नौजवान भारत सभे तर्फे मुंबईतील मानखुर्द – गोवंडी भागातील मुला – मुलींसाठी गेल्या काही काळापासून शहीद राजगुरू शिक्षण सहायता केंद्र चालवण्यात येत आहे, ज्यात आठवी ते बारावी व त्यापुढे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना कला, विज्ञान, वाणिज्य शाखेतील विषय शिकवले जातात. आपल्या सूर्यमालेतील ग्रह, त्यांची निर्मिती, पृथ्वी ची निर्मिती, आकाशातील विविध घटनांचा अभ्यास व त्यांची माहिती मुलांना व्हावी म्हणून वरळी, मुंबई येथील नेहरू तारांगण येथे सहलीचे आयोजन नौजवान भारत सभेतर्फे करण्यात आले. कामगार – कष्टकरी वस्त्यांमध्ये दोन वेळेची पोटाची खळगी भरण्यासाठी सगळे कुटुंब काही ना काही काम सतत करत असते. बहुतांश वेळी घरातील मुले चित्रकला, संगीत, नृत्य, अभिनय, वाचन, इत्यादी विविध कलाप्रकारांत असलेला रस, विज्ञान जगताच्या बहुविध जिज्ञासा आणि इतर अनेक इच्छा, लहान वयांत अंगावर येऊन पडलेल्या घरातील कामांच्या, आर्थिक जबाबदाऱ्यांमुळे, गुंडाळून मनाच्या एखाद्या कोपऱ्यात ठेवून देतात. अडगळीच्या खोलीतील सामान ज्याप्रमाणे कधीतरी कामी येईल ह्या अपेक्षेने जपून ठेवले जाते पण कधीच बाहेर काढले जात नाही त्याचप्रमाणे त्यांच्या मनाच्या ‘त्या’ कोपऱ्यातील इच्छा कधीच मूर्त रूप घेत नाहीत. मूर्त रूप घेतात त्या फक्त समस्या!! शिक्षणाच्या, पोटापाण्याच्या, रोजगाराच्या, आजारपणाच्या, राहण्याच्या खोलीच्या, पिण्याच्या पाण्याच्या!! गरीबीशी जोडलेल्या सर्व समस्या!
शहीद राजगुरू शिक्षण सहायता केंद्रात शिकणारे सर्व सदस्य कष्टकरी – गरीब घरांमधून येतात. आयोजित सहलीला सहभागी सर्वांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. बिग बँग, पृथ्वीवरील वातावरण निर्मिती, विविध ग्रह – ताऱ्यांची नावे, त्यांची माहिती, वेगवेगळ्या आकाशगंगा, त्यांचे विलोभनीय सौंदर्य सर्वांच्या डोळ्यांतील विस्मय, आनंद, समाधान यांतून परावर्तित होताना दिसले. मुलांनी अनेक प्रश्न विचारले. ब्लॅक होल, धूमकेतू, उल्कापात, क्लायमेट चेंज, इत्यादी विविध विषयांवर चर्चा झाल्या. पृथ्वीच्या निर्मितीचा इतिहास जाणून घेतल्या नंतर पृथ्वीवरील जैव वैविध्य, वातावरण, इत्यादीं विषयी अधिक जाणून घेण्याची इच्छा निर्माण झाल्याचे, तसेच ह्या सर्व गोष्टी सर्व मुला – मुलींना बघायला, जाणून घ्यायला मिळणं खूप महत्वाचं असल्याच शाहीन, सिमरन, शुभम यांनी मांडलं. चर्चेनंतर सर्वांनी सोबत आणणेल्या खाद्यपदार्थांवर ताव मारला व तारांगणासोबतच असलेल्या ‘भारत – एक शोध संग्रहालयाला’ देखील भेट दिली.
सहलीचा संपूर्ण खर्च हा जनतेच्या आर्थिक सहयोगातून करण्यात आला ज्यात सहभागी सदस्यांनी देखील शक्य तो सहयोग केला.
नौजवान भारत सभेच्या कामांना जाणून घेण्यासाठी व सोबत जोडून घेण्यासाठी संपर्क :-
पूजा – 7057088323
अविनाश -8826265960
