राजस्थानातील जालोर येथील जातीय अत्याचाराच्या घटनेच्या विरोधात निदर्शने

नौजवान भारत सभा आणि अखिल भारतीय जाती विरोधी मंचाच्या वतीने आज पुणे येथे दांडेकर पुलाजवळ राजस्थानातील जालोर येथील जातीय अत्याचारातून इंद्र मेघवाल या दलित विद्यार्थ्याच्या संस्थाबद्ध हत्येविरोधात आंदोलन करण्यात आले. विद्यार्थी आणि युवक यावेळी आंदोलनात सहभागी झाले.
जालोर मध्ये इंद्र हा 9 वर्षाचा शाळकरी मुलगा शाळेत तहान लागली म्हणून एका मडक्यातून पाणी पिला. ते मडके त्याच्या एका जातीयवादी शिक्षकानुसार सवर्णांसाठी राखीव होते. मग जातीयवादी प्रतिक्रियावादी अहंकारातून त्या शिक्षकाने इंद्रला मारहाण केली. या मारहाणीमुळे झालेल्या दुखापतीतून त्याला बाहेर आणण्यासाठी त्याच्या आई-वडिलांना अनेक आठवडे अनेक हॉस्पिटल्सच्या चकरा माराव्या लागल्या, परंतु हे सर्व प्रयत्न कमी पडले आणि 13 ऑगस्ट रोजी त्याच्या मृत्यू झाला.
यावेळी अखिल भारतीय जाती विरोधी मंचाचे अभिजित यांनी मांडले की भांडवली-जातीयवादी मीडीया अनेक प्रकारच्या बातम्या देऊन या प्रकरणाची जातीय पार्श्वभूमी लपवण्याचा प्रयत्न करत आहे. तिथे मडकेच नव्हते, मुलगा आजारीच होता, अशा बातम्या दिल्या जात आहेत. दुसरीकडे पालकांनी शिक्षकच्या विरुद्ध तक्रार देऊ नये म्हणून दबाव असल्याचेही वक्तव्य दिले आहे. जातीय अत्याचाराच्या घटनांमध्ये नेहमीच दबावतंत्राचा, धाकदडपशाहीचा वापर होताना दिसला आहे. दलित विद्यार्थ्याला मारहाण करणाऱ्या शिक्षकाने विद्यार्थ्यावर अत्याचार केला आहे, हीच घटना अतिशय गंभीर आहे आणि एट्रोसिटीच्या गुन्ह्यास पात्र आहे.
यावेळी नौभासचे समन्वयक रवी पुर्णे यांनी मांडले की 75 वर्षांच्या स्वातंत्र्यानंतर अजूनही अस्पृश्यता शिल्लक आहे, आणि सर्वाधिक क्रूर अत्याचार गरीब कामगार कष्टकरी वर्गातून येणाऱ्या दलितांवर होताना दिसतात. देशात सामंती मालकी बदलून आता भांडवली मालकी स्थापित झाली आहे आणि कामगार वर्गीय दलितांवर होणारे अतिक्रूर अत्याचार भांडवली जातीव्यवस्थेने निर्धारित आहेत. कामगार कष्टकऱ्यांची वर्गीय एकताच आज जातीअंताकडे नेऊ शकते. दलित अस्मितेने संघटित होण्याने जातीवादामध्ये वाढच होत आहे.
शेवटी डॉ. निखिल एकडे यांनी कामगार कष्टकरी जनतेवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनांवर बोट ठेवत आज न्यायपूर्ण समाजाची निर्मिती करण्यासाठी वर्गीय एकजूट बनवण्याचे आवाहन केले. जातीअंत करण्यासाठी क्रांतिकारकांच्या विचारांना पुढे चालवत संघर्ष करणे गरजेचे आहे.
अखिल भारतीय जातीविरोधी मंच
नौजवान भारत सभा, पुणे

Related posts

Leave a Comment

17 + two =