शहीद दिनानिमित्त नौजवान भारत सभा, पुणे युनिट ची वार्षिक बैठक आणि पदयात्रा संपन्न

आज 23 मार्च शहीद दिवसानिमित्त नौजवान भारत सभेची वार्षिक बैठक पार पडली. गेल्या वर्षभरातील पुणे तसेच देशभरातील नौजवान भारत सभेच्या कामांचा आढावा, नवीन कार्यकारिणीची निवड तसेच पुढील कामांच्या नियोजनासंदर्भात महत्त्वाच्या सूचना यासाठी ही बैठक झाली. मीटिंगच्या सुरुवातीला साथी स्वप्नजा यांनी शहीद दिनानिमत्त प्रास्ताविक केले आणि जोरदार घोषणा देत मीटिंगची सुरुवात करण्यात आली. साथी सुस्मित यांनी पुण्यातील नौजवान भारत सभेचा वर्षभरातील अहवाल सादर केला. यामध्ये वर्षभरात पार पाडलेली चर्चासत्रे, अभियाने, बुक स्टॉल्स, नौभास द्वारे आंदोलनातील सहभाग, भगतसिंह जनअधिकार यात्रेमधील सहभाग, शिक्षण सहायता केंद्र, फिरते वाचनालय इत्यादी कामांचा संक्षिप्त आढावा मांडण्यात आला. त्यानंतर साथी रवी यांनी देशभरातील कामांचा आढावा मांडताना सांगितले की देशपातळीवर नौजवान भारत सभेचा भगतसिंह जनअधिकार यात्रेमध्ये सहभाग राहला आहे. बेरोजगारी, महागाई, भ्रष्टाचार आणि धार्मिक उन्मादाविरोधात 10 डिसेंबर रोजी सुरू झालेली भगतसिंह जनअधिकार यात्रा तेरा राज्यांमधून 8500 किलोमीटरचा प्रवास करीत तीन मार्च रोजी दिल्लीला पोहोचली जिथे मोदी शहाच्या पोलिसी गुंडांनी या यात्रेच्या समारोप सभेला संपन्न होऊ न देण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. मात्र तरीही एका सभेएवजी ठिकठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये, रस्त्यांवर सभा घेत या यात्रेचा आवाज देशभर पोचला. वाचनालये, शिक्षण सहायता केंद्र, भगतसिंह राष्ट्रीय रोजगार हमी कायदा (BSNEGA) अभियान इत्यादी पातळीवर देशभरात सुरू असलेल्या कामांचा आढावा साथी रवी यांनी मांडला. त्यानंतर नौजवान भारत सभेच्या पुणे युनिट ची नवीन कार्यकारिणी निवडण्यासाठी मतदान घेण्यात आले व नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. नवीन कार्यकारिणीमध्ये साथी रवी, साथी सुस्मित आणि साथी नेहा यांची बहुमताने निवड झाली. साथी सुस्मित यांची पुणे युनिट कार्यकारिणीचे समन्वयक म्हणून निवड झाली. त्यानंतर झालेल्या खुल्या चर्चासत्रात सदस्यांनी आणि हितचिंतकांनी आपापली मते मांडत पुढील कामाबाबत महत्त्वाच्या सूचना व चर्चा केली. मीटिंग संपल्यानंतर दांडेकर पूल भागातून शहीद दिनानिमित्त पदयात्रा काढण्यात आली. दांडेकर पूल ते पानमळा आणि तिथून जनता वसाहत मध्ये पदयात्रा काढण्यात गेली. शहीद भगतसिंह, सुखदेव, राजगुरू यांचा संदेश आणि त्यांच्या स्वप्नातील भारत निर्माण करण्यासाठीचा संकल्प कामगार-कष्टकरी जनतेमध्ये घेऊन जात जोरदार घोषणाबाजी करत आणि भाषणे देत पदयात्रा पार पडली.

Related posts

Leave a Comment

fourteen + 19 =