कार्यक्रमात मंटोंच्या ‘टोबा टेक सिंह’ आणि ‘ठंडा गोश्त’ (थंड मांस) ह्या दोन लघुकथांचे सामूहिक वाचन करून त्यांच्यावर चर्चा करण्यात आली. पहिल्या लघुकथेत धर्माच्या आधारावर देशाची फाळणी करण्याचा फोलपणा व्यंगात्मक पद्धतीने उघडा पाडलेला दिसतो. तर दुसर्या लघुकथेत फाळणीच्या काळात घडलेल्या दंगलींमध्ये खून, दरोडे, अत्याचार, बलात्कार ह्यांची भयावहता अतिशय मार्मिक पद्धतीने मांडलेली दिसते. चर्चेदरम्यान सांप्रदायिकता, धर्मांधता, पितृसत्ता, मानवी नाती, अश्लीलतेची सापेक्षता, भारत-पाकिस्तान फाळणीच्या वेदना, स्वातंत्र्यचळवळीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची प्रतिक्रांतिकारी भूमिका, कलाकारांची सामाजिक-राजकीय भूमिका, असे अनेक मुद्दे उपस्थित झाले. मंटोंच्या लिखाणावर अनेक नामांकित समकालीन साहित्यिकांनी “अश्लीलते”चा आरोप लावला होता. ह्याच आरोपाखाली भारत व पाकिस्तानच्या सरकारांनी मंटोंवर अनेक खटले भरले, कधी दंड ठोठावला तर कधी तुरुंगवासही सुनावला. ह्याबाबत मंटो स्वतःची भूमिका स्पष्ट करत म्हणतात, “आपण ज्या काळातून जात आहोत त्याची जर तुम्हाला जाणीव नसेल तर माझ्या कथा वाचा. आणि जर तुम्हाला ह्या कथा सहन होत नसतील तर ह्याचा अर्थ असा की हा समाजच असह्य आहे. माझ्या लिखाणात कोणताही दोष नाही. ज्या दोषाचे खापर माझ्यावर फोडले जाते, तो प्रत्यक्षात विद्यमान व्यवस्थेतील दोष आहे. मला गोंधळ घालायला आवडत नाही आणि मी लोकांच्या मनात उत्तेजना निर्माण करू इच्छित नाही. संस्कृती, सभ्यता आणि समाजाला निर्वस्त्र करणारा मी कोण? तो तर आधीच नागडा आहे. मी त्याला कपडे घालण्याचा प्रयत्नही करत नाही, कारण ते माझे काम नाही, ते शिंप्याचे काम आहे.” मंटो हे जागतिक साहित्यातील एक अजरामर नाव आहे. जरीही मंटोंच्या दृष्टीकोनाबद्दल काही बाबतीत मतभेद असले तरीही सत्ताधार्यांच्या हितसंबंधांवर व समाजाच्या मागासलेपणावर बेधडक प्रश्न उपस्थित करणारा हा सच्चा कलाकार होता. आज भारतात वाढत्या फासीवादीकरणाच्या पार्श्वभूमीवर मंटोंच्या स्मृतीला व साहित्याला उजाळा देऊन देशातील तरुणांमध्ये तेच बेधडक चैतन्य जागवण्याची गरज आहे. #manto #shortstories #sadathassanmanto #communalism #fascism
नौजवान भारत सभा (पुणे) तर्फे हिंदी-उर्दू लेखक सआदत हसन मंटो ह्यांच्या ७०व्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या निवडक लघुकथांचे वाचन आयोजित करण्यात आले होते.
