शहीद राजगुरु यांच्या 111व्या जन्मदिना निमित्त कामगार कष्टकऱ्यांच्या मुला-मुलींना वक्तृत्वाची संधी!

संघर्ष आणि निर्माण या दोहोंची सांगड घालत नौभास शहीद भगतसिंह, राजगुरु, सुखदेव यांच्या विचारांमधील क्रांतीकारी परिवर्तनाचा प्रचार करत आहे.”जनतेची सेवा करा” हा नौजवान भारत सभेचा नारा आहे. नौजवान भारत सभा, पुणे युनिटद्वारे हा नारा प्रत्यक्षात उतरवण्यासाठी 130, दांडेकर पूल वस्तीमध्ये शिक्षण सहायता केंद्र व ग्रंथालय चालवते आणि कामगार-कष्टकऱ्यांच्या मुलांना दर्जेदार शिक्षण मिळाले पाहिजे याचा नेहमी प्रयत्न करत असते.
शहीद शिवराम राजगुरू यांच्या 111व्या जन्मदिना(24 ऑगस्ट) निमित्त वस्तीमध्ये 7 वी ते 10 वी च्या विद्यार्थ्यांसाठी 25 ऑगस्ट, रविवार रोजी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. अनेक मुलांनी उत्साह दाखवत ‘भगत सिंह व त्यांच्या साथीदारांची स्वातंत्र्य लढ्यातील योगदान’, ‘आपण स्वतंत्र आहोत काय?’, ‘शहीद राजगुरू यांचे जीवनकार्य’, ‘अंतराळात माणूस’ आणि ‘आपण मोबाईलचे गुलाम होत आहोत का?’ अशा विषयांवर भाषण केले. एकूण 20 विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला. मुलांचा आत्मविश्वास वाढावा यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
कामगार कष्टकऱ्यांच्या वस्त्यांमधील मुलांना अशा प्रकारच्या स्पर्धांमध्ये सहभाग घेण्याची संधी फारच कमी वेळा मिळते. स्पर्धेमध्ये बक्षिसापेक्षा बहुतेक विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील संधी मिळाल्याचा आणि मंचावरून बोलण्याचा आनंद ओसंडून वाहत होता. सदर कार्यक्रमसाठी नालंदा बौद्ध विहार यांचे जागेसाठी सहकार्य लाभले तसेच परिक्षक म्हणून सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती आणि प्रा. मनिषा यांचे सहकार्य लाभले.
नौजवान भारत सभेसोबत, आणि शिक्षण सहायता केंद्रासोबत जोडून घेण्यासाठी आम्ही सर्व संवेदनशील युवकांना आवाहन करत आहोत की त्यांनी आपल्या आयुष्याचा काही वेळ गांभीर्याने आणि जबाबदारीने देण्यासाठी पुढे यावे.

Related posts

Leave a Comment

eleven − 1 =