्ट प्रकल्पापासून ते पुरग्रस्तांकरिता आणि झोपडपट्टी उध्वस्तीकरणाविरोधातील आंदोलन, सरकारी आरोग्य सेवेच्या दैन्यावस्थेविरोधात राज्यभरात वेळोवेळी केलेली आंदोलने, जातीय अत्याचारांविरोधात आणि महिलांवरील अत्याचारांविरोधात वेळोवेळी केलेली आंदोलने, सीएए-एनआरसी विरोधातील भव्य आंदोलन आणि त्यामध्ये दाखल केसेसद्वारे जनसामान्यांचे व नौभास कार्यकर्त्यांचे दमन, लोकशाही अधिकारांच्या समर्थनार्थ केलेली अनेक आंदोलने, अशा अनेक आंदोलनांसहीतच नैसर्गिक आपदांच्यावेळी काढलेल्या मदत मोहिमा व वैद्यकीय मदत कार्य, करोना संकटाच्या काळात केलेले मदतकार्य; भगतसिंह, चंद्रशेखर आझाद, राजगुरु, सुखदेव, अय्यंकाली, सावित्रीबाई फुले, अशा विविध क्रांतिकारक आणि समाजसुधारकांच्या जन्मदिनानिमित्त व स्मृतीदिनानिमित्त आयोजित केलेले कार्यक्रम अशा सर्व कामांचा एकंदरीत आढावा मांडला गेला. यानंतर साथी अविनाश यांनी देशभरातील विविध राज्यांमध्ये नौभसातर्फे चालू असलेल्या कामांचा आढावा मांडला. साथी सुरज यांनी नौजवान भारत सभेचे आजवरचे सर्व काम कशाप्रकारे जनसहयोगातून आयोजित झाले आहे हे सांगत पुणे, मुंबई व अहमदनगर येथील आर्थिक ताळेबंद सर्वांसमोर मांडला. यानंतर लोकशाही पद्धतीने निवडणूक प्रक्रिया राबवण्यात आली आणि खालील सदस्यांची एकमताने राज्य कार्यकारणी म्हणून निवड करण्यात आली: रवि , अतुल, अविनाश, अपेक्षा, सुरज. कार्यकारणीद्वारे रवि यांची सचिव आणि अतुल यांची कोषाध्यक्ष म्हणून निवड केली गेली. https://www.facebook.com/784643538358551/posts/2185151494974408/

Related posts

Leave a Comment

14 − thirteen =