देशात वाढती बेरोजगारी, शिक्षणाचा खर्च, विद्यार्थ्यांच्या वाढत्या आत्महत्या, शिक्षणाचे भगवेकरण अशा अनेक ज्वलंत प्रश्नांपासून विचलित करण्यासाठी एक जालीम उपाय म्हणून धार्मिक ध्रुवीकरणाचे वातावरण पसरवले जात आहे आणि देशातील तरुण अस्मितेच्या राजकारणाला बळी पडत चालले आहेत. या सर्वांच्या विरोधात नौभास द्वारे देशातील विविध राज्यांमध्ये विध्यार्थी आणि तरुणांमध्ये एक मोहीम चालवली जात आहे. त्याच अनुषंगाने, नौभास चे मुंबई युनिट, विविध महाविद्यालयांमध्ये देखील ही मोहीम राबवत आहेत, ज्याद्वारे तरुणांमध्ये ही जाणीव निर्माण केली जात आहे कि ज्या देशाचे स्वप्न भगतसिंह आणि त्यांच्या साथीदारांनी पहिले होते त्याच्या अगदी उलट स्थिती आपल्या देशात निर्माण झाली आहे.
सदर अभियानात आम्ही आपल्या क्रांतिकारकांचा वैचारिक वारसा आणि त्यांच्या स्वप्नातील भारत देश यावर चर्चा केली. त्यांना असा देश नको होता जिथे बहुसंख्य लोकसंख्या इतक्या भयावह परिस्थितीत जगत आहे की त्यांना दर दिवशी जगण्यासाठी संघर्ष करावा लागतो आणि दुसरीकडे काही मोजके धनदांडगे लोक ज्यांची कुत्री मांजरी सुद्धा हजारो रुपयांची बिस्कीट खातात. आपण सध्या जे काही तणावपूर्ण वातावरण, असमानता देशात पाहत आहोत त्याचीच चिंता आपल्या क्रांतिकारकांना होती. त्यामुळे समान आणि न्यायसंगत समाज निर्माण करण्याच्या लढ्यात सामील होणे हे तरुणांचे कर्तव्य आहे, त्यासाठी नौभास सक्रियपणे कार्यरत आहे.
या कार्यक्रमात बुक स्टॉल लावण्यात आला, गाणी, नाटक सादर केले गेले तसेच शैक्षणिक स्थिती व बेरोजगारी या विषयावर भाषण देण्यात आले. भाषणात देशातील सार्वजनिक शिक्षण व्यवस्थेवर चालू असलेल्या हल्ल्याबद्दल बोलले गेले होते, ज्यामध्ये केंद्र आणि राज्य या दोन्ही सरकारने नवउदारवादी धोरणे स्वीकारल्यापासून शिक्षणावरील खर्चात सातत्याने घट होत आहे. स्वातंत्र्यानंतर अनेक समित्यांनी शिक्षणावरील एकूण खर्च जीडीपीच्या किमान 6% असायला हवा असे सुचविले असताना, दरवर्षी शिक्षण निधीत कपात होत असल्याचे आपण पाहतो. उदाहरणार्थ, 1990-91 मध्ये केंद्र सरकारने 1.4% खर्च केला होता, तो आता 0.37% करण्यात आला आहे. प्रगतिशील आणि क्रांतीकारी साहित्याचा बुकस्टॉल देखील लावण्यात आला. पुस्तकांच्या स्टॉलवर क्रांतिकारांची विविध पुस्तके पाहून, अशा प्रकारचेही लेखन प्रकाशित झाले आहे याचे आश्चर्य विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये दिसले. ज्याने ते फक्त प्रभावित झाले नाहीत तर त्यांनी बुकस्टॉल लावण्यात हातभार लावला आणि पुस्तकांच्या मजकुरावर चर्चा देखील केली. ‘मेरा रंग दे बसंती चोला’, ‘आ रे नौजवान’ या क्रांतीकारी गाण्यांमधून विद्यार्थ्यांना संघर्षात सहभागी होण्याचे आवाहन नौभासच्या सदस्यांनी केले. सफदर हाशमींच्या “राजा का बाजा” या पथनाट्याचा एक भाग ज्यात बेरोजगार युवकाची नोकरी मिळविण्यासाठी धडपड दाखवली आहे, सादर केला गेला. विद्यार्थी म्हणाले की त्यांच्या कॉलेज मध्ये यापूर्वी कधीही अशा प्रकारचा कार्यक्रम आयोजित केला गेलेला नव्हता आणि भविष्यातही अशा कार्यक्रमात सहभागी होण्यास ते उत्सुक असतील.
नवीन शिक्षण धोरण 2020 चे उद्दिष्ट भविष्यात शिक्षणावरील खर्चात आणखी कपात करण्याचे आहे. सरकारी महाविद्यालयांना स्वायत्तता देण्यासारख्या सुधारणांमुळे शिक्षण संस्थांमध्ये फी वाढ होत चालली आहे. जरी विद्यार्थ्यांनी तांत्रिक अभ्यासक्रमात डिप्लोमा पूर्ण केला असला वा उच्च शिक्षण घेतले असले तरीही ते बेरोजगार तरुणांच्या रांगेत सामील होत आहेत. आयटीआय आणि पॉलिटेक्निक अभ्यासक्रमांची स्थिती वेगळी नाही, महाराष्ट्रातील अनेक संस्थांनी त्यांच्या अभ्यासक्रमांमधील रिक्त जागांची संख्या जास्त असल्याने ते बंद करण्याची मागणी सरकारकडे केली आहे. याचे कारण म्हणजे सार्वजनिक क्षेत्रातील अभियांत्रिकी उद्योगांमध्ये अशा तरुणांना नोकरी न देता उलट त्या कंपन्या सक्रियपणे कॉर्पोरेट्सना स्वस्त किमतीत विकण्याचा सरकारचा निर्णय आहे. अशा अभ्यासक्रमांमध्ये नोकरीच्या संधी फारच कमी आहेत आणि ज्याप्रकारे सरकारी संस्थांद्वारे हे अभ्यासक्रम चालवले जात आहेत ते “कमी आकर्षक” बनत चालले आहेत. विविध सरकारी विभागांमध्ये अनेक जागा रिक्त असताना बेरोजगारीचे संकट का आहे? उदाहरणार्थ, एकट्या रेल्वेमध्ये ३ लाख पदे रिक्त आहेत. अशा अनेक मुद्द्यांवर विद्यार्थी आणि शिक्षकांशी चर्चा करण्यात आली.
नौजवान भारत सभा सर्वांसाठी मोफत, दर्जेदार आणि समान शिक्षणाच्या मुद्द्यांवर सक्रियपणे काम करत आहे आणि प्रत्येकाला अनिवार्य रोजगार सुनिश्चित करण्यासाठी भगतसिंग राष्ट्रीय रोजगार हमी कायद्यासाठी संघर्षरत आहे. भगतसिंहांच्या स्वप्नांना साकार करण्यासाठी आमच्यासोबत या!

