🟥शहीद स्मृती संकल्प अभियान अंतर्गत वस्तीतील तरुणांसोबत बैठक🟥
19 मार्च रोजी संध्याकाळी नौजवान भारत सभेतर्फे पुणे शहरात वस्तीतील तरुणांसोबत बैठक झाली. ह्या बैठकीमध्ये शहीद भगतसिंहांचे विचार आणि आजच्या संदर्भात त्याची प्रासंगिकता यावर चर्चा झाली. त्यामध्ये सुरुवातीला साथी सुस्मित यांनी भगतसिहांच्या राजकीय कार्यावर प्रकाश टाकत त्याची आजच्या काळात प्रासंगिकता काय आहे आणि त्यासोबत नौजवान भारत सभेची भूमिका काय आहे हे मांडले. यानंतर बैठकीला उपस्थित सर्वांनी सध्याच्या कष्टकरी जनतेच्या परिस्थितीवर भाष्य केले.संतोष यांनी आपले कामाचे अनुभव आणि मालक व ठेकेदारांसोबत चालणारा संघर्ष यांची उदाहरणे दिली, त्यामधून कामगारांचे बांधकाम क्षेत्रात शोषण कसे होते हे त्यांच्या बोलण्यातून खूप उघडपणे स्पष्ट होत होते. त्यासोबतच हे शोषण थांबले पाहिजे, कामगारांच्या जीवनात परिवर्तन झाले पाहिजे, असे त्यांच्या बोलण्यातून आले. रवी यांनी आजच्या बेरोजगारीने देशातील युवक त्रस्त आहेत, उच्च शिक्षण घेऊनही रोजगार मिळत नाही, महागाई आकाशाला भिडली आहे आणि यामध्ये घर चालवणे खूपच अवघड होऊन बसले आहे, असे मांडले. आपण सर्व युवकांनी संघर्षरत होत कामगार-कष्टकऱ्यांच्या संघर्षाशी आपला संघर्ष जोडून घेतला पाहिजे, संघटित होऊन आपण लढले पाहिजे, कोणीही एकटे-एकटे बिल्डर, मालक, ठेकेदार यांच्याशी प्रखर संघर्ष चालवू शकत नाहीत त्यामुळे आज एकत्रित येऊन संघर्ष करण्याची गरज आहे हे मांडण्यात आले. साथी सिद्धार्थने कामाच्या ठिकाणी माणसाला यंत्राप्रमाणे वागवले जाते आणि त्याच्या कल्पक बुद्धीला मारण्याचे काम केले जाते, असे वक्तव केले. प्रत्येक ठिकाणी कमीत-कमी पगारावर लोकांना कसे राबवता येईल यासाठी सातत्याने मालकांकडून प्रयत्न केले जातात. त्यासोबतच साथी सुस्मितने मांडले की एवढाच पगार दिला जातो जेवढा आज काम करून तुम्ही उद्या कामावर येऊ शकाल आणि काम करू शकाल हे आजच्या ह्या भांडवली व्यवस्थेचे वास्तव आहे आणि ही व्यवस्था नफ्यासाठी चालते हे भयाण वास्तव आपल्याला नाकारता येणार नाही. ह्या बैठकीला वस्तीतील युवकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला आणि वस्तीतील युवकांनी नौजवान भारत सभेचे सदस्य होण्यासाठी तीव्र इच्छा व्यक्त केली आणि भगतसिंहांचे आणि त्यांच्या साथींचे जे स्वप्न अपुरे राहिले आहे ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुढे येण्याच्या ग्वाही सोबत बैठकीची सांगता झाली.
