स्त्री मुक्ती लीग व नौजवान भारत सभेच्या संयुक्त विद्यमाने अहमदनगर मधील सिद्धार्थनगर भागामध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा*

रविवार दिनांक 8/3/2020 रोजी सायंकाळी 5:00 वाजता नौजवान भारत सभेच्या वतीने सिद्धार्थनगर,म्यूनिसिपल कॉलनी परिसरामध्ये जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. यावेळी स्त्री मुक्ती लीग च्या कार्यकर्त्या साथी अपेक्षा यांनी ‘अमन के हम रखवाले सब एक है’ हे क्रांती गीत गायले.यानंतर नौजवान भारत सभेचे साथी प्रवीण यांनी उपस्थितांना संबोधित केले.त्यांनी आपल्या बोलण्याची सुरूवात करताना ‘महिलाए अब उठी नही तो जुल्म बढता जायेगा’ क्रांती गीत गायले. 8 मार्च इतिहास सांगताना ते म्हणाले की 8 मार्च 1908 ला अमेरिकेच्या न्यूयार्क शहरामध्ये कापड उद्योगात काम करणार्या महिला कामगारांनी मतदानाचा अधिकार आणि युनियन बनवण्याचा अधिकार मागत संपूर्ण मॅनहटन शहर जाम केलं. हे प्रदर्शन विश्वभरात चर्चेचा विषय झालं.त्यानंतर ह्या आंदोलनाचा परिणाम म्हणून संपूर्ण जगभरात 8 मार्च हा जागतिक महिला दिन साजरा करण्यात येऊ लागला.भारतात सर्वात अगोदर मुंबई येथे 1943 ला 8 मार्च हा महिला दिन साजरा करण्यात आला. त्यानंतर 1971 साली 8 मार्च या दिवशी पुण्यामध्ये महिलांनी मोठा मोर्चा काढला.त्यानंतर 1975 ला जागतिक युनोने हे वर्ष आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून घोषित केल्यामुळे संपूर्ण जगभरामध्ये 8 मार्च हा जागतिक महिला दिवस साजरा केला जाऊ लागला.पुढे ते म्हणाले की येत्या 10 मार्चला भारतातील पहिल्या महिला शिक्षीका सावित्रीबाई फुले यांचा स्मृतिदिन आहे.सावित्रीबाई फुलेंनी फक्त जाती व्यवस्था मोडीत काढण्याचे काम न करता महिला मुक्तीसाठी मोठ्याप्रमाणावर संघर्ष केला. पुणे येथे ज्योतीबा व सावित्रीबाई फुलेंनी पहिली मुलींची शाळा सुरू केली. त्यांच्या पुणे येथील शाळेत फातिमा बी शेख या सहशिक्षिका होत्या. सावित्रीबाईंनी महिलांना सांगितले कि “अज्ञान हा आपला सर्वात मोठा शत्रू आहे त्याला उपटून टाका. या अज्ञानाला/अडाणी पणाला चिरडून टाकल्याशिवाय आपली मुक्ती शक्य नाही.” त्यांच्या शाळेतील मुक्ता साळवे या मातंग समाजातील विद्यार्थीनीने वयाच्या १४ व्या वर्षी एकोणिसाव्या शतकात ‘आम्ही धर्म जात नसलेली माणसं’ असा निबंध लिहून मनुवादी व्यवस्थेचा बुरखा फाडला आज 110 वा आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करत असताना महिला खरंच स्वतंत्र आहेत का? हा प्रश्न उभा राहतो. आज स्त्री खरंच सुरक्षित आहे का? प्रत्येक ऑफिसेस कार्यालय अनेक ठिकाणी स्त्री म्हणून ती अपमानित होत नाही का? आजही स्त्रीयांचे नाव संपत्तीमध्ये लावले जात नाही, ना वडिलांच्या ना पती कडच्या. महिलांवरील अत्याचाराचे, बलात्काराचे प्रमाण दिवसेंदिवस चिंताग्रस्त करणारे आहे.आज भारत सरकारने काढलेल्या NRC,NPR,CAA हा कायदा सूद्धा स्त्री विरोधी अाहे. आसाममध्ये या NRC कायद्यानुसार झालेल्या सर्वे मध्ये 19 लाख मूळ आसामी नागरिक नागरिकत्व यापासून बेदखल झाले आहेत.त्यापैकी 70 टक्के हिस्सा हा महिलांचा आहे म्हणून या कायद्याविरोधात सुद्धा स्त्रीयांनी आवाज उठवला पाहिजे.सोबतच त्यांनी सांगितले की जो समाज दबलेला आहे,त्यानेच त्याच्या मुक्तीसाठी आवाज उठवला पाहिजे.स्त्रिया ह्या संपूर्ण जगाचा अर्धा हिस्सा आहेत.त्या अबला नाहीत.आज या स्त्रीयांनी त्यांच्या मुक्तीसाठी हुंकार भरला पाहिजे.आजच्या जागतिक महिला दिनाच्या दिवशी स्त्रियांनी प्रत्येक प्रकारच्या शोषणाविरोधात आवाज उठवत त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी संघटित होण्याचा संकल्प केला पाहिजे. शेवटी साथी अपेक्षा साळवे यांनी जाहीर केले कि आजपासून अहमदनगर शहरांमध्ये ‘स्त्री मुक्ती लीग’ संघटनेच्या कामाला सुरुवात झाली असून अहमदनगर मधील स्रियांच्या प्रत्येक समस्या सोडविण्यासाठी संघटनेच्या वतीने कायम पुढाकार घेतला जाईल. या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहिलेल्या रहमत सुलतान फाऊंडेशनच्या युनूस भाई तांबटकर यांनीही आपले मनोगत व्यक्त करत उपस्थित महिलांना आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नौजवान भारत सभेचे साथी अविनाश यांनी केले.यावेळी स्त्री मुक्ती लीगच्या साथी अपेक्षा साळवे, रोहिणी वाघमारे,सुरेखा वैरागर, सोनल पाटोळे, हर्षदा वाघमारे, सायली मोहिते, प्रणिता पाटोळे इ.व नौजवान भारत सभेचे साथी प्रवीण, अविनाश साठे, अतुल महानवर, महेश साठे यांनी या कार्यक्रमासाठी विशेष मेहनत घेतली.परिसरातील महिलांनी या कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या प्रमाणावर उपस्थिती दर्शवली.
सहभाग-
स्त्री मुक्ती लीग
नौजवान भारत सभा
दिशा विद्यार्थी संघटना
अहमदनगर, महाराष्ट्र

Related posts

Leave a Comment

sixteen − 15 =