नौभास, पुणे तर्फे नवीन शिक्षण धोरण (NEP) यावर चर्चासत्र आयोजित

सतत होत असलेले शिक्षणाचे खाजगीकरण आणि मोदी सरकारचे विद्यार्थी विरोधी नवीन शिक्षण धोरण (NEP) यावर नौजवान भारत सभेकडून आज (रविवारी) शहीद भगतसिंह वाचनालय, दांडेकर पूल येथे चर्चासत्र आयोजित करण्यात आले. चर्चासत्रामध्ये नौजवान भारत सभा आणि दिशा विद्यार्थी संघटनेकडून या धोरणाविरोधात काढण्यात आलेल्या संयुक्त पत्रकाचे व NEP वरील दिशा विद्यार्थी संघटनेच्या भूमिकेचे वाचन करण्यात आले. सहभागी साथींनी वेगवेगळ्या मुद्द्यांच्या वेगवेगळ्या आयामांवर भूमिका मांडल्या. साथी अरुणने मांडले की आजचे शिक्षण हे कशाप्रकारे भांडवली चाकर घडवण्याचे काम करत आहे आणि एकंदरीत आजच्या व्यवस्थेच्या संकटाच्या काळात जेव्हा की महागाई, बेरोजगारी, आर्थिक विषमता यांसारख्या प्रश्नांनी जनतेची कंबर मोडली आहे, नवीन शिक्षण धोरण कशाप्रकारे जनतेवर आधुनिक शिक्षणबंदी लादत आहे आणि चांगला रोजगार देणारे शिक्षण हे एका छोट्या संपत्तीधारी वर्गाची मक्तेदारी बनून राहिले आहे.
साथी जयवर्धनने मांडले की मूळ प्रश्न हा आहे की आजचे शिक्षण नक्की काय काम करते; तर ते व्यक्तीला समाजाप्रती जबाबदार न ठेवता व्यक्तीकेंद्री विचारासाठी प्रेरित करते. भांडवली व्यवस्थेमध्ये ते स्वाभाविकच आहे; कारण स्पर्धा ही गोष्ट या व्यवस्थेच्या वेगवेगळ्या अवयवांमध्ये रक्तासारखी प्रवाहित आहे. याच्या पलीकडे जाऊन प्रत्येक व्यक्तीला समान व मोफत शिक्षण मिळवून देणे ही शासनाची जबाबदारी आहे. शिक्षणाचे उद्दिष्ट हे व्यक्तीला सुसंस्कृत व सामाजिक व्यक्ती म्हणून घडवण्याचे असले पाहिजे.
साथी अमनने मांडले की विद्यार्थी हा समाजाचाच एक घटक असतो व समाजापासून विभक्त असे त्याचे कोणते ही स्वतंत्र अस्तित्व नसते. परंतु भांडवली शिक्षण आणि स्पर्धा व्यक्तीला जास्तीत जास्त स्व-केंद्री बनवत जाते. चांगले शिक्षण तेच असू शकते जे समाज, राजकारण व संस्कृतीकडे पाहण्याचा एक टीकात्मक दृष्टिकोन देऊ शकते. कारण आज शिक्षण भांडवली बाजारातील एक विकला जाणारा ‘माल’ आहे आणि त्याचे उद्दिष्ट हे भांडवली गुलामांच्या पुढील पिढीला घडवणे आणि त्या गुलामीची मानसिक रुजवण समाजामध्ये करणे आहे, आजचे प्रचलित शिक्षण हे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टी व तर्कशुद्ध विचार करण्याची क्षमता विकसित करण्याचे उद्दिष्ट घेऊन येत नाही तर बौद्धिक निष्क्रियता व अवैज्ञानिक विचारांना खत-पाणी घालण्याचे काम पण करते.
आजची समाज व्यवस्था ही असमानतेवर आधारित आहे आणि म्हणूनच येथील शिक्षण ही असमानतेच्या तत्वावर आधारलेले आहे. म्हणून एका नवीन प्रती-संस्कृतीच्या निर्माणाची गरज आहे. भांडवली मूल्य-मान्यता आणि संस्कृतीशी जनतेच्या झुंजार व क्रांतिकारक संघर्षातूनच लढले जाऊ शकते.
साथी सौरभने आपले मत मांडताना सांगितले की आज सरकार एकीकडे मोठमोठ्या भांडवलदारांची अब्जावधींची कर्जे माफ करत आहे आणि दुसरीकडे हजारो लाखो तरुण शिक्षणाच्या मूलभूत अधिकारापासून वंचित आहेत. हे आजच्या सरकारचे भांडवलधार्जिणे धोरणच दाखवते. पुढे शिक्षणाच्या आवश्यकतेवर भाष्य करताना सौरभने मांडले की शिक्षण हे सामान्य जनतेसाठी खूप महत्त्वाचे आहे. विद्यार्थी-युवक चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी शिक्षणाचे महत्त्व जनतेत रुजवण्यासाठी विशेष प्रयत्न केले पाहिजेत.
इतर साथींनी ही चर्चेमध्ये सक्रिय सहभाग नोंदवला.
शिक्षणाचे खाजगीकरण हे शासनाने राबवलेले लोकविरोधी धोरण आहे या मुद्द्यावर चर्चेअंती सर्वांची सहमती बनली.
नौजवान भारत सभा अशा प्रकारच्या चर्चासत्रांचे नियमित आयोजन करत असते जेणेकरून सामाजिक, राजकीय प्रश्नांकडे पाहण्याचा सुसंगत, वैज्ञानिक दृष्टिकोन संवेदनशील विद्यार्थी व तरुणांमध्ये विकसित व्हावा.

Related posts

Leave a Comment

6 + fifteen =