शहीद भगतसिंहाच्या जन्मदिवसा (28 सप्टेंबर) निमित्ताने नौजवान भारत सभेचे विशेष सदस्यता अभियान
नौजवान भारत सभेचे सदस्य बना! भगतसिंहाच्या स्वप्नांना साकार करा!
साथींनो,
कोणत्याही देशाला आणि समाजाला पुढे नेण्यामध्ये तरुणांचे खूप मोठे योगदान असते. तारुण्य हा माणसाच्या जीवनातील असा काळ असतो जेव्हा माणूस सर्वात जास्त मुक्त आणि सर्जनशील असतो. तो जीवनाच्या विविध पैलूंवर विचार करतो. आपल्या स्वप्नांना पंख जावून तो मुक्त आकाशात विहार करतो आणि आपल्या स्वप्नांना वास्तवात उतरवतो. मानवी इतिहास तरुणांच्या असंख्य बलिदानांची आणि वीरतेची कहाणी आहे. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात देखील अनेक युवकांनी बलिदान दिले. भगतसिंह, सुखदेव, राजगुरू ,अश्फाक उल्ला खान, राम प्रसाद बिस्मिल, राजेंद्र लाहिरी, रोशनसिंग व चंद्रशेखर आजाद यांच्यासारख्या अनेक तरुणांच्या बलिदानामुळे आपण गुलामीच्या बेड्या तोडू शकलो. यातील शहीद भगतसिंह हे केवळ शूर तरुणच नव्हे तर क्रांतिकारी विचारवंत देखील होते. त्यांनी तत्कालीन क्रांत्यांचा अभ्यास केला होता आणि फाशी जाण्याच्या तीन दिवस आधी, 20 मार्च 1931 ला, भगतसिंह ,सुखदेव आणि राजगुरू यांनी पंजाबच्या गव्हर्नरला लिहीले होते की “आम्ही हे सांगू इच्छितो की युद्ध सुरू झालेलं आहे आणि ही लढाई तोपर्यंत चालू राहील जोपर्यंत शक्तिशाली माणसं भारतीय जनता आणि श्रमिकांच्या उत्पन्नाच्या साधनांवर आपला एकाधिकार कायम ठेवतील. अशा व्यक्ती इंग्रज भांडवलदार आणि इंग्रज असोत की भारतीय असोत, त्यांनी आपापसात मिळून एक लूट चालूच ठेवली आहे. जरी फक्त भारतीय भांडवलदारांकडूनच निर्धनांचे रक्त शोषले जात असले तरी त्यामुळे या स्थितीत काहीही फरक पडत नाही.”
भगतसिंहांनी जेव्हा ब्रिटिशांच्या गुलामी विरुद्ध संघर्ष सुरू केला तेव्हा त्यांचे महत्वपूर्ण पाऊल होते, 1926 मध्ये नौजवान भारत सभेची स्थापना. त्यानंतर दोन वर्षांनी भगतसिंह आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी एच. एस. आर. ए.( हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन) नावाच्या नवीन क्रांतिकारी संघटनेची स्थापना केली आणि स्पष्ट शब्दात घोषणा केली की—फक्त इंग्रजांची सत्ता उखडून टाकणे हे आमचे ध्येय नाही. फक्त इंग्रजांच्या जाण्यामुळे सामान्य जनतेच्या समस्या सुटणार नाहीत. सामान्य जनतेच्या समस्या तेव्हाच समाप्त होऊ शकतात जेव्हा भारतीय नफेखोरांनादेखील उखडून टाकले जाईल आणि अशा एका समतापूर्ण व्यवस्थेची निर्मिती केली जाईल जिथे एका माणसाकडून दुसऱ्या माणसाचे शोषण करणे अशक्य केले जाईल. काँग्रेस बाबत भगतसिंहांनी त्यावेळीच म्हटले होते की काँग्रेसी देशी नफेखोरांची पार्टी आहे, जी परदेशी लुटारूंसोबत सौदेबाजी करून स्वतःसाठी सत्ता मिळवू पाहते आहे. त्यांनी स्वातंत्र्याची व्याख्या, 90 टक्के लोकांच्या स्वातंत्र्याच्या रूपात, देशी-विदेशी सर्व प्रकारच्या भांडवलाकडून जनतेच्या शोषणाच्या अंताच्या रूपात केली होती आणि एका समतापूर्ण सामाजिक रचनेचे निर्माण करण्याला क्रांतीचे ध्येय ठरवले होते.
परंतु भगतसिंहांना शहीद होऊन 87 वर्षे झाल्यानंतर देखील परिस्थिती आज अशी आहे की जनतेच्या अश्रूंच्या सागरात मूठभर श्रीमंतांच्या चैनीचे मनोरे उभे आहेत. सांगण्यासाठी तर ही लोकशाही म्हणजे जनतेचे राज्य आहे, परंतू या लोकशाहीचा एक-एक स्तंभ जनतेच्या छातीत निर्दयपणे घुसलेला आहे. संसद विधानसभेच्या कामकाजांवर दरवर्षी अब्जावधी रुपये खर्च होतात परंतु पुढारी मंत्री तिथे एकमेकांवर चिखलफेक करतात, खुर्च्या मोडतात आणि जनतेच्या विरुद्ध धोरणे बनवतात. निवडणुकांची प्रक्रिया इतकी खर्चिक आहे की सामान्य माणूस निवडणूक लढण्याच्या विचारेदेखील करू शकत नाही. खासदार, आमदारांच्या निवडणूकांपासून सरपंचांच्या निवडणुकीपर्यंत पैसेवाल्यांचाच बोलबाला असतो. निवडणुका जाती धर्माची समीकरणे बांधून, धार्मिक दंगली भडकावून, खोटी आश्वासने देऊन, बूथ कब्जा करून, नफेखोर मीडीयाला हाती धरून लढवल्या जातात व जिंकल्या जातात. मोठे मोठे उद्योगपती आणि शेठजी आपल्या तिजोऱ्या त्या पक्षांसाठी खुल्या करतात जे पक्ष त्यांच्या हितासाठी काम करण्यात सर्वात जास्त सक्षम आहेत. म्हणजे निवडणुकीमध्ये कोणत्याही पक्ष जिंकला तरी जनतेच्या जीवनात काहीच फरक पडत नाही. जनतेसाठी निवडणुकांचा अर्थ एवढाच आहे की तिला नागनाथ चावणार की सापनाथ! आम्हाला हे दिसत नाही का की काँग्रेसच्या भ्रष्टाचाराला गांजलेल्या जनतेला ‘अच्छे दिन’ चे स्वप्न दाखवत सत्तेत आलेल्या मोदी सरकारने तर अंबानी अदानीची सेवा करण्यासाठी जनतेवर संकटांचा पाऊस पाडलाय. एका बाजूला नोटबंदी ,जीएसटी, महागाई द्वारे जनतेची आर्थिक लूट चालूच आहे तर दुसरीकडे हिंदुत्ववादी संघटना कधी गाईच्या नावाने तर कधी आणखी कुठल्या मुद्यावर दंगली भडकावत आहेत, मॉब-लिंचिंग करत आहेत.
इंग्रजांनी भारतीय जनतेला लुटण्यासाठी ज्या कायद्यांचा, शासन-प्रशासनाच्या यंत्रणेचा वापर केला होता त्या सर्वांना स्वातंत्र्यानंतर फक्त जसेच्या तसेच स्विकारले नाही, तर जनआंदोलने, तसेच जनतेच्या खऱ्या प्रतिनिधींच्या निर्दय दमनासाठी टाडा, पोटा, यु. ए. पी. ए. सारखे नवे काळे कायदे निर्माण करण्यात झाले—असे कारनामे तर इतिहासातही मिळत नाहीत. जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचे वास्तव हे आहे कि एक सामान्य माणूस पैसे आणि शिफारशीशिवाय पोलिसांत एफ.आय.आर. देखील नोंदवू शकत नाही. खालच्या कोर्टांचा नियम आहे की—ज्याच्याकडे पैसा, त्याला न्याय आणि उच्च व सर्वोच्च न्यायालयांची पायरी तर पैसे नसलेला चढूच शकत नाही. अख्ख्या देशात कामगार कायदे पायदळी तुडवून शेत-कारखान्यातील कष्टकऱ्यांची श्रमशक्ती लुटली जात आहे. उद्योगपती, पुढारी आणि श्रम विभागांचे अधिकारी यांच्या संगनमतामुळे कामगार कायदे अमलात सुद्धा येऊ शकत नाही. आता तर कामगार कायद्यात सुधारणा करण्याच्या बहाण्याने उरल्यासुरल्या कामगार कायद्यांना देखील नष्ट केले जात आहे, जेणेकरून कामगारांची श्रमशक्ती लुटण्यात उद्योगपतींना जरा देखील कायदेशीर अडचण येऊ नये. बाकी कष्टकऱ्यांच्या आंदोलनाला दडपण्यासाठी सत्तेची काठी नेहमीच सज्ज असते. खाण्यापिण्यापासून ऐषोआरामा पर्यंतच्या सर्व वस्तू निर्माण करणारे कामगार जनावरांसारखे हाडंतोड काम करून देखील कसेबसे आपले पोट भरतात. कष्टकरी जनतेने जर काही दिवसांसाठी आपले काम थांबवलं तर प्रत्येक गोष्ट ठप्प होईल. परंतु कष्टकऱ्यांंना आज कोणत्याही प्रकारची सुरक्षितता उपलब्ध नाही.
लोकशाहीचा चौथा खांब मानली गेलेली प्रसारमाध्यमे पूर्णत: मोठमोठ्या उद्योगपतीच्या नियंत्रणासाठी आहेत. लोकांनी आपल्या परिस्थितीबद्दल विचारच करू नये म्हणून ही माध्यमे ‘खा, प्या आणि ऐश करा’ च्या चंगळवादी संस्कृतीचे विष पसरवून समाजाच्या विचारशक्तीला कुंठीत करत आहेत. सर्व प्रकारच्या खोट्या जाहिराती, अश्लील फिल्म व गाण्यांचे कार्यक्रम, भ्रष्ट नेत्यांची प्रतिमा उजळवणे, संवेदनशील विषयांना खळबळजनक बनवून असे दाखवणे की ज्यामुळे लोकांमध्ये द्वेष पसरेल, यासाठी ही माध्यमे 24 तास कार्यरत असतात. ‘विकास’, ‘नेत्यांचे यश’, ‘अच्छे दिन’ वगैरे भ्रामक प्रचाराखाली जनतेचं दु:ख झाकून टाकले जात आहे .
इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळून 71वर्षे उलटल्यानंतर सुद्धा स्थिती अशी आहे की देशातले कोट्यवधी लोक महागाई, बेकारी, टाळेबंदी, कामगार कपात, लूट आणि भ्रष्टाचार यांचा मार भोगत आहे. शिक्षण, आरोग्य, पाणी, वीज या सारख्या मुलभूत सुविधा मिळवणे सुद्धा जनतेसाठी अधिकच कठीण झाले आहे. देशातल्या वरच्या 10 टक्के लोकांकडे देशाची 84 टक्के संपत्ती जमा झाली आहे, आणि दुसरीकडे खालच्या 60 टक्के लोकांकडे एकूण संपत्तीच्या फक्त 2 टक्के संपत्ती आहे. सर्वात वरच्या 22 भांडवलदारांच्या संपत्तीत दुप्पट-तिप्पट नव्हे तर 1,000 पट वाढ झाली आहे. दुसरीकडे दररोज हजारो मुले भूक आणि कुपोषणाने मरतात आणि सरकारी गोदामात धान्य सडत आहे. 84 कोटी पेक्षा जास्त लोक एका दिवसात 20 रुपयांपेक्षा जास्त खर्च करू शकत नाहीत. जवळपास 36 कोटी लोक झोपड्यांमध्ये-फुटपाथवर राहण्यासाठी मजबूर आहेत. मोदी सरकारने सत्तेत आल्याआल्या खाण्यापिण्याच्या सामानावरच्या सबसिडीत 1,000 कोटी रुपयांची आणि आरोग्य बजेटमध्ये 6,000 कोटी रुपयांची कपात केली, तर दुसरीकडे उद्योगपतींचे 1 लाख 44 हजार कोटीचे कर्ज माफ केलेय. जनतेचा पैसा श्रीमंतांवर खर्च केला जात आहे. जनतेवरच्या अप्रत्यक्ष करांमध्ये वाढ करण्यात येत आहे. पेट्रोल 90 रुपयांवर तर डीझेल 80 रुपयांवर पोहोचले आहे. चार वर्षात गॅस 400 रुपयांपासून 800 रुपयांवर पोचला आहे. सामान्य जनतेच्या ताटातून डाळ-भाजी देखील गायब होत आहे.
असं म्हटलं जातं की तरुण देशाचे भविष्य असतात. भारत देश सर्वात जास्त तरुण लोकसंख्यचा देश आहे पण इथे जवळपास 30 कोटी तरुण बेकारीचे धक्के खात आहेत. अशा क्रूर-मानवद्रोही काळात व्यापक सामान्य युवक जनतेसमोर जे गंभीर प्रश्न उभे आहेत ते म्हणजे सतत महागाई, दूर होत चाललेले शिक्षण आणि कमी होत जाणाऱ्या रोजगाराच्या संधी. सामान्य घरातील दहावी, बारावी, बी.ए., एम.ए., पी. एच. डी. केलेले तरुण साधी नोकरी मिळवण्यासाठी दारोदार भटकत आहेत. नोकरी मिळते तर ती कंत्राटी, जिथे कामगार कायदा लागूच होत नाही. तरुणांची एक मोठी संख्या कारखान्यांमध्ये स्वस्त-श्रम, रोजंदारी, कॉल सेंटर, छोटे दुकान, आणि नेटवर्क मार्केटींग मध्ये 10-12 तास काम केल्यानंतर जेमतेम 6,000ते 10,000 हजार कमावत आहे. नोकऱ्या सतत कमी होत आहेत. नुकतेच रेल्वेच्या 90,000 जागांसाठी तीन कोटी अर्ज आले होते. हे सर्व यामुळेही आहे की गावा-शहरांमध्ये शिक्षण, आरोग्य, परिवहनाच्या क्षेत्रातच असंख्य विकासकामे आज प्रलंबित आहेत. आपल्या देशात नैसर्गिक साधनांची काहीच कमतरता नाही. जर व्यवस्थेचे उद्देश नफा कमावणे नसेल तर आज कामाचे तास 6 किंवा 4 करता येतील. यामुळे ना केवळ सामान्य जनतेच्या सोयी वाढतील, तर बेरोजगारीच्या समस्येचे निराकरण शक्य होईल. परंतु बेकारी ही देशाच्या उद्योगपतींसाठी फायद्याची आहे कारण त्यामुळे त्यांना स्वस्त दरात श्रमशक्तीचे शोषण करण्याची संधी मिळते. हीच स्थिती शिक्षणाची देखील आहे. उच्च शिक्षणाची स्थिती आधीपासूनच वाईट होती आणि आता युजीसीच्या बजेटमध्ये 55 टक्के कपात केल्यामुळे उच्चशिक्षणाचे दिवाळे निघाले आहे. याच सोबत हवेत तरंगत असलेल्या अंबानींच्या जिओ इन्स्टिट्यूटला ‘इन्स्टिट्यूट ऑफ एमिनेन्स’ चा खिताब देण्यात आला आणि 1,000 कोटी रुपये देण्याचाही प्रस्ताव देण्यात आला. दुसरीकडे सरकारी शाळांसाठी पैसे मागितल्यावर शिक्षण मंत्री प्रकाश जावडेकर म्हणतात की सरकारी शाळांनी हातात भिकेचा वाडगा घेऊन भीक मागू नये. हे स्पष्ट आहे की ते ज्या शाळांबद्दल बोलत आहेत, त्या शाळांमध्ये सामान्य कष्टकऱ्यांची मुलं शिकतात. कमी होत जाणाऱ्या जागा आणि वाढत जाणारी फी यामुळे गरीब आणि सर्वसाधारण मध्यमवर्गीय तरुण उच्च शिक्षणाच्या परिघातून बाहेर फेकले जात आहेत. त्यांच्यासाठी डॉक्टर आणि इंजिनिअर होण्याचे स्वप्न तर खूपच दूरची बात आहे. ज्या शिक्षणातून रोजगार मिळण्याची शक्यता आहे असे शिक्षण केवळ मूठभर श्रीमंतांच्या मुलांसाठी उपलब्ध आहे.
या कारणांमुळे आज सामान्य तरुणांमध्ये खूप निराशा आहे. निराशेमुळे खूप तरुण आत्महत्या करत आहेत. अनेक जण व्यसन व अपराध यात फसत आहेत. योग्य समज नसल्यामुळे मोठया प्रमाणात निवडणुकबाज सर्व पक्ष अनेक तरुणांना धार्मिक, जातीय, प्रांतीय झगड्यांमध्य गुरफटवत आहेत आणि त्यांना खऱ्या मुद्यांपासून दूर नेत आहेत.
आज या देशाच्या तरुणांसमोर एक ज्वलंत प्रश्न उभा आहे. शासक वर्गाच्या छळ-कपटापासून आणि भ्रम-भरकटवण्यांपासून मुक्त होऊन आम्ही भगतसिंहाच्या आव्हानावर कधी लक्ष देणार? भगतसिंह विद्यार्थ्यांना दिलेल्या संदेशात म्हणले होते की “सद्यःस्थितीत आम्ही तरुणांना असे सांगू शकत नाही, की त्यांनी बाॅम्ब आणि पिस्तुले हातात घ्यावीत. आज विद्यार्थ्यांसमोर यापेक्षाही अधिक महत्वाची कामे आहेत… क्रांतीचा हा संदेश तरुणांनी देशाच्या कानाकोपऱ्यात पोचवायचा आहे. गिरण्या-कारखान्यांची क्षेत्रे, शहरातील बकाल वस्त्या आणि खेड्यातील जीर्ण झोपड्या यामध्ये राहणाऱ्या कोट्यवधी लोकांमध्ये तरुणांनी क्रांतीची चेतना जागवली पाहिजे. त्यातूनच स्वातंत्र्य मिळेल आणि मग एका माणसाकडून दुसऱ्या माणसाचे होणारे शोषण अशक्य होऊन जाईल.” कुंठीतावस्थेत अडकलेला इतिहास युवकांच्या गरम रक्तरुपी इंधनाने पुन्हा गतिमान होऊ शकतो. यासाठी सामान्य जनतेच्या विचारी, साहसी आणि प्रत्येक प्रकारच्या बलिदानासाठी तयार असलेल्या मुला-मुलींना पुढे यावे लागेल. त्यांना केवळ एकजूट होऊन आपल्या प्रत्येक न्याय अधिकाऱ्यांसाठी झगडावेच लागणार नाही तर समाजात सुरू असलेल्या न्याय आणि अधिकारांसाठीच्या प्रत्येक संघर्षात सहभागी व्हावे लागेल. आपली हाडे मोडून घेत आणि रसातळातल्या अंधाराच्या नरकात जगत समाजाच्या पायाची निर्मिती करणाया कष्टकऱ्यांची त्यांना ना केवळ सेवा करावी लागेल, तर त्यांच्या जीवन आणि संघर्षांमध्ये मिसळून जावे लागेल.
‘नौजवान भारत सभेची’ स्थापना याच उद्देशाने करण्यात आली होती की ती देशभरातल्या तरुणांना संघटित करेल आणि एका नव्या क्रांतीची तयारी करेल. ‘नौभास’ त्या सर्व तरुणांना आपल्या सोबत जोडेल जे जातिवाद आणि धार्मिक कट्टरतेपासून मुक्त आहेत, जे कोणत्याही भ्रष्ट पक्षाचा झेंडा उचलत नाहीत, जे महिलांना पायातली चप्पल किंवा उपभोग्य वस्तू समजत नाहीत तर त्यांना आपल्या बरोबरीचा माणूस समजातात. ‘नौजवान भारत सभेचा’ प्रमुख नारा आहे, ‘सर्वांसाठी समान शिक्षण आणि सर्वांना रोजगार’. नौभासची मागणी असेल की ‘भगतसिंह राष्ट्रीय रोजगार हमी कायद्या’ अंतर्गत एकतर सरकार प्रत्येक काम करण्यायोग्य व्यक्तीला काम देईल नाहीतर प्रत्येकाला भरणपोषण योग्य असा बेरोजगारी भत्ता देईल. नौजवान भारत सभा आरोग्य, पाणी, इत्यादी लोकशाही अधिकारांसाठी लोकांना जागृत करेल आणि त्यांना प्राप्त करण्यासाठी संघर्षात उतरेल. नौजवान भारत सभा जनसहयोगाच्या आधारावर पुस्तकालये, अभ्यास मंडळे, प्रचार अभियाने, पत्रके, पुस्तके वगैरेंद्वारे तरुणांमध्ये एक नवी क्रांतिकारी प्रबोधन मोहीम निर्माण करेल आणि त्यांना वैज्ञानिक जीवनदृष्टी व इतिहास बोधाने सज्ज करेल. नौभास नशेबाजी, हुंडाप्रथा, जातिप्रथा, अस्पृश्यता आणि सर्व सामाजिक कुप्रथांविरोधात व्यापक प्रचार अभियान चालवेल.
साथींनो ,आता थोडासा उशिरदेखील आपल्या येणाऱ्या पिढ्यांसाठी खूपच घातक ठरेल. स्वातंत्र्याच्या ज्या रोपट्याला भगतसिंहांसारखा महान शहीदांनी आपल्या रक्ताने शिपलं होतं ते सुकू लागले आहे. या शहीदांची स्वप्ने आमच्या डोळ्यात डोकावत आहेत. चला, या शहीदांच्या स्वप्नातील भारत निर्माण करण्याच्या संघर्षात प्राणपणाने सामील होऊयात. हे पत्रक केवळ नौजवान भारत सभेचा परिचय नाही, तर आवाहन आहे कि तुम्ही नौजवान भारत सभेचे सदस्य बना आणि भगतसिंहांच्या विचारांना पुढे न्या.
उठ तरुणा जागा हो! शोषण मुक्त समाजाचा निर्माता हो!
क्रांतिकारी अभिवादनासह,
नौजवान भारत सभा
फेसबुक : www.facebook.com/nbsmaharashtra वेबसाइट : www.ma.naubhas.in
नौजवान भारत सभेची सदस्यता घेण्यासाठी संपर्क करण्याअगोदर जाहीरनामा नक्कीच वाचा. जाहीरनामा या लिंक वर ( http://ma.naubhas.in/manifesto ) मिळेल. नौजवान भारत सभा महाराष्ट्राचे सदस्य बनण्यासाठी खाली दिलेल्या क्रमांकांवर संपर्क करा तसेच सदस्यता घेण्यासाठी या लिंक (http://ma.naubhas.in/membership) वर जाऊन माहिती भरूनही अर्ज करू शकता.
मुंबई संपर्क – 9082861727, 9619039793 अहमदनगर संपर्क – 9156323976, 9156824706 पुणे संपर्क – 9422308125, 7798364729