शहीद चंद्रशेखर आझाद यांच्या जन्मदिनानिमित्त (23 जुलै) नौजवान भारत सभेतर्फे अभिवादन कार्यक्रम करून पदयात्रा काढण्यात आली.

आज शहीद चंद्रशेखर आझाद यांच्या जन्मदिनानिमित्त (23 जुलै) नौजवान भारत सभेतर्फे पुण्यातील दांडेकर पूल भागात अभिवादन कार्यक्रम करून पदयात्रा काढण्यात आली. सुरुवातीला साथी रवि यांनी चंद्रशेखर आझादांचे कार्य, क्रांतिकारकांचा वैचारिक वारसा, संघटनेची गरज यावर मांडणी केली. त्यानंतर साथी जय यांनी आजच्या परिस्थितीमध्ये क्रांतिकारक विचारांची प्रासंगिकता यावर भाष्य केले. त्यानंतर निघालेल्या पदयात्रेमध्ये नौजवान भारत सभेचे कार्यकर्ते, न्यायप्रिय जनता आणि शिक्षण सहाय्यता केंद्रातील मुले सहभागी झाली. घोषणा देत, भाषण करत, पत्रक वाटत पदयात्रा पार पडली. कार्यक्रमात नौभासाच्या सांस्कृतिक टीमने काही क्रांतिकारी गाणी सुद्धा सादर केली.

जीवनाच्या संघर्षात आणि रोजीरोटीच्या शोधात वणवण करता करता स्वातंत्र्यानंतरच्या पिढ्यांनी खूप काही बघितले, जाणले आणि भोगले आहे. त्यांनी जनतेच्या खऱ्या स्वातंत्र्यासाठी क्रांतिकारकांच्या सर्वोच्च बलिदानासोबतच भांडवलधार्जिण्या पुढाऱ्यांच्या तडजोडी देखील बघितल्या आहेत. त्यांनी सत्तासुख, निहीत स्वार्थ आणि भांडवालदारांची सेवा करण्यासाठी होणारे देशाचे धार्मिक विभाजन आणि दंगली सुद्धा बघितल्या आहेत. स्वातंत्र्यानंतर स्वतःच्या जमिनीवरून उध्वस्त होणारे कष्टकरी शेतकरी व मजूर बघितले आहेत. रोजगाराच्या शोधात वणवण भटकणारे तरुण बघितले आहेत. देशात भरपूर खाद्यान्न असताना सुद्धा भूक आणि कुपोषणाने होणारे मृत्यु बघितले आहेत. देशातील कष्टकरी जनतेची आजची पिढीसुद्धा त्याच समस्या, अडचणी व संघर्षांमध्ये गुंतलेली आहे जे अगोदरच्या पिढ्यांनी भोगले आहेत. उलटपक्षी आज जीवनाच्या समस्या अधिक जास्त जटील व गुंतागुंतीच्या झाल्या आहेत. असं का घडलं ह्याचा आपण कधी विचार केला आहे का? ज्या इंग्रजांच्या जाण्याने जनतेला आनंदी जीवन मिळणार होते, ज्यांच्या जाण्याने शेतकरी व मजुरांचे दिवस बहरणार होते, ज्या इंग्रजांच्या जाण्याने सर्वांना शिक्षण, आरोग्य, रोजगार यांचा अधिकार मिळणार होता, त्यांच्या जाण्यानंतरही सर्व जसेच्या तसेच का आहे? उलटपक्षी आम्हा कष्टकऱ्यांचे जीवन अधिकाधिक उध्वस्त का होत गेले?

स्वातंत्र्याच्या लढ्याचे नेतृत्व करणारी मुख्यधारा नेहमीच देशातील भांडवलदारांचे प्रतिनिधित्व करत आली होती. त्यामुळेच तिचा लढा देशातील सत्तेवर ताबा मिळवण्यासाठी, भांडवदारांच्या नफ्याचा वाटा वाढवण्यासाठी होता. म्हणून या लढ्याचे स्वरूप देशी भांडवलदार विरुद्ध साम्राज्यवाद असे होते. ही धारा समतामूलक समाज बनवण्यासाठी नव्हे तर मालक वर्गाच्या स्वार्थासाठी लढत होती.

परंतु शोषणाविरुद्ध, कष्टकऱ्यांच्या सत्तेसाठी व समतामुलक समाजासाठी कोणीच लढत नव्हते असेही नव्हते. ही लढाई लढत होते ‘हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन (HSRA)’ चे कार्यकर्ते, जिचे सदस्य भगतसिंह, राजगुरू, सुखदेव, भगवतीचरण वोहरा यांसारखे क्रांतिकारक होते. संघटनेचे कमांडर इन चीफ होते चंद्रशेखर आझाद.

सन 1931 भारताच्या क्रांतिकारी आंदोलनासाठी व देशातील कष्टकरी जनतेसाठी सर्वांत घातक ठरले! कारण 27 फेब्रुवारी 1931 रोजी इंग्रजांशी लढतांना आझाद शहीद झाले आणि त्यानंतर लगेचच 23 मार्च 1931 रोजी भगतसिंह, राजगुरू व सुखदेव यांना इंग्रज सरकारने फाशी देऊन भांडवलशाही, साम्राज्यशाही व प्रत्येक प्रकारच्या शोषणाविरुद्ध लढणाऱ्या खऱ्या योध्यांना आपल्या मार्गातून हटविले. या क्रांतिकारकांच्या बलिदानानंतर कामगार कष्टकऱ्यांची सत्तेची आशा थोडी धूसर झाली. पुढे देशातील एकंदरीत क्रांतिकारी लढे वैचारिक दिवाळखोरी, स्थितीशीलता आणि फुटीच्या गर्तेत अडकले. पण समाजात अन्याय व असमानता आहे तो पर्यंत क्रांतीच्या स्वप्नांना व क्रांतिकारकांना विस्मृतीत ढकलणे शक्य नाही. इंग्रजही चंद्रशेखर आझादांसारख्या क्रांतिकारकांना मारून त्यांच्या विचारांना संपवू शकले नाहीत. आजही त्यांच्या विचारांची मशाल क्षितिजावर दिशादर्शन करत प्रज्वलित आहे.

चंद्रशेखर आझाद यांचा जन्म कमालीची गरिबी, अशिक्षितता, धार्मिक कट्टरतेच्या वातावरणात झाला. आझाद पुस्तकं वाचून नाही तर राजकीय व वैयक्तिक संघर्षातील आपल्या सक्रिय अनुभवातून शिकून त्या क्रांतिकारी दलाचे नेते झाले ज्या दलाचे उद्दिष्ट फक्त इंग्रजांना देशातून हाकलवून लावणे एवढेच नव्हते तर एका शोषणविरहित समतामूलक समाजाची स्थापना करणे होते. कामगारांच्या सत्तेशिवाय आणि शोषणाच्या प्रत्येक रूपाचा विनाश केल्याशिवाय, देशातील कष्टकरी जनतेची मुक्ती शक्य नाही हे सत्य ते जाणून होते. जोपर्यंत आपल्या देशातील जनता देशी-विदेशी भांडवलदारांच्या नफ्यासाठी आपले रक्त वाहण्यासाठी मजबूर आहे, जोपर्यंत शिक्षण, आरोग्य, रोजगार, आवास यांपासून जनता वंचित आहे, जोपर्यंत भूक आणि कुपोषणाचा भस्मासुर कष्टकऱ्यांच्या बालकांना गिळत राहील, तोपर्यंत आमच्या क्रांतिकारकांचे स्वप्न आमचे ध्येय बनून राहील. ज्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी त्यांना आपल्या प्राणांचे देखील बलिदान द्यावे लागले, ते स्वप्न आम्ही जिवंत ठेवू.

साथींनो, आजचा काळ हातावर हात धरून आणि स्वतःच्या नशिबावर विश्वास ठेवून बसण्याचा नाही. कुणी अवतार पुरुष येऊन आपल्याला मुक्ती मिळवून देईल असेही नाही तर आपणच आपल्या एकीची शक्ती ओळखायला हवी. चंद्रशेखर आझादसारखे क्रांतिकारक देखील कष्टकरी पार्श्वभूमीतुन आले होते. त्यांनीसुद्धा मुंबईत मजुरी करून कितीतरी रात्री रस्त्यावर व फूटपाथवर व्यतीत केल्या होत्या. परंतु त्यांनी जीवनाच्या त्या संकटांपुढे गुडघे न टेकता जीवनाला अधिक सुंदर आणि अर्थपूर्ण बनविण्याचे जे स्वप्न पाहिले, जो संकल्प केला, त्यास पूर्णत्वाकडे नेण्याचा प्रयत्न शेवटच्या श्वासापर्यंत करत राहिले. कामगार-कष्टकऱ्यांनी ज्या हातांनी या भांडवली जगाच्या इमल्यांना उभे केले, ज्यावर भांडवलदार मिरवतात, त्याच हातांनी आता आपल्या शोषणमुक्त समतामूलक भविष्याला रचावे लागेल. नव्या जोमाने क्रांतिकारी आंदोलनाची सुरुवात करावी लागेल. इतिहासातील चुकांपासून धडा घेत, क्रांतिकारी संघटनेचा पाया रचावा लागेल. आपल्याला पुन्हा एकदा नव्या ऊर्जेने आणि नव्या आवेगाने आपल्या मुक्तीस्वप्नांना देशाच्या कानाकोपऱ्यात घेऊन जावे लागेल. शासक वर्गाच्या आपल्याला जाती,धर्म, प्रांत, भाषा यात विभागण्याच्या षडयंत्राविरुद्ध आपल्याला कामगार-कष्टकऱ्यांची वर्गीय एकजूट बनवावी लागेल. तेव्हाच आपण आपल्या शहिदांच्या स्वप्नांना पूर्ण करू शकू.

क्रांतिकारी अभिवादनासह
*नौजवान भारत सभा*

Related posts

Leave a Comment

seven + fifteen =