बेस्ट खाजगीकरणाच्या विरोधात – 4 जुलै 2025 रोजी वडाळा बस डेपो येथे आयोजित जनआंदोलनात सामील व्हा!

भांडवलदारांच्या नफ्यासाठी सार्वजनिक वाहतूक सेवा विकणे नाही चालणार!!
देशभरात चाललेला सार्वजनिक क्षेत्राच्या लुटीचा डाव आता मुंबईच्या बेस्ट बस सेवेसमोर उभा ठाकला आहे. ज्या बेस्टला सामान्य मुंबईकरांनी आपल्या कररूपी पैशातून उभं केलं, तीच सेवा आता खाजगी भांडवलदारांच्या घशात घालण्याचा कट सुरू आहे. याविरुद्ध 4 जुलै रोजी वडाळा बस डेपोवर एक आंदोलन आयोजित करण्यात आले आहे.
यासंदर्भात दिनांक 26 जून 2025 रोजी मानखुर्द-गोवंडीतील शिवाजीनगर जुना बस डेपो परिसरात प्रचार अभियान राबवण्यात आले. अभियानादर्म्यान अनेक नागरिकांनी आपला रोष व्यक्त केला – बस फेऱ्या कमी झाल्यात, भाडं प्रचंड वाढलंय, आणि सामान्य माणसाचं जगणं अधिकच अवघड झालंय. बेस्ट म्हणजे केवळ वाहतूक नव्हे तर सामान्य कामगार-कष्टकरी जनतेची जीवनवाहिनी आहे.
आज मोदी-फडणवीस सरकार जे करत आहे ते काही नविन नाही – 1991 पासून सुरू उदारीकरण आणि खाजगीकरणाचे धोरण आता फॅशिस्ट राजवटीत दुप्पट वेगाने राबवले जात आहे. आधी सार्वजनिक उपक्रमांना जाणूनबुजून तोट्यात ढकलायचं, मग “सुधारणा” करण्याच्या नावाखाली त्यांना टाटा-बिर्ला, अदानी-अंबानीसारख्या भांडवलदारांना विकायचं – हाच जुना, सडका आणि जनविरोधी फॉर्म्युला पुन्हा उघडपणे राबवला जात आहे.
बेस्टही याच फॉर्म्युल्याचा बळी ठरत आहे. सरकारने जाणूनबुजून तिचं नुकसान वाढवलं, निधी थांबवला, बस फेऱ्या कमी केल्या, आणि आता “सार्वजनिक व्यवस्था चालत नाही”, म्हणत सार्वजनिक वाहतूक सेवेला पूर्णपणे भांडवलदारांना सोपविण्याचे काम करत आहे.
खरंतर बेस्ट म्हणजे मुंबईतील लाखो कष्टकऱ्यांचा आधार आहे. ती विकली जाणं म्हणजे केवळ एक वाहतूक सेवा नाही तर जनतेचा हक्क हिरावून घेण्यासमान आहे.आज बेस्टचे खाजगीकरण थांबवण्यासाठी एक संघटित जनआंदोलन उभं करण्याची गरज आहे.
त्यासाठीच 4 जुलै 2025 रोजी वडाळा बस डेपो येथे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. ही केवळ बेस्ट वाचवण्याची नाही, तर संपूर्ण सार्वजनिक क्षेत्र वाचवण्याची लढाई आहे. आम्ही सर्व विद्यार्थी, तरुण व कामकरी जनतेला ह्या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करतो.
नौजवान भारत सभा

Related posts

Leave a Comment

5 × 4 =