विद्यार्थी सर्जनशीलता शिबिर 2025 – पहिला दिवस
दि. 28 मे 2025 रोजी सिद्धार्थनगर, अहिल्यानगर येथे नौजवान भारत सभा यांच्या वतीने सहा दिवसीय विद्यार्थी सर्जनशीलता शिबिराची उत्साहपूर्ण सुरुवात झाली. गेल्या तीन वर्षांपासून सातत्याने आयोजित होणाऱ्या या शिबिराचे हे चौथे वर्ष असून यंदा एकूण 88 विद्यार्थी सहभागी झाले आहेत.पहिला दिवस चित्रकला या विषयास समर्पित होता. शिबिराची सुरुवात सकाळी 7 वाजता राजू म्याना सरांच्या पी.टी. सत्राने झाली. यानंतर उद्घाटन सोहळा पार पडला, ज्यात शहीद भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले आणि ‘ए भगतसिंग तू जिंदा है’ या गीताने वातावरण भारावले.
प्रज्ञा प्रभुलकर (मुंबई युनिट), राजू म्याना सर, समृद्धी वाकळे मॅडम व पुनम शेरकर मॅडम यांच्या उपस्थितीत शिबिराची भूमिका उलगडण्यात आली. राजू सरांनी अशा शिबिरांची सामाजिक गरज अधोरेखित केली.
चित्रकला कार्यशाळेमध्ये समृद्धी वाकळे मॅडम व पुनम शेरकर मॅडम यांनी विद्यार्थ्यांना चित्रकलेच्या मूलभूत तत्त्वांचे मार्गदर्शन करून सर्जनशीलता आणि जीवनाशी असलेली तिची नाळ स्पष्ट केली. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभागातून कल्पनाशक्ती आणि निरीक्षणशक्तीचे उत्तम चित्र रेखाटले.
आजच्या काळात शिक्षणाचे बाजारीकरण आणि कलाक्षेत्रातील कार्यशाळांचे खासगीकरण वाढताना आहे. अशा पार्श्वभूमीवर गरीब व कष्टकरी समाजघटकांतील विद्यार्थ्यांना सृजनशील शिक्षणाची संधी मिळावी, यासाठी हे शिबिर नौजवान भारत सभा (अहिल्यानगर) तर्फे आयोजित करण्यात आले आहे.
पुढील पाच दिवस विविध विषयांद्वारे विद्यार्थ्यांतील सुप्त कलागुणांना वाव देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
विद्यार्थी सर्जनशीलता शिबिर 2025 – दुसरा दिवस (29 मे)
नौजवान भारत सभा (नौभास), अहिल्यानगर तर्फे आयोजित विद्यार्थी सर्जनशीलता शिबिराचा दुसरा दिवस विज्ञान आणि हस्तकलेचा होता. दिनांक 29 मे 2025 रोजी पार पडलेल्या या दिवसाची सुरुवात सकाळी 8 वाजता राजू म्याना यांच्या ऊर्जावान पी.टी. सत्राने झाली. विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मकता आणि सक्रियता निर्माण करत, या सत्राने दिवसाची सुरुवात उत्साही केली.यानंतर विद्यार्थ्यांना उत्क्रांतीच्या सिद्धांताची ओळख करून देण्यासाठी एक माहितीपट दाखवण्यात आला. या माध्यमातून जीवसृष्टीच्या विकासाची प्रक्रिया सुलभ आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांसमोर मांडण्यात आली.
पुढील सत्रात नौभास, पुणे येथील सदस्य सुस्मित राव यांनी विविध वैज्ञानिक प्रयोगांचे प्रत्यक्ष सादरीकरण केले. या प्रयोगांच्या माध्यमातून भौतिकशास्त्र व रसायनशास्त्रातील मूलभूत संकल्पना विद्यार्थ्यांना सोप्या पद्धतीने समजावून सांगण्यात आल्या. हे सर्व प्रयोग विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उत्सुकतादायक ठरले.
तिसरे व अंतिम सत्र हस्तकलेसाठी राखीव होते. या सत्राच्या सुरुवातीला संगमनेर महाविद्यालयाचे प्राचार्य कडलग सर यांनी शिबिराला भेट दिली व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. नंतर या सत्रात शिक्षिका स्मिता म्याना यांनी विद्यार्थ्यांना कागदी कप व विविध कागदांच्या तुकड्यांपासून छोटेखानी टोपली तयार करण्याचे मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेचा उपयोग करून टोपल्या तयार केल्या. यासाठी लागणारे साहित्य त्यांना घरी नेण्यासाठीही देण्यात आले, जेणेकरून ते पुन्हा एकदा स्वतःच्या हाताने प्रयत्न करू शकतील.
अशा प्रकारे, विज्ञान व कला यांची सांगड घालत शिबिराचा दुसरा दिवस यशस्वीरीत्या पार पडला. विद्यार्थ्यांचा ज्ञान, कौशल्य व सर्जनशीलतेकडे झुकणारा कल या दिवशी विशेषत्वाने जाणवला.
विद्यार्थी सर्जनशीलता शिबिर 2025 – तिसरा दिवस (30 मे)
शुक्रवार, दिनांक 30 मे 2025 रोजी नौजवान भारत सभा, अहिल्यानगर यांच्यावतीने आयोजित विद्यार्थी सर्जनशीलता शिबिराच्या तिसऱ्या दिवशीची सुरुवात राजू म्यान यांच्या जोशपूर्ण पी. टी. सत्राने झाली. शारीरिक हालचालींच्या लयबद्धतेने आणि एकत्रित सहभागाने परिसरात नवचैतन्य पसरले.
यानंतरचा शिबिरातील सहभागी विद्यार्थ्यांनी सर्वांनी मिळून नाष्टा केला. मुलांनी आपापले डबे एकमेकांबरोबर तसेच शिबिरातील कार्यकर्त्यांबरोबर वाटून खाल्ले. गेल्या दोन दिवसांत निर्माण झालेल्या आपुलकीला या साध्या कृतीने अर्थपूर्ण अधोरेखा मिळाली.
या दिवशीचे मुख्य आकर्षण होते – मूर्तिकला सत्र.
शिल्पकार विकास कांबळे यांनी मुलांमधील सर्जनशीलतेला चालना देत शाडू मातीच्या साहाय्याने शिल्पनिर्मितीचे प्रशिक्षण दिले. गोलाकार, दंडगोल, अंडाकृती अशा प्राथमिक आकारांपासून सुरुवात करून सर्वांनी मिळून कल्पकतेने हत्तीची सुंदर शिल्पे साकारली.
कोणाच्या शिल्पात अंबारीच्या सजावटीतून सर्जनशीलता झळकली, तर कोणाच्या सोंडेच्या वळणांतून कल्पनाशक्तीचा प्रवाह दिसून आला. ही केवळ कलाकृती नव्हती – ती होती जीवनाकडे पाहण्याची मुलांची नवदृष्टी.
त्यानंतर सायंकाळी स्नेहसंमेलनाच्या तयारीचा एक भाग म्हणून नाटक, गाणी आणि नृत्य यांचा सराव पार पडला. मुलांनी हे कलाप्रकार फक्त सादर केले नाहीत, तर त्यामधून आपल्या जगण्यातील अनुभव, भावना आणि आशा साकार केल्या.
कामगार-कष्टकरी वर्गातील मुलांच्या आयुष्यात संधींचा मोठा अभाव असतो. बालवयातच त्यांना शिक्षणाऐवजी मजुरीचे ओझे वाहावे लागते. अनेकदा, हातात कुंचला येण्याआधीच कुदळ उचलण्याची वेळ येते. भांडवली व्यवस्थेच्या दडपणात सौंदर्य, संवेदना आणि वैज्ञानिक दृष्टिकोन या मूल्यांना स्थान मिळत नाही.
अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना सौंदर्यदृष्टी, सर्जनशील अनुभव आणि वैज्ञानिकतेचा संगम साधणारे शिबिरे ही काळाची अत्यंत गरज ठरतात. नौजवान भारत सभा अशा शिबिरांद्वारे मुलांमध्ये सर्जनशीलता, विचारशक्ती आणि सामूहिकतेचे मूल्य जोपासण्याचे कार्य सातत्याने करत आहे.
सर्जनशीलता म्हणजे फक्त कला नव्हे – ती प्रतिकाराचेही एक सामर्थ्य आहे. मुलांचे हात जेव्हा मातीला आकार देतात, तेव्हा ते केवळ शिल्प निर्माण करत नाहीत, तर नवसमाजाच्या पायाभरणीचे कार्यही करत असतात.
विद्यार्थी सर्जनशीलता शिबिर – 2025 : चौथा दिवस
दि. 31/5/2025 रोजी सिद्धार्थनगर, अहिल्यानगर येथे सहा दिवसीय विद्यार्थी सर्जनशीलता शिबिराचा चौथा दिवस यशस्वीरीत्या पार पडला.
शिबिराचा चौथ्या दिवशी पाचव्या दिवशीच्या सादरीकरण आणि समारोपाच्या कार्यक्रमात सादर करायचे नाटक, गीत, डान्सच्या तयारीची रंगीत तालीम करण्यात आली.
गॅदरिंग मध्ये सादरीकरण होणार यामुळे मुलांमध्ये प्रचंड आनंद आणि उत्साह दिसत होता.
विद्यार्थी सर्जनशीलता शिबिर 2025 : पाचवा दिवस
रविवार, 1 जून 2025 रोजी सिद्धार्थनगर, अहिल्यानगर येथे नौजवान भारत सभेने आयोजित केलेल्या सहा दिवसीय विद्यार्थी सर्जनशीलता शिबिराचा पाचवा दिवस यशस्वीरीत्या पार पडला. पाचवा दिवस हा विद्यार्थ्यांच्या कलात्मक अभिव्यक्तीला त्यांच्या पालकांपर्यंत पोहोचविण्याचा होता. या दिवशी विद्यार्थ्यांनी बनविलेल्या कलाकृतींचे प्रदर्शन व सांस्कृतिक सादरीकरण केले गेले आणि शिबिराचा औपचारिक समारोप करण्यात आला.
शिबिराच्या केवळ चार दिवसांच्या अल्पावधीत मुलांनी गाणी, नाटक आणि विविध नृत्याविष्कारांसारख्या विभिन्न कलाप्रकारांचा सराव केला आणि या दिवशी अगदी उत्साहाने सर्व सादर केले. समारोप आणि सादरीकरण कार्यक्रमाआधी विद्यार्थ्यांची सिद्धार्थनगरमधून जोशपूर्ण रॅली काढण्यात आली. अवघ्या सिद्धार्थनगर “सर्वांना मोफत, समान, दर्जेदार शिक्षण मिळालेच पाहिजे”, “इंकलाब जिंदाबाद” अशा घोषणांनी दुमदुमले होते.
त्यानंतर कार्यक्रमाची सुरुवात शहीद भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर मुख्य कार्यक्रमाला सुरुवात झाली. साथी अपेक्षा यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले आणि कार्यक्रमाची रूपरेषा मांडली. साथी अविनाश यांनी प्रास्ताविक केले, ज्यात सर्जनशीलतेची सामाजिकता व शिबिराची भूमिका स्पष्ट केली. त्यानंतर उपस्थित प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला—अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे विश्वस्त सचिव आटरे-पाटील, संगमनेर महाविद्यालयाचे प्रा. कडलग सर, पीस फाउंडेशनचे अर्शद भाई आणि मार्क्सवादाचे प्रचारक-प्रसारक कॉ. अभिजीत मीनाक्षी. त्यानंतर त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
सुरुवातीला “मेरा रंग दे बसंती चोला” या क्रांतिकारी गीताच्या सादरीकरणाद्वारे क्रांतिकारकांना स्मरण करण्यात आले. त्यानंतर विविध गाण्यांवर अनेक समूह नृत्य सादर करण्यात आले. सादरीकरणाच्या वेळी विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसत होता, तसेच कार्यक्रमाला उपस्थित पालकही मुलांचे सादरीकरण पाहून आनंदी होते. यासोबतच देशातील जनतेला आपसात लढवून आपल्या खऱ्या मुद्द्यांपासून भटकवण्यासाठी सांप्रदायिक अंधराष्ट्रवादी झगड्यांच्या आगीत तेल ओतणाऱ्या माध्यमांविरुद्ध प्रबोधन करणारे एक राजकीय-सामाजिक नाटक मुलांनी सादर केले.
हल्लीच्या नफाकेंद्रित व्यवस्थेतील खचित शिक्षणप्रणालीत विद्यार्थ्यांचे प्रगतीशील भरण-पोषण नव्हे तर शोषण होते. शैक्षणिक संस्था, विद्यालये इत्यादींच्या खाजगीकरणामुळे शिक्षणाचा दर्जा खालावला आहेच, शिवाय विद्यार्थ्यांच्या जिज्ञासेला व कलात्मक अभिव्यक्तीला शालेय पाठ्यक्रमापासून ते सामान्य दैनंदिन आयुष्यातही दाबले जाते. स्वप्ने उमलण्याआधीच दडपली जातात आणि विद्यार्थ्यांचे माणूस म्हणून भवितव्य अंधारात ढकलले जाते. विद्यार्थ्यांमधील जिज्ञासा जिवंत राहावी व त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा, या हेतूने नौजवान भारत सभा हे विद्यार्थी सर्जनशीलता शिबिर आयोजित करत आहे आणि हे कार्य सातत्याने व अधिक व्यापक पातळीवर सुरू ठेवण्यासाठी नौभास कटिबद्ध आहे.
विद्यार्थी सर्जनशीलता शिबिर 2025: सहावा आणि शेवटचा दिवस (सहल)
दि. 2 जून 2025, सोमवार – सिद्धार्थनगर, अहिल्यानगर येथे आयोजित सहा दिवसीय विद्यार्थी सर्जनशीलता शिबिराचा सहावा आणि शेवटचा दिवस “स्पेस ओडिसी” या तारांगणातील शैक्षणिक सहलीने साजरा करण्यात आला. या दिवशी विद्यार्थ्यांना असीम भौतिक विश्वाची ओळख करून देण्याचा उद्देश होता.
या सहलीतून चंद्र, तारे, ग्रह, सूर्य, आकाशगंगा आणि एकूणच अवकाशातील विविध घटकांची माहिती विद्यार्थ्यांना देणे, तसेच त्यामागील वैज्ञानिक स्वरूपातील सौंदर्याची जाणीव करून देणे, हा उद्देश होता. विज्ञानप्रदर्शन हे सहजसोपे आणि जिज्ञासा वाढवणारे प्रभावी माध्यम ठरते, याची जाणीव ठेवून ही सहल आखण्यात आली होती.
“आवकाशाचे विश्व उलगडणार” या कल्पनेने विद्यार्थ्यांमध्ये आधीपासूनच उत्सुकता होती. तारांगणात प्रवेश करताच त्यांनी “नक्षत्र-उद्यान” या विभागातील क्रीडासाहित्याचा मनसोक्त आनंद घेतला. नंतर निसर्गरम्य परिसरात मुक्तपणे वावरत त्यांनी सामूहिक भोजनाचा आनंद लुटला.
मुख्य दालनात केतकी मॅडम यांनी ग्रह, तारे, नक्षत्रे, आकाशगंगा यांसारख्या खगोलीय घटकांबद्दल सोप्या व सखोल भाषेत माहिती दिली. तसेच, रोजच्या जीवनात अशा निरीक्षणांची सुरुवात कशी करता येईल, हेही समजावून सांगितले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी 3D आणि 360° तंत्रज्ञानावर आधारित माहितीपट पाहिले. “नक्षत्रे” या माहितीपटात विविध नक्षत्रांचे आकार, वैशिष्ट्ये व प्रसिद्ध ताऱ्यांची ओळख करून देण्यात आली. “ब्रह्मांडाची आश्चर्ये” या चित्रपटात तारे, तेजोमेघ, ग्रह, आकाशगंगा आणि इतर खगोलीय घटकांचे सजीव चित्रण करण्यात आले. विशेषतः सॅटर्न ग्रहाच्या कड्यांचे दर्शन विद्यार्थ्यांसाठी विशेष आकर्षण ठरले.
त्यानंतर विद्यार्थी विज्ञानप्रदर्शन दालनात पोहोचले. येथे चंद्रयान, रॉकेट, हबल दुर्बिण, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक (ISS) यांसारख्या अंतराळ उपकरणांची हुबेहूब प्रतिकृती पाहायला मिळाली. तसेच ताऱ्यांचा जन्म व मृत्यू, चंद्रयान मोहिमा, अंतराळात राहणारे संशोधक यांचे अनुभव प्रत्यक्ष पाहता आले. हे अनुभव विद्यार्थ्यांना एका नव्या विश्वात घेऊन गेले.
संपूर्ण सहलीदरम्यान सर्वांनी हसत-खेळत वेळ घालवला. शिबिराच्या पहिल्या दिवसापासून शेवटच्या सहलीपर्यंत एकमेकांसाठी अनोळखी असलेली ही मुले आता एकमेकांचे जवळचे मित्र–मैत्रिणी झाली आहेत.
शिबिराच्या समाप्तीप्रसंगी विद्यार्थ्यांनी पहिल्या दिवसापासून सहलीपर्यंत काय काय शिकलो, याविषयी आपली मनोगते मांडली. तसेच नौजवान भारत सभेच्या भविष्यातील विविध उपक्रमांमध्ये सहभागी होण्याची उत्सुकताही त्यांनी व्यक्त केली.
“आकाशाकडे डोळे लावून पाहत निरीक्षण करणे” हे मानवाच्या जिज्ञासेचे केंद्रबिंदू प्राचीन काळापासून राहिले आहे. कालचे आपले पूर्वज असोत वा आजचे वैज्ञानिक, आकाशातील संकल्पनांना समजून घेण्याचा प्रयत्न सातत्याने चालूच आहे. विश्वाचे आकलन करणे, त्यामधील आपली जागा शोधणे आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून जगाकडे पाहणे, ही विज्ञानप्रक्रियेची मूलभूत अंगे आहेत.
मात्र, हे विज्ञान शिकण्यासाठी आवश्यक असणारे साधनसंपन्नतेचे, दर्जेदार शिक्षणाचे व आर्थिक स्थैर्याचे पर्यावरण कामगार–कष्टकऱ्यांच्या मुलांना अद्याप सहज उपलब्ध नाही. शिक्षणातील असमानता, महागड्या खाजगी शाळा, भाषिक अडथळे आणि विज्ञानातील भांडवली दृष्टिकोन यांमुळे ही मुले शालेय पातळीवरच विज्ञानापासून दूर लोटली जातात.
त्यामुळे त्यांच्या अंतर्गत जिज्ञासेला दडपले जाते, विवेकशीलतेचा विकास खुंटतो आणि नफाकेंद्री भांडवली समाजव्यवस्था योग्य व अपरिहार्य असल्याचा गैरसमज रुजवला जातो. वैज्ञानिक दृष्टिकोन टिकू नये म्हणून भांडवली विचारधारा कामगार–कष्टकऱ्यांवर सातत्याने दबाव टाकते. शिक्षणव्यवस्थाही भांडवलशाहीच्या प्रभावाखाली आपली भूमिका पार पाडत आहे.
आजचे राजकारण केवळ रोटी, कपडा, मकान या मागण्यांपुरते मर्यादित न राहता, ज्ञान, विज्ञान, संशोधन, पुनर्जागरण आणि नवसर्जनासाठी संघर्ष करणारे असणे आवश्यक आहे. शिक्षणव्यवस्थेची आणि समाजव्यवस्थेची पुनर्रचना, ही काळाची गरज आहे. जिथे विज्ञान हे नफ्याचे साधन न राहता समाजविकासाची दिशा ठरेल.
नौजवान भारत सभा अशा उपक्रमांद्वारे कामगार–कष्टकऱ्यांच्या मुलांमध्ये बौद्धिक मुक्ततेचा आणि वैज्ञानिकतेचा प्रवाह सतत सुरू ठेवण्याचे कार्य करते. सर्जनशीलतेला वाव देत, तार्किकतेचा प्रसार करत, “ज्ञानावर कुणाची मक्तेदारी नाही” हे ठामपणे सांगत, ज्ञान ही सामाजिक संपत्ती आणि सर्जनशीलता ही सामूहिक प्रेरणा आहे. हे शिकवण्याचे आणि रुजवण्याचे कार्य सातत्याने करीत आहे.
