नौभासतर्फे शहीद चंद्रशेखर आझाद जयंती साजरी, भारताच्या स्वातंत्र्यलढ्याप्रमाणेच पॅलेस्टाईनच्या स्वातंत्र्याचे समर्थन करण्याची गरज अधोरेखित

chandrashekhar azad jayanti

chandrashekhar azad jayantiआज शनिवारी 26 जुलै, 2025 रोजी पुण्यातील सुपर बिबवेवाडी भागात नौजवान भारत सभा (नौभास) तर्फे शहीद चंद्रशेखर आझाद यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाद्वारे जनतेला आपल्या क्रांतिकारी पूर्वजांच्या क्रांतिकारी विचारांशी परिचित करविले गेले आणि आजही साम्राज्यवादाविरोधात प्रलंबित असलेल्या पॅलेस्टाईनच्या प्रश्नावर प्रकाश टाकला गेला. कार्यक्रमाची सुरुवात “आ रे नौजवान” या आवाहनात्मक क्रांतिकारी गीताने झाली. यानंतर चंद्रशेखर आझाद यांच्या जीवनाबद्द्ल, नौभासबद्दल आणि आजच्या आव्हानांबद्दल मांडणी केली गेली.

साम्राज्यवादी वसाहती इंग्रजांप्रमाणेच भारताचे भांडवली सरकार देखील जनतेला क्रांतिकारकांच्या विचारांपासून दूर ठेवण्याचे काम करत आले आहे. हेच कारण आहे की 1947पासून आजपर्यंत भारत सरकारने शहीद भगत सिंह आणि इतर क्रांतिकारकांच्या उपलब्ध दस्तावेजांना जनतेर्यंत येण्यापासून थांबवले. याच षडयंत्राअंतर्गत सर्व भांडवली प्रसार माध्यमांमध्ये, टीव्ही मध्ये, चित्रपटांमध्ये, पुस्तकांमध्ये, समाज माध्यमांमध्ये, सर्वत्र शहीद चंद्रशेखर आझाद यांची प्रतिमा ‘मिशीला पीळ देऊन बंदूक हाती घेतलेला एक स्वप्नाळू वा आक्रमक तरुण’ अशी बनवल्या गेली आहे. परंतु जर इतिहासाच्या तथ्यांमध्ये नजर भिरकवली तर असे स्पष्ट दिसून येते की शहीद आझाद सुद्धा स्वत: कष्टकरी आयुष्य जगलेले होते, सामान्य कामगार-कष्टकरी जनतेचे जन-स्वराज्य स्थापन करण्यासाठी समाजवादी क्रांतीचा अभ्यास करण्यासाठी नेहमी आतुर असलेले एक विचारशील युवक होते. हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मीची कमांडर-इन-चीफ म्हणून धुरा सांभाळताना त्यांच्याही डोक्यात फक्त इंग्रजांचा विरोधच नव्हता तर साम्राज्यवादाचा, नफाकेंद्री भांडवलशाहीचा विनाश करून समतामूलक समाजवादाची स्थापना करण्याचा विचार होता.
आज रोजी स्वातंत्र्याची 77 वर्षे उलटून देखील आपल्या क्रांतिकारी पूर्वजांचे स्वप्न हे वास्तवात उतरलेले नाहीये. सर्वत्र नैराश्याचे आणि असुरक्षेचे वातावरण पसरलेले आहे. देशातील तरुण मुख्यतः बेरोजगारीने त्रस्त आहेत. आजघडीला देशातील बेरोजगारांपैकी 80% संख्या ही तरुणांची आहे (आयएलओ रिपोर्ट). तरुण एकतर नैराश्यात जाऊन आत्महत्येचा मार्ग निवडत आहेत किंवा हिंदुत्ववादी फॅशिस्ट गुंडांच्या टोळक्यांमध्ये सामिल होत आहेत. भाजप-संघाने भडकवलेल्या हिंदू-मुस्लिम दंगलींमध्ये एकमेकांची टाळकी फोडतायेत आणि महिलांची छेडखानी करणारे लंपट तत्त्व म्हणून मिरवत आहेत. आजचे हे वास्तव शहीदांच्या स्वप्नांतील भारतापासून हजारो मैल दूर आहे. म्हणूनच 2005 मध्ये नौजवान भारत सभेची पुनर्स्थापना करण्यात आली, ज्याचे उद्दिष्ट शहीदांच्या क्रांतिकारी विचारांना वस्त्या-वस्त्यांत, गल्लीबोळात घेऊन जाणे, देशातील युवा आंदोलनाला संघटित करून व्यापक जनतेच्या संघर्षांशी जोडणे आणि समाजवादी क्रांतीसाठी देशातील युवापिढीची तयारी करविणे, हे आहेत. याच कार्याचा भाग म्हणून “सर्वांना समान, मोफत, दर्जेदार शिक्षण मिळालेच पाहिजे” आणि “सर्वांना पक्का रोजगार मिळालाच पाहिजे” या मागण्यांवर, तसेच जातीवाद, भांडवली पितृसत्ता, लोकशाही अधिकारांचे दमन, इत्यादी मुद्द्यांवर देखील नौभास आवाज उठवत असते.
भारताने ब्रिटीश साम्राज्यवादाशी लढा देऊन स्वातंत्र्य मिळवले. जगातील शेकडो देश ब्रिटीश, फ्रेंच, स्पॅनिश, इत्यादी साम्राज्यवादाशी लढून स्वतंत्र झाले. असाच एक देश पॅलेस्टाईन मात्र अजूनही स्वतंत्र झालेला नाही. पण आज जनतेत पॅलेस्टाईनच्या मुद्द्याविषयी भाजप-संघाकडून भ्रम पसरविले जात आहेत. पॅलेस्टाईनच्या मुद्द्याला मुस्लिमांचा मुद्दा म्हणून बघितले जात आहे. इस्रायल भारताला मदत करतो म्हणून त्याला पाठिंबा द्यावा, हा मुस्लिम विरुद्ध ज्यू असा मुद्दा आहे, इस्रायल हमास पासून स्वतःचे संरक्षण करीत आहे, असे अनेक भ्रम हिंदुत्ववादी लोकांमध्ये पसरवत असतात. परंतु तथ्ये आणि वास्तव यांच्या खोट्या प्रचाराच्या तोंडावर लाथ मारतात. 7 ऑक्टोबर 2023 रोजी इतिहास सुरू झालेला नाहीये, तर 1948 पासून, म्हणजेच गेल्या जवळजवळ 77 वर्षांपासून पाश्चिमात्य साम्राज्यवादी राज्यांच्या भांडवली हितांखातर झायोनिस्ट इस्रायलचे निर्माण दहशतीद्वारे करण्यात आले. 1948ला पॅलेस्टिनी जनतेच्या जमिनी बळकावण्यात आल्या, त्यांची घरंदारं लुटण्यात आली आणि बंदुकीच्या नळीवर पॅलेस्टिनी जनतेचे विस्थापन करून बेकायदेशीर इस्रायल वसाहतीची स्थापना करण्यात आली, ज्या दिवसाला “नकबा” म्हणून ओळखले जाते. तेव्हापासून आजपर्यंत दररोज पॅलेस्टिनी जनतेवर इस्रायल बॉम्बगोळ्यांचा मारा करत आलेला आहे. हे दोन देशांतील युद्ध नसून पॅलेस्टिनी जनतेचा जनसंहार आहे आणि पॅलेस्टिनी जनतेकडून इस्रायल-विरोधात होणारी प्रत्येक हिंसक-अहिंसक कारवाई ही पॅलेस्टाईनच्या स्वातंत्र्यलढ्याचा भाग आहे, आतंकवाद नव्हे. पॅलेस्टाईनमध्ये मुस्लिम, ज्यू, ख्रिस्ती, ड्रुझ जमात अशा सर्वच धर्मांची जमातींची लोकं राहतात. अमेरिकेतील “ज्यूईश व्हॉईस फॉर पीस” नावाच्या ज्यू संघटनेचे देखील पॅलेस्टाईनला समर्थन आणि इस्रायलला विरोध आहे. यातच हे स्पष्ट होते की हा मुस्लिम विरुद्ध ज्यू मुद्दा नाहीच आहे.
गेल्या दीड वर्षांपासून इस्रायलची अमानवी क्रूरता खूपच वाढली आहे. गाझापट्टीला स्मशानामध्ये बदलण्यात आलेले आहे. इस्रायल अन्नधान्याच्या कोणत्याही मदतीला पॅलेस्टिनी जनतेपर्यंत पोहोचू देत नाही. सर्वजण अन्नाच्या एकेका तुकड्यासाठी तरसत आहेत. उपासमारीमुळे होणाऱ्या मृत्यूंचे आकडे दिवसेंदिवस वाढतच जात आहेत. ह्या मृत्यू नसून खुनी इस्रायल कडून करण्यात आलेल्या हत्या आहेत. रोज-रोज पॅलेस्टिनी चिमुरड्यांची फक्त सांगाडे उरलेल्या, कोमेजलेल्या, सुकलेल्या शरीरांची हृदय पिळवून टाकणारी चित्रे समोर येत आहेत. या कोवळ्या जीवांना बघून कुठला “माणूस” त्यांचा धर्म बघण्याची किंवा इस्रायलला समर्थन देण्याची चेष्टा करेल? शहीद भगत सिंह, शहीद सुखदेव, शहीद राजगुरूंच्या भारतात अशी चेष्टा होणे लाजिरवाणी गोष्ट आहे. ही 200 वर्ष इंग्रजांच्या क्रूर शासनाविरुद्ध बंड पुकारणाऱ्या आपल्या प्रत्येक पूर्वजावर आणि भारताच्या स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासावर थुंकण्यासारखी गोष्ट आहे. आणि ही गोष्ट फक्त आणि फक्त तेच करू शकतात ज्यांचे स्वातंत्र्यलढ्याशी काहीही घेणेदेणे नव्हते, जे इंग्रजांचे तळवे चाटण्यामध्ये मग्न होते, जे साम्राज्यवाद्यांशी लढण्याऐवजी जनतेत जाती-धर्माचे झगडे लावण्यामध्ये, आपल्यात फूट पाडण्यामध्ये व्यस्त होते—ते म्हणजेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप. आज पॅलेस्टाईनला समर्थन आणि इस्रायलचा विरोध हेच आज आपले माणूस म्हणून आयडेंटिटी कार्ड असले पाहिजे.
पॅलेस्टाईनच्या समर्थनात आणि झायोनिस्ट इस्रायल विरोधात इस्रायलशी सर्व राजकीय, आर्थिक हितसंबंध तोडण्यासाठी मोदी सरकारवर दबाव आणण्यासाठी संघटित होण्याचे आवाहन करत आहोत. स्वत:च्या हृदयात स्वातंत्र्याची कल्पना जपलेल्या सर्वांना आवाज उठवण्याचे आवाहन करत आहोत. बीडीएस चळवळीअंतर्गत कोका कोला, मॅकडोनाल्ड्स, मॅगी इत्यादींसारख्या सर्व कंपन्या ज्या इस्रायल सोबत आपले संबंध अजूनही बाळगून आहेत, अशांवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन करत आहोत. या कंपन्यांकडे आपल्याकडून गेलेल्या एकेका रुपयामागे पॅलेस्टिनी चिमूरड्यांचे रक्त आहे.
शेवटी पॅलेस्टिनी जनतेची क्रांतिकारी आशा दर्शवणारी आणि साम्राज्यवादाला आवाहन देणारी एक कविता सादर केली गेली आणि “तू ज़िंदा है तो ज़िंदगी की जीत में यकीन कर” या क्रांतिकारी गीताने आणि शहीद चंद्रशेखर आझाद यांना पुन्हा क्रांतिकारी अभिवादन करत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
इंकलाब जिंदाबाद!
भांडवलशाही साम्राज्यवाद फासीवाद मुर्दाबाद!!
पॅलेस्टाईनचा स्वातंत्र्यलढा चिरायू होवो!!!
झायोनिझम हो बर्बाद!!!!

Related posts

Leave a Comment

thirteen + ten =