शहीद भगत सिंह वाचनालयाच्या साप्ताहिक कार्यक्रमात विजय तेंडुलकर लिखित “घाशीराम कोतवाल” हा चित्रपट पाहून त्यावर चर्चा करण्यात आली. हा चित्रपट तेंडुलकरांच्या याच नावाच्या नाटकाचे रूपांतरण आहे. हा चित्रपट ह्याच्या निर्मितीपासून ते चित्रपट विषयाच्या मांडणी पर्यंत एक अनोखा प्रयोग होता. FTII च्या विद्यार्थ्यांनी ‘युक्त’ नावाची collective बनवून या चित्रपटाची निर्मिती केली होती.
चित्रपटाबद्दल चर्चा करताना साथी जयने मांडले की, “चित्रपट आणि नाटकाच्या मांडणीमध्ये बराच फरक आहे. नाटकामध्ये घाशीराम या व्यक्तिरेखेचा उदय आणि अस्त दाखविला आहे. चित्रपटामध्ये घाशीरामचे पात्र तात्कालीन सामाजिक, राजकीय पार्श्वभूमीवरचे एक लहान पात्र म्हणून पुढे येते. चित्रपटात पेशवेकालीन समाजातील जातिव्यवस्था, दलित कामगारांना करावी लागत असलेली सक्तीची वेठबिगारी याचे चित्रण येते.”
साथी रवीने मांडले की, “त्या काळी मराठा साम्राज्यात एकीकडे सुरू असलेला सत्ता संघर्ष, दुसरीकडे ब्रिटिशांचा होत असलेल्या उदयाच्या पार्श्वभूमीवर नाना फडणवीस घाशीरामला पुण्याचा कोतवाल बनवतो, त्याचा जनतेच्या दमनासाठी कसा वापर करतो हे दाखविले आहे. जेव्हा घाशीरामला ब्राम्हणांकडून विरोध खूप वाढतो, तेव्हा नाना घाशीरामचा मृत्यू घडवून आणतो. घाशीराम फक्त नाना फडणवीसाचा एक प्यादा असतो, खरी सूत्रे नाना फडणविसाच्याच हातात असतात.”
साथी सुस्मितने मांडले की, “चित्रपटात दाखवलेल्या घटना जरी इतिहासातल्या असल्या तरी चित्रपट सध्याच्या राजकीय, सामाजिक परिस्थितीवर सुद्धा भाष्य करतो. चित्रपटात दाखवले गेले आहे की कशाप्रकारे जेव्हा जनता हलाखीच्या परिस्थितीत राहत होती, तेव्हा सत्ताधारी नाच गाण्यांमध्ये मग्न होते. आज सुद्धा आपण बघू शकतो की सत्ताधारी कशाप्रकारे स्वतःच्या स्वार्थासाठी घाशीराम सारखी प्यादी उभी करतात. चित्रपटातसुद्धा एका दृश्यामध्ये हे प्रतीत होते की हा चित्रपट फक्त इतिहासाबद्दल न बोलता या समाजात सतत निर्माण होणाऱ्या घाशीरामकडे आपले लक्ष वेधत आहे.”
साथी प्रविणने मांडले की, “मराठा साम्राज्याच्या अस्तानंतर ब्रिटिशांनी त्यांना अनुकूल असलेले कायदे बनवायला आणि लागू करायला सुरुवात केली. ब्रिटिशांनी जमिनीची रीतसर मोजणी करून नवीन जमीन महसूल प्रणाली लागू केली. जुनी सरंजामशाही पद्धत जाऊन भांडवलशाही येण्याचा तो काळ होता. चित्रपटामध्ये मराठे आणि ब्रिटिश यांच्यातील संघर्ष प्रभावीपणे दाखवला आहे.”
‘घाशीराम कोतवाल’ सारखे चित्रपट जे सामाजिक, राजकीय, आर्थिक परिस्थितीबद्दल भाष्य करत असतानाच नावीन्यपूर्ण पद्धतीने मांडणी करतात, अशा चित्रपटांचा सद्यःस्थितीत दुष्काळ पडला आहे. सध्या निर्माण होणारे चित्रपट हे निवळ पैसे कमावण्यासाठी बनवले जातात आणि जनता सुद्धा निव्वळ मनोरंजनासाठी डोके बाजूला ठेवून असे चित्रपट बघते. असे चित्रपट आज बनले गेले पाहिजेत जे आजच्या समाजाचे वास्तव मांडतील, जे व्यवस्थेतील शोषणाचा पर्दाफाश करतील आणि आपल्याला एका समतामुलक समाजाच्या निर्मितीसाठी जनतेला प्रेरित करतील, ज्या समाजाचे स्वप्न शहीद भगतसिंह यांनी पहिले होते.
नौजवान भारत सभा नियमितपणे देशातील महत्त्वाच्या घडामोडींवर चर्चा किंवा चित्रपट बघण्याचे आयोजन करत असते. तुम्ही सुद्धा यात सामील होऊ शकता.
संपर्क – रवि 8956840785
