क्रांतिकारी शहीद राजगुरू यांच्या जन्मदिवसानिमित्त नौजवान भारत सभेतर्फे कार्यक्रम आयोजित केला गेला.

24 ऑगस्टला सुपर बिबवेवाडी येथे क्रांतिकारी शहीद राजगुरू यांच्या जन्मदिवसानिमित्त नौजवान भारत सभेतर्फे कार्यक्रम आयोजित केला गेला. कार्यक्रमाची सुरुवात ‘आ रे नौजवान तेरी बेड़ीयाँ रही हैं टूट’ ह्या क्रांतिकारी गीताने झाली.
त्यानंतर साथी सुस्मितने शिवराम राजगुरू यांचा क्रांतिकारी चळवळीतील जीवनपट मांडला. शहीद भगतसिंग, शहीद राजगुरू, शहीद सुखदेव वयाच्या तरुणपणात एका सुंदर समाजाचं स्वप्नं बघत हसत हसत फासावर गेले. भगतसिंहाचे स्वप्न होते की अशी समाजव्यवस्था निर्माण झाली पाहिजे जिथे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीचे शोषण होणार नाही, जिथे नफ्यावर आधारित उत्पादन व्यवस्था नसून मानवकेंद्री व्यवस्था असेल. त्यांचे जे स्वप्न आज अधुरे राहिले आहे ते पूर्ण करायची जबाबदारी सर्व तरुणांची आहे. आजच्या पाठ्यपुस्तकातून क्रांतिकारकांचा खरा इतिहास लपवला जातो. त्यामुळे अशा कार्यक्रमांचे महत्व आहे असे मत मांडले.
त्यानंतर साथी सिद्धार्थने क्रांतिकारकांचे योगदान आणि आजची भारतातील तरुणांची परिस्थिती याविषयी आपले मत व्यक्त केले. आजच्या शिक्षणाचे होणारे बाजारीकरण, सरकारी शाळांमधील शिक्षणाचा घसरणारा दर्जा याचा सगळ्यात जास्त सर्वसामान्य जनतेला फटका बसत आहे कारण खाजगी शाळांची फिस कामगार कष्टकरी जनतेला भरणे शक्य होत नसल्याने कामगार कष्टकरी वर्गातून येणारे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहतात. नुकतेच मोदी सरकारने एनसीईआरटीचा अभ्यासक्रम बदलून स्वातंत्र्य चळवळीचा खरा इतिहास हा येणाऱ्या नवीन पिढीपासून लपवण्यासाठी जोरदार प्रयत्न चालवले आहेत. यातूनच आरएसएस प्रणित जे लोक स्वातंत्र्यचळवळीपासून अलिप्त होते त्यांनाच आज देशभक्त म्हणून दाखवण्याचा प्रयत्न चालू आहे. शिक्षणाचे भगवेकरण मोठ्या प्रमाणात चालवले आहे. यानंतर आजच्या आरोग्य व्यवस्थेविषयी बोलताना आरोग्य व्यवस्थेमध्ये झालेले खाजगीकरण तसेच नफाकेंद्रित आरोग्य व्यवस्थेची पोल खोल केली. सरकारी रुग्णालयांची परिस्थिती अतिशय वाईट असून, साध्या तापाच्या गोळ्या सुद्धा खाजगी दुकांनामधून विकत घ्याव्या लागतात. त्यामुळे प्रत्येकाला मोफत समान आरोग्य सुविधा मिळण्यासाठी संघर्ष करण्याची गरज आहे. यानंतर देशाचे वास्तव मांडताना जेव्हा एकीकडे सरकार स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत होते त्याच वेळी बिल्कीस बानोच्या बलात्काऱ्यांना कैदेतून सोडून देण्यात आले. 2002 मधील गोध्रा हत्याकांडावेळी बिल्कीस बानो या महिलेवर बलात्कार केला गेला. तिच्या 3 वर्षाच्या मुलिसहित तिच्या कुटुंबीयांना मारून टाकण्यात आले. ज्यांनी हे कृत्य केले त्यांना गुजरात सरकारने कैदेतून सोडले तसेच त्यांचा हार, पेढे देऊन सत्कार केला. तसेच राजस्थान येथे जालोरमधील इंद्र मेघवाल ह्या 9 वर्षाच्या बालकाला एका स्वतःला उच्च जातीच्या समजणाऱ्या शिक्षकाने त्याच्या मटक्यातील पाणी पिल्यामुळे मारून टाकले. अशा प्रकारे आजच्या व्यवस्थेचं आणि तरुणांच्या परिस्थितीचे भीषण वास्तव साथी सिद्धार्थने मांडले.
त्यानंतर साथी नेहाने नौजवान भारत सभाची भूमिका आणि आजचे वस्त्यांमधील वास्तव मांडले. यामध्ये वस्त्यांमध्ये होणारे बलात्कार, तरुणांची व्यसनाधीनता यावर आपले मत मांडले. आज जेव्हा आपण फासिस्ट काळात जगत आहोत तेव्हा तरुणांनी प्रतिगामी शक्तींची चाल ओळखली पाहिजे ज्या आपल्याला जाती धर्माच्या झगड्यात अडकवतात आणि खऱ्या मुद्द्यांपासून दूर नेण्याचे काम करतात. वस्तीतसुद्धा भांडवली पक्ष आणि आरएसएस सारख्या संघटना कामगार कष्टकरी वर्गातील तरुणांचा कशा प्रकारे धार्मिक, जातीय तेढ वाढवण्यासाठी वापर करून घेतात हे मांडले. आज तरुणांनी शिक्षण, बेरोजगारी या मुद्द्यांभोवती संघटित होण्याची गरज असल्याचे साथी नेहाने मांडले.
यानंतर संघर्ष की राहपर अब चलना है साथियों ‘ हे क्रांतिकारी गीत सादर करण्यात आले.
कार्यक्रमाचा शेवट इंकलाब झिंदाबाद! फासिवाद मुर्दाबाद! साम्राज्यवाद मुर्दाबाद! या घोषणांनी झाला.

Related posts

Leave a Comment

5 + ten =