शहीद भगतसिंह, सुखदेव आणि राजगुरू यांच्या शहादत दिवसानिमित्त – स्मृती संकल्प अभियानाचे आयोजन अहिल्यानगर
नौजवान भारत सभाच्या वतीने शहीद भगतसिंह, राजगुरू आणि सुखदेव यांच्या शहादत दिनानिमित्त (23 मार्च) तीन दिवसीय “शहीद स्मृती संकल्प अभियान” आयोजित करण्यात आले. हे अभियान शहरातील विविध भागांत राबवण्यात आले, ज्यामध्ये ‘बाईचीच चूक’ या पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले. या पथनाट्याला लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या अभियानाच्या माध्यमातून शहीद भगतसिंह, सुखदेव आणि राजगुरू यांच्या बलिदानाचा इतिहास, स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारकांचे योगदान तसेच त्यांच्या क्रांतिकारी विचारधारेचा वारसा लोकांपर्यंत पोहोचवला गेला. क्रांतिकारकांचे स्वातंत्र्य हे केवळ ब्रिटिश सत्तेपासून मुक्ती नव्हते, तर त्यांचा उद्देश संपूर्ण शोषणमुक्त समाजाच्या निर्मितीचा होता, जिथे राज्यकारभार देशातील कामगार आणि कष्टकऱ्यांच्या हाती असेल; कुठल्याही प्रकारचे शोषण, जातीय-धार्मिक भेदभाव तसेच स्त्री-पुरुष असमानता नसेल. आजही देशातील बहुसंख्य कष्टकरी जनता शिक्षण, आरोग्य, घर आणि रोजगार यांसारख्या मूलभूत हक्कांपासून वंचित आहे. देशाची संपूर्ण संपत्ती श्रमिक वर्गाच्या मेहनतीने निर्माण होते, मात्र त्याच मेहनतीच्या जोरावर भांडवलदार आणि ठेकेदार वर्ग श्रीमंत होत जातो. म्हणूनच शहीद भगतसिंह आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पाहिलेले समताधिष्ठित समाजाचे स्वप्न अद्याप अपूर्ण आहे. ते पूर्ण करण्याची जबाबदारी तरुण आणि कष्टकरी जनतेवर आहे. नौजवान भारत सभा ही शहीद भगतसिंह, राजगुरू आणि सुखदेव यांच्या विचारांवर चालणारी संघटना आहे. शिक्षण, रोजगार आणि अन्य मुलभूत हक्कांसाठी युवकांना संघटित करण्याचे कार्य संघटनेच्या माध्यमातून केले जाते. या अभियानादरम्यान तरुणांना संघटनेशी जोडण्यासाठी विशेष आवाहन करण्यात आले. 🔸 नौजवान भारत सभा 🔸 📞 संपर्क: 9403317106
