महान क्रांतिकारी शहीद शिवराम राजगुरू यांचा क्रांतिकारी वारसा जिंदाबाद

शहीद शिवराम राजगुरू यांच्या 113 व्या जन्म दिवसानिमित्त मुंबईतील मानखुर्द – गोवंडी येथे नौजवान भारत सभेद्वारे चालवण्यात येणाऱ्या शहीद शिवराम राजगुरू शिक्षण सहायता केंद्रात शिकायला येणाऱ्या विद्यार्थ्यांना राजगुरूंच्या महान क्रांतिकारी
वारश्याचा परिचय करून देण्यात आला. क्रांतिकारकांचे स्वातंत्र्याचे स्वप्न आजही अपूर्ण आहे आणि आज त्यांचे विचार, जीवन यांपासून प्रेरणा घेत पुन्हा त्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी लढण्याची गरज आहे. भगतसिंह, राजगुरू, सुखदेव, चंद्रशेखर आझाद, इत्यादी देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राण वेचलेल्या क्रांतिकारकांना स्वातंत्र्यानंतर एका समतामुलक, समाजवादी देशाची अपेक्षा होती ज्यात सर्व कारखाने, शेती – बागा, संपत्ती निर्माण करण्याची साधने यांवर कामगार कष्टकऱ्यांची सामूहिक मालकी असेल. देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे उलटूनही आज देशातील करोडो कामगार कष्टकरी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगत आहेत. श्रीमंत आणि गरीब यांतील दरी दिवसेंदिवस अत्यंत वेगाने वाढत आहे. कामगारांसाठी मुळातच कमकुवत असलेले श्रम कायदे जवळ जवळ नष्ट करण्यात आले आहेत. कामगार – कष्टकरी वर्गातून येणाऱ्या लाखो मुलांना शिक्षण घेणं शक्य नाही. देशभरात कुठेच सामान्य कष्टकरी जनतेसाठी आरोग्य सेवा उपलब्ध नाहीत. जनतेच्या अधिकारांसाठी लढणाऱ्या, आवाज उठवणाऱ्यांना देशद्रोहाचे आरोप लावून तुरुंगात बंदिस्त केले जात आहे. ह्या परिस्थितीत देशातील तरुणांनी एकजूट होऊन राजगुरू, भगतसिंह यांसारख्या क्रांतिकारकांच्या विचारांना, जीवनप्रवासाला वस्त्या – वस्त्यांमध्ये, गल्लोगल्ली, खेडो – पाडी घेऊन जाणे गरजेचे आहे.
ह्या विचारांना सोबत घेऊनच नौजवान भारत सभा मागील 2 महिन्यांपासून मानखुर्द – गोवंडी येथील भगतसिंह वाचनालय, लल्लुभाई कंपाऊंडमध्ये ‘शहीद शिवराम राजगुरू शिक्षण सहायता केंद्र’ चालवत आहे. यात 8 वीच्या पुढील सर्व अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना विविध विषय शिकवले जातात. ह्या विषयांमध्ये मराठी, हिंदी, इंग्रजी, इतिहास, भूगोल, गणित, विज्ञान, वाणिज्य (कॉमर्स) शाखेतील विषयांचा समावेश आहे. आज भांडवलाच्या सेवेत असलेल्या ज्ञानाला पूर्णपणे सामाजिक करण्याचा व्यापक संघर्ष उभा करणे गरजेचे आहे.
शहीद शिवराम राजगुरू शिक्षण सहायता केंद्रात येऊन वस्तीतील मुलांना शिकवण्यासाठी आपणही आपल्या वेळेचा सहयोग करण्याचे आव्हान नौजवान भारत सभा करत आहे.

Related posts

Leave a Comment

fifteen − eleven =