भंडारा जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या नवजात शिशु अतिदक्षता विभागात आग लागून 10 बालकांचा मृत्यु झाला. सुरक्षा यंत्रणा नसतानाही या विभागाचे 2015 मध्ये उद्घाटन झाले होते. गेल्या पाच वर्षात भाजपा आणि आघाडी, दोन्ही सरकारांनी या रुग्णालयात सुरक्षा यंत्रणेच्या व्यवस्थेसाठी कोणतेही पाऊल उचलले नाही. दिवसेंदिवस आरोग्य सेवेत कंत्राटीकरण वाढवून, खाजगीकरण वाढवून, सरकारी दवाखाने खाजगी कंपन्यांच्या ताब्यात देऊन, खर्च कमी करुन सरकारी व्यवस्थेचे खच्चीकरण करुन, सरकारी आरोग्य व्यवस्था ‘खराबच’ असते अशी धारणा वाढवून खाजगी नफेखोर हॉस्पिटलचा धंदा वाढवण्याचे काम आज सर्व भांडवली पक्षांच्या सरकारांद्वारे केले जात आहे. मूलभूत सुविधांच्या व सुरक्षा यंत्रणेच्या अभावाने भंडारा येथे झालेले चिमुरड्यांचे मृत्यू अपघाती नसून सरकारी आरोग्य सेवेवर खर्च न करणाऱ्या, खाजगी हॉस्पिटलचा धंदा व्यवस्थित चालावा यासाठी सरकारी आरोग्य सुविधा मोडीत काढणाऱ्या, भांडवलधार्जिण्या राज्यव्यवस्थेने घेतलेले बळी आहेत. या घटनेच्या विरोधात सोमवार दि. 12 जानेवारी 2020 रोजी मांगीरबाबा चौक, दांडेकर पूल, पुणे येथे निदर्शने करण्यात आली. यावेळी उपस्थित जनतेला ‘दोषींना शिक्षा व पीडितांना न्याय’, ‘सर्वांना मोफत, समान आणि सुरक्षित आरोग्यसेवा’, ‘संपूर्ण आरोग्य व्यवस्थेचे राष्ट्रीयीकरण’, इत्यादी मागण्यांसाठी संघर्ष करण्याचे आवाहन करण्यात आले.
भंडारा जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या नवजात शिशु अतिदक्षता विभागात आग लागून 10 बालकांच्या मृत्यूचा घटनेचा निषेध करण्यासाठी निदर्शने
