नौजवान भारत सभेतर्फे मानखुर्द – गोवंडी मधील काही वस्त्यांमध्ये फिरते वाचनालय चालवण्यात येते. कष्टकरी वस्त्यांमधील अबाल – वृद्धांपर्यंत भांडवली – चंगळवादी संस्कृती पोहचवण्यासाठी अनेक माध्यमं आहेत, परंतु कामगार – कष्टकऱ्यांचा, सामान्य जनतेचा इतिहास, संवेदनशील मानवी मूल्ये, सांस्कृतिक जडण घडणीचा ठेवा पोहचवण्यासाठी जवळपास काहीच नाही!! अत्यंत गरीब असलेल्या वस्त्यांमधील अशिक्षित, बेरोजगार युवक नशेखोरीच्या आहारी गेलेले दिसतात, खून, भांडणं ही तिथे नित्य नियम बनलेली असतात. तिथे राहणाऱ्या लोकांची घरं आणि संपूर्ण शहराची घाण वाहून नेणारा, बाजूने वाहणारा नाला जणू एकच आहेत अशी परिस्थिती असते!
सांडपाण्याच्या गटारांतून पिण्याच्या पाण्याचे पाईप टाकलेले असतात, ज्यात बहुतेक वेळा सांडपाणी मिसळून पिण्याचे पाणी दूषित होत असते आणि तेच पाणी त्या वस्तीतले लोक पित असतात. शौचालये नसतात, शाळा नसतात, दवाखाने नसतात ! थोडक्यात, एक सन्मानजनक जीवन जगण्यासाठी लागणाऱ्या मूलभूत सुविधा नसतात तेही अशा ठिकाणी जिथे मुंबईला घडवणारे हजारो हात वास्तव्याला असतात! अशाच अत्यंत अमानवीय परीस्थितीत आयुष्यभर प्रश्न न उचलता राहण्यासाठी वस्त्यांमध्ये उपलब्ध करून दिली जातात स्वस्तात नशेखोरी करण्याची साधनं, पब जी सारखे हिंसक खेळ, अर्थहीन व्हिडिओ बनवून कमी काळात प्रसिद्ध होण्याची स्वप्न दाखवणारी टिक टॉक सारखी एप्लिकेशन्स! जिथे मूलभूत सुविधाच नसतील तिथे वाचनालये, बाग – बगिचे, खेळांचे क्रीडांगण इत्यादी तर लोकांच्या कल्पनेत देखील नसतात!
एक सृजनशील, संवेदनशील, मानवीय मूल्यांनी समृध्द असा समाज घडवण्यासाठी गरजेचे आहे शिक्षण, स्वास्थ्य, रोजगार ह्या मुद्द्यांवर व्यापक कष्टकरी जनतेला संघटित करणे! हे प्रश्न सुटतील तेव्हाच नशाखोरी, गरीबी, दयनियतेच्या काळोख्या गर्तेतून बाहेर येणे शक्य आहे! एक सुदृढ, समता मूलक समाज बनवणे शक्य आहे! ही एक लांब पल्ल्याची लढाई आहे पण ती उभी करण्यासाठी सद्यपरिस्थितीत शक्य ते सर्व लहान – मोठे मार्ग अवलंबणे गरजेचे आहे.
अनेक सृजनशील हातांतील सृजनशीलता फुलण्या आधीच चिरडली जाऊ नये म्हणून आपल्याला त्या हातांपर्यंत पोहचणे गरजेचे आहे. भांडवली चंगळवादी, भोगवादी संस्कृतीरुपी अजगराच्या विळख्यात अडकलेल्या समाजाला सोडवण्यासाठी त्या लाखो कल्पक हृदयापर्यंत आपल्याला पोहचावे लागेल जी ह्या समाज परिवर्तनाच्या लढाईतील लढवय्ये बनतील!
ह्याच पार्श्वभूमीवर नौजवान भारत सभा वस्त्या – वस्त्यांमध्ये फिरते वाचनालय चालवते ज्यात उत्तम, दर्जेदार, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार – प्रसार करणारे साहित्य लहान – थोरांसाठी नेले जाते. एका पिशवीत पुस्तके न्यायची, वस्तीत दारोदारी जाऊन ती द्यायची आणि आठवड्याभराने पुन्हा पुस्तके बदलवून द्यायची असे फिरत्या वाचनालयाचे एकंदरीत स्वरूप असते. वाचनालयापर्यंत पोहचू न शकणाऱ्या वर्गासाठी फिरते वाचनालय स्वतः त्यांच्यापर्यंत पोहचते!
समाज परिवर्तनाच्या लढाईत सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या सर्वांनी ह्या फिरत्या वाचनालयात आपला एक वाटा उचलावा. तुम्ही खालील प्रकारे सहभागी होऊ शकता :-
1. फिरत्या वाचनालयासाठी मुख्यत्वे हिंदी, उर्दू, मराठी, इंग्रजी, तमिळ भाषांमधील संवेदनशील, वैज्ञानिक बाल साहित्य व इतर साहित्य देऊन.
2. फिरते वाचनालय चालवण्यासाठी आठवड्यातून किमान 2 – 3 तासाचा स्वतःचा वेळ देऊन.
3. फिरत्या वाचनालयासाठी आर्थिक सहयोग देऊन.
आर्थिक सहयोगासाठी तपशील :-
Name: AVINASH KUMAR
Account No. : 309011284569
IFSC Code: RATN0000284
Branch: AMBEDKAR GARDEN
Bank: RBL Bank
Or to Gpay –
Google Pay No. – 8826265960
नौजवान भारत सभा सर्वांना एका समतामूलक, न्याय्य, सृजनशील, संवेदनशील समाज बनवण्याच्या संघर्षाचा वाटेकरी होण्याचे आवाहन करते.
फिरत्या वाचनालयासाठी सहयोग करण्यासाठी संपर्क :-
