धर्म आणि आपला स्वातंत्र्य संग्राम
‘किरती’च्या में, १९२८ च्या अंकात हा लेख छापला गेला. एप्रिलमध्ये अमृतसर येथे राजकीय परिषद आणि नौजवान भारत सभेची परिषद झाली होती. शहीद भगतसिंह आणि त्यांचे सहकारी यांच्यामध्ये धर्माच्या प्रश्नावर जोरदार विचारविनिमय झाला. हा लेख या समस्येवर प्रकाश टाकतो. स्वतंत्र भारताच्या संकल्पनेची रूपरेषा तेव्हा काहीशी स्पष्ट होऊ लागली होती. या संदर्भात जनतेचे ऐक्य आणि राष्ट्रीय एकता स्थापन करण्यासंदर्भात काही ठोस सूचना या लेखात दिलेल्या आहेत.
एप्रिल १९२८ मध्ये नौजवान भारत सभेच्या घोषणापत्रात, ज्याचे लेखन भगतसिंह आणि भगवतीचरण वोहरा यांनी केले होते, धार्मिकतेसंबंधी ठोस विचार मांडण्यात आले आहेत.
अमृतसरमध्ये दि. ११, १२, १३ एप्रिल १९२८ रोजी राजकीय परिषद झाली. त्यासोबतच युवकांचीही परिषद aसंपन्न झाली. दोन-तीन प्रश्नांवर मोठा विवाद व चर्चा झाली. त्यापैकी एक प्रश्न धर्माविषयी होता. वास्तविक, धर्माचा प्रश्न कोणीही उपस्थित केला नसता, परंतु धर्मांध संघटनांच्या विरोधात प्रस्ताव ठेवला गेला आणि धर्मांध संघटनांची बाजू घेणाऱ्यांनी धर्माची ढाल करून, स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला. खरे तर हा प्रश्न आणखी काही काळ दबून राहिला असता, परंतु अशा रीतीने तो समोर आल्याने त्यावर स्पष्ट चर्चा झाली आणि धर्माची समस्या सोडविण्याचा प्रश्नही उभा राहिला. प्रांतीय परिषदेच्या विषय समितीतही मौलाना जफर अली साहेबांनी पाच-सात वेळा ‘खुदा-खुदा’ असा उच्चार केल्यावर, अध्यक्ष पंडित जवाहरलाल यांनी त्यांना सांगितले की, या मंचावर येऊन ‘खुदा-खुदा’ म्हणू नका. तुम्ही जर धर्माचे मिशनरी असाल तर मी निधर्मीपणाचा (irreligion) प्रचारक आहे. त्यानंतर लाहोरमध्ये नौजवान सभेने या विषयावर एक बैठक घेतली. अनेक भाषणे झाली. धर्माच्या नावार लाभ उठविणारे व हा प्रश्न उपस्थित होताच भांडण होईल म्हणून घाबरणारे, अशा अनेक सद्गृहस्थांनी वेगवेगळ्या प्रकारचे प्रामाणिक सल्ले दिले.
पुन: पुन्हा सांगितला गेलेला सर्वात महत्त्वाचा मुद्दा ज्यावर श्रीमान भाई अमरसिंहजी झबाल यांनी विशेष जोर दिला तो म्हणजे धर्माचा प्रश्न उपस्थितच केला जाऊ नये हा. फारच चांगला सल्ला आहे. जर कोणताही धर्म समाजात लोकांच्या सुखशांतीमध्ये विघ्न निर्माण करीत नसेल तर त्याविरुद्ध आवाज उठवण्याची आवश्यकता का भासेल? परंतु प्रश्न हा आहे की आतापर्यंतचा अनुभव काय सांगतो? गेल्या आंदोलनातही हाच धर्माचा प्रश्न उभ राहिला आणि सर्वांना त्याविषयी स्वातंत्र्य देण्यात आले; इतके की अगदी काँग्रेसच्या मंचावरही आयते (कुराणातील वाक्ये) आणि मंत्र पठण केले जाऊ लागले. त्या काळात धर्मापासून अलिप्त राहणाऱ्या माणसाला चांगले समजले जात नसे. परिणामी संकुचितपणा वाढत गेला.
याचा जो दुष्परिणाम झाला तो कोणापासून लपून राहिला आहे? आता मात्र राष्ट्रवादी किंवा स्वातंत्र्यप्रेमी लोकांना धर्मांचे वास्तविक स्वरूप कळून आले आहे. आणि ते लोक धर्माला आपल्या मार्गातला अडसर समजू लागले आहेत.
प्रश्न हा आहे की धर्माला घरापुरते मर्यादित ठेवले तरी लोकांच्या हृदयातील भेदभाव वाढत नाहीत का? देशाने संपूर्ण स्वातंत्र्य प्राप्तीचे ध्येय गाठण्यावर धर्माचा काही परिणाम होत नाही? आजकाल संपूर्ण स्वातंत्र्याचे उपासक असलेले सद्गृहस्थ धर्माला बौद्धिक गुलामी म्हणतात. त्यांचे असे म्हणणे आहे की ईश्वर हा सर्वशक्तिमान आहे, मानव मात्र काहीच नाही, केवळ मातीची कठपुतळी आहे, असे मुलांना सतत सांगणे म्हणजे मुलांना कायमस्वरूपी कमकुवत बनवणे होय. त्यांची मानसिक शक्ती आणि त्यांचा आत्मविश्वासच नष्ट करणे आहे. तथापि, या विषयावर कोणताही वादविवाद न करता आणि आपल्यासमोर असलेल्या दोन सरळ प्रशनांचा विचार करायचा झाला, तरी धर्म हा आपल्या मार्गातील अडसर आहे, हेच आपल्याला दिसून येते. खरे तर सर्व लोक एक समान असावेत असे आपल्याला वाटते. त्यांच्यामध्ये भांडवलदारांच्या उच्चनीचतेची व स्पृश्य-अस्पृश्यांसारखी कोणतीही विभागणी नसावी. परंतु सनातन धर्म हा असा भेदभाव करण्याच्या बाजूने आहे. विसाव्या शतकातही पंडित मालवीयजीसारखे लोक भंग्याच्या मुलाकरवी हार घालून घेतल्यानंतर अंगावरील कपड्यांसहित स्नान करतात आणि अस्पृश्यांना जानवेसुद्धा घालू देण्यास नकार देतात. अशा धर्माविरुद्ध जर काहीच न बोलण्याची शपथ घेतली तर शांतपणे घरी जाऊन गूपचूप बसायला पाहिजे, नाहीतर धर्माला विरोध करावा लागेल. लोक असेही म्हणतात की या वाईट गोष्टींमध्ये सुधारणा झाली पाहिजे. फारच छान! स्पृश्य-अस्पृश्यतेला ज्या स्वामी दयानंदांनी नकार दिला तेसुद्धा चातुर्वर्ण्य ओलांडून जाऊ शकले नाहीत. भेदभाव आहे तसाच राहिला. गुरुद्वारांमध्ये जाऊन शीख ‘राज्य करेल खालसा’ असे गाणे गात असतील आणि बाहेर येऊन प्रातिनिधिक राज्याच्या गप्पा करत असतील, तर त्याला काय अर्थ आहे?
धर्म तर म्हणतो की इस्लामवर विश्वास नसलेल्या काफीरांना तलवारीने कापून काढले पाहिजे, आणि मग दुसरीकडे एकतेचा पुकारा केला तरी त्याचा परिणाम काय होणार? आम्हांला कल्पना आहे की आणखी उच्च तत्त्वे सांगणारी आयते व मंत्र वाचून व त्यांची ओढाताण करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. परंतु प्रश्न असा आहे की, या सर्व झगड्यातून सुटकाच का करून घेऊ नये? आमच्या समोर तर धर्माचा खडा पर्वत उभा दिसतो आहे. समजा भारतात स्वातंत्र्याची लढाई सुरू झाली आणि परस्परविरोधी सेना बंदुका सरसावून समोरासमोर उभ्या ठाकल्या आणि आता गोळ्या सुटणार एवढ्यात, कोणी महंमद घौरीबाबतची जी दंतकथा सांगितली जाते त्याप्रमाणे आजही आमच्यासमोर गायी, डुक्कर, ग्रंथसाहीब, वेद, पुराण आदी गोष्टी आणून उभ्या केल्या तर आम्ही काय करू? जर आम्ही पक्के धार्मिक असू तर आपापला गाशा गुंडाळून घरी जाऊन बसू. धर्मभावनेमुळे हिंदू-शीख गाईवर आणि मुसलमान डुकरावर गोळ्या झाडणार नाहीत. धर्म परायणवादी लोक अशा वेळेस सोमनाथच्या हजारो पंड्यासारखे ठाकूरांसमोर लोटांगण घालतील. बाकी लोक आपले धर्महीन किंवा अधर्मी काम साधून जातील. म्हणजे आपण कोणत्या निष्कर्षापर्यंत पोहचतो? धर्माविरुद्ध विचार करावाच लागतो. परंतु धर्माच्या बाजूने असलेल्या लोकांच्या दृष्टीने विचार करू गेल्यास ते म्हणतात की अशाने जग अध:कारमय होईल, सर्वत्र पाप वाढेल! खूप भले! आता याच बाबींचा विचार करू.
रशियन महात्मा टॉलस्टॉय यांनी आपल्या Essay and Letters पुस्तकामध्ये धर्मावर चर्चा करताना, धर्माचे तीन भाग सांगितले आहेत –
१) Essentials of Religion (धर्मातील सारतत्त्वे) : धर्मातील आवश्यक बाबी अर्थात सत्य बोलणे, चोरी न करणे, गरिबांना मदत करणे, प्रेमाने राहणे, इत्यादी.
२) Philosophy of Religion (धर्माविषयी तत्त्वज्ञान) : जन्म, मृत्यू, पुनर्जन्म, विश्वाची रचना या बाबींचे तत्त्वज्ञान. यात मानव आपल्या इच्छेनुसार विचार आणि आकलन करण्याचा प्रयत्न करतो.
३) Rituals of Religion (धार्मिक कर्मकांडे) : रीतिरिवाज, इत्यादींचा यात अंतर्भाव होतो.
याचा अर्थ हा की वरील पहिल्या मुद्द्याचा विचार केल्यास सर्व धर्म एक आहेत. सर्व म्हणतात सत्य बोला, खोटे बोलू नका, प्रेमाने राहा. या बाबींना काही सद्गृस्थांनी वैयक्तिक धर्म (Individual Religion) म्हटले आहे. या मुद्याबाबत संघर्ष करण्याचा प्रश्न उद्भवत नाही. खरे म्हणजे अशा प्रकारचे योग्य विचार प्रत्येक मानवाने आत्मसात केले पाहिजेत. दुसरा प्रश्न तत्त्वज्ञानाचा आहे. वास्तविक असे म्हणावे लागते की, Philosophy is the outcome of Human Weakness – म्हणजे तत्त्वज्ञान ही मानवाच्या कमजोरीची परिणती आहे. माणूस जिथपर्यंत पाहू शकतो तेथे कोणतेही भांडण नाही. परंतु जिथे माणसाला काही स्पष्ट दिसत नाही तिथेच डोके चालवणे सुरू केले जाते आणि विशिष्ट असे निष्कर्ष काढले जातात. खरे तर तत्त्वज्ञान ही फार आवश्यक गोष्ट आहे, कारण त्याशिवाय उन्न्ाती होऊ शकत नाही. तथापि, त्या सोबतच शांतताही अतिशय आवश्यक आहे. आमचे पूर्वज सांगून गेलेत की मृत्यूनंतर पुनर्जन्म होतो. ख्रिश्चन व मुसलमान ही गोष्ट मानत नाहीत. छान! आपापले विचार आहेत. या बसून चर्चा करू या, परस्परांचे विचार समजावून घेऊ या. पण जन्म-मरणाच्या प्रश्नावर, ‘मसला-ए-तनासुक’वर चर्चा होऊ लागली, तर आर्यसमाजी व मुसलमानांत लाठ्यांचा वर्षाव होऊ लागतो. गोष्ट अशी आहे की दोन्ही बाजूंनी आपल्या डोक्याला, बुद्धीला व विचार-आकलनाच्या शक्तीला टाळे लावून ते घरी बंद करून ठेवलेले असते. हे समजतात की ईश्वराने वेद असेच लिहिले आहे आणि तेच सत्य आहेत. यांनी विचार करण्याच्या शक्तीला खुंटीला टांगून ठेवलेले असते. तत्त्वज्ञान हे प्रत्येक व्यक्तीच्या व्यक्तिगत मतापेक्षा अधिक महत्वाचे मानले गेले नाही, तर विशेष तत्त्वज्ञान मानल्याने भिन्न गट तयार होणार नाहीत, मग यात कोणाची तक्रार असण्याचा प्रश्नच नाही.
तिसरी गोष्ट रीतिरिवाजांविषयी. सरस्वती पूजेच्या दिवशी सरस्वतीच्या मूर्तीची मिरवणूक काढणे आवश्यक आहे, आणि त्या मिरवणुकीच्या पूढे बँडबाजा वाजविणेही गरजेचे आहे. परंतु हॅरीमन रोडवरील रस्त्यात एक मशीदही येते. इस्लाम धर्म म्हणतो मशिदीसमोर बाजा वाजवण्यास मनाई आहे. मग, काय व्हायला हवे? नागरी स्वातंत्र्याचा हक्क सांगतो की बाजारातून जाताना बाजा वाजवला जाऊ शकतो; परंतु धर्माला हे मान्य नाही. यांच्या धर्मात गाईचे बलिदान आवश्यक आहे तर दुसऱ्या धर्मात गाईची पूजा करावी असे लिहिले आहे. आता काय करावे? पिंपळाची फांदी कापल्यावरही धर्माधर्मांत फारकत होत असेल तर काय करावे? हेच तत्त्वज्ञानावर व रितिरिवाजांवर आधारित छोटे-छोटे भेद पुढे जाऊन राष्ट्रीय धर्म (National Religion) बनून जातात व ते वेगवेगळ्या संघटना बनण्याचे कारण बनतात. परिणाम आपल्यासमोर आहेत.
म्हणून तिसऱ्या व दुसऱ्या मुद्द्यांसोबत अंधविश्वासचे मिश्रण म्हणजे जर धर्म असेल तर अशा धर्माची आम्हांला आवश्यकता नाही. त्याला आजच फेकून दिले पाहिजे. जर पहिल्या व दुसऱ्या मुद्द्यांमध्ये स्वतंत्र विचार मिळून धर्म बनत असेल, तर असा धर्म अभिनंदनीय आहे.
पण वेगवेगळ्या संघटना व खाण्यापिण्यातील भेदभाव संपवणे आवश्यक आहे. स्पृश्य-अस्पृश्य शब्दांना मुळापासून उखडून टाकायला हवे. जोपर्यंत आपण आपला संकुचितपणा सोडून एक होत नाही, तोपर्यंत आपल्यात प्रत्यक्ष एकता होऊ शकणार नाही. म्हणूनच वर लिहिलेल्या मुद्द्यांनुसार वाटचाल करतच आपण स्वातंत्र्याच्या दिशेने कूच करू शकतो. आपल्या स्वातंत्र्याचा अर्थ केवळ इंग्रजांपासून सुटका करून घेणे एवढाच नाही, तर ते संपूर्ण स्वातंत्र्याचे नाव आहे – ज्यात सर्व लोक परस्परांशी मिळून-मिसळून राहतील आणि बौद्धिक गुलामगिरीतूनसुद्धा मुक्ती मिळवतील.