नौजवान भारत सभा, मुंबई तर्फे “Bombay: Our City / हमारा शहर” चित्रपटाचे स्क्रिनिंग आणि चर्चा !!

नौजवान भारत सभेतर्फे शहीद भगतसिंह वाचनालय, मानखुर्द, मुंबई येथे दिनांक 10 सप्टेंबर रोजी आनंद पटवर्धन दिग्दर्शित Bombay: Our City माहितीपटाचे स्क्रिनिंग करण्यात आले. देशात होणाऱ्या G२० समिट आणि त्याच्या निमित्ताने लपवल्या जाणाऱ्या झोपडपट्ट्यांचे राजकारण समजून घेण्याकरता या माहितीपटाचे स्क्रिनिंग केले गेले होते. झोपडपट्टीत आणि फुटपाथवर राहण्याऱ्या लोकांचं आयुष्य दर्शविणारा हा माहितीपट आहे. शहरांना चकाचक करणाऱ्या कामगार कष्टकऱ्यांना कसे कोंबडीच्या खुराड्यासारख्या घरांमध्ये राहायला मजबूर केले जाते आणि जेव्हा पाहिजे तेव्हा त्यांच्या झोपड्यांना सरकारद्वारे तुडवले जाते ते ह्या माहितीपटात दाखविले आहे. मोठमोठाल्या इमारतींमध्ये राहणाऱ्या समाजातील तथाकथित उच्चभ्रू लोकं कसे शहरं उभारणाऱ्या कामगार-कष्टकऱ्यांना समाजातील कृमी-कीटक समजतात हे माहितीपट स्पष्ट दाखवते.

पुढे चर्चे दरम्यान मोदी सरकारद्वारे नाहक टेंभा मिरवल्या जाणाऱ्या G20 समिटच्या अध्यक्षपदाबाबत बोलले गेले की हे आळीपाळीने प्रत्येकाच्या वाट्याला येते, तर यात काहीच गर्वाची बाब नाही असे सगळ्यांचे मत होते. फक्त आणि फक्त निवडणुकांमध्ये मत मिळवण्याकरता, स्वतःची प्रतिमा अजून मोठी करण्याकरता असे भासवले जात आहे की प्रधानमंत्री मोदी यांच्यामुळे भारताला अध्यक्षपद मिळाले आहे. हे सर्व आंतरराष्ट्रीय संमेलने म्हणजे जगभरातील भांडवलदार वर्गाच्या नफ्याच्या वाटाघाटीच्या सभा असतात आणि जगाला आपापसात वाटण्यासाठी सर्व देशांचे प्रधान आणि सेंट्रल बँक चे गव्हर्नर या भेटी करतात. या संमेलनामध्ये सामान्य कष्टकरी जनतेचे मुद्दे गायब असतात. झोपड्यांना लपवणे, झाकणे म्हणजे स्वतःला लोक प्रतिनिधी म्हणवणाऱ्या नेते मंडळींना देशाच्या बहुसंख्य जनतेची लाज वाटते. जर हे लोकं खरेच जनतेचे प्रतिनिधी आहेत तर याचा अर्थ देशाच्या जनतेची लाज वाटणं म्हणजेच यांना स्वतःचीच लाज वाटते. पण सत्य तर हे आहे की हे तथाकथित नेते हे लोकप्रतिनिधी नसून भांडवलदार वर्गाचे प्रतिनिधी आहेत, आणि यांना सामान्य कष्टकरी जनतेची लाज नाही तर किळस आणि तिटकारा वाटतो. चर्चेदरम्यान झोपडपट्टी पुनर्वसन योजनेबद्दल पण बोलणे झाले की सर्व झोपडपट्टी पुनर्वसन योजना ह्या मोठ्या बिल्डरांना जमीन फुकटात देण्याच्या योजना असतात. लल्लुभाई कंपाऊंड, जिथे स्क्रिनिंग झाली, ही देखील स्वतः एक SRA वसाहत आहे.

नौभासतर्फे अशी अनेक कामं मुंबईतील मानखुर्द गोवंडी भागात केले जातात. नौजवान भारत सभेसोबत जोडून घ्या आणि एका समतामूलक समाजाच्या जडणघडणीत आपले योगदान द्या.

 

Related posts

Leave a Comment

16 + 19 =