चंद्रशेखर आझाद! भारताच्या स्वातंत्र्यलढ्याच्या क्रांतिकारी आंदोलनातील असे नाव जे आजही अतिशय आदराने घेतले जाते, जे अजूनही कोणी विसरले नाही आणि विसरणे ही शक्य नाही! असे नाव ज्याने शोषणाविरुद्ध लढणाऱ्या आणि समतामुलक, न्याय्य समाजाचे स्वप्न बघणाऱ्या कित्येकांना प्रेरणा देण्याचे काम केले आहे, आणि आजही करत आहे. चंद्रशेखर आझाद खऱ्या अर्थाने भारताच्या क्रांतिकारी आंदोलनातील असा एक चकाकता तारा आहे, ज्याचा प्रकाश आजच्या घोर निराशेच्या काळात सुद्धा साम्राज्यवादी-भांडवली शोषणाविरुद्ध, हर प्रकारच्या असमानतेविरुद्ध लढणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आशेचा किरण देण्याचे काम करत आहे. चंद्रशेखर आझाद यांचा जन्म कमालीची गरिबी, अशिक्षितता, धार्मिक कट्टरतेच्या वातावरणात झाला. ते फक्त पुस्तकं वाचून नाहीत तर राजकीय संघर्ष व जीवन संघर्षातील आपल्या सक्रिय अनुभवातून शिकून त्या क्रांतिकारी दलाचे नेते झाले ज्या दलाचं उद्देश्य फक्त इंग्रजांना घालवणं नव्हतं तर एक शोषणविरहित आणि समतामूलक समाजाची स्थापना करणं होतं. कामगारांच्या सत्तेशिवाय आणि शोषणाच्या प्रत्येक रूपाचा विनाश केल्याशिवाय, देशातील कष्टकरी जनतेची मुक्ती शक्य नाही हे सत्य ते जाणून होते. जोपर्यंत आपल्या देशातील जनता देशी – विदेशी भांडवलदारांच्या नफ्यासाठी आपल्या हाडामासाचा, रक्ताचा एक एक थेंब वाहायला मजबूर आहे, जोपर्यंत शिक्षण, आरोग्य, रोजगार, उत्तम आवास, उत्तम भोजन यांपासून एकही कामगार वंचित आहे, जोपर्यंत भूक आणि कुपोषणाचा भस्मासुर आमच्या बालकांना गिळत राहील तोपर्यंत आमच्या क्रांतिकारकांचे स्वप्न आमच्या स्मरणात राहील. ज्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी त्यांना आपल्या प्राणांची देखील आहुती द्यावी लागली ते स्वप्न आम्ही जिवंत ठेवू.
साथींनो, आजचा काळ हातावर हात धरून आणि स्वतःच्या नशिबावर विश्वास ठेवून बसण्याचा नाही. कुणी तारणहार किंवा पैगंबर येऊन आपल्याला मुक्ती मिळवून देईल असेही नाही. आपणच आपली ताकद ओळखायला हवी. चंद्रशेखर आझादांसारखे क्रांतिकारक देखील कोणी अवतार पुरुष नव्हते, ते सुद्धा तुमच्या आमच्या सारखे माणूसच होते. त्यांनीसुद्धा मुंबईत मजुरी करण्यापासून कितीतरी रात्री रस्त्यावर व फूटपाथवर व्यतीत केल्या होत्या. परंतु त्यांनी जीवनाच्या त्या संकटांपुढे गुडघे न टेकता जीवनाला अधिक सुंदर आणि अर्थपूर्ण बनविण्याचं जे स्वप्न बघितलं, जो संकल्प केला त्यास पूर्णत्वाकडे नेण्याचा प्रयत्न शेवटच्या श्वासापर्यंत करत राहिले. आपण कष्टकऱ्यांनी ज्या हातांनी या भांडवली जगाच्या इमल्यांना उभं केलं, ज्यावर भांडवलदार मिरवतात, त्याच हातांनी आता आपल्याला शोषणमुक्त समतामूलक भविष्याला रचावं लागेल. नव्या जोमानं क्रांतिकारी आंदोलनाची सुरुवात करावी लागेल. इतिहासातील चुकांपासून धडा घेत, क्रांतिकारी संघटनेचा पाया रचावा लागेल. आपल्याला पुन्हा एकदा नव्या ऊर्जेनं आणि नव्या आवेगानं आपल्या मुक्तीस्वप्नांना देशाच्या कानाकोपऱ्यात पसरवावं लागेल. चंद्रशेखर आझाद, अश्फाक उल्लाह खान आणि इतर क्रांतिकारकांनी हिंदू-मुस्लिम एकतेचा संदेश दिला होता. आज मात्र देशभरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि संघ परिवारातील इतर संघटना सांप्रदायिकतेचे वातावरण पसरवत आहेत. आज अशा परिस्थितीमध्ये शहीद चंद्रशेखर आझाद आणि तमाम क्रांतिकारकांचा वारसा घेऊन सांप्रदायिक फासीवादी शक्तींविरुद्ध संघर्ष उभा करावा लागणार आहे. यासाठी पुन्हा एकदा नव्याने क्रांतिकारकांचे विचार हे जनतेमध्ये घेऊन जावे लागणार आहे. क्रांतिकारकांनी दाखवलेल्या मार्गाने त्याग, निष्ठा व समर्पित भावनेने जनतेला एकजुट करण्याचा संकल्प आज करूयात. शासक वर्गाच्या आपल्याला जाती धर्मात विभागण्याच्या षडयंत्राविरुद्ध आपल्याला सर्व जाती-धर्मातील कष्टकऱ्यांची वर्गीय एकजूट बनवावी लागेल. तेंव्हाच आपण आपल्या शहिदांच्या वास्तविक स्वप्नांना पूर्ण करू शकू.
इंकलाब झिंदाबाद!!
भांडवलशाही, साम्राज्यवाद मुर्दाबाद!!
जाती-धर्माचे झगडे सोडा, खऱ्या लढाईशी नाते जोडा!!
