स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या युवकांसाठी इकडे आड तिकडे विहीर!! तलाठी भरतीच्या घोटाळ्याची चौकशी करून सर्व दोषींवर कारवाई झालीच पाहिजे!

तलाठी भरतीच्या घोटाळ्याची चौकशी करून सर्व दोषींवर कारवाई झालीच पाहिजे!
सरकारी भरतीच्या सर्व परीक्षांचे शुल्क रद्द करा!
एकीकडे जागा भरतीमध्ये घोटाळे आणि दुसरीकडे कंत्राटीकरणाची लटकती तलवार!
स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या युवकांसाठी इकडे आड तिकडे विहीर!!
सरकारी पदांच्या भरतीमधील घोटाळ्यांच्या विरोधातील युवकांच्या आंदोलनाला ‘नौजवान भारत सभा’चे पूर्ण समर्थन!!

मित्र-मैत्रिणींनो आणि साथींनो!

म्हाडाच्या भरतीमधील प्रश्नपत्रिका फूटीचे प्रकरण, आरोग्य विभागातील पदांच्या भरतीमध्ये आणि शिक्षकांच्या भरतीमध्ये झालेल्या घोटाळ्यानंतर आता महाराष्ट्र सरकारच्या तलाठी भरतीमधील घोटाळे समोर येऊ लागले आहेत. एका एका जागेसाठी हजारांच्या संख्येने स्पर्धा करणाऱ्या तरुणांना आता निवड प्रक्रियेतील भ्रष्टाचारांना आणि गोंधळांना तोंड द्यावे लागत आहे. एकीकडे कमी होत चाललेल्या सरकारी जागा आणि दुसरीकडे परीक्षा प्रक्रियेतील मनमानी कारभाराने परिक्षार्थ्यांच्या जीवनाची होरपळ चालवली आहे.

महाराष्ट्र सरकारने तलाठी पदाच्या 4793 जागांच्या भरतीसाठी जाहिरात काढून 2023 च्या ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात परीक्षा घेतल्या, ज्याला अर्ज करणाऱ्यांची संख्या होती तब्बल साडे अकरा लाख! सन्मानजनक रोजगार मिळण्याचे सर्व दरवाजे बंद झालेल्या कामगार-कष्टकरी वर्गातून येणाऱ्या लाखो तरुणांच्या अपेक्षा या परीक्षेच्या निकालावर अवलंबून होत्या. तलाठी परीक्षेचा अर्ज भरण्यापासून ते निकाल लागेपर्यंतच्या प्रक्रियेत अनेक घोळ समोर आले आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे भरती प्रक्रिया राबवली जाते तेव्हा 296/- रुपये परीक्षा शुल्क आकारले जाते; परंतु टीसीएस कंपनीने 900/- आणि 1000/- रुपये शुल्क आकारले. परीक्षा देतानासुद्धा अनेक युवकांना तांत्रिक बिघाडाचा सामना करावा लागला. अनेक केंद्रांवर तर 2 तास उशिराने परीक्षा सुरू करण्यात आली. समोर आलेल्या माहितीनुसार जवळपास 25% युवकांना परीक्षा केंद्र त्यांनी केलेल्या तीन निवडींपेक्षा वेगळे आले. लाखो परिक्षार्थ्यांना त्यांच्या निवासस्थानापासून शेकडो किलोमीटर लांब जाऊन परीक्षा द्यावी लागली. परीक्षेच्या पहिल्याच दिवशी प्रश्नपत्रिका फुटीची बातमी समोर आली. अश्या अनेक अडचणींचा सामना करून परीक्षा दिल्यानंतरसुद्धा नुकत्याच लागलेल्या निकालाने मोहभंग झाला आहे. परीक्षा घेणाऱ्या टाटाच्या टीसीएस कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या नातेवाइकांची, ज्यांचा स्पर्धा परीक्षेसोबत काहीही संबंध नाही, त्यांची नावे उत्तीर्ण उमेदवारांच्या यादीमध्ये शीर्षस्थानी आढळली आहेत. परीक्षेत एकूण 114 प्रश्न चुकीचे होते आणि 147 प्रश्नांमध्ये दुरुस्त्या करण्यात आल्या. परीक्षा 57 सत्रांमध्ये झाल्यामुळे निकाल लावताना गुणांचे सामान्यीकरण करण्यात आले, म्हणजेच प्रश्नपत्रिकेच्या काठिण्य पातळीनुसार गुण कमी-जास्त करण्यात आले. अशा सामान्यीकरणानंतर मूळ गुणांमध्ये 5-6 गुणांचा फरक येणे अपेक्षित असते; परंतु काही परिक्षार्थ्यांच्या गुणांमध्ये 30 ने तफावत आढळली आहे.

मेहनतीने कमवलेला पैसा आणि ऐन तारुण्यातील उमेदीची 7-8 वर्ष सरकारी नोकरीच्या आशेत अभ्यास करण्यात खर्च केल्यानंतरसुद्धा शेवटी तरुणांच्या हातात मिळते काय तर वाढते कंत्राटीकरण आणि उरल्या-सुरल्या जागांच्या भरतीमधील घोटाळे. स्पर्धा परीक्षेतील अपयशाने कित्येक तरुण निराशेच्या गर्तेत खेचले जातात आणि आपले आयुष्य संपवतात. टीसीएस सारख्या कंपन्यांच्या हातात भरती प्रक्रिया सोपवून परीक्षापद्धतीत सुसूत्रता, प्रश्नपत्रिकेची निर्मिती, परीक्षा देण्याच्या उत्तम सुविधा आणि वेळेत निकाल या जबाबदाऱ्यांतून सरकारने काढता पाय घेतला आहे. या आधी म्हाडा भरती प्रक्रिया राबवणारी जी. ए. सॉफ्टवेअर टेक्नोलॉजीज, आरोग्य भरतीतील न्यासा कम्युनिकेशन्स प्रा. लि. या कंपन्यांकडून झालेले घोटाळे समोर आलेले असताना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने स्वतः तलाठी भरती प्रक्रिया राबवणे अपेक्षित होते. परंतु आत्तापर्यंत सत्तेत आलेल्या प्रत्येक भांडवली पक्षाने खाजगीकरणाचा घाट घातला आहे. त्यामुळे, ‘टीसीएस’ सारख्या कंपन्यांच्या मालकांना नफा मिळवून देणे हेच या पक्षांचे काम बनले आहे.

बेरोजगारीचा फास दिवसेंदिवस आणखी आवळला जात असताना, हजारो तरुण व विद्यार्थी तणाव व भविष्याच्या असुरक्षिततेपायी आत्महत्येला जवळ करत असताना भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना ई. विविध पक्षांची भांडवली सरकारे मात्र त्यांच्या मोठमोठ्या कॉर्पोरेट मित्रांना, उद्योगपतींना सवलती देण्यात मग्न आहेत. हे सर्व पक्ष दिखाव्यापुरते अशा मुद्यांवर आंदोलने करतात, परंतु या सर्वांनी सत्तेत असताना हीच धोरणे राबवली आहेत, कारण त्यांच्या बोलवत्या धन्यांची म्हणजे भांडवलदार वर्गाची तीच इच्छा आहे. त्यांच्या फायद्यासाठी कंत्राटीकरण, खाजगीकरण पुढे रेटले जात आहे आणि कोट्यवधी तरुणांच्या आयुष्याशी खेळ केला जात आहे. म्हणूनच सध्या सुरू असलेले आंदोलन हे विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांना धरून आहे. पण हे आंदोलन फक्त तलाठी भरतीमधील घोट्याळ्यापुरते मर्यादित नसले पाहिजे. सध्या वाढत असलेली बेरोजगारी, सरकारी नोकऱ्यांचे खाजगीकरण आणि कंत्राटीकरण हे प्रश्न आज सर्वच तरुणांसमोर आ वासून उभे आहेत. म्हणूनच सध्या सुरू असलेल्या आंदोलनाला व्यापक करत सर्व विद्यार्थी तरुणांनी आज एकत्र येणे गरजेचे आहे. मालक वर्गासाठी चालत असलेल्या या भांडवली सत्तेचे खरे चरित्र ओळखणे आज विद्यार्थी युवकांसाठी सर्वात महत्त्वाचे आहे. आपले खरे हित लक्षात घेऊन जाती-धर्माचे सगळे भेद बाजूला सारत विद्यार्थी-युवकांनी आज सर्वांसाठी शिक्षण व रोजगाराच्या अधिकाराच्या योग्य मागणीभोवती संघटित होणे आज काळाची गरज आहे, अन्यथा विद्यार्थी तरुणांचे जीव भांडवली पक्षांच्या राजकारणाला बळी पडत राहतील.

मागण्या:

1) तलाठी भरतीच्या घोटाळ्याची चौकशी करून सर्व दोषींवर कारवाई करा.

2) तलाठी भरतीची परिक्षा पूर्णपणे सरकारी खर्चाने पुन्हा करून तात्काळ भरती करा.

3) सर्व सरकारी भरती प्रक्रिया सरकारी यंत्रणेद्वारे राबवा. खाजगी कंपन्यांना युवकांचे भवितव्य ठरवण्याचे अधिकार देणे बंद करा.

4) सरकारी भरतीच्या सर्व परीक्षांचे शुल्क रद्द करा.

5) परीक्षार्थ्यांना परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी लागणारा खर्च सरकारने दिला पाहिजे.

4) कंत्राटीकरण पूर्णपणे रद्द करून सर्व रिक्त पदांवर तात्काळ भरती सुरू करा.

6) बेरोजगारी भत्ता रु. 10,000 लागू करा.

7) भगतसिंह राष्ट्रीय़ रोजगार हमी कायदा पारित करा. रोजगाराचा अधिकार मूलभूत अधिकार बनलाच पाहिजे!

नौजवान भारत सभा, महाराष्ट्र

संपर्क: रविशंकर 8956840785

सुस्मित ‪83298 69421

Related posts

Leave a Comment

two × 4 =