साथींनो! एकोणवीस वर्षाच्या वयात शहीद होणारे गदर पार्टीचे नायक करतार सिंह सराभा यांचा 24 मे हा जन्मदिवस आहे. करतार सिंह सराभा यांचा जन्म 24 मे 1896 रोजी पंजाबच्या लुधियाना जिल्ह्यातील सराभा गावात झाला होता. लुधियाना येथून मॅट्रिक पास केल्यानंतर इंजिनिअरिंगचा अभ्यास करण्यासाठी ते सॅन फ्रान्सिस्को, अमेरिका येथे गेले होते.
अमेरिकेमध्ये लाला लाला हरदयाल, मुहम्मद बरकतउल्ला, सोहन सिंह भकना इत्यादी देशप्रेमींनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ‘हिंदी असोसिएशन ऑफ पॅसिफिक कोस्ट’ नावाच्या पार्टीची स्थापना केली होती. पार्टीद्वारे ‘हिंदुस्तान गदर’ नावाचे वृत्तपत्र काढले जात होते, त्यामुळे पार्टी गदर पार्टीच्या नावाने ओळखली जाऊ लागली. करतार सिंह सराभा सुद्धा तिथे आंदोलनासोबत जोडले गेले. अतिशय कमी वयातच करतार सिंह सराभा यांनी आपल्या आश्चर्यकारक संघटन क्षमतेचा परिचय दिला होता. त्यामुळे गदरच्या पंजाबी आवृत्तीच्या प्रकाशनाची जबाबदारी करतार सिंह सराभा यांच्यावर सोपवली गेली होती.
1914 साली गदर आंदोलनाशी संबंधित कामागाटमारू जहाजावर असलेल्या प्रवाशांचे इंग्रजांनी दमन केले. पुढे जाऊन गदर आंदोलनकर्त्यांनी भारतामध्ये सशस्त्र विद्रोह करण्याची योजना बनवली. त्याकरिता त्यांनी कार्यकर्ते आणि हत्यारे भारतात पाठवणे सुरू केले. परंतु किरपाल सिंहाच्या गद्दारी मुळे विद्रोह सुरू होण्याआधीच इंग्रजांना सुगावा लागला आणि त्यांनी वीरपुत्रांची धरपकड सुरू केली. करतार सिंह सराभा सहित अनेक गदर कार्यकर्ते अटक केले गेले. आपल्या खटल्यामध्ये 19 वर्षीय करतार सिंह सराभा यांनी थोडेही न डगमगता छातीठोकपणे सांगितले की त्यांनी साम्राज्यवादाविरुद्ध विद्रोह केला आहे आणि अशी आग भडकावली आहे जी त्यांच्या मृत्यूनंतर सुद्धा विझणार नाही. इंग्रज न्यायाधीश आश्चर्याने बघत राहिले होते. करतार सिंहांचे आजोबा इंग्रजांद्वारे त्यांना इतक्या कमी वयात फाशी दिल्या गेल्यामुळे खूप दुःखी होते. जेव्हा करतार सिंह तुरुंगात आपल्या आजोबांना भेटले तेव्हा त्यांनी आजोबांना समजावले की ते खाटेवर म्हातारे होऊन सडत-सडत मरू इच्छित नाही, हा मृत्यू त्या मृत्यूपेक्षा हजारपटीने चांगला आहे.
गदर आंदोलनादरम्यान 200 पेक्षा जास्त लोकांनी बलिदान दिले तसेच अनेकांना इंग्रज सरकारने तुरुंगात बंद ठेवले. 16 नोव्हेंबरला करतार सिंह सराभा, महाराष्ट्राचे गणेश विष्णू पिंगळे आणि इतर पाच गदर आंदोलनकर्त्यांना फाशी दिली गेली.
शहीद करतार सिंह सराभा आणि गदर पार्टीच्या क्रांतिकारकांचा वारसा धर्मनिरपेक्षता आणि आंतरराष्ट्रीयतावादाचा वारसा आहे. गदर वर्तमानपत्राने हिंदू व मुस्लीम दोघांनाही आवाहन केले की त्यांनी आर्थिक मुद्द्यांवर जास्त लक्ष द्यावे कारण त्याचा दोन्हींच्या जीवनावर एक सारखा प्रभाव पडतो. हिंदू आणि मुसलमान दोघेही प्लेगमुळे मरत आहेत. दुष्काळ पडल्यावर दोघेही अन्नापासून वंचित राहतात. पगारासाठी जोर जबरदस्ती दोन्हींवरही केली जाते आणि दोघांनाही जास्त दराने भूमी कर आणि पाणी कर द्यावा लागतो. प्रश्न हिंदू विरुद्ध मुसलमान हा नाही तर भारतीय विरुद्ध इंग्रज शासक हा आहे. हिंदू मुस्लिम एकता एवढी मजबूत बनवली गेली पाहिजे की कोणीच त्याला तोडू शकणार नाही.
गदर पार्टीचे क्रांतिकारी सर्व देशांच्या स्वातंत्र्याच्या बाजूने होते. गदर वर्तमानपत्राच्या लेखांमध्ये आणि लाला हरदयाल इत्यादी क्रांतिकारकांच्या भाषणांमध्ये हे म्हटले जायचे की ते त्या प्रत्येक देशात क्रांती इच्छितात जिथे गुलामी आणि शोषण अस्तित्वात आहे.
आज आपल्या देशात सत्तेत बसलेल्या धर्मांध फॅसिस्ट शक्ती धर्मनिरपेक्षता आणि आंतरराष्ट्रीयतावादाच्या दोन्ही आदर्शांना पायदळी तुडवत आहे आणि धर्मांधता व अंधराष्ट्रवादाचा आसरा घेऊन देशातील सामान्य कामगार कष्टकरी जनतेला भांडवलाच्या गुलामी मध्ये ढकलत आहेत. संपूर्ण समाजामध्ये फॅसिस्ट भाजपा सरकार आणि संघ परिवाराद्वारे पसरवल्या गेलेल्या द्वेषाच्या आगीत धार्मिक दंगे आणि मॉब लिंचींग सारख्या घटना घडत आहेत. कष्टकऱ्यांच्या हक्क अधिकारांवर हल्ला करत श्रम कायद्यांमध्ये बदल केले जात आहेत. जनतेच्या बाजूने आवाज उठवणाऱ्या राजकीय-सामाजिक कार्यकर्त्यांना आणि बुद्धीजीवींना काळ्या कायद्यांद्वारे तुरुंगात बंद केले जात आहे. स्वातंत्र्याची सात दशके ओरडून-ओरडून सांगत आहेत की करतार सिंह सराभा सारख्या क्रांतिकारकांचे स्वप्न अजूनही अपूर्ण आहे.
करतार सिंह सराभा यांच्या जन्मदिवसानिमित्ताने आम्ही त्यांचे आदर्श आणि विचारांपासून प्रेरणा घेऊन त्यांच्या स्वप्नातील समाजाच्या निर्मितीच्या संकल्पाचे स्मरण करत आहोत आणि देशातील न्यायप्रिय व वीर तरुणांना आवाहन करत आहोत की या लुटीवर आधारित संरचनेला उघडून फेकून एका समतामूलक समाजाच्या स्थापनेसाठी खांद्याला खांदा लावून पुढे जावे.
